Tuesday, 8 May 2012

चहाच्या पेल्यातलं वादळ...


स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांपासून अलग केल्यावर जगाची निर्मिती झाली. स्वर्गातील एकूण बारा सम्राटांनी प्रत्येकी १८ हजार वर्षं या जगावर राज्य केलं. त्यानंतर पृथ्वीवरील अकरा राजांनी या जगाचा कारभार सांभाळला. प्रत्येक राजाची राजवट स्वर्गातील सम्राटाएवढीच होती. त्यानंतर मानवजातीच्या नऊ प्रमुखांनी एकूण ४५ हजार वर्षं राज्यकारभार केला. सोळा सार्वभौम अधिकार्‍यांवर जगाची जबाबदारी सोपवण्यात आली. शेवटी फु सी, शेन नुंग आणि हुआंग टी या त्रयींनी पृथ्वीवर प्रगती घडवून आणली. फु सी आणि हुआंग टी पीतनदीच्या दक्षिणेकडील होनन या प्रदेशात राह्यचे. पृथ्वीवरील सर्व हस्तकौशल्य आणि कला या दोघांनी शोधली. तिसरा सार्वभौम अधिकारी शेन नुंग. पृथ्वीवरील जमीन सर्वप्रथम नांगरण्याचा मान शेन नुंगचाच. त्यानेच चहा या पेयाची मौल्यवान देणगी अखिल मानवजातीला दिली.

या चिनी दंतकथेचा काळ इसवीसनपूर्व २७३७. शेन नुंगने वैद्यकीय ग्रंथात लिहिल्याप्रमाणे चहामुळे तहान भागते. झोप कमी येते, मन आणि शरीर प्रफुल्लित होते. चहाच्या शोधासंबंधात चीनमध्ये अनेक दंतकथा आहेत. भारतातून चीनमध्ये गेलेल्या बौद्ध भिक्षूंनी चहाचा स्वीकार केला. चहाला धार्मिक पेयाचाही मान त्यामुळे मिळाला. चीनमधील अनेक धर्मपंथांनी चहाला गौरवाचं स्थान दिलं. मंदिराभोवती चहाचे मळे लावण्याची प्रथाच तिथे होती. लू यू या विद्वानाने चा चिंगसर्वश्रेष्ठ चहा असा ग्रंथच लिहिला. चहाच्या संदर्भातील बौद्ध, टाओ आणि कन्फ्युशिअन तिन्ही पंथींयांच्या तत्वांचा आढावा लू यूने घेतला आहे. सौंदर्य आणि साधेपणा ही दोन तत्वं लू यूला चहा या पेयात आणि चहापानाच्या कार्यक्रमात दिसली. लू यू त्याच्या बोहेमियन जीवनशैलीमुळे प्रसिद्ध होता. त्यात या ग्रंथाची भर पडल्याने त्याची लोकप्रियता वाढली. चीनच्या सम्राटाने त्याच्याशी मैत्री केली. चहा कसा करावा याचं रसभरीत वर्णन लू यूने केलं आहे. लू यूने सांगितलेल्या चहाच्या कृतीत दूध नाही. चहात चवीसाठी कणभर मीठ घालत किंवा खजूर, कधी स्वादासाठी पेपरमिंट असंही लू यूने नोंदवलं आहे. सुंदर निळसर झाक असलेले चिनी मातीचे कप चहा या पेयासाठी अत्त्युत्तम असतात. लालसर चॉकलेटी चहा या कपात ओतला की चहाला एक आगळावेगळा पांचूसारखा हिरवट रंग येतो आणि त्यामुळे पेयाची लज्जत वाढते असं लू यूने म्हटलं आहे. इसवीसन ८०४ साली लू यूने जगाचा निरोप घेतला. पण तोपावेतो चहा चिनी जनमानसात आणि संस्कृतीत पुरतेपणी मुरला होता. लू यूने चहाची रोपं, पानं, जाती, चहा करण्याची भांडी, चहाचे कप, चहापानाचा कार्यक्रम इत्यादीबाबत आपल्या त्रिखंडात्मक ग्रंथात जी माहिती दिली होती ती आजही आदर्श मानली जाते. जपानी चहापानाचा गूढ कार्यक्रम लू यूच्या ग्रंथाच्या आधारेच आकाराला आला. चीन, जपान आणि अतिपूर्वेकडील देशांमध्ये चहा चीनमधूनच पोचला. चहापानाला शाही स्वरूप आलं होतं. चिनीमातीची नक्षीदार भांडी, चहाच्या किटल्या अशा सरंजामामुळे चहा हे पेय तालेवारांच्या शाही बैठकांमध्ये रुळलं. अरबांमुळे युरोपियनांना चहा या पेयाची आणि चहापानाच्या कार्यक्रमाची ओळख झाली. छानछोकीच्या वस्तू आणि षौक ह्यांचा युरोपमध्ये दुष्काळच होता. युरोपिय देशातील उमराव, बडे व्यापारी चहा आणि त्याचा शाही सरंजाम यांच्याकडे म्हणूनच आकर्षिले गेले.  आफ्रिकेतून कॉफी येण्याआधी युरोपकडे वाईन हेच शाही पेय होतं. पहिल्यांदा कॉफीने आणि त्यानंतर चहाने विविधता आणली. चहाच्या पानांवर करायची प्रक्रिया युरोपला माहिती नव्हती. जपानने पाश्चांत्यांना आपली बंदरं बंद करून टाकली होती आणि पाश्चात्य लोक लबाड आहेत अशीच चिनी राज्यकर्ते व व्यापारी ह्यांची धारणा होती. त्यामुळे चीनने केवळ एकच बंदर युरोपशी व्यापार करण्यासाठी खुलं केलं होतं. प्रथम पोर्तुगीजांनी चहाची आणि चहापानाची चव जपान आणि चीनमध्ये चाखली. त्यानंतर डचांनी. त्यांनी चहापानाच्या समारंभाची रसभरीत वर्णनं करून ठेवली. त्यामुळे डच व्यापार्‍यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून व्यापारात आघाडी घेतली. १६१० साली चिनी आणि जपानी चहा घेऊन बोटी युरोपला रवाना झाल्या. तरिही १७०० सालापर्यंत चहा हे पेय युरोपात दुर्मिळच होतं. इंग्लड आणि अन्य युरोपिय देशांमध्ये उमराव, दरबारी, श्रीमंतांच्या घरीच हे पेय घेतलं जाई. कॉफी हाऊसमध्ये अतिशय महागडं पेय म्हणून चहाची विक्री व्हायची. चहाबरोबर चहा बनवायची नक्षीदार पोर्सेलिनची भांडीसुद्धा आयात केली जायची. त्यावेळी युरोपात चहापानाच्या पार्ट्या आयोजित केल्या जात. एक पौंड चहा त्यावेळी १०० डॉलरला मिळायचा. असा चहा पोर्सेलिनच्या नक्षीदार भांड्यातून दिला जायचा. त्यावेळी युरोपियन लोक चहा बशीत ओतून फुर्रर्र असा आवाज करत प्यायचे. पुढे कधीतरी म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर चहा कपातूनच आवाज न करता प्यायचा असं रुढं झालं. चहापानानंतर केक, थोडीशी ब्रँडी, तोंडात टाकायला मनुका, बेदाणे, असा या पार्ट्यांचा थाट असायचा. ह्यालाच म्हणायचे हाय टी. पुढे चहा इंग्लडात भलताच लोकप्रिय झाला. म्हणजे क्रिकेट हा खेळ भारताचा वाटतो तसं चहाबाबत ब्रिटीशांचं झालं. गोची अशी होती की चहा काय किंवा पूर्वेकडून येणार्‍या मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार डचांच्या हाती होता. डच व्यापारी अनेकदा दर वाढवत असत. त्यामुळे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. (युरोपियन लोकांना जे जे एक्झॉटिक वाटायचं त्याला ते इंडिया म्हणायचे. त्यामुळे चीनशी व्यापार करणार्‍या कंपन्यांची नावं ईस्ट इंडिया तर अमेरिकेला गेलेला कोलंबस तिथल्या सर्व मूळच्या रहिवाशांना इंडियन म्हणून मोकळा झाला. अज्ञात अशा पूर्वेलाच नाही तर अज्ञात  अमेरिकेतही एका बेटांच्या समूहाला वेस्ट इंडीज असं नाव युरोपियनांनी देऊन टाकलं.) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी केवळ व्यापारासाठीच स्थापन झाली पण तिला अनेक अधिकार देण्यात आले, उदा. ब्रिटीश साम्राज्याच्या सीमा वाढवणे, सैन्य जमवणे, युद्ध करणे, खटले भरणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे असे. त्यामुळे ही कंपनी ब्रिटीश साम्राज्याची वाहक बनली. चहाच्या व्यापाराचा एकाधिकारच या कंपनीकडे आला. दरम्यानच्या काळात जर्मनी आणि फ्रान्समध्येही चहा पोचला. पण जर्मन लोकांना बीयरपुढे सर्वकाही फिकं वाटायचं. फ्रान्समध्येही वाईनची जागा चहाला मिळाली नाही. चहाऐवजी आफ्रिकेतून आलेली कॉफी फ्रेंचांना अधिक पसंद होती. रशियात चहा पोचला मंगोलियामार्गे. रशिया मुलुखाचा गरीब देश. बहुसंख्य लोक दिवसातून एक दिवसच पोटभर जेवत. त्यामुळे भूक मारायला चहा हे पेय त्यांना वरदानासारखंच वाटलं. चहा, पाणी आणि लिंबू असं एकत्र उकळून दिवसभर घुटके घेत बसायचं, अशी रशियन पद्धत. चहा ते पाण्यासारखाच प्यायचे. म्हणून पाणी गरम करण्याचा हीटर आणि चहाची किटली अशा संयुक्त उपकरणाची निर्मिती या रशियन लोकांनी केली. त्यालाच म्हणतात सॅमोव्हार. ह्या भांड्यात एकावेळी चाळीस कप चहा करता यायचा. रशियन लोक तोंडात साखरेचा खडा ठेवून गरमागरम चहा घोट-घोट पित असत. ग्लासभर चहा आणि तोंडात साखरेचा खडा ठेवून घुटके घेण्याचा आनंद स्वर्गीय आहे, असं अलेक्झांडर पुष्कीन (१७९९-१८२३) या रशियन कवीने लिहूनच ठेवलंय.  रशियन लोकांनी चहाभोवतीचं सौंदर्यांचं, खानदानीपणाचं वलय नष्ट करून टाकलं. ह्याबाबतीत त्यांचं आणि आपलं जुळत असावं. अमेरिकेत चहा बहुधा सतराव्या शतकातच पोचला. १६७४ साली न्यूयॉर्कच्या अवतीभवती चहाच्या बागा तयार करण्यात आल्या. चहा घरी बनवण्याची पद्धत होती. शहराच्या आसपासच्या झर्‍यातलं पाणी घेऊन फेरीवाले दारोदार हिंडत आणि चहाचं पाणी अशी आरोळी देत. बायका ते पाणी चहा करण्यासाठी विकत घेत. ब्रिटनमधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्यांसाठी चहा अत्यावश्यक बाब झाली होती. चहाचा कारभार तर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. अमेरिकेतील वसाहतींमध्ये चहा, रेशीम, मसाल्याचे पदार्थ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमार्फतच पाठवले जायचे. या वस्तूंवर ब्रिटीश सरकारने कर बसवले. त्याला वसाहतवाद्यांनी विरोध केला. ब्रिटीश सरकारने त्यांच्या विरोधापुढे मान तुकवली आणि बहुतेक वस्तूंवरचे कर हटवले. पण चहावरचा कर मात्र ठेवला. त्यामुळे वसाहतवाले संतापले. १६ डिसेंबर १७७३ रोजी कंपनीची तीन जहाजं चहा घेऊन बोस्टन बंदरात दाखल झाली. तिथे संतप्त जमावापुढे भाषण करताना जॉन रोवे हा म्होरक्या म्हणाला, खारट पाण्यात चहा कसा मिसळेल? त्याच्या ह्या वक्तव्याने ठिणगी पडली. आणि जमावाने हजारो टन चहा समुद्रात बुडवला. हीच ती बोस्टनची टी पार्टी.

    केवळ अमेरिकन वसाहतींमध्येच नाही तर ब्रिटनमध्येही चहावर कर लावण्यात आला. त्यामुळे ब्रिटनमध्ये चहाची तस्करी सुरु झाली. चहाचा काळाबाजारही तेजीत सुरु झाला. लाचखोरी, भ्रष्टाचार यामध्ये वाढ झाली. उच्च प्रतीचा चहा सामान्य लोकांना वाजवी किंमतीत मिळाला पाहीजे ह्यासाठी लंडनमध्ये आंदोलन झालं. परिणामी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा चहावरील एकाधिकार संपुष्टात आला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार डांबीसपणाचाच होता. चीनमध्ये अफूच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. तरिही कंपनी तिथे अफूची विक्री करायची. (भारतातली अफू चीनमध्ये निर्यात केली जायची. मुंबई शहरातून या अफूचा व्यापार चालायचा. मुंबई शहराची पायाभरणी कापसाच्या नव्हे तर अफूच्या व्यापाराने केली. अमिताव घोष यांच्या सी ऑफ पॉपीज् या कादंबरीमध्ये त्याची दखल घेण्यात आलीय.) त्यामुळे चिनी राज्यकर्त्यांना ब्रिटीशांबाबत अधिक संशय वाटू लागला. यातूनच १८३९ ते ४२ या काळात चीन-ब्रिटन यांच्यात युद्ध पेटलं त्याला म्हणतात अफूचं युद्ध. त्यात चीनचा पाडाव झाला आणि ब्रिटीशांना बरेच अधिकार मिळाले. पुढे १८५७ सालच्या बंडानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त झाला. दरम्यानच्या काळात भारतात ब्रिटीशांनी चहा लोकप्रिय करायला सुरुवात केली होती. टीपॉय म्हणजे चहाचे कप ठेवण्याचं खुर्चीसमोरचं छोटं टेबल. हाय टी म्हणजे दुपारी चहासोबत केक, बिस्कीटं मांडायचं मोठं टेबल. चहाच्या मार्केटिंगमधून जन्माला आलेले हे फर्निचरचे आणि शिष्टाचाराचे प्रकार बाबू लोकांमध्ये रुळू लागले होते. तरिही १९ व्या शतकात चहा भारतीयांच्या जिभेवर रुळला नव्हता. चहाची सवय वा व्यसन विसाव्या शतकातच देशात पसरू लागलं.  

तो चहा गुलाबी, चर्चा खळखळणारी...अशा शब्दांत इंदिरा संत यांनी मराठी चहाच्या रंगरुपाची नोंद करून ठेवली आहे. माधव साठे ह्या समाजवादी साथीला कुलाब्यापासून दादरपर्यंतच्या प्रत्येक इराणी हॉटेलातल्या चहाची चव पक्की ठाऊक होती. इराण्यांच्या हॉटेलात पानी कम चहा मिळतो. म्हणजे चहाचं पाणी कमी. दूधाचं प्रमाण तेच. लंबा पानी चहाही मिळायचा. इराण्यांची हॉटेलं हे तरुणांचे अड्डे होते. अरुण कोलटकरच्या इराणी या कवितेत ह्या माहौलाचं सुंदर साक्षेपी चित्रण आहे. त्यात दुधाचं प्रमाण कमी असायचं. मुसलमानांच्या चहाला इलायचीचा स्वाद असायचा. शेट्टी वा उडप्यांच्या हॉटेलातला चहा भरपूर दूध घातलेला. सत्तरच्या दशकात मुंबईत म्हणजे दक्षिण मुंबईत, शंकरविलास हिंदू हॉटेलांची साखळी होती. ह्या हॉटेलांमध्ये फक्त चहा, नेस्कॅफे आणि उकाळा मिळायचा. साधा, स्पेशल, तीन नंबर आणि गुलाबी असे चार प्रकारचे चहा तिथे मिळायचे. अंधेरी स्टेशनात अमेरिकन चहा मिळायचा म्हणजे चहात दुधावरची साय टाकून द्यायचा तो स्टॉलवाला. दादर स्टेशनाच्या बाहेर बबनचा चहाचा स्टॉल हा पत्रकारांचा अड्डा बनला होता. तो चहात कोकोचा वगैरेही स्वाद टाकायचा. अंबरिश मिश्र रात्री उशिरापर्यंत तिथे आपली मैफील जमवायचा. अर्धा कप चहासाठी कटिंग हा शब्द बहुधा मुंबई शहरात जन्म पावला असावा. पण कट म्हणजे कापणे म्हणून कटिंग हा शब्द वापरून हाफ कप चहा अशा तीन शब्दांना सुटसुटीत पर्याय मुंबईतल्या चहा टपरीवाल्यांनी काढला असावा. पंजाब आणि उत्तर प्रदेशात दुधातच चहा पत्ती टाकून उकळतात. हैदराबादेत साखर एवढी घालायचे की चहाच्या ग्लासात चमचा उभा राह्यला पाह्यजे. त्याला खडा चम्मच चहा म्हणायचे. गुजराती, मारवाडी यांना मसाला घातल्याशिवाय दूध चालत नाही त्यामुळे चहाचाही मसाला त्यांनी तयार केला. मुंबईतील प्रकाश, पणशीकर ह्या अस्सल मराठी हॉटेलांमध्ये आजही मसाला दूध मिळतं. सत्तर वा ऐंशीच्या दशकात तिथे चहा-कॉफी मिळू लागली. उत्तर भारतीयांच्या कचोरी, समोसा, दही आणि दूध एवढेच पदार्थ मिळतात. दुधाला स्वाद देणारं पेय म्हणूनच भारतीय लोकांनी चहाला जवळ केलं.

