Friday, 5 June 2015

शीतयुद्धाच्या भूमीवर

शीतयुद्धाच्या भूमीवर
सर्वच हसून-खेळून
असतात एकमेकांशी
अंतर राखून
करतात गुजगोष्टी
हस्तांदोलन, आलिंगन
आबादीआबाद आहे
असं जाहीर करणारे फोटो

मनात ठासलेला असतो
द्वेष आणि दुस्वास
पाठ वळताच धाडतात
बुलावे गारद्यांना
देतात शह एकमेकांना
एक-दुसर्‍याचा काटा
कसा काढता येईल
ह्या खलबतात
असतात मग्न
काटा काढल्यावर
पाळतात दुखवटा

इथे भेटण्यासाठी
इतकी वर्षं
साथसाथ चालण्याची
गरज नव्हती
पण भेटलो आहोतच
तर आता फोटो काढूया
गळ्यात गळे घालून
आणि टाकूया फेसबुकवर
लाईक करशील ना ?

1 comment:

  1. आवडली... एकूणात सगळ्यांच्याच मनात चाललेलं राजकारण? :)

    ReplyDelete