Friday 25 November 2011

पंडित सत्यदेव दुबे : “ करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा...”


उस भविष्य में
धर्म-अर्थ र्‍हासोन्मुख होंगे
क्षय होगा धीरे-धीरे सारी धरती का
सत्ता होगी उनकी
जिनकी पूंजी होगी
जिनके नकली चेहेरे होंगे
केवल उन्हें महत्व मिलेगा
राज्यशक्तियां लोलुप होंगी
जनता उनसे पीडीत होकर
गहन गुफाओं में छिप-छिप कर दिन काटेगी

धर्मवीर भारती यांच्या अंधा युग, या नाटकाचा प्रारंभ, त्यांनीच रचलेल्या या विष्णु पुराणाने होतो. महाभारत युद्धाचे दिवस आहेत. कौरवांचा पराभव निश्चित झाला आहे. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी हटून बसला आहे. मित्र-शत्रू असा आपपर भेद न करता हे अस्त्र अवघ्या पृथ्वीला भस्मसात करणार आहे. या प्रमुख ताणाभोवती हे नाटक रचलं आहे. या नाटकाने भारतीय रंगभूमीला आत्मविश्वास दिला. आपल्या इतिहास-परंपरेत आपली मूळं घट्ट रोवून, आधुनिकतेला आपलंसं करता येतं ही जाण नव्हे तर दर्शन भारतीय रंगमंचालाच नाही तर साहित्य-संस्कृतीला या नाटकाने दिलं, असं म्हटलं जातं. शंभर वर्षांत एखादंच असं नाटक लिहीलं जातं, अशा शब्दांत गिरीश कर्नाड यांनी या नाटकाचा गौरव केला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पहिले संचालक, इब्राहीम अल्काझी यांनी या नाटकाचे खेळ दिल्लीतल्या फिरोजशा कोटला आणि पुराना किला या वास्तूंमध्ये सादर केले. १९६३ साली.

अंधा युग हे नभोनाट्य होतं. १९५३ साली ते आकाशवाणीने प्रसारीत केलं होतं. देशाची फाळणी करण्याचा निर्णय हीच घोडचूक होती, वेडाचार होता ही भूमिका मांडण्यासाठी लिहिलेल्या या नाटकाची व्याप्ती आणि खोली एवढी वाढली की अवघ्या विश्वाला कवेत घेण्याची क्षमता त्या संहितेत होती. या नाटकाचे प्रयोग आसामी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये झाले.  अल्काझी, रामगोपाल बजाज, एम.के रैना, मोहन महर्षी, रतन थिय्याम या श्रेष्ठ भारतीय रंगकर्मींनी या नाटकाचे खेळ आपआपल्या अर्थनानुसार देशात आणि परदेशात विविध वास्तूंमध्ये सादर केले.

अंधा युग विस्मृतीतच जाणार होतं. मात्र सत्यदेव दुबे नावाच्या रंगकर्मीने या नाटकाची क्षमता अचूक हेरली होती. नभोनाट्याला रंगमंचावर आणण्यासाठी नाटकाच्या संहितेवर ते दहा वर्षं काम करत होते. त्यावेळच्या मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईला क्रिकेटपटू होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आलेले दुबे, इब्राहिम अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये रमले. अल्काझी दिल्लीला गेल्यावर थिएटर युनिटचं नेतृत्व दुबेजींकडे आलं. अंधा युग ची संहिता त्यांनी अल्काझींनाही पाठवून दिली होती. दिल्ली आणि कोलकत्यातल्या हिंदी नाट्य महोत्सवात दुबेजींनी अंधा युग सादर केलं. दुबेजींनी केलेल्या या नाटकाच्या खेळात गुंगा सिपाही ही भूमिका राजेश खन्नाने केली होती तर अश्वत्थामा होता, नासीरुद्दीन शहा. दुबेजींचा प्रयोग अल्काझींनी पाह्यल्यानंतर या नाटकाने इतिहास घडवला.

असं युगप्रवर्तक नाटक शोधून काढणारे सत्यदेव दुबे यांच्याबरोबर माझी भेट ठरली 2004 साली. त्यांनीच मला फोन करून वेळ मागून घेतली आणि वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये भेटायला ये असं सांगितलं. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी पोचलो. दुबेजी माझीच वाट पाहात होते.
काय पिणार? त्यांचा प्रश्न.
रम.
किती पेग?
दोन पेग.
कोक?
नाही. लिंबू.
त्यांनी वेटरला मोठ्ठी ऑर्डर दिली. पाच पेग रम, दोन कोकाकोला, दोन लिंबू कापून. थंड पाणी. बर्फ नको. माझ्या प्रश्नांकित चेहेर्‍याकडे पाहून दुबेजींनी खुलासा केला-- सारखं सारखं त्याला बोलवायचं आणि ऑर्डर रिपीट करायची म्हणजे आपल्या बोलण्यात व्यत्यय येणार. त्यापेक्षा एकदाच काय ती ऑर्डर दिली की आपणही मोकळे आणि तोही.