१९८४ साली मी पहिल्यांदा ईशान्य भारतात गेलो होतो त्यावेळी आसामात चहाला सा म्हणायचे (आसामी भाषेत च नव्हता.) आता मात्र तिथेही चाय हा शब्द रुळला आहे. नागालँडमध्ये फिका चा प्यायचे. म्हणजे उकळत्या पाण्यात फक्त चहाची पत्ती टाकून पाणी गाळून घ्यायचं. दूध किंवा साखर टाकली की चहाची चव राहात नाही, असं ते म्हणायचे. आता नागालँडमध्ये सर्वत्र आपल्यासारखा दुधाचा चहा मिळतो. दूधाऐवजी ते व्हाईटनर अर्थात दूध पावडर वापरतात एवढाच फरक. भंडारा जिल्ह्यात नवेगाव बांधाच्या जवळ तिबेटी निर्वासितांचं गाव आहे. तिबेटी जिन्नसांची खरेदी करायला गावकर्‍यांचा एक गट दरसाल सिलीगुडीला जातो. बेगमीच्या जिन्नसांच्या यादीत चहाही असतो. तिबेट वा चीनमधली खास चहा पत्ती त्यांना हवी असते. चहात याकचं लोणी घुसळून केलेलं पेय त्यांच्या आवडीचं. चहा गरम तर हवा पण घुसळताही यायला हवा म्हणून एक खास थर्मासही तिबेटी लोकांसाठी बनवण्यात आलाय. हा तिबेटी चहा मला त्या नवेगाव बांधाजवळच्या तिबेटी गावातच चाखायला मिळाला. लोणी गायीच्या दुधाचं होतं. म्हणजे सिलीगुडीहून याकचं दूध वा लोणी आणत नाहीत एवढं कळलं. नमकीन चहा काश्मीरला पितात. दिल्लीतल्या दरयागंज भागात आप की पसंद या नावाचं एक चहाच दुकान होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळायचे. म्हणजे तुम्ही दार्जिलिंग आणि आसाम अशा दोन चहांची ऑर्डर दिली तर वासावरून समजायचं की दोन वेगळे चहा बनत आहेत. ग्रीन टी किंवा दूध वा साखरेशिवाय चहाच्या स्वादाची भारतीयांना ओळख होण्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं.  
भारतात चहा लागवडीचं श्रेय मणिराम दिवाण यांना जातं. त्यांचं मूळ नाव मणिराम दत्त बारुआ. अहोम राजदरबारात ते दिवाण होते. त्यांनीच रॉबर्ट ब्रूस आणि अलेक्झांडर ब्रूस या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना आसामातील जंगली चहाची झुडपं दाखवली (१८२३). सिंगफो या आदिवासी जमातीच्या प्रमुखांची भेट घडवून ब्रूस बंधूंना आसामातील चहाच्या झुडपांची माहिती दिली. या झुडुपांची नीट देखभाल करून अलेक्झांडर ब्रूस यांनी चहा लागवडीचं तंत्र विकसीत केलं. त्यापूर्वी चीनमधून चहाच्या बिया आणून त्यांची लागवड करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मणिराम दिवाण हरहुन्नरी आणि कर्तबगार उद्योजक होते आणि उत्तम प्रशासकही होते. चहाच्या मळ्यांची लागवड करणारे ते पहिले आसामी उद्योजक. १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आलं. मणिराम दिवाण ह्यांचं चरित्र, चारित्र्य आणि कार्य यामधून त्यांच्या देशभक्तीचा, दूरदृष्टीचा आणि आसाम वा ईशान्य भारतातील राजकीय-सामाजिक प्रश्नांबद्दल असलेल्या त्यांच्या मर्मदृष्टीचा परिचय होतो.

ब्रह्मदेशातून होणार्‍या हल्ल्यांमुळे बंगालात स्थलांतरित झालेले मणिराम दिवाण, शांतता प्रस्थापित झाल्यावर आसामात परतले. बावीस वर्षांचे मणिराम दिवाण रंगपूरचे तहसीलदार आणि शिरस्तेदार म्हणून काम पाहू लागले. मणिराम दिवाणांचं कुटुंब मूळचं कनौजचं. सोळाव्या शतकात हे कायस्थ कुटुंब आसामात स्थलांतरित झालं. तेव्हापासून मणिराम यांच्या पूर्वजांना अहोम दरबारात स्थान होतं. आसामात परतल्यावर काही काळातच अहोम राजा पुरंदर सिंघाने त्यांना दरबारी सेवेत दाखल करून घेतलं. कंपनीने पुरंदरसिंघाला पदच्युत केल्यानंतर मणिराम कंपनीच्या सेवेतून बाहेर पडले.
भारतात चहाची लागवड करण्याचा निर्णय कंपनीने १८३३ साली घेतला. लॉर्ड बेंटिगने या संबंधात एक समिती स्थापन केली. या समितीने आसामला भेट दिली त्यावेळी अहोम राजा, पुरंदरसिंघाचा प्रतिनिधी म्हणून मणिराम दिवाण ह्यांनी चहा लागवडीसाठी आसामात भरपूर वाव असल्याचं समितीच्या निदर्शनास आणून दिलं. १८३९ साली स्थापन झालेल्या आसाम टी कंपनीचे दिवाण म्हणून मणिराम यांची नियुक्ती झाली. दरमहा २०० रुपये पगाराच्या नोकरीला मणिराम यांनी वर्षभरातच रामराम ठोकला आणि जोरहाट जिल्ह्यात चहाची लागवड सुरु केली. त्याशिवाय शिबसागर जिल्ह्यातही त्यांनी चहामळे उभारले. हातमाग, वीटभट्टी, कापड रंगवणे, हस्तीदंतावरील कारागीरी, हत्तींचा व्यापार, लष्कराच्या बराकी बांधण्याचं कंत्राट, दगडी कोळशाचा व्यापार असे अनेक उद्योग मणिराम ह्यांनी सुरु केले. आसाम टी कंपनीच्या मागोमाग अनेक कंपन्यांनी चहामळे फुलवायला सुरुवात केली. ह्या सर्व कंपन्या गोर्‍यांच्या होत्या. त्यांनी मणिरामना सतावायला सुरुवात केली. कंपनीच्या एका अधिकार्‍याने मणिरामच्या चहामळ्यावर जप्तीच आणली. मणिरामनी सदर कोर्टात याचिका दाखल केली. कंपनीची धोरणं आणि कारभारामुळे आसामी जनतेची स्थिती हलाखीची झाली आहे, आसामी लोकांची प्रतिष्ठा, मानसन्मान, पत, नोकरी, जात, धंदा यावरच या कारभाराने हल्ला केला केला. आसामचं शोषण करण्याच्या कंपनीच्या नीतीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप मणिरामनी या याचिकेत केला. आदिवासी, विशेषतः डोंगरातील आदिवासी (आसामात मैदानात वा खोर्‍यात राहणार्‍या आदिवासी जमातीही आहेत.) समूहांना वाईट वागणूक कंपनी सरकार देत आहे, याकडे मणिरामनी याचिकेत लक्ष वेधलं. कंपनी सरकारची कर-सारा पद्धती, अफूच्या लागवडीला उत्तेजन देण्याचं धोरण, मारवाडी आणि बंगाली लोकांचा कारभारातील आणि अर्थव्यवस्थेतील वाढता वरचष्मा, कामाख्या मंदिरातील सरकारी पूजा बंद करण्याचा निर्णय, अहोम राजांच्या प्रासादांची लूट, स्मारकांची हेळसांड असे मुद्देही मणिरामनी आपल्या याचिकेत मांडले आहेत. अहोम राज्यसंस्था आणि राज्यकारभाराची पुनःस्थापना करण्यात यावी, अशी मागणी मणिराम यांनी या याचिकेत केली. ही याचिका अर्थातच फेटाळण्यात आली.
मणिराम यांची ही याचिका म्हणजे आसामी राष्ट्रवादाचा ओनामा म्हणता येईल. अहोम, आसामी, हिंदू, मुस्लिम, शाक्त आणि वैष्णव पंथीय, आसामातील आदिवासी समूह यांच्या भाषा आणि संस्कृती ही आसामी राष्ट्रवादाची बैठक असावी असं या याचिकेद्वारे मणिराम यांनी स्पष्टपणे सुचवलं आहे.

अहोम राज्यसंस्था अर्थातच राजेशाहीची पुर्नस्थापना करण्यासाठी जमवाजमव करायला मणिराम कोलकात्याला गेले. अहोम राजाचा वंशज कंदरपेश्वर सिंघा याच्या वतीने त्यांनी त्यांनी तिथल्या न्यायालयात ६ मे १८५७ रोजी याचिका दाखल केली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेने ब्रिटीश सेनाधिकार्‍याला ठार मारून क्रांतीचं रणशिंग फुंकलं. त्यावेळी मंगल पांडेला आवरणार्‍या सैनिकावर बराकीतल्या अन्य सैनिकांनी दगडफेक केली होती. मंगल पांडेला निघून जाऊ दे अन्यथा आम्ही तुझ्यावर गोळ्या चालवू अशी धमकीही दिली. मात्र प्रत्यक्षात बंडाला सुरुवात झाली १० मे १८५७ रोजी. या बंडात आसामनेही उडी घ्यावी आणि ब्रिटीशांच्या विरोधात बंड करून अहोम राजवटीची स्थापना करावी, यासाठी मणिराम दिवाण यांनी हालचाली सुरु केल्या. कोलकता, दिब्रुगढ, गोलाघाट, सिबसागर, जोरहाट अशा विविध ठिकाणच्या विश्वासू साथीदारांना त्याने एकत्र आणण्यात त्यांना यश मिळालं. कंदरपेश्वर सिंघा या अहोम राजाचे विश्वासू साथीदार होते सुभेदार शेख भिकून आणि नूर मोहम्मद. त्याशिवाय अन्य दरबारीही सामील झाले. कोच राजबंशी, आसामी हिंदू, आसामी मुसलमान, अहोम असे विविध धार्मिक, भाषिक, वांशिक लोक या कटात सहभागी झाले होते. प्रथम जोरहाट ताब्यात घ्यायचं त्यानंतर दिब्रुगढ, सिबसागर हे जिल्हे मुक्त करायचे अशी रणनीती आखण्यात आली. ब्रिटीशांनी ब्रह्मी सैन्याच्या तावडीतून आसामची मुक्तता केल्याबद्दल मणिराम दिवाण यांनी बुरांजीमध्ये (आसामी तवारिख) असं लिहून ठेवलंय की अमरावतीच्या पुरंदराप्रमाणे ब्रिटीशांची संपत्ती आणि साम्राज्य वाढो. परंतु त्यानंतर मणिराम ही राजवट उलथून टाकण्यासाठी कटिबद्ध झाले. कोलकत्याहून मणिराम ह्या रणनीतीचं सूत्रसंचालन करत होते. परंतु ब्रिटीश पोलीसांना या कटाचा सुगावा लागला आणि अटकसत्र सुरु झालं. मणिराम दिवाण यांना कोलकत्यात अटक करण्यात आली. २६ फेब्रुवारी १८५८ रोजी त्यांना जाहीरपणे फाशी देण्यात आलं. त्याचे पडसाद आसामात उमटले. चहामळ्यातल्या शेकडो कामगारांनी बंद पाळला. लोकांचा असंतोष उफाळून आला. या आंदोलनाला ना नेता नव्हता की संघटना वा कार्यक्रम. त्यामुळे हा असंतोष सहजपणे चिरडण्यात आला.

