Thursday 31 August 2017

पंजाबातील डेरे आणि राजकारण


   पंजाबामध्ये एकूण १२ हजार गावं आहेत आणि ९ हजार डेरे आहेत. चंडीगडहून प्रकाशित होणार्‍या देशसेवक या पंजाबी वर्तमानपत्राने ह्यासंबंधातील सर्वेक्षण २००७ साली प्रसिद्ध केलं होतं. डेरा सच्चा सौदा चे बाबा राम-रहीम ह्यांनी शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंघ ह्यांची वेशभूषा केल्याने त्यावर्षी पंजाबात आणि अन्यत्र शीख समुदायांनी गदारोळ केला होता.
पंजाबला मी पहिल्यांदा भेट दिली २००७ साली. पंजाबातील शेती आणि शेतकरी ह्यांचा अभ्यास करण्यासाठी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने मला तिथे पाठवलं होतं. चंडीगडमधला माझा सहकारी इखलाख सिंग हा माझा पंजाबातील गाईड होता. पंजाबचा इतिहास, भूगोल आणि वर्तमानाची ओळख त्याच्यामुळे झाली.

    शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा कायदा आहे, त्या कायद्यानुसार या समितीच्या गुरुद्वारांची देखभाल व नियंत्रण केलं जातं, प्रत्येक गुरुद्वाराच्या निधीचा हिशेब ठेवला जातो, त्याचं लेखापरिक्षण होतं, समितीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुका होतात, समितीचा कारभार आदर्श आहे असं नाही पण कायदा, नियम यांचं नियंत्रण आहे. डेरा सच्चा सौदा किंवा अन्य कोणत्याही डेर्‍यांमध्ये अशी व्यवस्था नाही, करोडो रुपयांच्या व्यवहारांचा, मालमत्तेचा हिशेब नाही, अशी शब्दांत अनेक सरकारी अधिकारी (प्रामुख्याने शीख) आपली नाराजी मांडायचे.

   पंजाबातील विविध डेरे आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती ह्यांच्यामध्ये संघर्ष आहे.  ह्या डेर्‍यांचे भक्त वा अनुयायी ह्यांना गुरुद्वारांमध्ये स्थान नाही. कारण ह्यापैकी बहुतेक दलित वा अन्य मागासवर्गीय आहेत. गुरुद्वारांनी त्यांना जवळ केलं तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं इखलाख सिंग म्हणाला.
   
   २०११ च्या जनगणनेनुसार पंजाबमधील अनुसूचित जातींची लोकसंख्या ३१.९ टक्के आहे. हरयाणामध्ये २०.२ टक्के आहे. तर शेजारच्या हिमाचल प्रदेशात अनुसूचित जातींची लोकसंख्या २५.२ टक्के आहे. चंडीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. या शहरात अनुसूचित जातींची लोकसंख्या १७.५ टक्के आहे.  अनुसूचित जाती, अन्य मागासवर्गीय जातींबाबत केला जाणार्‍या सामाजिक भेदभावामध्ये डेरा संस्कृतीची पाळंमुळं आहेत. सामाजिक भेदभावाच्या विरोधातील विद्रोहाचं हे डेरे प्रतीक बनले आहेत.
      