मी रंगकर्मी नाही. २००४ साली एका प्रादेशिक मराठी दैनिकात मुंबईतील राजकारणाच्या बातम्या देणारा मी एक सामान्य पत्रकार होतो. नाटक सोडाच पण सिनेमाचाही मी चोखंदळ रसिक उरलो नव्हतो. दारूकामाचं सामान टेबलवर आल्यानंतर दुबेजी म्हणाले की त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणुक लढवण्याचं ठरवलंय, त्यासाठी त्यांना माझ्याकडून मार्गदर्शन हवं होतं. आजचा चार्वाक नावाचा एक दिवाळी अंक आम्ही चार-पाच मित्र काढत होतो. त्या अंकात दुबेजींनी मुलाखत द्यावी अशी विनंती करायला मी आणि सतीश तांबे त्यांना कधीतरी भेटायला गेलो होतो. मुलाखत मी घेणार नव्हतो. पण त्यावेळी त्यांनी माझा मोबाईल फोन नंबर त्यांच्या मोबाईल फोनमध्ये टिपून ठेवला होता. राजकारण कव्हर करणारा मी पत्रकार आहे, अशी नोंद त्यांनी करून ठेवली असावी. त्यामुळे असेल कदाचित् पण निवडणुकीला उभं राह्यचं मनात आल्यावर त्यांनी मला फोन केला. निवडणुका, लोकशाही, निवडणुक लढवण्यामागची त्यांची भूमिका या विषयावर दुबेजी सविस्तर बोलू लागले. रामराज्य परिषद, आरएसेस, भारतीय जनसंघ यापैकी कोणत्या तरी संघटनेत होते वा त्यांचा संबंध आला असावा, असं त्यांच्या बोलण्यावरून वाटलं. पण नंतर त्यांनी या संघटनांबद्दल नाराजी व्यक्त केली. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा प्रश्न अगदीच बोगस आहे, अशी टिपणी केली. मुसलमानांकडून आपण खूप गोष्टी शिकायला हव्यात, असं ते ठासून मांडत होते. उदाहरणार्थ, सध्या एड्स या रोगाचा प्रसार होत असताना, हिंदूंनीही सुंता करण्याचा गांभीर्याने विचार केला पाहीजे कारण त्यामुळे शिश्नाची त्वचा काहीशी निबर होते आणि समागम करताना तिला व्रण पडण्याची वा तिच्यातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता कमी असते, अशी दुबेजींची कारणमीमांसा होती.

आमची दुसरी मिटिंग एमआयजी क्लबमध्येच पण दुपारी झाली. अभिनय या विषयाच्या संबंधात ते आणि चेतन दातार यांची चर्चा सुरु होती. चेतनचं बोलणं दुबेजी लक्षपूर्वक ऐकत होते. चेतन बोलत असताना दुबेजी हळूवारपणे म्हणाले, थांब.
चेतन बोलायचा थांबला.
दुबेजी म्हणाले, श्वास घे.
चेतनने श्वास घेतला.
आता बोल.
चेतनने त्याचं वाक्य पूर्ण केलं.
सोड श्वास.
चेतनने श्वास सोडला.
काही मिनिटं हा सिलसिला चालू होता. चेतन त्याच्या मनात होतं तेच बोलत होता पण दुबेजींच्या श्वास-निःश्वासाच्या सूचना पाळत. श्वास, उच्छ्ःवास, निःश्वास या क्रियांचा बोलण्यावर, आवाजावर आणि अर्थातच अभिनयावर काय परिणाम होतो, त्याचा तो अभ्यास सुरु होता. गप्पा नेहमीप्रमाणेच या विषयावरून त्या विषयावर भरकटतच होतं पण श्वास, उच्छ्ःवास, निःश्वास यांची लय बदलली की आवाजात काय फरक पडतो यावर दुबेजी लक्ष ठेवून होते.

त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय ही बातमी कळल्यावर पत्रकारांचे त्यांना फोन यायला लागले. मुलाखत हवी म्हणून. दुबेजी म्हणायचे, मुलाखत घ्यायला केव्हाही या. पण पैसे किती देणार ते सांगा. वार्ताहर स्तंभित व्हायचे. पेड न्यूजच्या काळात, उमेदवारच मुलाखतीसाठी पैसे मागतोय त्यामुळे हैराण झाले. दुबेजींचं म्हणणं होतं, तुम्ही माझी मुलाखत छापणार वा प्रसारित करणार म्हणजे वाचक वा दर्शक यांना तुम्ही ती विकणार तर मला माझा वाटा मिळाला पाहिजे. मी फुकट मुलाखत कुणालाच देणार नाही. फुकट बातमी द्यायची असेल तर मी पत्रकार परिषद घेईन. दुबेजींना पैशाशी ना सोयर होतं ना सुतक. पण प्रश्न तत्वाचा होता. तिथे तडजोड नाही. आता हे तत्व कोणतं हा मोठा गहन प्रश्न होता. कोणत्या नाटकावर आपण काम करतोय म्हणजे विचार करतोय यावर ते बोलत होते. मध्येच मला म्हणाले, हे छापून टाक कुठेतरी, म्हणजे काय की ती मेधा पाटकर कोण, कशासाठी लढतेय हे मला काहीच माहीत नाही. पण एक बाई अशी लढतेय हे कळल्यावर मला समाधान वाटतं. तसंच कोणतं तरी काम करणार्‍या माणसाला नाटकातही एक माणूस त्याच्यासारखंच काही काम करतोय एवढं तर कळेल. तेवढं पुरतं.