ब्रिटीशांच्या आगमनापूर्वी आसामात बेबंदशाही माजली होती. शैव वा शाक्त आणि वैष्णव या दोन पंथांमधील संघर्षाने राज्य यंत्रणा खिळखिळी झाली होती. त्यातच ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांमुळे अराजकसदृश्य स्थिती होती. कचार संस्थानचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये होतं ते  १८२६-२७ या काळात २० हजार रुपयांवर आलं. राजाची ही स्थिती असेल तर सामान्य जनांचे काय हाल असतील ह्याची कल्पना करता येते. ब्रह्मदेशातून होणार्‍या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठीच अहोम राजाला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला पाचारण करावं लागलं. कंपनीच्या सैन्याने ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा पुरता बंदोबस्त केल्यानंतरच आसामात शांतता प्रस्थापित झाली. आणि पुढे लवकरच कंपनीने अहोम राजांना बरखास्त करून आसामवर आपला अंमल प्रस्थापित केला. अहोम राजांनी ६०० वर्षे आसामवर राज्य केलं होतं. ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा बीमोड करण्याची आर्थिक आणि लष्करी बळ त्यांच्याकडे नव्हतं. ह्या काळात आसामातील गावं स्वयंपूर्ण नसली तरी आत्मनिर्भर होती. पोटापुरतं उत्पन्न शेतीतून मिळत होतं. मात्र वरकड उत्पादन वा उत्पन्न नव्हतं. अहोम राजवटीत शेतसारा नव्हता. शेतकर्‍यांनी वर्षातले काही महिने राजदरबारासाठी कष्ट विकायचे अशी प्रथा होती. ही प्रथा गुलामगिरी सदृश्यच होती. शेतसारा नसल्याने साम्राज्याच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी फौज उभारण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसाच नव्हता. त्यामुळे कंपनीला सहजपणे आसामात प्रवेश मिळाला.
 कंपनीचं राज्यात शेतसारा आणि कर लावण्यात आले. कारण या प्रचंड भूप्रदेशातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये ब्रिटीशांना रस होता. त्यावेळी आसाममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होती. ही जमीन एक तर पाणथळ होती किंवा मोठ्या प्रमाणावर अरण्यांनी व्यापलेली होती. फॉरेस्ट कायदा वा वनविधेयक आणून ब्रिटीशांनी वनसंपत्तीची लूट वा शोषण सुरु केलं. (महात्मा फुलेंनी शेतकर्‍य़ाचा असूड या ग्रंथात त्यावर कोरडे ओढले आहेत.) आसामात जंगल जमीन वहिताखाली आणण्याचं धोरण ब्रिटीशांनी अवलंबिलं. आसाम त्या काळात बंगालला जोडण्यात आला होता. मेमनसिंग, ढाका इत्यादी जिल्ह्यांमध्ये परिपत्रक काढून ब्रिटीशांनी शेतकर्‍यांना आसामात जमीन कसण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. जंगल जमीन वहिताखाली आणली तर एक वर्षासाठी शेतसारा माफ करण्यात आला. परिणामी आसामात परप्रांतीयांचा ओघ सुरु झाला. नेपाळी, बंगाली, संथाळ मोठ्या प्रमाणावर आसामात स्थलांतरित झाले. त्यांनी स्वतंत्र गावं वसवली. जंगल जमिनीवर चहामळ्यांनाही उत्तेजन देण्यात आलं. चहामळ्यांसाठी तर करमाफीची योजना होती. चहामळ्यांवर काम करायला मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज होती. त्यासाठी बिहार, ओडीशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, मद्रास या प्रांतातील दुष्काळप्रवण भागातून प्रचंड प्रमाणावर मजूरांची आयात करण्यात आली. १९३१ सालापर्यंत आसामातील परप्रांतीयांची संख्या १३ लाख झाली. त्यावेळच्या आसामच्या लोकसंख्येमध्ये हे प्रमाण १/६ होतं. जवळपास १५ लाख एकर जंगल जमीन लागवडीखाली आणण्यात आली. परप्रांतीय आसामातील वनसंपत्तीचं बेसुमार शोषण करत आहेत या विषयावर आसामच्या विधिमंडळात १९३७ सालीच घमासांग चर्चा झाली. लोकसंख्या वाढली, शेती वाढली त्यामागोमाग व्यापारही वाढला. चहा कारखान्यांची सर्व यंत्रसामुग्री इंग्लडातून आयात करण्यात आली होती. चहामळ्यातील कामगारांचा शिधा आणि अन्य साहित्याचा पुरवढाही कोलकत्यातून व्हायचा. हा व्यापार, त्यासाठी लागणारा पतपुरवठा यासाठी कोलकत्यातून मोठ्या प्रमाणावर मारवाडी समाज आसामात आला. चहामळ्यांवरील कार्यालयात काम करण्यासाठी इंग्रजी शिक्षित बंगाली आले. वसाहतवाद म्हणजे काय तर एका प्रदेशातील लोकांनी दुसर्‍या प्रदेशात जाऊन तिथली जमीन आणि अन्य नैसर्गिक संसाधनांवर मालकीहक्क स्थापित करणं आणि तेथील राज्ययंत्रणा ताब्यात घेणं. आसाममध्ये राज्ययंत्रणा ब्रिटीशांच्या ताब्यात होती पण वसाहती झाल्या त्या परप्रांतीयांच्या अर्थातच भारतीयांच्या, जमीनीवर मालकी प्रस्थापित झाली परप्रांतीयांची. जंगलावर मालकीहक्क मिळाला ब्रिटीशांना वा परप्रांतीय भारतीयांना. सरकारात अर्थात नोकरशाहीत वरचष्मा राहिला परप्रांतीयांचा. आसामातील उच्चवर्णीय हिंदू (ब्राह्मण, कायस्थ), अहोम यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले. अहोम तर सत्तेबाहेरच फेकले गेले होते. त्यांच्याकडे जमीन वगळता अन्य संसाधनंही नव्हती. त्या जमीनीचीही लूट ब्रिटीशांनी केली. वसाहतवादाची सुरुवात जरी ब्रिटीशांनी केलेली असली तरी त्याचा चेहरा भारतीयच राहिला. मार्क्सवादी दृष्टीने आसामी समाजातील वर्ग विग्रहाचं विश्लेषण करून अहोम आणि उच्च जातीय हिंदू यांनी आपल्या हितसंबंधांसाठी आसाम आंदोलन सुरु केलं असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे. पण आपणच आपल्या भूमीवर अल्पसंख्य होत आहोत ह्याचा आसामी जनतेला धक्का बसला होता हे नाकारण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर लाखोंच्या संख्येने बांग्ला देशातून आसामात निर्वासित आले. फक्रुद्दीन अली अहमद ह्यांनीही या स्थलांतराला उत्तेजन दिलं होतं. त्यामुळेच आसाम आंदोलनाची रुजवात झाली. ऑल आसाम स्टुडंन्टस् युनियनच्या पोटात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने जन्म घेतला. इंदिरा गोस्वामी यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेलाही उल्फा या संघटनेबद्दल सहानुभूती होती, हे इथे ध्यानात घेतलं पाहीजे. आसाम आंदोलनात चहामळ्याचे कामगार सहभागी नाहीत असं मराठीमध्ये (दिनांक साप्ताहिक) सर्वप्रथम लिहिलं कुमार केतकरांनी. त्यांच्या लेखाचं शीर्षक होतं आसाम लढ्याचे पांगळे पाय. इंदिरा गांधी यांना सत्ताच्युत करण्याच्या अमेरिकेच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग म्हणूनच कुमार केतकर आसाम आंदोलन वा देशातील कोणत्याही असंतोषाकडे पाहात होते. मणिराम दिवाण ह्यांच्या बलिदानानंतर म्हणजे १८५८ नंतर चहामळ्यातील कामगार स्वातंत्र्य आंदोलनातही सहभागी झाले नव्हते, होऊ शकले नव्हते ही बाब केतकरांनी मांडली नाही. कारण मग त्यांना आसाम प्रश्नाचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाच्या चौकटीत करता आलं नसतं. असो.
आसामात पोटापुरती शेती केली जायची. चहामळ्यांमुळे शेती पुरवठाप्रधान होऊ लागली. औद्योगिकरण झालेलं नव्हतं पण लोकांच्या आशा-आकांक्षामध्ये वाढ झाली होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसामातील विविध वांशिक गटांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. आसामी-बांग्ला देशी, आसामी-बंगाली, आसामी-बोडो, आसामी-कोच राजबंशी असे संघर्ष निर्माण झाले. चहामळ्यातील कामगार प्रामुख्याने आदिवासी जमातींमधले आहेत. आपला समावेश अनुसूचित जाती-जमातींमध्ये करण्यात यावा यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केलं. अर्थव्यवस्था जशी बदलू लागते तसे राजकीय-सामाजिक संघर्ष तीव्र होऊ लागतात. आता आसामातील शेती पुरवठा प्रधानतेकडून मागणीप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. २०११ साली तांदळाचं सर्वाधिक उत्पादन आसामात झालं. प्रणव मुखर्जींनी हरित क्रांती पूर्वेकडे नेण्याची घोषणा करून जी आर्थिक तरतूद २०११ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली त्याचा हा परिणाम होता. ह्या वरकड उत्पादनामुळे शेती मागणीप्रधानतेकडे वेगाने वाटचाल करू लागेल. त्यातून अर्थातच नवे प्रश्न निर्माण होतीलच.
आसामातली जातिव्यवस्था बंगाल वा गंगा-यमुनेच्या खोर्‍यात असते तेवढी बंदीस्त नव्हती. अस्पृश्यता तर नव्हतीच. पण उर्वरित भारतातून लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं जातिव्यवस्थाही आली. चहामळ्यांमध्ये तर अठरापगड जाती-जमातींचे लोक आले. त्यांचा पहिला संघर्ष आदिवासींशी झाला. बराक नदीच्या दक्षिणेकडील टेकड्या केवळ जंगलांनी व्यापलेल्या होत्या. लुशाई अर्थात मिझो जमाती तिथे शिकारीला यायच्या. पारंपारिक अर्थाने या टेकड्यांवरील जंगल त्यांच्यासाठी राखीव होतं. चहामळ्यांसाठी जंगल साफ करायला सुरुवात झाल्याने मिझो संतापले. त्यांनी वसाहतवाद्यांवर म्हणजे अर्थातच चहामळ्यांच्या कामगारांवर हल्ले सुरु केले. पुढे पोलिसांची राखीव कुमक मागवून त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. इनर लाइन परमिट अर्थात टेकड्यांवरील जंगलात जायचं तर परवाना पद्धत सक्तीची करून ब्रिटीशांनी आदिवासींना मुख्य प्रवाहापासून तोडूनच टाकलं.         
चहामळ्यामध्ये जातिव्यवस्था पाळली जाते. उच्चवर्णीय कामगारब्राह्मण, भूमिहार, राजपूत आपली आडनावंतिवारी, चौबे, राय, सिंग, अभिमानाने मिरवतात. अनेक ठिकाणी ब्राह्मण घरी आला तर त्याचे पाय तीन वेळा धुण्याची प्रथा आहे. ते पवित्र पाणी आपल्या अंगावर शिंपडून स्वतःलाही शुद्ध करण्याचा विधी पाळला जातो. दुशाद, बावरी, कालिंदी, रविदास या जातींच्या व्यक्तिंचा स्पर्श झालेलं पाणी अन्य जातींनाग्वाला (गवळी), कोयरी, कुरमी, राजपूत यांना चालत नाही. एक गाव, एक पाणवठा चहामळ्यांमध्ये नाही. चहामळ्यांमध्ये असलेला पाणक्या पूर्वास्पृश्य जातींचा चालत नाही. गवळी, कोयरी, कुर्मी, बरोई यांच्या हातचं पाणी सर्वांना चालतं त्यामुळे पाणक्या अर्थात मजूरांना पाणी देणारा या जातींचा असतो. धोब्याकडे शिजवलेलं अन्न रविदास खात नाहीत. धोबीही रविदासांच्या घरी जेवत नाहीत. मुंडाच्या घरात संथाळ जेवत नाहीत. प्रत्येक जातीची पंचायत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास जात पंचायती दंड ठोठावतात. शिक्षणाचं प्रमाण कमी त्यातही गळतीचं प्रमाण अधिक आहे. भुवन व्हॅली टी इस्टेटमध्ये २०११ सालात दारिद्र्याने १५ कामगार मृत्युमुखी पडले. कुपोषण आणि वैद्यकीय मदतीचा अभाव ही त्याची कारण आहेत असं आसाम टाईम्स या वर्तमानपत्राने म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमलीय. स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियनांच्या मालकीचे चहामळे असताना या कामगारांची स्थिती अतिशय शोचनीय होती. त्यांना कोंडवाड्यात बंदच करून ठेवलं होतं. अजूनही त्यांच्यातील शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं नाही. चहामळ्यातील कामगारांच्या वस्त्यांना भेट दिल्यावर व्ही. एस. नॉयपॉल अतिशय व्यथित झाले. त्यांचे पूर्वज वेस्ट इंडीजमधल्या मळ्यांवर काम करण्यासाठी भारतातून स्थलांतरित झालेले असल्याने नॉयपॉल ह्यांना या कामगारांबद्दल विशेष ममत्व होतं. चहामळ्यांवर आता जरी भारतींयाची मालकी असली तरिही कामगारांच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही. भारतातल्या जातिव्यवस्थेने कामगार आणि मालक यांना आपल्यात सामावून घेतलं आहे. कामगार आणि चहामळ्यांचे मालक-संचालक अशा दोन जातीच आहेत. कामगार कुटुंब वा जातिमध्ये बंदिस्त तर मालक-संचालक आपल्या क्लबांमध्ये दंग. मालक-संचालकांनी आपल्या पूर्वसुरींचं अर्थात ब्रिटीशांचं अनुकरण केलं आहे. केवळ शर्ट, शॉर्ट एवढ्यापुरतंच नाहीतर त्यांचे आत्मेही ब्रिटीशांचेच असावेत. बहुसंख्य कामगार निरक्षर, दारूच्या आहारी गेलेले, परंपरा हरवलेले, अनेक समूह तर स्वतःची भाषाही गमावून बसले आहेत. हे सर्व वेस्ट इंडीजमध्येही पाह्यला मिळतं. ह्यांची स्वतंत्र गावं नाहीत तर इस्टेटीच्या वळचणीला उभ्या राह्यलेल्या वस्त्या आहेत, असं व्ही. एस. नॉयपॉल ह्यांनी नोंदवलं आहे.

चहा कामगार आपल्या सांस्कतिक परंपरा गमावून बसले आहेत हे नॉयपॉल ह्यांचं म्हणणं कामगारच स्वीकारणार नाहीत. चहामळ्यांतील कामगारांमध्ये केवट, मल्लाह हे गंगापूजन करणारे, नागपूजा बंगालातून आली. ओरॉन चंद्रपूजक, मल्लाह नौकापूजनही करतात. रामनवमी, फागुआ, अक्षय तृतिया, दसरा, कालीपूजा, दुर्गापूजा, दिवाळी, होळी, जन्माष्टमी इत्यादी अनेक गंगाखोर्‍यातले सण आसामात साजरे होऊ लागले. बिहू हा आसामचा राष्ट्रीय सण. देशातच नव्हे तर जगभरात जिथे असतील तिथे आसामी लोक बिहू साजरा करतात. चहामळ्यातल्या कामगारांमध्ये आदिवासींची संख्या मोठी असल्याने चहामळ्याच्या कामगार वस्ती वा गावांमध्ये एक नाचघर असतंच. नृत्य आणि गाणं ह्याशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. चहामळ्यातील कामगारांच्या गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतालाही योगदान दिलं आहे. सलील चौधरींचा पिंड चहामळ्यातील कामगारांच्या संगीतावरच पोसला गेला होता. भूपेन हजारिका यांनी तर बंगाली, आसामी, चहामळ्यातील कामगार, ईशान्य भारतातील आदिवासी ह्यांच्या लोकसंगीतातून अनेक धुन आणि ताल उचलले आणि भारतीय संगीत समृद्ध केलं.
एक कली दो पत्तीयाँ
नाजूक नाजूक उँगलियाँ
तोड रही रतनपूर बागिचे में.....
या गुलजार यांच्या गीताला भूपेन हजारिका ह्यांनी दिलेलं संगीत त्याची उत्तम साक्ष आहे.
दोन पान आणि एक पानकळी नाजूकपणेच खुडावी लागते. त्याचा संबंध चहाच्या चवीशी असतो. अशी खुडलेली पानं लगोलग फॅक्टरीमध्ये प्रक्रियेसाठी रवाना केली जातात. सच्छिद्र सिलींडरमध्ये ही पानं गरम हवेच्या झोतात सुकवली जातात. त्यानंतर फिरत्या पृष्ठभागावर वाटली जातात. त्यानंतर दळली जातात. सुकवून पुन्हा दळून गाळली जातात. अखेरीला त्यांच्यावर स्वाद प्रक्रिया करण्यात येते. चहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. ग्रीन टी आणि ब्लॅक टी. ग्रीन टी बनवण्याच्या प्रक्रियेत पानांचं फर्मेंटेशन करत नाहीत. ब्लॅक टी मध्ये दोन उपप्रकार आहेत. ऑर्थोडॉक्स टी. ह्यामध्ये चहाची पानं असतात. तर सीटीसी (क्रशिंग, टिअरिंग, कर्लिंग) म्हणजे चिरडून, फाडून, वळवलेली पानं. प्रतिकारशक्ती वाढवणं, रक्तदाब संतुलित ठेवणं, हृदयविकारांवर आणि वजन कमी करण्यासाठी चहा गुणकारी आहे.  प्रत्येक प्रकारच्या चहाचे गुणधर्म, चव आणि स्वाद यामध्ये फरक असतो. देशाच्या राष्ट्रीय पेयाचा मान चहाला देण्यात यावा अशी मागणी अलीकडे जोर करू लागली आहे. चीन आणि इंग्लड या दोन देशांनी चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा दिला आहे. पाकिस्तानचं राष्ट्रीय पेय उसाचा रस आहे तर स्कॉटलंडने व्हिस्कीला हा दर्जा दिला आहे. जागतिक उत्पादनात आसामातील चहाचा वाटा १३ टक्के आहे तर भारतातील ५१ टक्के उत्पादन आसामात होतं. आसामच्या चहा उद्योगाची वार्षिक उलाढाल ५००० कोटींची आहे. पाच लाख कामगारांना कायमस्वरुपी तर पाच लाखांना हंगामी रोजगार आसामचा चहा उद्योगामुळे मिळतो. अखिल भारतीय पातळीवर हा आकडा अर्थातच दहा लाखांच्या घरात आहे. चहा हा केवळ एक जिन्नस वा उत्पादन नाही. चहा ही एक संस्कृती आहे. म्हणून चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा द्यावा अशी मागणी आसामातील चहामळ्यांच्या संघटनांनी केली आहे. योजना आयोगाचे उपाध्यक्ष, माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मागच्या महिन्यातच या मागणीला पाठिंबा दिला आहे. चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा मिळाला तर त्याचा संबंध भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याशी, त्यामध्ये फासावर गेलेल्या देशभक्ताशी आणि भारतीय चहाचा शोध लावणार्‍या मणिराम दिवाण यांच्याशी आहे. 

Saturday, 21 April 2012

साखर चरित्र


साखर कांडल्यावर उखळ पांढरं होतं. साखरेला उत्तम भाव मिळतो त्यामुळे शेतकर्‍याचं नशीब फळफळतं म्हणून हा वाक्प्रचार रुढ झाला. आमच्या लहानपणी मुंबईत काकवी मिळायची. पोळीबरोबर काहीतरी गोड हवं तर काकवी नाही तर गूळ ताटात वाढला जायचा. चहाही गुळाचाच. माझा जन्म १९६१ सालचा. त्यावेळी देशातलं दरडोई गूळाचं सेवन सालीना १५ किलो होतं तर साखरेचं पाच किलो. २०१०-११ सालात भारतीय माणूस वर्षाला २० किलो साखर खाऊ लागला तर गुळाचं सेवन पाच किलोपर्यंत खाली आलं. कारण साखर स्वस्त झाली आणि गूळ महागला. साखरेमध्ये शून्य पोषणमूल्यं आहेत तरिही जगभरात साखरेच्या सेवनाचं प्रमाण संपूर्ण जगात वाढत चाललं आहे. साखर, चहा, कॉफी, कोको अशा अनेकानेक पदार्थांचं जागतिकीकरण होण्याची प्रक्रिया गेल्या दोन-तीनशे वर्षांतली आहे. आठवडी बाजार अगदी आदिवासींच्या प्रदेशातही भरतात. पण ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो तिच्या विस्ताराला सुरुवात झाली युरोपातून. नव्या पदार्थांचं व्यसन लोकांना लावण्यावरच अन्न प्रक्रिया उद्योगांची मदार असते. मुद्दा अन्न प्रक्रिया उद्योगांवर टीका करण्याचा नाही तर माणसं वा समाजाच्या आहारात बदल केव्हा होतो, कसा होतो, नव्या चवी केव्हा आणि कशा स्वीकारल्या जातात हे समजून घेण्याचा आहे.