    शीख धर्माचा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध आहे. भेदाभेद अमंगळ अशीच गुरु ग्रंथसाहिबाची शिकवण आहे. अमृतसरचं मंदिर म्हणजे हरमिंदर साहिबची उभारणी करण्यासाठी शीलापूजनाला लाहोरच्या एका सुफी संताला म्हणजे मुसलमानाला पाचारण करण्यात आलं होतं. गुरु ग्रंथ साहिबामध्ये जयदेव, नामदेव, कबीर, शेख फरीद अशा अनेक संतांच्या रचना संग्रहित करण्यात आल्या आहेत. लहंदा (पश्चिम पंजाब), ब्रज, खडी बोली, संस्कृत, सिंधी, पर्शियन अशा अनेक भाषांतील रचना या गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. बहुभाषिक आणि बहुपंथीय रचनांचा हा एकमेव धार्मिक ग्रंथ असावा. पण तरिही पंजाबात अस्पृश्यता पाळली जात होती. दलितांचे वेगळे गुरुद्वारा आहेत, जातीय शोषणही आहे. शीख म्हणजे शिष्य. अमृतधारी म्हणजे केस, कंगवा, कच्छ, कृपाण आणि कडं धारण करणारे शीख. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीवर या अमृतधारी शीखांचं वर्चस्व आहे. अमृतधारी शीख शाकाहारी असतात. खालसा ही संघटना गुरु गोविंद सिंघांनी स्थापन केली. मोगलांच्या अन्याय-अत्याचारांपासून रयतेचं संरक्षण करण्यासाठी राज करेगा खालसा ही घोषणा दिली. पाच क कारांचं पालन करणारे खालसा जनतेचे रक्षणकर्ते आहेत. मात्र शीख जातिव्यवस्था, अस्पृश्यता पाळू लागले, त्यांनी दलितांना गुरुद्वारात प्रवेश करायला मज्जाव केला, त्यामुळे वेगवेगळे डेरे निर्माण झाले, अशी कारणमीमांसा इखलाखने सांगितली.
    
    पंजाबामधील जातींची पाळंमुळं मध्य आशियातील विविध टोळ्या वा जमातींमध्ये आहेत असा दावा डॉ. बुद्ध प्रकाश या अभ्यासकाने पोलिटीकल अँण्ड सोशल मूव्हमेंटस् इन एन्शियंट पंजाब या ग्रंथामध्ये केला आहे. बधवार, बेदी ही आडनावं म्हणजे जाती असणारे समूह भद्र जमातीचे, बहल वा बहेल यांचं मूळ बाल्हिक जमातीमध्ये तर अरोडा वा अरोरा अरट्ट, अरास्ट्रक या जमातीचे, कांग म्हणजे कांग किऊ या जमातीचे, मेहरांचं मूळ मागा वा मगा जमातीत आहे. पंजाबातील जाती वा आडनावं आणि मध्य आशियातील जमातींची यादीच डॉ. बुद्ध प्रकाश यांनी सादर केली आहे. या यादीनुसार जाट म्हणजे यवनज वा आयोनियन. जाट हे मूळचे पशुपालक. सिंध प्रांतात ते शेळ्या-मेंढया, गाई-म्हशी आणि उंटांचे कळप घेऊन ते येत असत. पुढे ते सिंधू नदीच्या वरच्या अंगाला स्थलांतरीत झाले.  राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ते स्थायिक झाले. जाट मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसायात आहेत. जाटांची सर्वाधिक लोकसंख्या माझा या प्रदेशातली. माझा म्हणजे पंजाबातील मध्यवर्ती प्रदेश. पर्शियन भाषेत आब म्हणजे पाणी. पंच आब म्हणजे पंजाब. हा प्रदेश हिंदुस्थान आणि पाकिस्तान यामध्ये विभागला गेला आहे. सतलुज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या त्या पाच नद्या. या पाच नद्यांचा पंचनद पुढे सिंधुला मिळतो. हिमालयात उगम पावणार्‍या या बारमाही नद्यांमुळे पंजाब सुजलाम-सुफलाम आहे. वर्षाला दोन ते तीन पिकं घेतात इथले शेतकरी. या पाच नद्यांचा मध्यवर्ती प्रदेश म्हणजे माझा. माझा या पंजाबी शब्दाचा अर्थच मध्यवर्ती असा आहे. पंजाबची राजधानी होती लाहोर. ती माझा प्रदेशातच आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक ह्यांचं जन्मगाव, राय भोई की तलवंडी (आता नानकाना साहिब) हे लाहोरजवळ आहे.  
    
   पंजाबात जाटांच्या अनेक उपजाती आहेत. उदा. ओजला, ब्रार, इत्यादी आडनावं. जाट प्रामुख्याने शेतकरी आणि सैन्य दलात आहेत, तर खत्री उदा. अरोडा, व्यापार-उदीम, व्यवसायात आहेत. खत्री म्हणजे क्षत्रिय. पण पंजाबातील खत्री प्राचीन काळापासून व्यापार-उदीमात आहेत. शीखांचे सर्व दहा गुरू खत्री जातीचे आहेत. जाट असोत वा शीख वा राजपूत वा अन्य जाती, त्यांनी शीख धर्माचा स्वीकार केला आहे. ग्रंथ हाच गुरू अशी त्यांची श्रद्धा आहे. मूर्तीपूजा, मनुष्यरुपी गुरू वा प्रेषित वा अवतार ह्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही.
    