मी आणि सतीश तांबे त्यांना भेटायला साहित्य सहवासमधल्या त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. चालताना काठी का तत्सम आधार लागायचा. त्यामुळे जिने चढता-उतरता येत नव्हते. त्यामुळे चेले, चाहते, मित्र या गोतावळ्याचं मिळून त्यांचं कुटुंब बनलं होतं. अर्थात तरिही ते राह्यचे एकटेच. आम्ही दोघे गेलो तेव्हा म्हणाले, आय कॅन मेक कॉफी आणि लंगडत स्वैपाकघरात गेले. कॉफीचा डबा उघडला तर पावडर संपलेली. त्यांनी शेजारी फोन केला आणि कॉफी आहे का विचारलं, त्यांच्याकडेही नव्हती. दुबेजींनी तात्काळ विनंती केलीआपल्या बिल्डिंगमधल्या अशा माणसाचा नंबर द्या की त्याच्याकडे कॉफी असेल.
संवादात ते कमालीचे तीक्ष्ण होते. अंकुर, निशांत, भूमिका, जुनून, कलयुग, आक्रोश,विजेता या चित्रपटांचे संवाद दुबेजींनी लिहिले आहेत. (अंकुर, भूमिका, विजेता आणि मंडी या चित्रपटांच्या पटकथाही त्यांच्या आहेत.) दुबेजी श्रेष्ठ रंगकर्मी. पद्मश्री, कालिदास सन्मान असे अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार त्यांना रंगभूमीला केलेल्या योगदानाबद्दल मिळाले आहेत. भूमिका या चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला तर जुनून या चित्रपटाच्या संवादासाठी फिल्मफेअर पारितोषिक मिळालं.

सतीश तांबेच्या एका कथेचं त्यानेच नाट्य रुपांतर केलं होतं. कथेचं नाव होतं-- बिनबायांच्या जगात ब्रह्मचार्‍याचं लग्न. मित्राचं लग्न ठरल्याबद्दल सुरु झालेल्या पार्टीत अनुभवी मित्र, वराला सल्ले द्यायला सरसावलेले असतात. कथेच्या शेवटी वाचकाला कळून चुकतं की स्त्रीचं लैंगिक सुख वा आनंद हा नेमका कशात आहे, हे पुरुष नावाच्या प्राण्याला कळलेलंच नाही. या कथेच्या नाट्यरुपाचं वाचन एका रविवारी दुबेजींच्या घरीच करायचं ठरलं. काही मित्रही आले. नाटक दुबेजी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. चर्चा नाटकापेक्षा साहित्यात वा नाटकात लैंगिकतेचं कसं चित्रण झालंय यावर सुरु होती. दुबेजींनी तर मोठं भाषणच दिलं पण ते सेक्स या विषयावर. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली चर्चा दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत चालली. निघताना दुबेजी सतीशला म्हणाले, नाटक चांगलं आहे पण त्याचं नाव बदल आणि पुन्हा लिहून काढ.

दुबेजींचं म्हणणं असं होतं की नाटक स्त्रीशिवाय असूच शकत नाही. नाटकात बाई हवीच. त्यामुळे तो विषय बरोबर आहे. ताण नीट पकडला आहेस पण स्त्री पात्र विरहीत असं नाटक नसतं कारण स्त्रीपात्र विरहीत जीवन नसतं. दुबेजींसाठी नाटक आणि जीवन वेगळं नव्हतं. मुलाखती दरम्यान एकाने त्यांना विचारलं की बरेच महिने दुबेजींनी नाटक केलं नव्हतं त्यामुळे ते अस्वस्थ आहेत का. दुबेजी उत्तरले, नाटक केलं नाही की सर्वात मोठा प्रॉब्लेम सेक्सचा होतो. सेक्स मिळत नाही ना. तो पत्रकार अवाक् झाला त्याने विचारलं, पंडीतजी हे उत्तर छापू का असंच्या असं. हो, जे बोललो ते छापण्यासाठीच बोललोय, दुबेजी उत्तरले. त्यांच्या नाटकांचे फक्त पाच-सात प्रयोगच का होतात, असं मी एकदा त्यांना विचारलं तर निरागसपणे ते उत्तरले, पाच-सात प्रयोग झाल्यावर मला क्लायमॅक्सच येतो. विविध अभिनेत्रींबरोबर नाटकात काम करणं वा  आपल्या नाटकाच्या कामात स्त्रियांना गुंतवणं ह्यातच त्यांचं लैंगिक वा शाररीक सुख सामावलेलं होतं. नाटक हाच त्यांचा सेक्स होता.