कापसाप्रमाणेच साखरेचाच शोध भारतातच लागला. कापसाप्रमाणे उसाचं मूळ स्थान भारत. रामायणातल्या मेजवानीच्या वर्णनात उसाचे करवे येतात म्हणजे भारतात उसाचं पीक प्राचीन काळापासून घेतलं जातं होतं, असं अनुमान काढता येईल. ऊस चोखून खावा म्हणजे उसाची गोडी शोषता येते. उसाच्या दाट रसाला फणिता म्हणतात. या फणितापासूनच गूळ आणि शर्करा तयार होते अशी माहिती अथर्ववेदात आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा काल इसवीसन पूर्व ३००. या ग्रंथात उसाच्या रसापासून गूळ, फणिता, खांड, खांडसरी, मत्स्यांदिका (माशाच्या आकाराचे साखरेचे स्फटिक) आणि शर्करा अशा अनेक प्रकारची साखर तयार करतात, अशी नोंद आहे. सुश्रुत आणि चरक संहितेत साखरेच्या औषधी गुणांची चर्चा आहे. चिनी लोकांचा दावा आहे की साखरेचा शोध त्यांनीच लावला. पण ऐतिहासिक पुरावे असं सांगतात की उसापासून साखर तयार करण्याचं तंत्र शिकून घेण्यासाठी चीनच्या सम्राटाने काही कारागीरांना गंगेच्या खोर्‍यात पाठवलं होतं. इसवीसन पूर्व ५५० ते ४८६ या काळात पर्शियामध्ये दरायसचं साम्राज्य होतं. त्याने सिंधु खोर्‍यावर आक्रमण केलं तेव्हा त्याला बांबूसारख्या दिसणार्‍या आणि मधमाशांच्या मदतीशिवाय मध देणार्‍या वनस्पतीचा अर्थात गवताचा शोध लागला. या पर्शियन लोकांनी उसासोबतच साखर बनवण्याचं तंत्रही मायदेशात नेलं आणि तिथे साखर उद्योग सुरु केला. साखरेचा व्यापारही त्यांनी सुरु केला. त्यामुळे अल्पावधीत उसाची लागवड सिंधु नदीपासून आफ्रिकेत आणि काळ्या समुद्रापर्यंत सुरु झाली. उसाच्या रसापासून बनवलेल्या दाट पाकाला मसाल्याचा पदार्थच म्हणत कारण पदार्थ टिकवण्याचा गुणधर्म होता त्याच्यात. संस्कृत शर्करा या शब्दांचं ग्रीक आणि लॅटिन भाषेत स्थानांतरण होऊन सॅकॅरम हा शब्द साखरेला मिळाला. ( या सॅकॅरमपासूनच रम हा शब्द निर्माण झाला. उसाच्या रसाच्या मळीपासून तयार होणारी दारू. असो.) मुद्दा हा की साखर या पदार्थाचं मार्केट पोटेन्शिअल भारतीय लोकांच्या ध्यानी आलं नाही. पर्शियन आणि त्यानंतर अरब लोकांनी साखरेचा व्यापार सुरु केला. शेजारी राष्ट्रांना ते साखर निर्यात करू लागले. त्यामुळे साखर बनवण्याच्या तंत्रातही प्रगती केली. तो काळ असा की युरोप सुरु व्हायचा आणि संपायचाही ग्रीसमध्ये. (उरलेल्या युरोपात बहुधा हिममानव वा निआंडरथल यांचाच वावर असावा.) ग्रीसचा संबंध पर्शिया आणि आशियाशी होता. सिकंदरने ग्रीसच्या साम्राज्याच्या सीमा सिंधु खोर्‍यापर्यंत विस्तारल्या होत्या. मॅगेस्थेनिसने तर नोंदच करून ठेवलीय की भारतीय लोक गवतापासून मध बनवतात. पण ग्रीकांनाही युद्धशास्त्र, तत्वज्ञान, चर्चा, वाद-विवाद ह्यातच रस असावा. त्यामुळे साखर उद्योगात त्यांनी रुची घेतली नाही की त्याचा विकासही केला नाही. (ह्याबाबतीत ग्रीक आणि भारतीयांमध्ये भलतंच साम्य दिसतं.) अरब व्यापारी होते. हुषार आणि धूर्त होते. युरोपियनांची साखरेची आवड हेरून साखरेचे कारखानेच त्यांनी काढले. उसाचं उत्पादन करता येईल असे प्रदेश त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणले. साखरेला उष्णता दिली की ती वितळते, खमंग होते, तिचा रंग तपकिरी बनतो. ती चिकट होते. अरबी भाषेत या साखरेला म्हणतकुरत अल मिल. त्यापासूनच कॅरॅमल हा शब्द बनला. कॅरॅमल म्हणजे मधुर मिठाचा गोळा. इसवीसनाच्या दहाव्या दशकापर्यंत साखरेला पांढरं मीठ म्हणत. कारणं दोन. पहिलं हे की पदार्थ टिकवण्याचा गुण साखरेत होता आणि दुसरं, मीठ काळपट वा मातकट रंगाचं होतं. स्वच्छ पांढरं मीठ तयार करण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान त्या काळात नव्हतं. तर या कॅरॅमलचा उपयोग अरबी स्त्रिया अंगावरील लव काढण्यासाठी करत. सौंदर्यप्रसाधनांमध्ये साखरेचा वापर अरबांनी सर्वप्रथम सुरु केला. म्हणजे सर्वप्रथम काकवी, गूळ अशा क्रमाने पर्शियन साखरेकडे वळले. साखरेचा शोध लागण्याआधी गोड पदार्थ म्हणजे मधच पर्शियन आणि युरोपियनांना ठाऊक होता. मधाचं ठोक उत्पादन करता येतं नव्हतं त्यामुळे साखरेच्या गोडीची भुरळ अरब आणि युरोपियनांना पडली.


अरब मुसलमान धर्मभोळे, एका हातात कुराण आणि एका हातात तलवार घेऊन जग पादाक्रांत करायला निघाले, अशी चुकीची प्रतिमा आपल्याकडच्या इतिहासाच्या पुस्तकांनी तयार केलीय. अगदी नरहर कुरुंदकरही त्यातून सुटलेले नाहीत. वस्तुतः अरब व्यापारी होते. उद्यमशील होते. विचाराने प्रगत होते. वेगवेगळे प्रयोग करणारे होते. अॅरिस्टॉटल आणि अन्य ग्रीक तत्वज्ञांच्या ग्रंथांचे अभ्यासक होते. (अरबी प्रवाशांच्या नोंदी त्या काळातल्या युरोपियन प्रवाशांपेक्षा अधिक विवेकशील आहेत. उदाहरणार्थ अल बेरूनीचा भारत हा ग्रंथ.) त्यामुळेच त्यांचं युद्धतंत्र प्रगत होतं. म्हणूनच ते जग पादाक्रांत करू शकले. अरबांनी साखरेच्या व्यापारातून बख्खळ संपत्ती मिळवली. तेराव्या शतकातील फ्रान्समधील नोंदी पहा. सॅव्होईच्या काऊंटेसने लिहिलेल्या घरखर्चात एक पौंड साखरेला दोन सोन्याच्या साऊस आणि पाच चांदीचे दिनार एवढी किंमत मोजावी लागे, असा उल्लेख आहे. बर्गंडीच्या काऊंटेसने १२९९ साली साखरेच्या पंधरा गोणी खरेदी केल्या आणि त्यासाठी पंधरा गोणी चांदी एवढी किंमत तिला मोजावी लागली.

ऊस हे नगदी पिक होतं. त्याच्या लागवडीसाठी आणि साखर कारखान्यांसाठी गुलामांना कामाला जुंपलं जाई. गुलामीची मुसलमानांची वा अरबांची आणि युरोपियनांची संकल्पना यात मूलभूत फरक आहे. युरोपियनांसाठी जमीन हेच संपत्तीच्या निर्मितीचं केंद्र होतं तर अरबांसाठी व्यापार. युरोपात जमीन मालकीला महत्व होतं आणि मुसलमानांमध्ये गुलामांच्या संख्येवर मालकाची श्रीमंती मोजली जायची. गुलामाने मालकाच्या संपत्तीत भर घालणं अपेक्षित होतं. जमीन अर्थात शेती हे उत्पादनाचं साधन नसल्याने गुलामाने मालकाला व्यापारात मदत करणं अपेक्षित होतं. (सिंदबादच्या सफरीतले किंवा अरेबियन नाईटसमधले गुलामांचे संदर्भ काळजीपूर्वक वाचले तर हा मुद्दा स्पष्ट होईल.) त्यामुळे अरबी मुसलमान गुलामांना सैन्यातही भरती करायचे. ही भरती प्रामुख्याने आफ्रिकेतूनच व्हायची. पण या गुलामांवर ते वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपवायचे. अगदी लष्करी मोहिमांच्याही. त्यामुळेच मलिक अंबर असो की शिद्दी जौहर ह्या गुलामांना राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली. सिंधू नदीच्या खोर्‍यातही आफ्रिकन गुलामांनी आपल्या पराक्रमाने  लष्करात आणि दरबारात मानाच्या जागा मिळवल्या होत्या.


संपत्तीची निर्मिती जमिनीतून अर्थात शेतीतून होते अशीच युरोपियनांची धारणा होती. त्यामुळे गुलामाला जमीनीवर राबवून त्याच्याकडून अधिकाधिक काम करून घेणं असा त्यांचा खाक्या होता. शेतीकामासाठी लागणारा एक पशू अशीच त्यांची गुलामांबद्दलची धारणा होती. आफ्रिकेतील काळ्या वर्णाच्या वा अमेरिकेतील तांबड्या वर्णाच्या लोकांना ते माणूसच मानत नव्हते. त्यांना जनावरांसारखीच वागणूक दिली जायची. पायात बेड्या घातलेल्या गुलामांना गळ्यातल्या साखळीने एकमेकांना जोडून त्यांच्या टोळ्या जहाजावर चढवल्या जायच्या. जेवढे जास्त गुलाम कोंबाल तेवढा नफा जास्त या हिशेबाने कमी जागेत जास्तीत जास्त गुलामांना डांबलं जायचं. मल-मूत्र विसर्जनाचीही सोय नसायची. उलट्या, हगवण, अन्य रोग यामुळे ३० टक्के गुलाम अमेरिकेच्या किनार्‍याला पोचेपर्यंत मरून जायचे. त्यांची प्रेतं समुद्रात फेकून दिली जात. इस्लाममध्ये विशेषतः अरबस्थानातील इस्लाममध्ये गुलामांना मनुष्यप्राण्याची वागणूक दिली जायची. युरोपियन लोक तेवढे सुसंस्कृत नव्हते. 

युरोपियन समाज सुसंस्कृत व्हायला सुरुवात झाली दहाव्या शतकात. व्यापार वाढू लागला आणि पूर्वेकडून येणार्‍या मसाल्याच्या पदार्थांची मागणी वाढली. साखर, मसाले, रेशमी आणि सुती वस्त्रं, हस्तीदंत, चंदनाच्या कलाकुसरीच्या वस्तू अरबांकडून खरेदी करून युरोपातील देशांना चढ्या दराने विकणे हा व्हेनिसच्या व्यापार्‍यांचा धंदा बनला. व्हेनिसमध्येच साखरेची पहिली वखार सुरु झाली. (आणि यथावकाश साखर निर्मितीलाही सुरुवात झाली.) या व्यापारामुळे युरोपियन देशातील सरकारांना मोठं उत्पन्नाचं साधन गवसलं. या मालावर अव्वाच्या सव्वा जकात आकारली जायची. त्यातच जकात अधिकार्‍यांना लाचही द्यावी लागायची. त्यामुळे आधीच महाग असलेल्या या मालाच्या किंमती आणखी वाढत असत. पण हा माल बंदरात पोचल्यावर चुटकीसरशी विकला जात असे. त्यामुळेच सोळाव्या शतकात युरोपातील संपन्न शहर होतं व्हेनिस. मर्चंट ऑफ व्हेनिस हे शेक्सपियरचं नाटक याच काळातलं आहे. भूमध्य सागरी प्रदेशात व्हेनिस व्यापाराच्या केंद्रस्थानी आल्याने रेनेसाँ वा प्रबोधनाचा आविष्कार सर्वप्रथम इटलीमध्ये झाला. मे. पु. रेगे यांनी म्हटलं आहे, “ख्रिश्चन धर्मातील मानवी प्रकृतीची पापमयता रेनेसाँने नाकारली, पाप ही संकल्पनाच नाकारली, माणसाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींच्या उत्कर्षात, त्यांच्या मुक्त विलासात माणसाचे अंतिम कल्याण आहे असे मानले. माणसाच्या मनोधर्मांवरील आणि त्याला लोभनीय वाटणार्‍या बाह्य सृष्टीवरील पापाचे सावट दूर झाले. रुप-रस-गंध-स्पर्शांनी गजबजलेल्या निसर्गातील आनंद अनुभवायला माणूस मोकळा झाला. लिओनार्दो दा विंची, मायकेल अँजेलो हे या कालखंडाचे प्रतिनिधी. रेनेसाँच्या या कालखंडात मूठभर व्यक्तीच मुक्त झाल्या. त्यांचं कर्तृत्व असामान्य होतं. पण तो कालखंड इतिहासाच्या ओघाला वळण देऊ शकला, गती देऊ शकला. कारण विज्ञानाची परंपरा उदा. गॅलिलिओ, केप्लर इत्यादी, उभी राह्यली आणि सामान्य माणसंहीखलाशी, शेतकरी-सैनिक, शेतकरी-कारागीर, व्यापारी, इत्यादी या चळवळीत ओढली गेली. त्यामुळे युरोपमध्ये रेनेसाँनंतर धर्मसुधारणेची म्हणजेच रिफर्मेशनची चळवळ समाजाच्या तळागाळात पोचली. त्यातूनच औद्योगिक क्रांतीची पायाभरणी झाली असं मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने प्रोटेस्टंट एथिक्स अँण्ड स्पिरीट ऑफ वेस्टर्न कॅपिटॅलिझमया ग्रंथात सविस्तर विशद केलं आहे. रिफर्मेशनच्या नंतर सुरु झालेल्या एनलाटन्मेंट या सांस्कृतिक आंदोलनाने क्रांतीच्या मशाली पेटवल्या.

विज्ञानाच्या क्षेत्रात राबणार्‍या अनेक कष्टकर्‍य़ांच्या श्रमामुळे काळजीपूर्वक केलेल्या निरिक्षणाने पाखडून घेतलेल्या वस्तुस्थिती सामान्य नियमांनी एकत्र विणल्या जात होत्या. निसर्गाविषयीच्या ज्ञानाला वस्तुस्थितीचा भक्कम आधार लाभत होता आणि विज्ञानाचा आकार प्राप्त होत होता. सैनिक आणि खलाशी, इंजिनीयर आणि कारागीर ह्यांच्या अनुभवातून जी माहिती मिळत होती ती आता विज्ञान आत्मसात करू शकत होते. त्यांच्या समस्यांना आता कामचलाऊ, तात्पुरती उत्तरे मिळत नव्हती; ही उत्तरे विज्ञानाच्या हळूहळू रचल्या जाणार्‍या इमारतींचे भाग बनत होती.अशा शब्दांत मे. पुं. रेगे यांनी रेनेसाँच्या कालखंडाची उपलब्धी मांडली आहे.

या प्रक्रियेची कारणं सामाजिक आणि राजकीय होती. मुसलमानांच्या अधिपत्याखालील जेरूसलेमसारखी पवित्र स्थळं परत मिळवण्यासाठी युरोपातील ख्रिश्चन देशांनी मोहिमा (क्रूसेडस्) सुरु केल्या ११-१२-१३ व्या शतकात. रेनेसाँची मूळं या काळात आहेत कारण या क्रूसेडसमुळे युरोपमध्ये सामाजिक स्थित्यंरं घडून आली. हजारो युरोपियन ख्रिश्चन या मोहिमांमध्ये सामील झाले. सैन्य भरतीसाठी युरोपातील भूदासांना म्हणजेच शेतकर्‍यांना जमीनीपासून मोकळं करणं सरंजामदारांना भाग पडलं. आपण शेतीपासून अर्थात गुलामीतून मोकळे होऊ शकतो ह्या अनुभवानेच शेतकर्‍यांमध्ये नवं चैतन्य संचारलं. हजारो युरोपियन या मोहिमांमधून सीरीया, पॅलेस्टीन, तुर्कस्थान, इजिप्त इत्यादी देशांमध्ये गेले. हजारो ठार झाले, पण कित्येक माघारी गेले. अरबस्थानात गेलेले युरोपियन अरबांच्या ऐश्वर्याने, प्रगतीने दिपून गेले. अरबांकडे गेलेला ग्रीक संस्कृतीचा वारसा, वैज्ञानिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नानाविध नव्या आणि चैनीच्या वस्तूंची ओळख त्यांना झाली. साखरेची चव सामान्य युरोपियनांनी म्हणजे सैनिकांनी सर्वप्रथम अरब राष्ट्रांमध्ये चाखली. या मोहिमांमधून परत आलेल्यांनी अनेक नवीन वस्तू आणि चैनीच्या चीजा आणल्या. त्यांची चटक सरंजामदारांना लागली. म्हणून पगाराच्या आणि काही हिश्शाच्या मोबदल्यात शहरातल्या आणि आजूबाजूच्या कारखान्यात काम करण्याची सवलत सरंजामदारांनी शेतकर्‍यांना दिली. त्यामुळे कारागीरांचा वर्ग निर्माण झाला. व्यापारी वर्गही तयार होऊ लागला. व्यापाराची आणि उद्योगधंद्याची केंद्रे म्हणून शहरं उदयाला आली. उद्योगांना, व्यापाराला नवीन रस्ते, दळणवळणाची साधनं यांची गरज भासू लागली. पतपेढ्यांचे, बँकांचे व्यवहार वाढू लागले. १४५३ मध्ये तुर्कांनी काँन्स्टॅटिनोपल ताब्यात घेतलं. त्याचं नामांतर इस्तंबूल करण्यात आलं. तिथे स्थायिक असलेले विद्वान आणि कलावंत पळाले आणि त्यांनी इटलीत आश्रय घेतला. हे पंडित आणि कलावंत यांना व्हेनिसच्या व्यापार्‍यांनी आश्रय दिला. त्यातून विचारमंथनाला सुरुवात झाली तेच रेनेसाँ.