    ह्याउलट पंजाबातील डेरे. देहधारी गुरुशिवाय मुक्ती वा आध्यात्मिक साधना अशक्य आहे अशीच बहुतेक डेर्‍यांची धारणा आहे. निरंकारी मिशन, राधास्वामी, डेरा सचखंड, डेरा सच्चा सौदा, नामधारी असे अनेक डेरे पंजाबात आहेत. निरंकारी मिशनचं मुख्यालय दिल्ली इथे आहे. ते शीख नाहीत कारण त्या डेर्‍याच्या संस्थापकाचा दावा होता की तो जगद्गुरु आहे आणि त्याची पत्नी जगन्माता. मात्र निरंकारी शीख धर्माच्या अनुयायांना आपलंसं करतात. गुरु गोविंद सिंघांनी खालसा ची स्थापना करताना पंच प्यारे ही संज्ञा आपल्या  पाच निष्ठावंत अनुयायांना उद्देशून वापरली. एका निरंकारी गुरुने सात सितारे अशी कल्पना मांडली होती. राधास्वामी पंथाची धारणा अशी की राधा म्हणजे देह त्याचा स्वामी म्हणजे आत्मा. नामधारी स्वतःला शीख मानणारे आहेत पण ते कधीही शीख धर्माच्या मुख्य धारेत नव्हते असा शीखांचा दावा आहे. डेरा सच्चा सौदा म्हणजे राधास्वामी पंथाची शाखा आहे. एका डेर्‍यातून दुसरा डेरा निर्माण होत असतो.

   ह्या डेर्‍यांचे अनुयायी मतदानाच्या वेळी आपल्या आध्यात्मिक गुरुचा संदेश शिरसावंद्य मानतात. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी लोकनीती या संस्थेने (सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचा उपक्रम) केलेल्या मतदानपूर्व नमुना सर्वेक्षणात २३ मतदारांनी सांगितलं की ते कोणत्या ना कोणत्या डेर्‍याचे अनुयायी आहेत. या डेर्‍यांना भेट देणार्‍य़ा १३ टक्के लोकांनी नमुना सर्वेक्षणात सांगितलं की ते मतदान करताना डेर्‍याचा आदेश पाळतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे नेते आध्यात्मिक गुरुंचे उंबरठे झिजवतात. डेरा सचखंड बालन हा प्रामुख्याने रविदास समाजाचा डेरा आहे. २०१२ च्या निवडणुकांमध्ये या डेर्‍याने बहुजन समाज पार्टीला पाठिंबा दिला. परिणामी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली आणि शिरोमणी अकाली दल-भाजप युतीला सत्ता काबीज करणं शक्य झालं असं विश्लेषण अनेक अभ्यासकांनी केलं आहे.

   शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक समिती हा डेरा मानला तर त्यावर शिरोममी अकाली दलाचं वर्चस्व आहे. या समितीच्या अधिपत्याखालील गुरुद्वारे, तिथे दररोज चालणारी कारसेवा (लंगर वा सार्वजनिक भोजनासाठी शिधा गोळा करणं, सैपाक करणं, भांडी घासणं, इत्यादी) हा शिरोमणी अकाली दलाचा कार्यक्रम मानायला हवा. मतदारांशी एवढा दैनंदिन संपर्क कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. नेमकं हेच मॉडेल अन्य डेर्‍यांनी आपलंसं केलं आहे. त्यातून धर्म आणि राजकारणाची कॉकटेल पंजाब-हरयाणामध्ये तयार झाली आहे.

  महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ११.८ टक्के आहे. म. फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय चळवळी उभ्या राह्यल्या. त्यांचा आणि धर्माचा वा पंथाचा संबंध उरला नाही. अशा प्रकारची प्रगतीशील सांस्कृतिक वा राजकीय आंदोलनांची पंजाबातील परंपरा क्षीण आहे. खालिस्तानवादी दहशतवादी असोत की अन्य राजकीय प्रवाह, त्यांनी डेर्‍यांमार्फतच आपलं राजकारण पुढे रेटलं. 