दुबेजींनी लिहीलेल्या एका नाटकाच्या वाचनाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. नाटकातली मध्यवर्ती भूमिका वा नायक, दुबेजींच्याच व्यक्तिमत्वावर बेतला होता. दुबेजींच्या जीवनातल्या ताण-तणावांचंच ते नाटक होतं. नाटक वाचून झाल्यावर दुबेजी म्हणाले, इतकी वर्षं नाटकात काढल्यावर इतका बेशरम झालोय की आता तुम्ही काहीही टीका करा, मी ऐकतो. त्यानंतरच्या चर्चेत कोणी प्रश्न विचारला तरच ते उत्तर देत होते. बाकी टीका, टिपण्णी, स्तुती, कौतुक उत्सुकतेने ऐकत होते. दुबेजींची जीवनविषयक दृष्टी त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधूनच अतिशय समग्रपणे व्यक्त होते. अभिव्यक्तीचं त्यांचं माध्यम नाटक हेच होतं. त्या नाटकाचा नायक रंगकर्मीच आहे पण सरकार, उद्योगपती वा अन्य कोणतीही संस्था यांच्या आर्थिक मदतीशिवाय तो नाटकं करत असतो. जवळचे मित्र, मैत्रीणी यांच्याकडे हक्काने पैसे मागून तो नाटकाचे खेळ करत असतो. ते त्याला कधी हिशेब विचारत नसतात की तो कोणाला कधी हिशेब देत नसतो. त्याचं जीवन छानछोकीचं वा सुखवस्तु नसतंच कारण नाटकाशिवाय तो अन्य काहीच करत नसतो. त्याला ना कपड्यालत्त्याचा षौक असतो, ना गाडीघोड्याचा, ना घरादाराचा. त्याला ना बायको असते, ना कुंटुंब. त्याला फक्त नाटक असतं आणि या नाटकाने जोडले गेलेले मित्र-मैत्रीणी. नाट्यकर्मी म्हणून तो श्रेष्ठ असतो पण नाटकाला, रंगभूमीला निर्णायक वळण देता येईल अशा एखाद्या संस्थेच्या संचालकपदी त्याची वर्णी लागलेली नसते. त्याला सदा हातातोंडाची मिळवणी करतच नाटकं करावी लागलेली असतात. या नायकाला एका मोठ्या संस्थेच्या संचालकपदाची ऑफर आलेली असते. कथानकात अन्य ताण-तणावही आहेतच. ही ऑफर त्याने स्वीकारावी की नाही, या विषयाभोवती ते नाटक फिरतं. तो अर्थातच ती ऑफर नाकारतो. हिंदी भाषेतले कादंबरीकार अमृतलाल नागर यांनी आपल्याला काय सांगितलं होतं हे आपल्या मित्रांना नायक सांगतो. जब पैदा हुआ था तो एक बंदा रुपया था मेरे पास, बचपनेमें एक चवन्नी चली गयी, जवानी के नशे में और एक चवन्नी गँवा बैठा. शादी होने के बाद, घर-गृहस्थीमें तिसरी चवन्नी भी चली गयी. अब एक चवन्नीही बची हैं, और मरते दम तक उसे नहीं छोडूंगा. अमृतलाल नागर हे वाक्य दुबेजींशीच बोलले होते. ते वाक्यच दुबेजींनी आपल्या नाटकात आपलीच भूमिका करणार्‍या पात्राच्या तोंडी टाकलंय. नाटक असेल वा अन्य कोणती कलाकृती वा संस्कृती ही कोणाच्या स्पॉनरशिपमधून उभी राहात नसते तर सर्जनशीलतेची कदर करणार्‍या प्रेमाच्या माणसांच्या आधाराने कलाकृती, कलाकार आणि संस्कृती घडत असते, अशी दुबेजींची धारणा होती. त्या धारणेनुसारच ते जगत होते.

या नाटकाचेही आठ-दहाच प्रयोग झाले. नेमका त्याच सुमारास मी मुंबईत नव्हतो त्यामुळे मला ते पाह्यला मिळाले नाहीत. एका खेळाची आठवण मित्राने सांगितली. पडदा उघडतो आणि डिपंल खन्नाच्या मुलीचा डान्स सुरु होतो. घमासांग म्युझिक आणि नृत्य. अचानक ते थांबतं. नर्तकी विंगेत जाते. मग निवेदकाचा आवाज. पाह्यलात नाच, आता नाटक पहा. हे भन्नाट होतं. तुम्हाला हे सुचलं कसं असं मी दुबेजींना विचारलं. मुंबईत कुठेही वेळेवर पोचणं कठीण असतं. ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी, ट्रॅफिक, गर्दी. त्यातून माझ्या नाटकाला येतात मोजके प्रेक्षक. चार-दोन मिनिटं होणारच इकडे-तिकडे. नेमकी सुरुवातच चुकवली अशी हुरहुर त्यांना वाटायला नको. उशीरा आलेले प्रेक्षक रांगातून सरकायला लागले की वेळेवर आलेल्या प्रेक्षकांचे चेहेरे आंबट होणार. त्यापेक्षा नाच टाकला की वेळेवर आलेले आणि येऊ न शकलेले, दोघांचीही सोय होते, असं दुबेजी म्हणाले. दुबेजींना नाटक म्हणजे केवळ लेखक वा दिग्दर्शकाचं असतं असं वाटतच नव्हतं. त्यांच्या दृष्टीने नाटक हे समूहाचंच असतं. नाटककाराने लिहीलं असेल नाटक पण त्याला ते संपूर्णपणे कळलं असेलच असं नाही. नाटकाचं वाचन करून, प्रेक्षक, रंगमंच, नाट्यगृह असे अनेक घटक लक्षात घेत त्यात बदल करायचेच असतात, अशीच त्यांची धारणा होती.

सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला दुबेजी कोसळले. त्यांना पृथ्वी थिएटरमधून हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. ते कोमात गेल्याचं कळलं. त्यांचे मित्र-मैत्रिणी, चेले, चाहते यांचा परिवार मोठा आहे. वेळापत्रक ठरवून त्यांची देखभाल केली जातेय. कोमात असलेल्या दुबेजींसाठी नाट्यवाचनही केलं जातंय. दुबेजींच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा वा नोंद करणारा ग्रंथ शांता गोखले यांनी संपादीत केला. ऑक्टोबर महिन्यातच तो प्रसिद्ध झाला. दुबेजी कोमात असताना. नोव्हेंबरच्या २२ तारखेपर्यंत म्हणजे हा लेख लिहितानाही ते कोमातच आहेत असं समजलं. डॉ. आनंद जोशी यांनी कोमाच्या स्थितीविषयी एक लेख लोकसत्तेत लिहिला होता. त्यांनी म्हटलं होतं की कोमाच्या स्थितीत असलेल्या काही पेशंटना आपल्या मनात आणि शरीरात काय चाललंय हे कळत असतं, आसपासच्या हालचाली आणि ध्वनींचंही ज्ञान होत असतं पण शरीराद्वारे ते कोणताही प्रतिसाद देऊ शकत नसतात. दुबेजी अशा अवस्थेत असतील तर नक्कीच त्रिशंकू नावाचं नाटक लिहिण्याच्या कामाला लागले असतील. या नाटकाच्या वाचनाला अमक्यातमक्या दिवशी, अमक्यातमक्या ठिकाणी ये, या त्यांच्या एसएमएसची मी वाट पहातोय.



Monday 19 September 2011

कालचा सामना मी पाह्यला नाही...

रुस्तुम, माझा मुलगा चेल्सीचा फॅन आहे. मी फुटबॉलचे जेवढे सामने टिव्हीवर पाह्यले त्यापैकी सर्वाधिक चेल्सीचे आहेत. बलाक, ड्रोग्बा, अनेलका, मलुदा, टेरी, लॅम्पार्ड या खेळाडूंच्या शैलीची ओळख झाली.


माझा आवडता खेळाडू अनेलका. कल्पकता आणि कलात्मकता हे त्याचं बळ. त्यामुळे अनेलकाकडून चुका फारशा होत नाहीत. बलाक आता चेल्सीमध्ये नाही. पण तो मिडफिल्डला असताना खेळाचं सूत्रसंचालन अचूकपणे करायचा. प्रतिस्पर्ध्याच्या पायातला चेंडू सहजपणे त्याच्या पायात यायचा. बलाक धिप्पाड असल्याने पायासोबत डोक्याचा वापर करण्यातही वाकबगार होता. लॅम्पार्ड म्हणजे धीराचा आदर्श. मागच्या विश्वचषकीय स्पर्धेत तो इंग्लडकडून खेळत होता. त्यावेळी त्याने ठोकरलेला चेंडू गोलपोस्टच्या दांडीवर आपटून आतमध्ये एक टप पडला. गोल झाला होता. पण धावपळीत पंचाचं लक्ष गेलं नाही. लॅम्पार्ड केवळ एक क्षण हिरमुसला आणि दुसर्‍या क्षणी धावू लागला. चेल्सीचा कॅप्टन टेरी. मिडफील्डवरून बचावाच्या फळीपर्यंत मागे सरकत आला तरिही नेतृत्व त्याच्याकडेच राह्यलं. मलुदा गेल्या काही वर्षात स्ट्रायकर म्हणून पुढे येऊ लागला. ड्रोग्बा हा चेल्सीचा हीरो. वेग, शक्ती आणि अष्टावधान यामुळे गोल करण्याची संधी तो क्वचितच् चुकवतो. चेल्सीचा गोलकीपर चेक सर्वांवर कडी करणारा. पेनल्टी कीकही चेक अडवू शकतो असा टीमला भरवंसा असतो.