     कारखानदारी आणि व्यापारामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळालं. शहरीकरण वाढलं. शेती उत्पादनात घट झाल्याने आहारात बदल करणं भाग पडलं. वनस्पतीजन्य प्रथिनांपेक्षा प्राणीजन्य प्रथिनांकडे शहरी लोक वळू लागले. मासेमारी आणि पशुपालनाला प्रोत्साहन मिळालं. मांस आणि मासे टिकवण्यासाठी मीठ-मसाल्यांची गरज भासू लागली. भूमध्य समुद्रात युरोपिय उद्योजक आणि व्यापार्‍यांची दाटी झाली. त्यामुळे नव्या भूमीचा शोध गरजेचा बनला. त्यातच पूर्वेकडून येणार्‍या मसाल्याच्या पदार्थांच्या आणि अन्य वस्तूंच्या व्यापारावर अरबांचं नियंत्रण प्रस्थापित झाल्याने नवे सागरी मार्ग ही युरोपची गरज बनली. यामध्ये पोर्तुगीजांनी आघाडी घेतली. त्यांच्यापाठोपाठ स्पॅनिश स्पर्धेत उतरले. पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये साखरेचं उत्पादन तोपावेतो सुरुही झालं होतं. ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधासाठी निघाला आणि पोचला कॅरेबियन बेटांवर. स्पेनच्या राजाला पत्र पाठवलेल्या पत्रात तो म्हणतोमहाराज, आपल्याला लागेल तेवढं सोनं मी आपल्याकरता आणीन. मसाल्याचे पदार्थ, कापूस, गम, रेझिन्स असे अनेक पदार्थ मी मायदेशी घेऊन येईन. वास्को द गामाने पूर्वेकडे जायचा नवा सागरीमार्ग शोधून काढल्याने मसाल्याच्या पदार्थांची गरज भागू लागली होती. त्यामुळे नव्या जगात होणार्‍या अन्य अन्न पदार्थांवर युरोपची दृष्टी वळली.

    शेती जोवर संस्कृतीच्या केंद्रस्थानी होती तोवर समाज खाऊन-पिऊन सुखी असतो किंवा ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’, या वृत्तीचा असतो. व्यापार केंद्रस्थानी येऊ लागल्यावर राहणीमानात, आचारविचारात, आहारात, भाषेत बदल होऊ लागतो. नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता तयार होते. दुसर्‍या प्रदेशावर राज्य करायचं तर आपल्या संपत्तीत वाढ करण्यासाठी हे सूत्रं भक्कम ठेवून युरोपिय देश नव्या प्रदेशांकडे पाहू लागले. नव्या भूमीवर साखर, कॉफी, कोको या नवीन पदार्थांची लागवड करण्यासाठी युरोपिय राष्ट्रांमध्ये होड लागली. ते पदार्थ लोकांच्या आहारात यायला हवेत म्हणून त्यांचा प्रचार करायचा. लोकांना नवीन सवयी लावायच्या, थोडक्यात आचरणात बदल घडवून आणणं हा केवळ विचार परिवर्तनाचा कार्यक्रम राह्यला नाही तर अर्थशास्त्राशी वा अधिक नेमकेपणे बोलायचं तर नफ्याशी जोडला गेला. चहा हे पेय केवळ भारतातच नाही तर युरोपातही ब्रिटीशांनी असंच लोकप्रिय केलं.

उसाच्या लागवडीसाठी अमेरिकेतील मूळ निवासींना गुलाम, वेठबिगार म्हणून कामाला जुंपण्यात आलं. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. हे सर्व पोपच्या धर्माज्ञेनुसार चाललं होतं. एदुआर्दो गॅलेनोने त्याच्या ग्रंथात पुढीलप्रमाणे नोंद केलीय.... जिवंत जाळण्याची शिक्षा दिलेल्या एकाला गुलामालाअमेरिकेच्या मूळ रहिवाश्याला, युरोपियन धर्मगुरुने विचारलं की मेल्यानंतर तुला स्वर्गात जायचंय की नरकात. त्याला तर स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पनाच ठाऊक नव्हत्या. त्याने विचारलं गोरा माणूस कुठे जातो, पाद्री म्हणाला, स्वर्गात. मग मी नरकात जाईन, गुलाम उत्तरला आणि त्याच्या पायाखालची लाकडं कुरकुरत जळायला सुरुवात झाली.

उसाच्या मळ्यांमध्ये आणि साखर कारखान्यात कामाला जुंपलेले हजारो स्थानिक निवासी युरोपियनांच्या संपर्कात आल्याने अनेक रोगांना बळी पडले. शेकडो पळून गेले म्हणून एका कॅथॉलिक धर्मगुरुनेच स्पेनच्या राजाकडे मागणी केली की अमेरिकेतील स्थानिक निवासींऐवजी आफ्रिकेतल्या गुलामांना या कामाला जुंपावं. राजाच्या हुकूमानुसार १५०० गुलामांची पहिली तुकडी दक्षिण अमेरिकेतील उसाच्या मळ्यांवर आणि साखर कारखान्यात कामाला पाठवण्यात आली. त्यानंतर आफ्रिकेत पकडून आणलेल्या गुलामांचा ओघ अमेरिकेतल्या ऊसमळ्यांवर सुरु झाला. न्यू इंग्लड या वसाहतीत ब्रिटीश लोकांनी काकवी वा उसाच्या मळीपासून रम नावाचं मद्य बनवायला सुरुवात केली. काळ्या गुलामांच्या श्रमातूनच ही रम बनवली जात असे आणि क्रूर विनोद असा की या रमच्या मोबदल्यात आफ्रिकेतून गुलामांची खरेदी केली जाऊ लागली. त्यामुळे व्यथित झालेल्या शेर्मान एडवर्डस या गीतकाराने   काकवी, रम आणि गुलामी यामुळे खणखणार्‍या पौंडाच्या तालावर आपण नृत्य करावं का ? असा सवाल केला. मोलॅसिस टू रम हे त्याचं गीत खूप लोकप्रिय झालं. इसवीसन १७०० पर्यंत साखर आणि गुलामी हे युरोपमध्ये समानअर्थी शब्द बनले. त्यामुळे गुलामगिरी नष्ट करू पाहणारे साखरेवर बहिष्कार घालण्याच्या गोष्टी करू लागले. एका निग्रोची कैफियत या कवितेत विल्यम कॉपर या कवीने नेमका हाच प्रश्न विचारला..
आम्ही ज्यासाठी राबतो ती वनस्पती निसर्गाने निर्माणच का केली ? 
श्वासांनी त्याला वारा घालावा लागतोय, अश्रूंनी सिंचावं लागतंय
आमच्या घामांनी मातीला वस्त्र चढवावं लागतंय
हे दगडी हृदयाच्या मालका
आनंदाने लोळतो आहेस
विचार कर किती लोकांनी आपल्या पाठी मोडायच्या
तुझ्या उसातल्या साखरेसाठी
इंग्लडातील या असंतोषाची दखल घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या साखरेच्या जाहिरातीत बदल केलाईस्ट इंडिया साखरः गुलामांनी बनवलेली नाही. कंपनीने गुलामांना कामाला जुंपलेलं नव्हतं हे खरं पण मळ्यावर आणि कारखान्यात काम करणार्‍या मजूरांना तुटपुंज्या मजूरीवर राबवून घेतलं जात होतं. अठराव्या शतकात आफ्रिका खंडातली लोकसंख्या घटल्याने गुलामांच्या किंमती वाढल्या, दक्षिण अमेरिकेतील ऊसमळ्यांमुळे साखरेच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याने किंमती कोसळल्या. फ्रेचांनी साखरेच्या उत्पादन खर्चात बचत केल्याने ब्रिटीश साखर कारखानदार बाजारपेठेबाहेर फेकले गेले.
      १७७५ मध्ये प्लासीच्या विजयानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल भारतात स्थिरावला. खुल्क खुदाका, मुल्क बादशाहका अंमल कंपनी सरकारका, अशी स्थिती निर्माण झाली. उत्तर भारत, बिहार आणि बंगाल या प्रदेशातील शेती उत्पादनांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कंपनीने डॉ. फ्रान्सिस बुकानिन या संख्या शास्त्रज्ञावर सोपवली. १८०८ ते १८१५ या सात वर्षांच्या कालावधीत बुकानिनने अत्यंत काळजीपूर्वक माहिती गोळा करून आणि तपासून आपला सविस्तर अहवाल कंपनीला सादर केला. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात रोमेशचंद्र दत्ता यांनी या अहवालाच्या आधारे असं नोंदवलंय की उत्तर भारत, बिहार आणि बंगाल या प्रांतात उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती. गूळ, खांडसरी आणि साखरेचं उत्पादनही घेतलं जात होतं. पण उच्च दर्जाच्या साखरेचा उत्पादनखर्च अधिक होता. वेस्ट इंडिज बेटावरील उसाच्या जाती आणि इथल्या उसाच्या जातींत फरक नव्हता पण उत्पादन प्रक्रियेत व्यावसायिकता नव्हती. याचा अर्थ गंगा-यमुनेच्या खोर्‍यात साखरेचा शोध इसवीसनापूर्वी लागलेला असला तरिही व्यापार, कार्यसंस्कृती आणि मागणीप्रधान उत्पादनाचा अभाव असल्याने ऊस वा साखर उत्पादनाच्या तंत्रात अजिबात प्रगती झाली नव्हती. अरब आणि त्यानंतर युरोपियन लोकांनी साखर उत्पादनाच्या तंत्रात आणि उपपदार्थांच्या उत्पादनात कमालीची प्रगती केली होती. फक्त सामाजिक चालीरीतीबाबतच नाही तर उत्पादन आणि बाजारपेठ यामध्येही आपण परंपरानिष्ठ होतो आणि आहोतही. भोपाळमध्ये पारंपारिक भारतीय तंत्रज्ञानाचं कायमस्वरूपी प्रदर्शन मांडण्यात आलंय. आदिवासी जमातींनी शोधून काढलेले उसाचे चरक, तेलघाण्या इत्यादी यंत्रं तिथल्या कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवली आहेत. आजही पुण्याच्या किंवा सातार्‍याच्या रस्त्यावर त्याच तंत्रानुसार उसाचा रस काढला जातो. जातिव्यवस्था ही उत्पादन व्यवस्थाही होती. गंमतीची बाब म्हणजे ह्या उत्पादन व्यवस्थेचा बाजारपेठेशी फारसा संबंध नव्हता. केवळ जगण्यापुरतं उत्पादन करण्याशी होता. बलुतेदारांना मिळणारं बलुतं आणि त्यांच्या कष्ट आणि कौशल्याचं बाजारमूल्यं ह्यांचा परस्पर संबंधच नव्हता. त्यामुळे कुशल कारागीराला तंत्रात वा यंत्रात संशोधन करावं, त्याची उत्पादन क्षमता वाढवावी यासाठी इन्सेटिवला वावच ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे बाजारपेठेसाठी ठोक उत्पादन करावं अशी प्रेरणाच भारतीयांना झाली नाही. अर्थातच साखरेचा शोध लावूनही साखर तंत्रज्ञानात, साखर उद्योगात आपण मागासलेले ठरलो.

   
    अठराव्या शतकापर्यंत साखरेवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग निर्माण व्हायला सुरुवात झाली पण साखरेचं सेवन प्रामुख्याने घरगुती होतं. साखर उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यावर, साखरेच्या ठोक पुरवठ्याची हमी मिळू लागल्यावर अन्न प्रक्रिया उद्योग विस्तारू लागले. महात्मा फुलेंनी आपल्या शेतकर्‍याचा असूड या ग्रंथात त्यांची नोंद घेतलेली आहे. विलायतेहून रुचीरुचीचे हलवे, मुरंबे, लोणची...इत्यादी सामान येऊ लागल्याने भारतातील कारागीर आणि कसबी जाती दारिद्र्यात लोटल्या गेल्या असं निरिक्षण म. फुलेंनी नोंदवलं आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अन्न प्रक्रिया उद्योगांची साखरेची गरज वाढली. त्यांनीच साखरेचं व्यसन समाजाला लावलं असं म्हणता येईल. कारण साखरेचा घरगुती वापर फारसा नसतो. दिवसाला आपण किती चहा पितो वा किती वेळा घरात पक्वान्न केली जातात. साखरेचं सेवन शीतपेयं, बिस्कीटं, केक, अन्य मिठाई यातून अधिक होतं. अन्न प्रक्रिया उद्योगांची जागतिक साम्राज्यं निर्माण व्हायला सुरुवात झाल्यानंतर साखर उद्योगावरील सरकारी नियंत्रणात वाढ होऊ लागली. सरकारचा हस्तक्षेप कळीचा ठरू लागला. जगातल्या फारच कमी देशांमध्ये साखर उद्योग नियंत्रणमुक्त आहे.

उसाच्या किंमत ठरवण्यात सरकारची भूमिका महत्वाची नाही तर कळीची असते. प्रत्येक कारखान्याला सरकारला लेव्ही साखर द्यावी लागते. म्हणजे एकूण उत्पादनाच्या दहा टक्के, सरकारी दराने. ही साखर सार्वजनिक शिधा वाटप यंत्रणेमार्फत वितरीत केली जाते. खुल्या बाजारपेठेत कारखान्याने किती साखर केव्हा विकायची हा निर्णयही सरकार घेतं. किती साखर निर्यात करायची हेही सरकार ठरवतं. साखरेच्या किंमती स्थिर राहाव्यात वाढू नयेत यासाठी सरकार ही खबरदारी घेतं. मुद्दा असा की साखरेच्या किंमती बाजारपेठेच्या शक्तींनी का नियंत्रित करायच्या नाहीत. साखर हा काही जीवनावश्यक पदार्थ नाही वा ते अन्नही नाही. गहू, तांदूळ, डाळी यांच्या व्यापारावरील वा किंमतीवरील सरकारचं नियंत्रण समजण्याजोगं आहे. साखर महाग झाली तर गरीब वा मध्यमवर्गीयांची उपासमार सुरु होणार नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पोषण संस्था यांची साक्ष काढली तर धट्ट्याकट्ट्या माणसाच्या रोजच्या आहारात साखरेचं प्रमाण फक्त १० ग्रॅम असावं. साखर म्हणजे शून्य पोषणमूल्यं असलेल्या कॅलरिज वा उष्मांक. मात्र तरिही साखरेचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात करण्यात आलाय. एकूण साखर उत्पादनाच्या केवळ ३० ते ३५ टक्के साखर घरगुती वापरासाठी खरेदी केली जाते. उरलेली सर्व साखर शीतपेयं, बिस्कीटं, चॉकोलेटं, गोळ्या, मिठाई इत्यादी प्रक्रिया उद्योगांमध्ये वापरली जाते. या मार्गाने जी साखर आपण खातो त्यासाठी आपण किती पैसे अधिक मोजतो? एक किलो मिठाईची किंमत ३०० रुपयांच्या आसपास असते. त्यातलं साखरेचं प्रमाण ४०० ग्रॅम असतं. २८ ते ३० रुपये किलोची साखर, मूल्यवर्धित उत्पादनात किती पटीने विकली जाते याचा अंदाज मिठाईच्या किंमतीवरून येऊ शकतो. तीच गत कोणत्याही शीतपेयाची वा चॉकलेट, गोळ्या इत्यादी उत्पादनांची आहे. साखरेच्या किंमती कमी असण्याचा फायदा या उद्योगांना होतो. शेतकर्‍यांना उसाचा दर देताना मात्र कारखान्याच्या उत्पादन खर्चाचा घोळ सरकारी यंत्रणा घालते. त्याच बरोबर साखर कारखान्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत देण्याच्या उपाययोजनाही सरकारयंत्रणेच्या सुपीक डोक्यातून निघतात. साखर उद्योग सरकारी नियंत्रणातून मुक्त होणं केवळ शेतकर्‍यांच्या हितासाठीच नाही तर समाजाच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे.


Wednesday, 28 March 2012

ज्वारीः भाकरीचा चंद्र चपातीने झाकला


भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली या नारायण सुर्वेंच्या कवितेतली भाकरी बहुधा ज्वारीची असावी. मुंबईतील गिरणीकामगारांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातील कामगारांची संख्या अधिक होती. सुर्वे मास्तरांच्या कवितेतली भाषा कोकणापेक्षा देशाला जास्त जवळची आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, आंध्र या प्रदेशात ज्वारी हे गरीबांचं धान्य होतं. जी. ए. कुलकर्णींच्या कथेत ज्वारीची भाकरी दुधात कुस्करुन न्याहारी करणारी पात्रं भेटतात तर रा.रं.बोराडेंच्या कथेतली दुष्काळाच्या चक्रात पिळलेली बहीण, पोतभर ज्वारी मिळेल या अपेक्षेने भावाकडे धाव घेते.

हैदराबाद बिर्याणीसाठी मशहूर आहे निजामामुळे. पण आंध्रातील (किनारपट्टी नव्हे) सामान्य माणसांचा आहार भाजी-भाकरी हाच होता. हैदराबादेत रामकृष्ण थिएटरच्या परिसरात कामतची तीन हॉटेल्स आहेत. त्यातलं एक जवार रोटीचं आहे. तिथे ज्वारीची भाकरी, बेसन, वांग्याची भाजी, कांदा हेच जेवण मिळतं. सोबतीला ताकाचा प्याला.