  या राजकारणाला गती मिळाली ९० च्या दशकात. विविध बाबा, डेरे उपग्रह वाहिन्यांवर आपले कार्यक्रम सादर करू लागले. मांत्रिक, तांत्रिक, आध्यात्म, योग ह्यांचं पेव फुटलं. उदारीकरणामुळे आधुनिकतेचा कार्यक्रम समाजमानसात रुजला नाही. फक्त तंत्रज्ञानाच्या आयातीला प्रोत्साहन मिळालं. समोसा खाऊन कॅन्सरवर उपचार करता येतो असे बाष्कळ दावे करणारे बाबा उपग्रह वाहिन्यांवर दिसू लागले. सध्याची परिस्थिती अधिक भीषण आहे. प्राचीन भारतात अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होत असत त्याचं प्रतीक म्हणजे श्रीगणेश, असा दावा पंतप्रधान करतात. प्राचीन भारतातील विमानविद्या या विषयावर सायन्स काँग्रेसमध्ये निबंध वाचला जातो. अशा वातावरणात बाबा लोक गजाआड गेले तरी अवैज्ञानिक बाबा संस्कृतीला आळा घातला जाणार नाही. 

Sunday 27 August 2017

मॉन्सून आणि भारत - २

इरान, मिस्त्र, रोमा सब मिट गये जहाँसे
बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा

इराण, ईजिप्त आणि रोमन ही केवळ साम्राज्यंच नाही तर त्या संस्कृती लयाला गेल्या असं इक्बाल ह्यांना म्हणायचं आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही प्राचीन काळापासून सांस्कृतिक सातत्य आहे. मात्र चीनमध्ये भारतासारखी बहुप्रवाही वा सर्वसमावेशक संस्कृती निर्माण झाली नाही. 

चीनच्या भूगोलामध्ये त्याची कारणं असावीत. युवाल हरारी या इतिहासाच्या अभ्यासकाने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की चीनमधील यलो रिव्हर (पिवळी नदी)च्या किनार्‍यावर विविध छोट्या टोळ्या शेती करत होत्या. प्रत्येक टोळी नदीचा एका छोटा तुकडा सांभाळत होती. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यावर मात करणं त्यांना जमत नव्हतं. इतिहासाच्या एका टप्प्यावर या सर्व टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी नदीवर एकात्मिक नियंत्रण प्रस्थापित केलं. ह्या प्रक्रियेत चीन नावाच्या राष्ट्राची बीजं रोवली गेली.  ह्याच राष्ट्राचं पुढे राष्ट्र-राज्यात रुपांतर झालं. 

चीनच्या नकाशाकडे नीट पाहा. तिबेटचं पठार, उघ्युरचा निमवाळवंटी प्रदेश आणि गोबीचं वाळवंट यांनी चीन वेढला आहे. हे प्रदेश ओलांडून चीनवर आक्रमण करणं जवळपास अशक्य बाब होती आणि आहे. चीन पादाक्रांत करण्याचा एकच मार्ग आहे तो मांचुरियातून जातो. याच मार्गाने कोणे एके काळी चेंगीजखानने चीनवर आक्रमण केलं होतं. जपानही ह्याच मार्गाने चीनवर चालून गेला होता. हा एकमेव मार्ग वगळता चीन अजिंक्य राहील अशी भौगोलिक रचना आहे. 