क्लबांच्या सामन्यात प्रेक्षणीय खेळाला महत्व असतं. विश्वचषक स्पर्धेत राष्ट्रीय भावनेला अधिक महत्व येतं. त्यामुळे ब्राझील वा दक्षिण अमेरिकेतील देशांचे संघ आणि अर्थातच जर्मनीसारखे काही देश या विश्वचषकावर वर्चस्व गाजवू पाहतात. आणि अनपेक्षित निकालच अपेक्षित करावे लागतात.

चेल्सीच्या संघाने अव्वल स्थान राखलं आहे त्याचं एक कारण सर्वोत्तम खेळाडूंचा त्यामध्ये भरणा आहे, असं म्हटलं जातं. ती क्लबची स्ट्रॅटेजी आहेच. पण त्याहीपेक्षा चेल्सीच्या संघाची स्वतःची म्हणून एक केमिस्ट्री तयार झाली आहे. चेल्सीच्या यशात सर्वाधिक वाटा संघ भावनेचा आहे. म्हणजे असं की अनेलकाने जागा काढली आणि ड्रोग्बाने गोल केला तर ड्रोग्बा पहिल्यांदा अनेलकाला मिठी मारेल. मग स्वतःचा विजय साजरा करेल. चेल्सीच्या संघात खेळाडूच्या व्यक्तीगत खेळापेक्षा संघ भावनेला केंद्रस्थान असतं. या उलट मँचेस्टर युनायटेड. या संघात रुनीला खास स्थानच असतं. कारण त्या संघाची केमिस्ट्री तशी घडली आहे. प्रत्येक संघाच्या केमिस्ट्रीची अशी वैशिष्ट्यं सांगता येतील.

काल म्हणजे रविवारी मँचेस्टर युनायटेड आणि चेल्सीचा सामना होता. प्रिमियर लीगमध्ये. मी काही तो सामना पाह्यला नाही. म्हणजे पाहणार नाही असंच ठरवलं होतं. टोरेझ चेल्सीतून खेळायला लागल्यापासून माझा चेल्सीतला रस कमी झालाय. तो सुपरस्टार आहे. पण चेल्सीच्या केमिस्ट्रीत बसणारा नाही. मागच्या विश्वचषक स्पर्धेत तो स्पेनकडून खेळत होता. त्याला बाहेर काढल्यावर स्पेनचा संघ यशाच्या दिशेने पुढे सरकला. टोरेझचं स्वतःवरच प्रेम आहे. पोर्तुगालच्या ख्रिस्टीआनो रोनाल्डोसारखं. त्यामुळे खेळावरची त्याची निष्ठा कणसूर होते. चेल्सीची केमिस्ट्री त्यामुळे बिघडते असं माझं निरीक्षण.

कालच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने चेल्सीचा ३:१ असा धुव्वा उडवला, असं रुस्तुमने सांगितलं तेव्हा मी त्याला हे ऐकवलं. अनेलकाने जागा काढल्यावर टोरेझने एक गोल केला. पण गोल झाल्यावर टोरेझने अनेलकाकडे बघितलंही नाही, रुस्तुम म्हणाला. ड्रोग्बा नव्हता. लॅम्पार्ड होता पण त्याचा बॅड पॅच सुरु आहे. अनेलका आणि मलुदा बदली खेळाडू म्हणून आले. म्हणजे उशिराच.











Wednesday 31 August 2011

सामाजिक प्रसारमाध्यमांची कामगिरी…


जनलोकपाल विधेयक आंदोलनात सामाजिक प्रसार माध्यमांची (सोशल मिडिया) भूमिका निर्णायक ठरली आहे. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब ही सामाजिक प्रसारमाध्यमं समजली जातात. वर्तमानपत्र, टेलिव्हीजन, रेडियो या लोंढा प्रसारमाध्यमांद्वारे (मास मिडिया) प्रसारीत केल्या जाणार्या बातम्या, माहिती, मतं, दृष्टीकोन मिळवण्याचं, लिहिण्याचं वा सादर करण्याचं काम वार्ताहर, पत्रकार, संपादक हेच करत असतात. सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध होणार्या बातम्या, माहिती, छायाचित्रं वा चित्रफीती कोणीही म्हणजे सामान्य माणूस, आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी प्रसिद्ध करू शकतात. कारण सामाजिक प्रसारमाध्यमांवर बातम्या, माहिती वा विचार प्रसिद्ध करण्यावर वेळेचं, आकाराचं वा संपादकाचं वा कोणत्याही कंपनीचं नियंत्रण नसतं. माहिती-तंत्रज्ञानाने फेसबुक, ट्विटर, ब्लॉग ही माध्यमं निर्माण करून बातमी, माहीती, विचार यांच्या प्रसारावरील वर्तमानपत्रं, रेडियो वा टेलिव्हिजन वाहिन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे.

सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करण्यासाठी अर्थातच इंटरनेट जोडणी, लॅपटॉप, कंप्युटर, अतिप्रगत मोबाईल फोन यांची गरज असते. इसवीसन २००० आणि २०१० या एका दशकात इंटरनेटचा वापर करणार्या भारतातील लोकांच्या संख्येत १४०० टक्के वाढ झाली आहे. मात्र इंटरनेट जो़डणी भारतात सर्वदूर पोचलेली नाही. भारतातील इंटरनेट जोडणीचा प्रसार टक्के आहे तर चीनमध्ये ४० टक्के आहे. अर्थातच भारतातील बहुसंख्य जनता अजूनही सामाजिक प्रसारमाध्यमांच्या कक्षेत आलेली नाही. मात्र मोबाईल फोनचा सर्वदूर प्रसार झाल्याने दिडके संदेश (एसएमएस) मात्र भारतात सर्वदूर पोचतात. आणि दिडक्या संदेशांचा समावेश ट्विटरप्रमाणेच सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये वा नव्या प्रसारमाध्यमांमध्ये होतो. या प्रसारमाध्यमांचा कल्पकतेने उपयोग केल्याने अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीला देशव्यापी पाठिंबा मिळाला. कोणताही मूलगामी विचार, संघटना नसतानाही देशव्यापी आंदोलन वा जागृती घडून आली.

अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनार्थ सुरु केलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या अधिकृत संकेत स्थळावर १३ दशलक्ष लोकांनी फोन केले. या संकेतस्थळाने फेसबुकवर सुरु केलेल्या खात्यावर ३२ लाख लोकांनी नोंदणी केली. फेसबुकच्या परिभाषेत त्यांना फॅन्स म्हटलं जातं. त्यापैकी ६० हजारांहून अधिक लोकांनी अण्णांच्या उपोषण काळात नोंदणी केली तर ५० हजार लोक एप्रिल ते ऑगस्ट या काळात अण्णांच्या आंदोलनाचे समर्थक झाले. त्याशिवाय फेसबुकवर १५० पानं वा खाती अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मूलन, जनलोकपाल विधेयकाचं समर्थन या कामासाठी काही उत्साही लोकांनी सुरु केली आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या फेसबुकच्या खात्यावर ७१००० लोकांनी आपली पसंती वा पाठिंबा नोंदवला (फेसबुकच्या परिभाषेत लाइक्स). त्याशिवाय १३००० लोकांनी आपली मतं नोंदवली. त्याशिवाय फेसबुकच्या लाखो सभासदांनी आपआपल्या खात्यावर मांडलेली मतं, त्यावर झालेल्या चर्चा याची गणती अजूनपर्यंत झालेली नाही.

ट्विटर वा चिवचिव हे माध्यम दिडक्या संदेशाप्रमाणे आहे. इंटरनेट आणि मोबाईल फोनद्वारे तुम्ही केलेली चिवचिव अर्थात दिलेली बातमी वा मतं तुमचे अनुयायी वा मित्र यांच्याकडे तात्काळ पोचते. आपल्या मोबाईल फोनवर ते ती वाचू शकतात. उदाहरणार्थ, पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानासमोर निदर्शन. ३५ जणांना अटक. हा संदेश आंदोलनाच्या नेत्याने चिवचिव स्वरुपात प्रसारित केला की त्याच्या मागावर असणार्या शेकडो वा हजारो लोकांना तो तात्काळ मिळतो. बातम्या फोडण्याचं काम आता वृत्तवाहिन्यांपेक्षाही वेगाने चिवचिवीमार्फत होत असतं. (ओसामा बिन लादेनच्या घरावर हल्ला झाल्याची बातमीही सर्वप्रथम चिवचिवाटाने प्रसारित केली होती.) चिवचिवाटाची ताकद वा परिणाम मोजण्याची पद्धती आहे. त्यानुसार ऑगस्ट १६ आणि १७ या दोन तारखांना जनलोकपाल विधेयकासंबंधात आठ हजारांपेक्षा अधिक संवाद (दिडके संदेश) चिवचिवाटात नोंदले गेले. अण्णांच्या आंदोलनाच्या अधिकृत चिवचिव खात्याचा प्रभाव १५ ऑगस्ट रोजी ६८ होता आणि दोन दिवसांत तो ७४ एवढा झाला. शाहरुख खान आणि दलाई लामा यांच्या चिवचिव खात्याशी अण्णांच्या आंदोलनाने बरोबरी केली.