ज्वारी रोटो अमाडी, भाजी ताकत लावs
नेह नरमदा मंsनहा, खे चल जीवन-नावs
मध्यप्रदेशातल्या निमाड प्रांततलं हे लोकगीत. नर्मदेत स्नान करून ज्वारीची भाकरी आणि अंबाडीची भाजी खाऊन आनंदात राहावं हा सुखी जीवनाचा कानमंत्र या गीतात वर्णिलेला आहे. मदर इंडिया हा सिनेमा १९५७ सालात प्रदर्शित झाला. अ‍ॅकेडमी अ‍ॅवार्डस् वा ऑस्करला जाण्याचा पहिला मान या भारतीय चित्रपटाला मिळाला. या सिनेमात चित्रीत केलेलं शेतकर्‍याचं जीवन ज्वारीभोवतीच विणलं गेलंय.
मतवाला जिया, डोले पिया, झुमे घटा छाये रे बादल..
करना हैं तो कर प्यार ना डर बिती उमर आयेगी ना कल....
या गाण्यामध्ये सुगीचं चित्रण आहे. ज्वारीची कणसं, त्यांची बैलगाडीतून खळ्याकडे रवानगी, मळणी याचं चित्रण त्या गाण्यात आहे. मदर इंडियातलं हे गाव मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमावर्ती भागातलं असावं म्हणूनच तर सावकारी पाश आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण होणारी डकैती ही भारतमातेची कहाणी बनते. इंदूर जिल्ह्याच्या गॅझेटीअरमध्ये नोंदवल्याप्रमाणे शेतकरी आणि शेतमजूर (लोकसंख्या अंदाजे ३२ टक्के) ज्वारी, बाजरी आणि मका यांच्या भाकर्‍याच खात असत. गव्हाची पोळी वा रोटी किंवा भात आणि भाज्या सणासुदीलाच शिजवल्या जात. महिन्यातून ७ ते १० वेळा घरात डाळ शिजवली जात असे. मांसाहार मर्यादीतच होता. म्हणजे चटणी-भाकर-कांदा हाच शेतकरी-शेतमजूरांचा मुख्य आहार होता. इंदूरच्या गॅझेटीअरमध्ये नोंदवलेली ही माहिती पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याला लागू होते.

हैदराबादेपासून इंदूरपर्यंतच्या पट्ट्यातली ज्वारीची भाकरी रोजच्या आहारातून गायब व्हायला नेमकी केव्हा सुरुवात झाली ? १९४३ पर्यंत आपल्या देशात शेती धोरण वा अन्न धोरण नव्हतं. बंगालाच्या दुष्काळानंतर अन्न धोरणाची म्हणजे रेशनिंगची व्यवस्था देशभर टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये सुमारे ३० लाख कुळांना २८ लाख हेक्टर जमिनीची मालकी मिळाली. कसेल त्याची जमीन हे तत्व अंमलात येऊ लागल्याने जमिनीत सुधारणा होऊ लागली. नियोजनच्या पहिल्या पंधरा वर्षांत ओलिताखालील जमिनीत जवळपास ७५ टक्के वाढ झाली. शेतीला होणार्‍या कर्जपुरवठ्यातही वाढ झाली. दर हेक्टरी उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. अधिक उत्पादन देणार्‍या वाणांच्या बियाणांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात आला. १९६४-६५ ते १९७०-७१ या काळात गव्हाचं उत्पादन दरसाल १४ टक्क्यांनी वाढत गेलं आणि गव्हाच्या दर हेक्टरी उत्पादनात दरसाल ७.५ टक्के वाढ झाली. ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिकं गव्हाबरोबरच्या स्पर्धेत टिकाव धरू शकली नाहीत कारण गव्हाला राजाश्रय मिळाला होता.

बाजारपेठेसाठी उत्पादन करायचं असेल तर ग्राहकांची पसंती एवढा एकच मुद्दा ध्यानात घेऊन चालत नाही तर दर एकरी उत्पादन, उत्पादन खर्च याचाही विचार करणं क्रमप्राप्त असतं. ज्वारीचं पीक उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा केव्हाही घेता येतं. भारतात ज्वारीचं पिक खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतात. खरीपात घेतली जाणारी ज्वारी संकरित वाणाची अर्थात हायब्रीड असते. दर हेक्टरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन देणार्‍या या जाती आहेत. पण त्यांच्यात एक गोची आहे. खरिपात घेतली जाणारी हायब्रीडला हमखास पावसाचा फटका बसतो कारण यापैकी बहुतेक जाती सप्टेंबरच्या अखेरीस काढणीला येतात. पावसाचा तडाखा बसला की ज्वारीचा दाणा काळा पडतो. अशी ज्वारी ना माणसांच्या आहारासाठी उपयोगाची ना कोंबड्यांच्या खाद्यासाठी. दमट हवेमुळे या ज्वारीच्या कडब्यालाही चांगली किंमत येत नाही कारण तो लवकर सडतो. हायब्रीडचा प्रसार आणि प्रचार १९७१-७३ या दुष्काळी वर्षांमध्ये झाला, हे इथे ध्यानी घ्यायला हवं. ही ज्वारी प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात घेतली जाते. तिथले शेतकरी म्हणूनच सोयाबीन, कापूस या पिकांकडे वळले आहेत.

रब्बी ज्वारी दुष्काळी पट्ट्यात घेतात. सोलापूर, सातारा, अहमदनगर. ही ज्वारी काटक असते. भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्याने तिचा दाणा मोत्यासारखा. उदाहरणार्थ मालदांडी. हायब्रीड ज्वारीला आजमितीला मिळणारा सर्वाधिक दर १२०० रुपये प्रति क्विंटल तर मालदांडी, शाळू इत्यादी वाणांच्या रब्बी ज्वारीला ३ हजार रुपये प्रति क्विंटल किंमत मिळते. पण रब्बी ज्वारीचं उत्पादन दर हेक्टरी ६-७ क्विंटलच असतं.

गव्हाचं दर हेक्टरी उत्पादन पंजाबात ४५.३२ क्विंटल आहे, मध्य प्रदेशात १६.४२ क्विंटल आहे तर महाराष्ट्रात १३.८८ क्विंटल आहे. खरीप असो वा रब्बी ज्वारीचं पीक नाईलाज म्हणून शेतकरी घेतात. या ज्वारीचा अन्न सुरक्षा योजनेसाठी काहीही उपयोग नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमधल्या गहू आणि ज्वारीच्या किंमती काय सांगतात? गव्हाच्या किंमती १९७५ ते १४५० रुपये प्रती क्विंटल या रेंजमध्ये आहेत. तर ज्वारीच्या किंमती ३५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल या रेंजमध्ये आहेत. दर हेक्टरी उत्पादन पाह्यलं तर शेतकर्‍याला गहू परवडतो हे ध्यानी येईल.

ज्वारी पिकवणार्‍या शेतकर्‍याची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर ज्वारीचं दर हेक्टरी उत्पादन वाढलं पाह्यजे आणि ज्वारीला बाजारपेठ मिळाली पाह्यजे. (या शेतकर्‍याला पाणी मिळालं तर तो ऊस पिकवेल किंवा गहू घेईल. मग तो ज्वारीचा शेतकरी राहणार नाही.)

ज्याला इंग्रजी भाषेत फूडग्रेन वा अन्नधान्य म्हणतात त्या मूलतः बिया असतात. बी चं आवरण कडक आणि तंतूमय असतं, तिचा गर मऊ असतो आणि प्रत्यक्ष बी मध्ये तेल असतं. कडक, तंतूमय आवरण अर्थातच भरड असतं त्याचा उपयोग प्रामुख्याने जनावरांच्या खाद्यासाठी होतो. मऊ गर माणसांच्या आहारासाठी उपयोगात आणला जातो.  तेलाचा आहारातही आहे आणि इंधनातही. यापैकी मऊ गर म्हणजे कार्बोहायड्रेट (कर्बोदकं) त्यांच्या सेवनातून आपल्याला ऊर्जा मिळते. धान्यातील कर्बोदकाचं प्रमाण आणि प्रकार यावर त्याचं मूल्य ठरतं. तेलातील चरबीचं प्रमाण आणि प्रकार यावर खाद्यतेलाचं मूल्य ठरतं. अर्थव्यवस्था सुदृढ होणं म्हणजेच उत्पादनात आणि उपभोगात वाढ होणं. आर्थिक स्तर ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणात आहारातील अन्नधान्याचं प्रमाण कमी होतं, भाज्या, फळं, मांसाहार आणि दूध वा दुग्धजन्य पदार्थ यांचं सेवन वाढतं. मांस आणि दूध यांच्या उत्पादनांना म्हणतात प्रोटीन इकॉनॉमी. आर्थिक स्तर सुधारला की आहारात कर्बोदकांपेक्षा प्रथिनांचं आणि चरबीचं प्रमाण वाढतं. माणसाचा आहार, पशुखाद्य आणि इंधन या तीन गरजा भागवता शेती भागवते. यापैकी कोणत्या गरजांची समर्थपणे पूर्तता करण्याची क्षमता ज्वारी या पिकात आहे हे ओळखून त्यानुसार उपाययोजना केली तर ज्वारीची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होऊ शकते.

ज्वारीच्या उत्पादनाला अमेरिकेत चौथं स्थान आहे. मका, सोयाबीन आणि गहू यांच्यानंतर धान्य उत्पादनात ज्वारीचा क्रमांक लागतो. गव्हातील ग्लुटेनचं अनेकांना वावडं (अ‍ॅलर्जी) असतं त्यामुळे ग्लुटेन नसलेला ब्रेड, बिस्कीटं, केक्स, मफीन्स, पिझ्झा, ग्लुटेन नसलेली बीअर असे अनेक पदार्थ ज्वारीपासून बनवले जातात. या पदार्थांना चांगली मागणीही असते. आपल्याकडे केवळ ज्वारीची भाकरीच लोकप्रिय आहे. लाह्या केल्या जातात पण ते घरगुती उत्पादनच आहे. ज्वारीवर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ बनवण्याच्या उद्योगात केलेली गुंतवणूक आपल्या देशात फायदेशीर ठरेल असं उद्योजकांना वाटत नाही.

इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टीट्यूट इन द सेमीएरिड ट्रॉपिक्सइक्रीसॅट, या संस्थेच्या नियतकालीकात डिसेंबर २००७ मध्ये भारतातील ज्वारीला औद्योगिक क्षेत्रात असलेली मागणी, या विषयावर एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. सदर निबंधात कुकुट्टपालन, पशुखाद्य, अल्कोहोल, स्टार्च आणि अन्य उद्योगात ज्वारीला कितपत मागणी आहे, याची चाचपणी करण्यात आलीय. या सर्व क्षेत्रात ज्वारीची स्पर्धा अर्थातच मक्याबरोबर आहे. ही स्पर्धा पोषणमूल्य म्हणूनही आहे आणि किंमतीच्या पातळीवरही आहे. पोषणमूल्य म्हणून कुक्कुटपालन, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगांची मक्यालाच पहिली पसंती आहे. कोंबड्यांच्या वा जनावरांच्या शिध्यामध्ये ज्वारीचा वाटा १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढू शकत नाही. आणि त्यासाठीही ज्वारीची किंमत मक्यापेक्षा २० ते ३० टक्के कमी असायला हवी. त्याची कारणं अनेक आहेत. ज्वारीतील कर्बोदकांचा प्रकार आणि प्रमाण मक्याशी स्पर्धा करणारं नाही असं स्टार्च उद्योगाचं म्हणणं आहे. कोंबड्यांच्या आणि जनावरांचं खाद्य तयार करणार्‍या उद्योगात पशुखाद्य आणि पक्षी वा प्राणी यांच्या वजनात होणारी वाढ आणि पशु-पक्षी उत्पादनांचा दर्जा यांच्यात थेट संबंध असतो. कोंबड्यांच्या आहारात ज्वारीचं प्रमाण वाढवायचं तर काळी ज्वारी चालणार नाही. त्यामुळे अंड्यातील पिवळ्या बलकाचा रंग बिघडतो, ज्वारीतून मिळणारी ऊर्जा मक्याशी स्पर्धा करू शकत नाही. तीच गत जनावरांचं खाद्य बनवणार्‍या कंपन्यांची आहे. म्हणजे पशुखाद्यात ज्वारीची मागणी मर्यादीतच राहणार.

दुसरा पर्याय अल्कोहोल उद्योगाचा. यामध्ये इथेनॉल आणि मद्य दोहोंचा समावेश होतो. अल्कोहोल उद्योगात आजघडीला ज्वारीच्या वापराचं प्रमाण कमी आहे परंतु या उद्योगाच्या ज्वारीबद्दल अतिशय कमी तक्रारी आहेत. ज्वारी काळी असली तरी चालेल तिच्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असावा आणि प्रथिनांचं प्रमाण कमीत कमी असावं एवढीच या उद्योगाची अपेक्षा आहे. बीअर बनवणार्‍या भारतीय कंपन्या ज्वारीतील स्टार्चऐवजी माल्टलाच अधिक पसंती देतात. एक कंपनीने माल्टसोबत तांदळाच्या कणीऐवजी ज्वारी वापरण्यात रस दाखवला, असं या शोध निबंधात नमूद करण्यात आलंय. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांच्या मते स्वीट शोरगम वा गोड ज्वारीच्या दाण्यापासून आणि धाटापासूनही भरपूर आणि उत्तम प्रकारचा अल्कोहोल अर्थात इथेनॉलचं उत्पादन मिळू शकतं. खरीपात गोड ज्वारी घेऊन इथेनॉलसाठी उपयोगात आणावी, या प्रस्तावाचे ते आग्रही पुरस्कर्ते आहेत. मालदांडी सारख्या उत्तम रब्बी वाणाच्या ज्वारीचा समावेश दैनंदिन आहारात करण्यासाठी पद्धतशीर मार्केटिंग करायला हवं, उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या धाब्यांवर गव्हाची वातड तंदुरी रोटी मिळते, तिथे ज्वारीची भाकरीही मिळेल अशी व्यवस्था करायला हवी असं डॉ. देशमुख म्हणाले.  

ज्वारीपासून मद्य निर्मिती करण्यास प्रोत्साहन देण्याचं धोरण राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. सदर धोरणानुसार या उद्योगांना सरकारी अनुदान मिळणार होतं.  या धोरणाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे हे धोरण बासनात गुंडाळून ठेवण्यात आलं. या धोरणाला झालेला विरोध प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर होता. धान्यापासून दारू बनू लागली तर अन्नाचा तुटवडा पडेल आणि भुकेची समस्या सोडवता येणार नाही. या युक्तिवादाला वस्तुस्थितीचा आधार नाही. अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं नाही हे आपल्या देशातील कुपोषणाचं कारण नाही. विषमता आणि सदोष वाटप यंत्रणेमध्ये आपल्या देशातील कुपोषणाची कारणं आहेत. हजारो पोती गहू दरवर्षी सडून वाया जातो. गेल्या वर्षीपेक्षा या खेपेला कमी गहू वाया गेला एवढाच कृषीमंत्र्यांचा बचाव असतो. दुसरा युक्तिवाद नीतीमत्तेचा आहे. दारू पिणं आरोग्याला हिताचं नाहीच पण अनैतिकही आहे कारण दारूने हजारो संसार उद्‍धवस्त केले आहेत. दारू हे शोषणाचंही माध्यम बनतं, इत्यादी. त्यामुळे धान्यापासून दारू बनवण्याला परवानगी देता कामा नये कारण पर्यायाने दारूच्या सेवनाला प्रोत्साहन वा उत्तेजन मिळतं.