वरील नकाशामधला मंगोल या नावाने दर्शवलेला भाग म्हणजे मंगोलिया आहे. तिथे गोबीचं वाळवंट आहे. तिबेट आणि गोबीचं वाळवंट वा मंगोलिया ह्यांच्या मधील प्रदेश उघ्युर. याच प्रांतातून जाणार्‍या मार्गाने चीनला मध्य आशिया आणि त्यानंतर युरोपशी जोडलं होतं. ह्या व्यापारी मार्गालाच रेशीम मार्ग म्हणत. उघ्युर आणि तिबेट हे चीनच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रदेश आहेत. तिबेटी वंश आणि संस्कृतीचे लोक वेगळे. उघ्युर प्रांतातील लोकांचं नातं तुर्कांशी आहे. हे दोन्ही प्रदेश आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी चीनला प्रचंड गुंतवणूक करावी लागते. पायाभूत सुविधांमध्ये आणि लष्करावर. हान चायनीज या नावाने दर्शवलेला प्रदेश म्हणजे चीनची मुख्य भूमी. मेनलँण्ड चायना. तेथील हान वंशीयांचं वर्चस्व हा चीनच्या राजकारणाचा गाभा राह्यला आहे. अगदी प्राचीन काळापासून आजतागायत. तिबेट, उघ्युर ह्या प्रांतामध्ये पायाभूत सुविधा, लष्कर, उद्योग इत्यादीमध्ये हान वंशींयांना सामावून घेण्यात आलं आहे. त्यांची लोकसंख्या या प्रांतांमध्ये वाढेल अशी धोरणं चीनने आखली. चीन राष्ट्र-राज्याची अर्थात हान वंशीयांची या प्रदेशावरील पकड भक्कम व्हावी यासाठीच अशी धोरणं आखण्यात आली आहेत. आजही चीनची सर्वाधिक लोकसंख्या मेनलँण्ड चायना वा चीनच्या मुख्य भूमीतच आहे. तिबेट आणि उघ्युर प्रांतात शेतीखाली फारशी जमीन नाही. कारण शेती करता येईल असं हवामान आणि भौगोलिक स्थिती या प्रांतांमध्ये नाही.  प्राचीन चिनी सम्राटांच्या परंपरेचं जतन आणि संगोपन करतच कम्युनिस्ट चीनचा साम्राज्यवाद आकाराला आला आहे.

चीन आणि भारत हे दोन्ही प्रदेश भूगोलामुळे जगापासून अलग पडलेले होते त्यामुळे या दोन्ही संस्कृतींमध्ये प्राचीन काळापासून सातत्य दिसतं.  भारतीय उपखंडात प्रवेश करणं दुष्कर नव्हतं परंतु एकदा का भारताच्या मुख्य भूमीत बस्तान बसवलं की परत फिरणं म्हणजे अनावश्यक त्रास, कटकटी आणि संघर्षाला सामोरं जाणं होतं. चीनच्या मुख्य भूमीत प्रवेश करणंच दुष्कर होतं. त्यामुळे तिथे एका वंशाच्या (वंश हे एक मानीव आहे. चीनच्या मुख्य भूमीवरील करोडो लोक आपल्याला एका वंशाचे मानतात हे वास्तव आहे) वर्चस्वाची संस्कृती आकाराला आली.



इक्बाल म्हणतो ती "कुछ बात" म्हणजे भारताचं हवामान आणि भूगोल, अर्थातच मॉन्सून असावा.

 परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमाँ का।
वो संतरी हमारा, वो पासबाँ हमारा।। सारे...
(आकाश वा नभांगण आमच्या हिमालयाचा शेजारी आहे. हिमालय आमचा द्वारपाल आणि पहारेदार आहे.) 

गोदी में खेलती हैं, उसकी हज़ारों नदियाँ।
गुलशन है जिनके दम से, रश्क-ए-जिनाँ हमारा।। सारे....
(त्याच्या कुशीमध्ये हजारो नद्या खेळतात, या नद्यांनी भिजवलेल्या खोर्‍‍यांचा हेवा स्वर्गालाही वाटतो.) 

ऐ आब-ए-रूद-ए-गंगा! वो दिन है याद तुझको।
उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा।। सारे...
(हे गंगा नदीच्या पाण्या, आठवतो का तो दिवस तुला जेव्हा आमचा तांडा तुझ्या किनारी विसावला. चीनमधील एकाही नदीच्या संबंधात अशी ओळ नसावी. ) 


असं सांगून इक्बाल निष्कर्ष काढतो--- 

कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।। सारे...
(कोणती तरी अशी बाब आहे की आमचं अस्तित्व नष्ट होत नाही, शेकडो वर्षं काळ आमचा शत्रू असला तरीही)