अण्णांना पाठिंबा देणारे दिडके संदेश (एसएमएस) पाठवा असं आवाहन सर्वप्रथम आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीने केलं. त्यानंतर अन्य वाहिन्यांनीही तो कित्ता गिरवला असेल. आलेले एसएमएस टिव्हीवर दाखवले जात होते. आयबीएन-लोकमत या वाहिनीला पाठवलेल्या एका दिडक्या संदेशाची किंमत पाच-सहा रुपये असावी. त्यापैकी ४०-५० टक्के रक्कम आयबीएन-लोकमतला मिळू शकते. आयबीएन-लोकमतने दिलेल्या माहितीनुसार साडे चार लाख लोकांनी एसएमएस पाठवले. म्हणजे निव्वळ दिडक्या संदेशांतून टेलिफोन कंपनीला मिळालेलं एका दिवसाचं उत्पन्न होतं २२ ते २७ लाख रुपये. यातले किमान पन्नास टक्के म्हणजे ११ ते १३ लाख रुपये आयबीएन-लोकमत या वाहिनीला मिळाले असावेत. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे दिडके संदेश पाठवण्याचा दर काय, त्यातून किती उत्पन्न टेलिफोन कंपनीला आणि आयबीएन-लोकमतला मिळालं याचा हिशेब सदर वाहिनीने दिलेला नाही. क्रांतीकारकाचा आव आणून आरडाओरडा करणार्या वाहिनीच्या संपादकांना यामध्ये आपण काही गैर करतो आहोत याबद्दल लाज-शरम वाटण्याचीही शक्यता नाही. अण्णांना शुभेच्छा देणारे दिडके संदेश पाठवणार्या सामान्य जनतेला सदर पैसे आपल्या टेलिफोन खात्यातल्या शिल्लक रकमेतून परस्पर वळते झाल्याचं कळलंही नसेल. आयबीएनलोकमत वा अन्य खासगी उपग्रह वाहिन्या या प्रकारची पाकीटमारी राजरोसपणे करतात.

सामाजिक प्रसारमाध्यमांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत तंत्रवैज्ञानिक आहे, हे इथे ध्यानात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, फेसबुकवरील कोणत्याही पानावर डाव्या बाजूला विविध उत्पादनांच्या जाहिराती असतात. त्या जाहिरातीवर क्लिक करून त्या उत्पादनाच्या वेबसाइटवर कोणी गेलं की ताबडतोब फेसबुकला ठराविक रक्कम मिळते. तुम्ही उत्पादन विकत घ्याल किंवा नाही, फेसबुकच्या खात्यात पैसे जमा होतात. माहितीचं प्रसारण मोफत आणि सर्वदूर करताना उत्पन्नाचा हा अभिनव मार्ग गुगलने शोधला. त्याचं अनुकरण आणि परिष्करण वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या मार्गाने करत आहेत. औद्योगिक क्रांती जेव्हा जन्माला येत होती त्यावेळी अॅडम स्मिथ या अर्थतज्ज्ञाने म्हटलं होतं की आदर्श भांडवलशाही व्यवस्थेत बाजारात कोणती उत्पादनं आहेत त्यांची संपूर्ण माहिती ग्राहकाला असेल तर बाजारातल्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा काय आहेत याची संपूर्ण माहिती भांडवलदारांना असेल. तसं घडलं तर मागणी आणि पुरवठा यामध्ये अचूक संतुलन निर्माण होईल आणि शोषणालाही आळा बसू शकेल. भांडवलशाही अर्थव्यवस्था तेजी-मंदीच्या चक्रातून सुखरुपपणे बाहेर पडू शकेल. सध्याचा काळ औद्योगिक क्रांतीनंतरचा आहे. कारण आता उत्पादनं अधिकाधिक वैयक्तिक बनत आहेत. म्हणजेच व्यक्तीच्या आवडी-निवडीनुसार बनवली जात आहेत. उदाहरणार्थ माझ्या मोबाईल फोनवर कुणाचं चित्रं असावं, कुणाचं गाणं वा संगीत असावं हे माझ्या आवडीनुसार मी ठरवतो. त्यानुसार उत्पादनं विकसीत होत असतात. त्यामुळे गरजांपेक्षा आवडी-निवडी, पसंती, अभिरुची यांना महत्व आलं आहे. फेसबुक वा तत्सम सोशल नेटवर्किंग साइटस् वर सभासदांची सर्व माहिती नोंदवलेली असते. त्यांची अभिरुची, आवडी-निवडी त्यामधील बदल इत्यादीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने बारीक नजर ठेवली जाते. त्यानुसार वेगवेगळ्या विषयांवरील पानांवर वेगवेगळ्या उत्पादनांच्या, सेवांच्या जाहिराती येतात. हे सर्व स्वयंचलित शिस्तीने सुरु राहील अशी काळजी घेतलेली असते. दिडके संदेश असोत वा चिवचिव वा ब्लॉग वा फेसबुक, नव्या प्रसारमाध्यमांनी स्वतःच्या उत्पन्नाचे अभिनव मार्ग शोधले आहेत.

तंत्रज्ञानाने प्रेरित आणि शक्य केलेला तात्काळ संवाद म्हणजे सामाजिक प्रसारमाध्यम. हे माध्यम जेव्हा लोकांच्या प्रश्नांची, समस्यांची आणि वेदनांची पकड घेतात त्यावेळी जनलोकपाल विधेयकासारखं स्वंयस्फूर्तआंदोलन उभं राहतं. लोंढा प्रसारमाध्यमं, राजकीय पक्ष, राजकीय नेते, पारंपारिक उद्योग-सेवा यांच्या हितसंबंधांच्या घट्ट विणीला असं आंदोलन छेद देतं. हे आंदोलन क्रांतीकारी नसेलही पण सत्ताधारी वर्गाला नमवणारं असतं.