ख्रिश्चन धर्मात वाइनला पावित्र्याचा दर्जा आहे. येशू ख्रिस्ताने केलेला पहिला चमत्कार म्हणजे पाण्याचं वाइनमध्ये अर्थात मद्यामध्ये केलेलं रुपांतर. विवाहप्रसंगी पाहुण्यांची गर्दी होते आणि मद्याचे बुधले संपतात. उरलेल्या पाहुण्यांचा मान कसा राखायचा या विचाराने यजमान हैराण होतात. येशूची आई त्याला म्हणते तूच काहीतरी उपाय कर आणि नोकरांना बजावते की येशू सांगेल ते करा. पिंपांमध्ये पाणी भरा असं येशू फर्मावतो. आता त्या पिंपातलं पाणी यजमानांना द्या. यजमान पाणी पितात तर ते मद्य असल्याचं त्यांना कळतं. पाण्याची वाईन अर्थात लाल रंगाचं मद्य करण्याचा पहिला चमत्कार येशूच्या नावावर जमा होतो. लॉर्ड बायरन हा कवी विद्यार्थी होता तेव्हाची गोष्ट. वर्गशिक्षक सांगतात, येशूच्या पहिल्या चमत्कारावर निबंध लिहा. बायरनने फक्त एकच वाक्य लिहिलंवॉटर सॉ हर मास्टर अँण्ड ब्लश्ड. पाण्याने आपल्या स्वामीला म्हणजेच येशूला  पाह्यलं आणि ते लाजून लालेलाल झालं. चर्चमध्ये प्रार्थनेच्या समाप्तीनंतर लाल मद्यात बुडवलेला पावाचा तुकडा धर्मगुरु भाविकांना देतो. मद्य म्हणजे ख्रिस्ताचं रक्त आणि पाव म्हणजे ख्र्रिस्ताचं मांस आहे, त्याचं सेवन केल्याने येशूचा अर्थात देवाच्या पुत्राचा अंश आपल्याही शरीरात येतो, या श्रद्धेने हा प्रसाद भक्षण केला जातो. मद्याला पवित्र दर्जा देणार्‍या ख्रिश्चनांनी विशेषतः युरोपियनांनी मद्याचे अनेकानेक प्रकार शोधून काढले. त्या पिण्याच्या पद्धती प्रथा रुजवल्या. मद्याचे शरीरावर वा समाजावर होणारे परिणाम आणि दुष्परिणाम या विषयांवर सर्वाधिक संशोधन युरोपियन लोकांनीच केलं. संशोधनाचे मापदंडच मद्याला धार्मिक महत्व देणार्‍यांनी, मद्याचा उत्सव करणार्‍यांनी, मद्य प्राशनाचे संस्कार, प्रथा रुजवणार्‍य़ांनीच निश्चित केले. त्यांच्यामुळेच संशोधन वैश्विक अर्थात स्थलकाल निरपेक्ष बनू शकलं. पुराव्यानिशी सिद्ध होणार्‍या चोख ज्ञानाची व्यवस्था त्यांनीच लावली. त्यामुळेच तंत्रज्ञान रचणं शक्य झालं. दारू पिऊन पिऊन युरोपियनांनी अमेरिकन राज्यक्रांती केली, फ्रेंच राज्यक्रांती केली, औद्योगिक क्रांती केली. दारूच्या दुष्परिणामांवरील कायदे आणि अन्य उपाययोजनाही त्यांनीच सर्वप्रथम अमलात आणल्या. दारू पिऊन मोटार चालवणे हा गुन्हा असल्याचा कायदा केला आणि तो अंमलात आणण्यासाठी अन्य व्यवस्था उभारल्या. उदाहरणार्थ, दारू पिलेला इसम घरी जाण्यासाठी एखाद्या संस्थेची मदत मागू शकतो, त्याच्या गाडीतून त्याला घरी सोडलं जातं आणि त्याबद्दल त्याला पैसे आकारले जातात. मद्यपान असो किंवा काम वासना वा अतिरिक्त उपभोग आधुनिक समाज कोणत्याही समस्येला सामोरं जाताना विवेकशीलतेचा अंगीकार करतो. आपल्या देशातील वैचारिक नेतृत्व मात्र सनातनी भूमिकेचा म्हणजेच दमनाचा, निवृत्तीचा, त्यागाचा पुरस्कार करण्यात धन्यता मानतं. त्यामुळे दारूबंदी, ब्रह्मचर्य इत्यादी उपायांचा आपल्या समाजात भयंकर दबदबा आहे. त्यामुळे समाजात ढोंग आणि भोंदूपणाला प्रतिष्ठा मिळते. म.गांधी आणि विनोबा यांचे आश्रम असणारा जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण ती कागदोपत्री, जिल्ह्यात दारू मुबलक मिळते.


सेवाग्राम आश्रमात मांस शिजवायला बंदी होती पण भक्षणाला अनुमती होती. बादशहा खान तिथे राह्यला आले तेव्हा गांधीजीनीच आश्रमाच्या नियमातली पळवाट त्यांना दाखवली. जवाहरलाल नेहरू सिग्रेट ओढायचे. ते आश्रमात येणार असतील तर त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून गांधीजी सिग्रेट आणून ठेवायचे. दादा धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे की सर्वोदयी समाजात व्यसनांना बंदी नसेल पण त्याचा उद्योग वा व्यापार करता येणार नाही. म्हणजे असं की दारू वा सिग्रेट फुकट मिळाली पाहीजे. त्याचाच दुसरा अर्थ असा की ज्याला दारू प्यायची असेल त्याने स्वतः बनवावी आणि प्यावी. हवी तर दुसर्‍यांना फुकट वाटावी पण त्यातून पैसे कमावता येणार नाहीत. सर्वोदयी समाज अस्तित्वात केव्हा येणार? विनोबांच्या भाषणानंतर एक श्रोता म्हणाला तुम्ही म्हणता तसा समाज अस्तित्वात यायला ५०० वर्षं लागतील. विनोबा त्यावर उत्तरले भलतेच आशावादी दिसता, मला वाटलं होतं की एक हजार वर्षं लागतील. त्यामुळे दारूबंदीबाबत सर्वोदयाची भूमिका स्पष्ट करताना दादा धर्माधिकारी म्हणाले सरकारने दारूच्या दुकानाला लायसन्स वा परवाना देऊ नये. म्हणजेच दारूच्या व्यवसायात सरकारचे हितसंबंध गुंतलेले असता कामा नयेत. जेव्हा गरज वाटेल तेव्हा सरकारला दारूचं दुकान बंद करता आलं पाहीजे. दादांच्या बोलण्यातलं तथ्य प्रमाण मानलं तर धान्यापासून मद्य निर्मिती करण्याने समाजाची नीतीमत्ता धुळीला मिळण्याची सुतराम शक्यता नाही.  

ज्वारीधान्य आणि धाट, दोन्ही अल्कोहोल उद्योगासाठी उत्तम कच्चा माल आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची शेती किफायतशीर होण्यासाठी गोड ज्वारीचं वाण उपयुक्त ठरू शकतं. अल्कोहोलपासून दारू बनवायची की इथेनॉल म्हणजे इंधन, हा मुद्दा उद्योजक, बाजारपेठ आणि शासन ह्यांच्यावर सोपवणं शहाणपणाचं ठरेल.  



Tuesday, 13 March 2012

कापूसकोंड्याची गोष्ट


त्यांच्याकडे एक झाड आहे. त्या झाडाला फळांऐवजी लोकर लागते. ही लोकर मेंढ्यांच्या लोकरीपेक्षा तलम आणि चांगल्या दर्जाची असते. भारतीय लोक तिच्यापासून आपले कपडे बनवतात. हेरोडोटसइसवीसनपूर्व ४४५. हेरोडोटसच्या या वर्णनावरून जॉन मँडेव्हिले या चित्रकाराने १४ व्या शतकात  काढलेलं कापसाच्या झाडाचं हे कल्पनाचित्र. 

कापूसकोंड्याची गोष्ट सांगू? तुम्ही हो म्हणा वा नाही, किंवा काय, कोण, कुठे, कसं असे प्रश्न विचारा किंवा कंटाळून गप्प बसा. कापूसकोंड्याची गोष्ट सुरुही होत नाही आणि संपतही नाही. कापसाच्या एका बोंडात पाच लाख धागे असतात. आणि गोष्ट तर कोणताही धागा पकडून सुरु करता येते. मुंबईच्या गिरणीसंपात देशोधडीला लागलेल्या कामगारांपासून किंवा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांपासून वा अलीकडेच कापसाची निर्यात बंद करण्याच्या सरकारी निर्णयामुळे उठलेल्या वादळापासून. कुठून तरी सुरुवात करायलाच हवी.

   कापसाचा शोध भारतात लागला आणि सुतापासून वस्त्रनिर्मितीही भारतातच सुरु झाली. हेरोडोटस (इसवीसनपूर्व ४४५) हा ग्रीक विद्वान आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या ग्रंथाचं नावच मुळी हिस्ट्री. तो खैबरखिंड ओलांडून हिंदुस्थानात आला होता. कापसाच्या सुतापासून कपडे विणता येतात हे नोंदवणारा तो पहिला पाश्चात्य विद्वान. भारतातले लोक ज्या लोकरीपासून सूत काढतात ती लोकर झाडावर लागते, असं त्याने नोंदवलं आहे. युरोपात त्यावेळी लोकरीची आणि कातड्यांची वस्त्रं वापरत असत. कापूस म्हणजे काय याची कल्पना युरोपियनांनी हेरोडोटसच्या लिखाणावरून म्हणजे त्याचं लिखाण ऐकूनच केली होती. त्यामुळे त्यांना वाटायचं की भारतात झाडाला मेंढ्या लागतात. हेरोडोटसच्याही पूर्वी म्हणजे इसवीसनापूर्वी एक हजार वर्षं, आपस्तंभ गृह्य सूत्रात सुती वस्त्रांबद्दलचा उल्लेख आहे-- हे वस्त्रा, रेवती देवीने बोंडातली सरकी काढून तुला पिंजलं, कृतिका देवीने त्यातून धागा काढला, धी देवीने त्या धाग्याचं वस्त्र विणलं आणि ग्ना देवीने त्या वस्त्राला मागातून सोडवून काढलं. या आणि अशा हजारो देवतांनी त्या वस्त्राची घडी घातली आणि ते सूर्याला अर्पण केलं. ते वस्त्र चढवल्यावर सूर्याची महानता झगमगू लागली. या उल्लेखावरून असं अनुमान करता येतं की कापसाचा शोध स्त्रियांनी लावला. त्यांनीच कापूस पिंजून त्याचे पेळू बनवले आणि त्यापासून धागा काढला. विणकामही त्याच करत असत. अगदी प्राचीन काळीही व्यक्तीची प्रतिष्ठा वा समाजातलं स्थान त्याने परिधान केलेल्या वस्त्रावरूनच ठरत होतं याचाही बोध या श्लोकातून होतो. (आसामात किंवा ईशान्य भारतातल्या अनेक आदिवासी जमातींमध्ये काल-परवा पर्यंत स्त्रिया कापड विणत होत्या.) शेती करताना पिकांचा प्राधान्यक्रम आर्य चाणक्याने अर्थशास्त्र या आपल्या ग्रंथात सांगितला आहे. अन्नधान्यासाठी सर्वाधिक जमीन लागवडीखाली आणावी, त्यानंतर ऊस, कापूस ही नगदी पिकं आणि त्यानंतर भाजीपाला, असं चाणक्याने म्हटलं आहे. गंगा-यमुनेच्या सुपीक खोर्‍यातही माणसाने आपल्या गरजा मर्यादीत ठेवाव्यात असं सुचवणारा आर्य चाणक्य जगातला पहिला अर्थशास्त्रज्ञ असावा. उत्पादनाची तंत्र प्राथमिक अवस्थेत असल्याने ठोक उत्पादनालाच मर्यादा होत्या. त्यामुळे अर्थातच शेतीवर आधारित उद्योगांमध्ये, उदा. वस्त्रोद्योग, शोषणाचं मानही मर्यादीतच असावं, असं अनुमान करता येतं.

    कापसाचं आणि कापडाचं ठोक उत्पादन सुरु झाल्यानंतर म्हणजे इंग्लडातील औद्योगिक क्रांतीनंतर कापूसकोंड्याची गोष्ट सुरु झाली असावी. निसर्गात कापसाच्या अनेक जाती आहेत. उदाहरणार्थ काटेसावर. पण या कापसाचं ठोक पद्धतीने उत्पादन घेता येत नाही. प्राचीन काळापासून लागवडीयोग्य कापसाच्या चारच जाती होत्या. त्यातल्या दोन भारतात, एक दक्षिण अमेरिकेतली तर एक आफ्रिकेत. अमेरिकन कापसाच्या जातीचं शास्त्रीय नावगॉसिपम हिरशुटम. लांब आणि मजबूत धागा हे या जातीचं वैशिष्ट्य. गॉसिपम बार्बाडेन्स ही लांब धाग्याच्या कापसाची जात आफ्रिकन वा नाईलच्या खोर्‍यातली. आखूड धाग्याचा आणि अमेरिकन कापसाच्या तुलनेत नाजूक धागा भारतीय कापसाच्या जातींचागॉसिपम ऑरबोरिअम आणि गॉसिपम हरबाशिअम. भारतीय कापसाच्या जातींना बोंडअळीचा त्रास नव्हता आणि मावा-तुडतुडे वा तत्सम रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती या जातींमध्ये अंगभूतच होती. या चार मूळ जातींमधूनच कापसाचं व्यापारी तत्वावर उत्पादन करणार्‍या शेकडो जातींची निर्मिती झाली आहे. अमेरिकन कापसाच्या जाती अमेरिकेत होत्या आणि तेथील मूळ निवासी त्यांचा वापर करत होते तोवर भारत आणि ईजिप्त इथला वस्त्रोद्योग ठीकठाक सुरु होता. भारतात तर वस्त्रोद्योग अतिशय उन्नत अवस्थेला पोचलेला होता. कापूस पिंजणं, त्याचे पेळू बनवणं, त्यापासून सूत कातणं, वस्त्रं विणणं, कपड्यावर प्रक्रिया करणं, रंग देणं असे शेकडो व्यवसाय आणि धंदे वस्त्रोद्योगाने निर्माण केले होते. भारतीय कापडाला देशा-परदेशातून खूप मागणी होती. ढाक्याच्या सुप्रसिद्ध मलमलीचा शास्त्रीय अभ्यास १९३५ साली झाला. मँचेस्टरच्या शिर्ले इन्स्टीट्यूटमधील मलमलीचा नमुना त्यासाठी निवडण्यात आला. ढाक्यातील ही मलमल भारतीय वाणाच्या कापसापासून बनवण्यात आली होती. या कापसाचा धागा ०.७० ते ०.९४ इंच वा १.८-२.४ सेमी होता. म्हणजे आखूड धागा. ज्या धाग्यापासून मशीनवर १२ काऊंटचं सूत निघतं त्याच धाग्यापासून ७०-१०० काऊंटचं म्हणजे सर्वाधिक तलम सूत कातण्याचं कौशल्य आंध्र प्रदेशातील कत्तिनींकडे होतं. ही वस्तुस्थिती सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ कॉटन रिसर्च या भारत सरकारच्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात नोंदवण्यात आलंय.

   कोलकत्याच्या शांतिपूर समाचार दर्पण या वर्तमानपत्रात १८२८ साली एका गरीब कत्तीनीचा अर्ज या मथळ्याचं एक पत्र प्रसिद्ध झालं. धर्मपाल यांच्या ग्रंथामध्ये इंग्रजी भाषेत प्रसिध्द झालेलं हे पत्र मुळाबरहुकूम उधृत करण्यात आलंय. एका अनामिक कत्तिनीने आपली कैफियत या पत्रात मांडली आहे. तिच्या पतीचं अकाली निधन झालं, पदरात तीन मुली आणि वृद्ध सासू-सासर्‍यांची जबाबदारी. संसार चालवण्यासाठी तिने चरखा आणि टकळीवर सूत कातायला सुरुवात केली. घरकाम करून ती सूत कातत असे. विणकर घरी येऊन सूत विकत घेत असत. या पैशातून या कत्तिनीने तिन्ही मुलींची लग्न जात-बिरादरीचे नेम पाळून पार पाडली. सासर्‍यांचं निधन झाल्यावर जात-बिरादरीच्या संकेतानुसार श्राद्ध वगैरे पार पाडलं. विणकरांनी आगाऊ दिलेल्या रकमेतून तिने हा खर्च केला. ते पैसे तिने नंतर फेडलेही. परंतु काही काळानंतर विणकर सूत घेण्यास येईनासे झाले.....

“…. गेली तीन वर्षं माझी आणि माझ्या सासूची परवड सुरु आहे. अन्नासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत. सूत घेण्यासाठी विणकर घरी येत नाहीत. सूत बाजारात पाठवलं तर पूर्वी जेवढी किंमत मिळायची त्याच्या एक चतुर्थांश रक्कमही हातात येत नाही. हे कशामुळे घडलं ते मला ठाऊक नव्हतं. मी अनेकांना याबाबत विचारलं. ते म्हणाले विलायती सूत मोठ्या प्रमाणावर येतं. विणकर तेच सूत विकत घेतात आणि कापड विणतात. विलायती सूत माझ्या कातलेल्या सूताशी स्पर्धा करू शकणार नाही अशी मला घमेंड होती. विलायती सूत शेराला ३-४ रुपये दराने मिळायचं. मी कपाळावर हात मारून घेतला. देवा रे, विलायतेला माझ्यापेक्षाही गरीब बायका आहेत हे मला ठाऊक नव्हतं. विलायतेतले सर्व लोक श्रीमंत आहेत हे मला ठाऊक होतं. पण माझ्यापेक्षाही गरीब बायका तिथे आहेत हे मला कळलं होतं. गरीबीमुळेच त्या बायकांना एवढ्या कमी किंमतीत सूत कातावं लागत होतं. तिथे त्या सूताला गि-हाईक नसल्याने ते सूत एवढ्या कमी किंमतीत इथे विकायची पाळी त्यांच्यावर आली. त्यामुळे आमचं मरण ओढवलं आहे. त्या सूताचे कपडे महिना-दोन महिन्यातच विरू लागतात. माझी तेथील कत्तीनींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा विचार करावा आणि इथे सूत पाठवणे योग्य आहे का ते ठरवावे.