इक्बालला अभिप्रेत असलेली "कुछ बात" म्हणजे या भारतीय उपखंडाचा भूगोल आणि हवामान, अर्थातच मॉन्सून असणार. आपला दुःखांचा ठेवा (रहस्य) आपल्याला कुणाला वाटताही येत नाही आणि दुसर्‍या कुणालाही हे दुःख समजणारही नाही, असंही इक्बालने म्हटलं आहे. मॉन्सून हे काही रहस्य नाही. पण नेमेचि येणारा ह्या पावसाळ्यामुळे ओल्या, सुक्या दुष्काळाच्या छायेत भारतीय उपखंडातील कोणता ना कोणता प्रदेश सापडतोच.  वर्षातून दोन वा चार महिने पाऊस पडेल पण शेती बारा महिने करायची असते ही बाब या उपखंडाच्या हाडीमांशी खिळली आहे. आपल्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा केंद्रबिंदू मॉन्सून आहे.   


Monday 21 August 2017

मॉन्सून आणि भारत --१

राष्ट्र लोकांच्या हृदयात असतं.
त्या राष्ट्राचे आपण नागरीक आहोत अशी लोकांची धारणा असते. 
कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी मिळाली, त्या भूमीवर त्या राष्ट्राच्या नागरीकांचं शासन स्थापन झालं की ते राष्ट्र-राज्य बनतं. 

कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी असेल किंवा नसेलही. उदाहरणार्थ ज्यू लोकांच्या मनात इस्त्राईल नावाचं राष्ट्र होतं. त्या राष्ट्राला भूमी मिळाली दुसर्‍य़ा महायुद्धानंतर. त्यानंतर इस्त्राइल हे राष्ट्र-राज्य बनलं. 

कल्पनेतल्या राष्ट्राला भूमी असेलही पण त्या भूमीचं रक्षण करणारी सेना त्याच्याकडे नसेल. उदाहरणार्थ भूतान. 
ते राष्ट्र-राज्य आहे परंतु या राष्ट्राचे परदेश संबंध आणि सीमा यांची काळजी भारत घेतो. 

राष्ट्र हृदयात असतं, त्याचे आपण नागरीक आहोत अशी धारणाही लोकांमध्ये असते, त्या राष्ट्राला निश्चित भूगोलही असतो पण त्यावर त्या राष्ट्राच्या नागरीकांचं शासन नसतं. ते राष्ट्र परक्या राष्ट्राच्या ताब्यात असतं. उदाहरणार्थ तिबेट. तिबेट या राष्ट्राचं सरकार तिबेटच्या बाहेर आहे. तिबेटवर चीनचा ताबा आहे. 

ज्यू लोकांचं राष्ट्र म्हणजे इस्त्राईल ही ज्यू राष्ट्राची कल्पना होती व आहे. 

भूतानी लोकांचं-- वंश, भाषा, धर्म व संस्कृती एक असणार्‍या लोकांचं राष्ट्र म्हणजे भूतान, अशी कल्पना आहे आणि तसं राष्ट्र-राज्यही आहे. 

तिबेटी बुद्धधर्म, तिबेटी भाषा आणि तिबेट या प्रदेशात राहणार्‍या लोकांचं कल्पनेतलं राष्ट्र तिबेट आहे. 

भारतीयांची भारताबद्दलची कल्पना काय आहे? किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे, व्हॉट इज आयडिया ऑफ इंडिया?
१. अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक रंग, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक जाती आणि अनेक प्रदेशातील लोकांचं राष्ट्र. 
२. हिंदुंचं एकमेव राष्ट्र ज्यामध्ये जगातले अन्य धर्मही आहेत आणि अनेक पंथही आहेत. परंतु त्यांनी हिंदुंच्या छत्रछायेखाली आपण आहोत याची पक्की खूणगाठ बांधायला हवी.  
३. आर्य आणि द्रविड यांचं राष्ट्र. 
४. मूलनिवासींचं राष्ट्र ज्यामध्ये ब्राह्मणांचा समावेश नाही. 
५. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात मांडण्यात आलेली भारतीय राष्ट्राची कल्पना. 

अशी अनेक उत्तरं आजच्या घडीला दिली जातात. 