   महात्मा गांधींनी हे पत्र १९३९ साली यंग इंडिया या त्यांच्या नियतकालिकात पुर्नमुद्रित केलं. लँकेशायरच्या कापडगिरण्यात काम करणार्‍या कामगारांना हाच अनुभव १९२९ सालच्या जागतिक मंदीत आला. भारतातल्या असहकार आंदोलनाने विदेशी कापडावर बंदी घालण्याचं आवाहन केल्यानंतर लँकेशायरच्या कामगारांवर बेकारीची नोबत आली. गोलमेज परिषदेसाठी इंग्लडात गेलेल्या गांधीजींनी या गिरणीकामगारांची भेट घेऊन भारतातील दारिद्र्याची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि खादीचा कार्यक्रम या गरीबीवरचा तोडगा कसा ठरू शकतो हेही सांगितलं. १९२५ साली गांधीजींनी चरखा संघ स्थापन केला आणि ५० हजार चरखे घराघरात फिरू लागले. सुमारे ५० हजार सूत कामगार १५०० गावांमध्ये काम करू लागले. त्याशिवाय विणकर, छपाई कामगार, रंगकाम करणारे, शिंपी अशा अनेकांना रोजगार मिळाला. १९३० सालात खादीचं उत्पादन आणि विक्री वाढली. एक लाखाहून जास्त लोकांना सूत कातून रोजगार मिळू लागला. उत्तम, कार्यक्षम आणि लहान चरखा बनवणार्‍याला एक लाख रुपयांचं पारितोषिक गांधीजींनी जाहीर केलं होतं. त्यामुळे एका बांबूपासून तयार केलेला, छोट्याशा पेटीत मावणारा असे अनेक चरखे त्या काळात तयार झाले. गांधीजी म्हणाले १८ वर्षात लाखो गरजू स्त्री-पुरुषांना चार कोटी रुपये चरखा संघानं मिळवून दिले. एवढं काम केलेला आणि चरखा संघाएवढंच भांडवल गुंतवलेला एकतरी उद्योग मला दाखवा. इंग्लडातील कापडगिरण्यांमध्ये तयार झालेल्या दर्जेदार म्हणजे तलम कापडाच्या तुलनेत खादी जाडी-भरडी होती आणि महागही होती. पण गांधीजींनी भारतीयांच्या देशभक्तीला, अस्मितेला आणि आकांक्षांना आवाहन केलं होतं त्यामुळे महाग खादीही लोक वापरू लागले. त्यामुळेच कोणत्याही सरकारी मदतीशिवाय नव्हे तर सरकारचा विरोध असताना, चरखा संघ आणि खादीचा देशाच्या कानाकोपर्‍यात प्रसार झाला.
    कापूस आणि खादीचा संबंध केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी नाही. अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याचा सेनानी जॉर्ज वॉशिंग्टन (१७६८) यानेही स्वदेशीचा पुरस्कार केला होता. ब्रिटनमधून आलेलं विदेशी कापड वापरण्याला वॉशिंग्टनचा विरोध होता. कापसाचं सूत कातून, कापड विणण्यात वॉशिंग्टन तरबेज होता. केवळ कापूसच नाही तर लोकर आणि लिननचेही सूत कातून तो कापड विणत असे. असे जाडेभरडे कपडे परिधान करण्यानेच आपला राष्ट्रीय अभिमान सिद्ध होतो असं त्याचं मत होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अमेरिकन कापूस इंग्लडात निर्यात होत असे आणि तेथील कापडगिरण्यात तयार झालेलं कापड अमेरिकेत येत असे. त्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यावरही वॉशिंग्टन जाडेभरडे कपडेच वापरत असे, अशी माहिती स्टीफन याफा या ग्रंथकाराने नोंदवली आहे. स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर औद्योगिकरणाची कास धरायला हवी हे म्हणून वॉशिंग्टनने औद्योगिकरणाचा पुरस्कार केला. पहिल्यांदा पेन्सिलिविनियात कापडगिरणी निघाली आणि त्यानंतर बॉस्टनमध्ये पाणचक्कीवर चालणार्‍या कापडगिरण्या सुरु झाल्या आणि अमेरिकन लोकांची कापडाची गरज तेथील वस्त्रोद्योग भागवू लागला.

   मोगल सम्राट जहांगीरकडून सनद मिळवून १६४० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने सूरत, कालिकत या बंदरांजवळ कापड कारखाने उभारून रंगीत कापडाची निर्यात इंग्लडात सुरु केली होती. या कापडाला इंग्लडात प्रचंड मागणी होती. इंग्लडातील लोकर लॉबी त्यामुळे अस्वस्थ झाली आणि भारतातून येणार्‍या पक्क्या मालावर बंदी घालण्याची मागणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जोर धरू लागली. अखेरीस १७२१ मध्ये पार्लमेंटने कायदा करून, भारतीय बनावटीच्या रंगीत कापडांच्या वापरावर बंदी घातली. हे रंगीत कापड कालिकत मधून निर्यात व्हायचं म्हणून त्याला नाव पडलं कॅलिको. १७५० ते १८५० हा ओद्योगिक क्रांतीचा काळ. या काळात वाफेच्या इंजिनावर कापडगिरण्या चालू लागल्या. धावता धोटा पहिल्यांदा आल्याने सुताची मागणी वाढली होती. या मागणीला पूर्ण करण्यासाठी ठोक पद्धतीने सुताचं उत्पादन करणार्‍या यंत्राची गरज होती. १७६४ सालात स्पिनिंग जेनी हे यंत्र बनवण्यात आलं. स्पिनिंग जेनीवर अमेरिकेतून आलेल्या कापसाचं कापसाचं सूत काढण्यात आलं. हा कापूस जात्याच मजबूत आणि लांब धाग्याचा. त्यामुळे आधुनिक वस्त्रोद्योगासाठी अमेरिकन वाणाचा कापूसच म्हणून आवश्यक ठरला कारण आधुनिक यंत्रसामग्रीची क्षमता त्या कापसाच्या गुणधर्मानुसारच बेतली होती. कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरुवात केवळ औद्योगिक क्रांतीने झाली असं म्हणणं खूपच ढोबळ होईल. विविक्षित कापसाच्या जातीपासूनच स्वयंचलित यंत्रावर कापडाचं ठोक उत्पादन घेता येतं, हे तत्व प्रस्थापित झाल्यानंतरचा कापूस आणि वस्त्रोद्योगाच्या इतिहासात शोषणाचा धागा कायमचा विणला गेला. अमेरिकेतील गुलाम, भारत-आफ्रिकेतील शेतकरी आणि जगभरातल्या कापडगिरण्यातील कामगारांच्या काही पिढ्या या शोषणाने बरबाद केल्या.   

   अमेरिकेच्या म्हणजे आजच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिण भागात कापसाची शेती होत असे. कापसाची शेती करायची तर मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. कारण त्या काळी कापूस वेचण्यासाठी यंत्रं नव्हती. हजारो एकर शेतातील मशागतीची कामं आणि कापसाची वेचणी यासाठी गुलामांच्या टोळ्या कामाला जुंपल्या जात. अमेरिकन यादवीयुद्धाच्या मुळाशी कापसाचीच शेती होती. दक्षिणेकडची राज्यं युरोपला कापसाचा पुरवठा करत. त्यामुळे यादवी युद्धात युरोप आपल्याला मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. यादवी युद्ध सुरू झाल्यावर युरोपिय भांडवलदारांनी अमेरिकन कापसाच्या जाती अन्य देशांमध्ये नेऊन नव्या जातींची निर्मिती करून कापूस लागवडीत मोठी भांडवल गुंतवणूक करायला सुरुवात केली. इजिप्त या गुंतवणूकीमुळे कर्जबाजारी झाला आणि पारंतत्र्यात अडकला. न्यूयॉर्क कॉटन एक्सेंजवर सट्टा खेळणा-या मुंबईतली सटोडियांनी अमेरिकन वाणाच्या कापसापासून तयार केलेलं बेणं गावागावात नेऊन रुजवलं. तोपावेतो ईस्ट कंपनीचं धोरणही बदललं होतं. भारतातून कच्चा माल निर्यात करायचा आणि पक्क्या मालाची आयात करायची असं धोरण कंपनीने वस्त्रोद्योगाबाबत ठरवलं. त्यामुळे कापसाच्या या व्यापारी शेतीला ईस्ट कंपनीने सर्वतोपरी साहाय्य केलं. गुजरात, सिंध, पंजाब, विदर्भ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र इथे झालेली कापसाची लागवड रेल्वे लाईनच्या बाजूने झाली हा योगायोग नाही. या सर्व रेल्वे लाईन बंदरांशी जोडलेल्या होत्या. कापसाच्या वाहतूकीसाठीच रेल्वेचा प्रामुख्याने उपयोग होता. बंदरातून हाच कापूस निर्यात केला जायचा.

   भारतीय कापसाच्या जाती आखूड आणि नाजूक धाग्याच्या होत्या पण त्यांच्यावर बोंडअळी नव्हती. मावा आणि तुडतुडे या रोगांना प्रतिकार करण्याची उपजत क्षमता या कापसाच्या जातींमध्ये होती. या गुणांमुळे भारतीय कापसाच्या जातींचा उत्पादन खर्च कमी होता. अमेरिकन वाणाच्या कापसावरच बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असे. अमेरिकन वाणाच्या कापसासोबतच बोंड अळीचा प्रवेशही भारतात झाला. अमेरिकन कापसाचं वाण आल्यानंतर हा उत्पादन खर्च कित्येक पटींनी वाढला. अमेरिकन जातीपासून तयार केलेल्या कापसाचं बियाणं व्यापा-यांनी गावोगाव पोहोचवलं. त्या बियाण्यांच्या पाठोपाठ मावा, तुडतुडे, बोंड अळी इत्यादी रोगांवरची औषधंही गावागावात पोचली. बियाण्याच्या किंमती, कीटकनाशकं, खतं इत्यादी घालभर (निविष्ठा) व्यापारी लोक उधारीवर शेतक-यांच्या गळ्यात मारायचे आणि कापूस विकत घेताना कर्जाऊ दिलेली रक्कम दामदुपटीने वसूल करायचे.ही एक प्रकारची कंत्राटी शेती होती. या कंत्राटी शेतीत शेतक-याच्या अधिकारांना, हक्कांना स्थान नव्हतं. स्वातंत्र्योत्तर काळात या पद्धतीत झालेला बदल म्हणजे सावकारी पाशात अडकलेले शेतकरी आत्महत्या करू लागले. बोंड अळीला अमेरिकन बॉलवर्म असंच नाव होतं. या बोंडअळीवर अक्सीर इलाज करण्यासाठी कापसाच्या गुणसूत्रातच बदल करण्यात आले. मात्र त्यातली मेख अशी की सर्व प्रकारच्या बोंडअळींना बीटी कॉटनचं बियाणं प्रतिबंध करत नाही. त्यामुळे दरवर्षी बीटी कॉटनची वेगवेगळी वाणं बाजारात येऊ लागली. सुमारे एक लाख कापूस उत्पादकांनी आत्महत्या केल्यानंतर बीटी कॉटनच्या बियाण्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. बीटी कॉटनच्या आगमनानंतरही दरसाल सुमारे १४०० कोटी रुपयांची कीटकनाशकं आपण अमेरिकेतून आयात करतो. त्यापैकी ७० टक्के कीटकनाशकांवर अमेरिकेत बंदी आहे. या कीटकनाशकांपैकी ५५ टक्के कीटकनाशकं केवळ कपाशीच्या पिकावर फवारली जातात, अशी माहिती के. राममूर्ती, टी.पी. राजेंदरन आणि एम. साबेश या तीन अभ्यासकांनी आपल्या निबंधात नोंदवली आहे. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ कॉटन रिसर्च या संस्थेच्या कोइंम्बतूर स्टेशनने प्रसिद्ध केलेल्या या निबंधात विषारी कीटकनाशकांच्या या प्रदूषणामुळे पर्यावरणावर भीषण संकट येण्याचा इशारा देण्यात आलाय.


    वस्त्रोद्योगामध्ये सर्वाधिक खर्च म्हणजे अंदाजे ४० टक्के खर्च कच्चा माल म्हणजे कापसावर होतो. आधुनिक अर्थशास्त्रानुसार शेतमाल हा कच्चा माल आहे. सुधारित बियाणं, किटकनाशकं, संप्रेरकं, शेतीची अवजारं वा यंत्रं, पाणी व्यवस्थापन, ही सर्व मूल्यवर्धित उत्पादनं असल्याने शेतकर्‍याने त्याची किंमत मोजायची त्याला बुद्धि, कौशल्यं, श्रम यांची जोड द्यायची. या सर्व घटकांच्या व्यवस्थापनातून शेतकरी जे उत्पादन घेतो ते मात्र मूल्यवर्धित नसतं असा आधुनिक अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. कापूस म्हणजे कच्चा मालाच्या किंमती जेवढ्या कमी तेवढा वस्त्रोद्योगाचा अर्थातच मूल्यवर्धित उत्पादनामुळे मिळणारा फायदा अधिक, असं सूत्र आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून कमीत कमी किंमतीला कापूस खरेदी करण्यातच वस्त्रोद्योगाचं आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेचं कल्याण आहे असं दुसरं सूत्र त्यातूनच आकार घेतं.

   १९८३ पर्यंत शेतीनंतर सर्वाधिक रोजगार वस्त्रोद्योग देत होता. निर्यातीतही वस्त्रोद्योगाचा मोठा वाटा होता. आपल्या देशातील वस्त्रोद्योग म्हणजे केवळ सूतगिरण्या आणि कापडगिरण्या नव्हेत. जीनिंग मिल्स, हातमाग, यंत्रमाग, सूतगिरण्या, संयुक्त कापडगिरण्या, कापडावरील प्रक्रिया उद्योग अशा अनेक विभागांचा समावेश आपल्या देशातील वस्त्रोद्योगात होतो. वस्त्रोद्योगातील कामगारांचं मोठ्या प्रमाणावर शोषण झालं तरच भारतीय कापडाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत स्पर्धात्मक राहू शकते. निर्यात वाढली तर परकीय चलनाचा साठा आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेची प्रकृती स्थिर राहू शकते. या सूत्राला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला आणि वस्त्रोद्योगाचं मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झालं. परिणामी आधुनिकीकरणासाठी सरकारकडून सवलतीच्या व्याजदराने करोडो रुपयांचं कर्ज घेऊन मिल मालकांनी कापडगिरण्या बुडवल्या. बहुतेक कापडगिरण्या अवसायनात जाण्याला गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचा निष्कर्ष १९८३ साली केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच काढला आहे. उत्पादनाच्या हरेक टप्प्यावर होणारा ऊर्जेचा वापर लक्षात घेऊन वस्त्रोद्योग धोरणाची पुनर्रचना करावी ही तज्ज्ञ समितीची शिफारसही केंद्र सरकारने गुंडाळून ठेवली. परिणामी हातमागांची स्थिती शोचनीय झाली. यंत्रमाग कामगारांच्या शोषणाला धरबंध उरला नाही. गिरणीकामगार देशोधडीला लागले.

   कापसाच्या निर्यातीपेक्षा तयार कपड्यांची अर्थात पक्क्या मालाची म्हणजेच मूल्यवर्धित मालाची निर्यात करणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी शहाणपणाचं ठरतं. पण त्यासाठी वस्त्रोद्योगाचं केवळ आधुनिकीकरण करून भागत नाही तर उद्योजकता, संशोधन, बाजारपेठेचा वेध घेण्याची क्षमता असे अनेक गुण आवश्यक असतात. आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रात म्हणजेच भांडवलदार आणि उद्योजकांमध्ये नेमका त्याचाच अभाव आहे. तरिही वस्त्रोद्योगात सर्वाधिक फायदा व्यापारी, मिल मालक, आयातदार, निर्यातदार यांचाच होतो. आपण उपाशीपोटी मरणार नाही एवढी हमीही आज वस्त्रोद्योगातील कामगारांना वा कापसाच्या शेतकर्‍यांना मिळू शकत नाही.

    देशी वस्त्रोद्योगाला स्वस्तात कापूस मिळावा आणि कापूस निर्यातही व्हावा असं केंद्र सरकारचं धोरण असतं. म्हणजे असं की कापसाचा हंगाम सुरु झाला म्हणजे बाजारपेठांमधून आवक वाढली की कापसाच्या किंमती कमी होतात. त्या काळात देशी उद्योजक कापसाची खरेदी करतात. त्यानंतर गरजू शेतकर्‍यांकडचा कापूस संपतो. निर्यातीने वेग घेतला की कापसाच्या किंमती खाली-वर होऊ लागतात. या काळात अनेक शेतकरी कापूस साठवून ठेवतात आणि चांगली किंमत आली की विकून टाकतात. मार्च, एप्रिल पर्यंत शेतकरी चिरडीला येऊ लागतात. नेमक्या त्याच वेळी निर्यातीवर बंदी घालायची. कापसाच्या किंमती एका गासडीमागे (१७० किलो) चार-पाचशे रुपयांनी कोसळतात. त्यावेळी देशी उद्योजकांनी आपली कापूस खरेदी उरकून घ्यायची. म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेचा, जागतिक बाजारपेठेचा लाभ शेतकर्‍यांना, विशेषतः कापूस उत्पादकांना घेऊ द्यायचा नाही असा सरकारी खाक्या आहे. शेतकर्‍यांच्या असंतोषाला काही मंत्री, मुख्यमंत्री, राजकारणी वारा घालू लागले की निर्यातीवरची बंधनं उठवायची. थोडक्यात काय तर हाकारे उठवून कापसाची शिकार करायची. शेतकरी जेवढा गरजू तेवढा भारतीय वस्त्रोद्योगाचा म्हणजेच मिल मालक, व्यापारी, आयात-निर्यातदार यांचा फायदा अधिक या सूत्राला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. जंगल कायद्यावर आधारेल्या ह्या नीतीला आयात-निर्यात वा वस्त्रोद्योग धोरण संबोधणं सभ्यतेला धरून नाही कारण शिकार कापसाची नाही तर शेतकर्‍यांची होत असते. दरवर्षीचा हा खेळ या वर्षी होळीच्या सुमारास सुरू झाला. साता उत्तरांची कापूसकोंड्याची गोष्ट पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत नाही.