मॉन्सूनने निश्चित केलेला प्रदेश म्हणजे भारत वा इंडिया वा भारतीय उपखंड वा जंबुद्वीप वा हिंदुस्थान वा इंडिया, अशी माझी भारताची कल्पना आहे.  त्यामध्ये पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांग्ला देश, श्रीलंका आणि मालदीव ह्यांचाही समावेश होतो. कारण हे सर्व देश मॉन्सूनमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत. प्राचीन काळापासून या देशांचे एकमेकांशी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आपआपल्या नैसर्गिक साधनस्त्रोतांची, कौशल्यांची, भांडवलाची देवाण-घेवाण या देशांमध्ये प्राचीन काळापासून सुरू आहे. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, पारसी असे अनेक धर्म आणि भारतीय उपखंडातील विविध भाषा या सर्व देशांमध्ये आहेत.

भारतीय उपखंडाचा हा नकाशा पाहा. त्यामध्ये राष्ट्रांच्या सीमा नाहीत. 
पश्चिमेकडे सुलेमान, साफीद आणि हिंदुकुश पर्वतांच्या रांगा आहेत. या पर्वतरांगा दक्षिण-उत्तर आहेत. उत्तर दिशेला त्यांची उंची वाढत जाते. अखेरीस त्या काराकोरमला मिळतात. 
तिथे भारतीय हिमालय सुरु होतो. हिमालयाची पर्वतरांग पश्चिमकडून पूर्वेकडे जाते. पूर्वेला ती दक्षिण दिशेकडे वळते. त्याला म्हणतात आराकान. तिथून ती बंगालच्या उपसागरात घुसते. अंदमान-निकोबार बेटे म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांनी समुद्रातून वर काढलेली डोकी आहेत. 

तीन दिशांना पर्वतरांगा आणि उरलेल्या तीन दिशा समुद्राने वेढलेल्या असा भारतीय उपखंड एखाद्या किल्ल्यासारखा आहे. त्यामुळे या भूमीत प्रवेश करायचा तर पर्वतरांगा ओलांडून येणं भाग होतो. पर्वतरांगांच्या पलीकडून या भूमीवर राज्य करणं अशक्य होतं. कारण पर्वतरांगांमध्ये सैन्याची रसद तोडणं सहजशक्य होतं. १९६२ साली चीनने अरुणाचल प्रदेशातून तेजपूरपर्यंत धडक मारली परंतु अल्पावधीत माघार घेतली त्याचं कारणंही हेच आहे. आजही डोकलाम भागात भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे परंतु चीन आक्रमण करण्याची शक्यता कमी आहे त्यामागचं महत्वाचं कारण उत्तुंग पर्वतरांगा हे आहे. 

या अशा भौगोलिक रचनेमुळे झालं असं की जे कोणी पर्वतांपलीकडून भारतीय उपखंडात आले ते तिथेच स्थायिक झाले. समुद्रमार्गाने आलेले धर्म-- ख्रिश्चन, इस्लाम, पारसी, ज्यू, हे देखील स्थानिक बनले. अपवाद ब्रिटीशांचा. त्याचा विचार यथावकाश करू. 

तूर्तास पडणारा प्रश्न असा की पर्वतरांगा ओलांडून आलेले आक्रमक वा समुद्रमार्गाने आलेले व्यापारी वा अन्य समूह या देशात स्थायिक का झाले? त्याचं कारण मॉन्सूनमध्ये असावं. उत्तरेला लँण्डलॉक्ड वा जमिनीने रोखलेला जगातला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर ह्या हिंदी महासागराच्या शाखा आहेत. युरेशियाचं पठार आणि हिंदी महासागर ह्यांच्यामध्ये भारतीय उपखंड आहे. 
त्यामुळे मॉन्सूनचं चक्र निर्माण झालं. अतिप्राचीन काळापासून मॉन्सून चक्र अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे भारतात दोन ते चार महिने पावसाळा असतो. 

आणखी एक कारण आहे. ते म्हणजे तिबेट. 
तिबेट जे जगातील सर्वाधिक उंचीवरील --१६००० फूट, पठार आहे. तिबेटमधील शेकडो पर्वत शिखरं ७००० फूट उंचीची आहेत. तर १३ पर्वत शिखरं ८००० फूटांहून अधिक उंचीवर आहेत. उदाहरणार्थ माऊंट एव्हरेस्ट वा सगरमाथा. सर्वाधिक हिमनद्या-- सुमारे ३५,००० तिबेटमध्ये आहेत. म्हणूनच तिबेटला आशियाचा वॉटर टॉवर म्हणतात. तिबेटमध्ये उगम पावणार्‍या महत्वाच्या नद्या-- सिंधु, गंगा, ब्रह्मपुत्रा. त्याशिवाय यांगत्से, यलो रिव्हर या चीनमधील नद्यांचा उगमही तिबेटमध्येच आहे. या सर्व नद्या बारमाही वाहणार्‍या आहेत. 
सिंधु आणि गंगा नदीच्या सुपीक खोर्‍यांमुळे भारतीय उपखंडातील मोठ्या प्रदेशात-- नॉर्दर्न प्लेन्स वा उत्तरी मैदानं, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचं उत्पादन होत असे. युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या भारतीय उपखंडात आणि चीनमध्ये होती. या दोन देशांमधून जगाला पक्क्या मालाचा-- सुती व रेशमी कापड, चिनी मातीची भांडी आणि अन्नधान्याचा वा शेती उत्पादनांचा-- चहा, धान्य, मसाल्याचे पदार्थ, नीळ, इत्यादीचा पुरवठा होत असे. औद्योगिक क्रांतीपूर्व जग युरोप क्रेंद्रीत नव्हतं. उत्तरी मैदानं अर्थात सिंधु आणि गंगा खोर्‍य़ातील नद्यांचा प्रदेश वेद, रामायण, महाभारत यांची भूमी समजला जातो. बौद्ध आणि जैन धर्मांचा उदयही याच प्रदेशात झाला. 

आलं, लसूण, हळद, जिरे, धने, दालचिनी, जायफळ, वेलची इत्यादी मसाल्याच्या पदार्थांपैकी दालचिनी, जायफळ, वेलची, मिरे इत्यादी मसाल्याचे पदार्थ दक्षिणेकडील राज्यांत, म्हणजे पश्चिम आणि पूर्व घाटांच्या प्रदेशात विपुल प्रमाणात होते. ह्या मसाल्यांशिवाय उत्तरी मैदानातील खाद्य संस्कृती बेचव होईल. आणि दक्षिणेकडील सर्व राजांच्या सैन्यातील घोडे युरेशियातून सिंधू खोर्‍यामार्गे आणि नंतर अरबी समुद्रातून आले.

भारतीय उपखंडात प्रवेश केल्यानंतर एकही मोठा नैसर्गिक अडथळा -- नदी, उत्तुंग पर्वतरांगा, वाळवंट, इत्यादी नसल्याने विविध राज्यांच्या सीमा आकुंचन प्रसरण पावत. विविध वंश, रंग, समूह, भाषा ह्यांची सरमिसळ झाल्याने केंद्रीय सत्तेला त्यांच्याशी जुळवून घेऊनच राज्यकारभार करावा लागे. मुघलांपासून ब्रिटीशांपर्यंत सर्व शासकांना प्रदेशांच्या स्वायत्ततेला या ना त्या मार्गाने मान्यता द्यावी लागली. भारतीय राष्ट्र-राज्य हे संघराज्य आहे. परंतु अनेकदा तो विविध राज्यांचा संघ आहे असं वाटतं. उदाहरणार्थ जल्लीकट्टू या बैलाच्या खेळावरील बंदी केंद्र आणि राज्य सरकारला उठवावी लागली.

खालील नकाशे पाह्यले तर ही बाब अधिक स्पष्ट होईल. 






  



राष्ट्र-राज्याच्या सीमारेषा निश्चित असतात. पण राष्ट्र-राज्याच्या मर्यादांमध्ये राष्ट्राची कल्पना बसवण्याची गरज नाही. एका राष्ट्रात अनेक राष्ट्र-राज्यं असू शकतात अशी नवी मांडणी आपण रुजवायला हवी. तसं घडलं तर पाकिस्तान, भारत, श्रीलंका या तीन देशातील फुटीरतावादी धारणांना-- धर्म, भाषा, वंश, स्थानिक वा प्रादेशिक संस्कृती यावर आधारीत राष्ट्रवादाला शह देणं शक्य होईल.