Friday 6 October 2017

तणमोर आणि पारधी समाजाचं पुनरुत्थान भाग- २




By Sypheotides_indicus.jpg: Koshykderivative work: Netzach - This file was derived from  Sypheotides indicus.jpg:, CC BY 2.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=25530735


ह्या गवताला म्हणतात कुंदा, हिंमतराव पवार म्हणाले. शेतात कुंदा आला की शेतकरी बेजार होतो कारण ह्या गवताच्या मुळ्या खूप खोलवर गेलेल्या असतात. हे गवत मुळापासून उपटणं कमालीचं कष्टाचं काम असतं. कुंदा दिसला की शेतकरी तेवढा भाग सोडून नांगरणी करतात. पहिला पाऊस झाला की हे गवत महामूर वाढतं, इतकं की त्यामध्ये शिरणं अवघड होतं. तणमोराचं घरटं ह्याच गवतात असतं, हिंमतराव पवार सांगत होते.

हिंमतराव पवार हे पारधी आहेत. शिरसा-मासा ह्या अकोला जिल्ह्यातील गावात ते राहतात. तिथल्या शिवारात त्यांनी तणमोराचं घरटं शोधलं होतं. त्यानंतर एक जखमी तणमोरही त्यांनी विदर्भ पक्षी मित्र संमेलनात सादर केला होता. वन विभागानेही त्यांच्या कामगिरीची नोंद घेतली आहे. तणमोराच्या नराला आम्ही म्हणतो खलचिडा आणि मादीला म्हणतात भांडेवडी, हिंमतराव पवारांनी माहिती दिली.
तणमोर हा पक्षी नेपाळच्या तराई प्रदेशातून उन्हाळ्यात मध्य भारतात येतो. गुजरात, नैऋत्य राजस्थान, वायव्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशाच्या शिवारात तो सापडतो. शिवार म्हणजे शेत जमीन, पडिक जमीन आणि झुडुपी जंगलांचा प्रदेश. गंमतीची बाब अशी की पारधी समाजही ह्याच प्रदेशात आहे.

तणमोर हा नेपाळच्या तराई प्रदेशातील पक्षी. उन्हाळ्यात तो मध्य भारतात येतो. पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम गुजरात, वायव्य महाराष्ट्रात तो सापडतो असं अनेक अभ्यासकांनी नोंदवलं आहे. ह्या प्रांतांतील गवताळ प्रदेश हा तणमोराचं वसतीस्थान. पावसाळा सुरू झाला की तणमोर माजावर येतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर उंच उडी मारतो. माद्या गवतामध्ये लपलेल्या असतात. उडी मारलेला तणमोर एक मिनिटभर अवकाशात दिसतो. जिथून उडी मारली तिथेच तो विसावतो आणि दीड-दोन मिनिटांत पुन्हा उडी मारतो. तणमोर उडी मारतो तेव्हाच त्याचं दर्शन होतं. शिवारातील ह्या पक्षांच्या हालचाली केवळ पारधीच टिपू शकतात. तणमोराची शिकार ब्रिटीश काळात भरपूर झाली. पारध्यांकडून तणमोराचा ठावठिकाणा कळला की ब्रिटीश अधिकारी वा सैनिक तणमोराच्या शिकारीसाठी रवाना होत. तणमोराला उडी मारताना पाह्यलं की लपतछपत त्याच्या जवळ जाऊ लागत. उडी मारून तणमोर एक-दीड मिनिटासाठी गवतामध्ये विसावतो. त्यावेळी सरपटत पुढे जायचं. त्याच्या पासून दहा मीटर अंतरावर पोचलं की छर्‍याच्या बंदुकीतून गोळी झाडायची. अनेक छर्‍यांपैकी एक छरा हमखास तणमोराचा बळी घ्यायचा. ही शिकाऱ म्हणजे ब्रिटीश अधिकारी वा सैनिकांचा नाश्ता होता. पारधी कधीही बंदुक वापरत नाहीत. फासे लावून तणमोर वा त्याची मादी पकडणं ही पारध्यांची खासियत होती.

आता तणमोर हा दुर्मिळ पक्षी झाला आहे. त्याची कारणं अनेक आहेत. दुष्काळ वा अवर्षण हे सर्वात प्रमुख कारण समजलं जातं. शेतीमधील तंत्रवैज्ञानिक बदल हेही एक कारण आहे. तणनाशक, कीटकनाशक, नवीन पिकं उदाहरणार्थ सोयाबीन, ह्यामुळेही तणमोराच्या पर्यावरणाला धोका पोचतो. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर ह्यासारख्या यंत्रांमुळे शेतातील कुंदा गवताचा नायनाट करता येतो त्यामुळेही तणमोराचं वसतीस्थानच नष्ट होतं. शिकारीमुळेही तणमोर अस्तंगत होतात.

तणमोर आणि पारध्यांचा प्रदेश वा पर्यावरणीयदृष्ट्या एकच आहे. केवळ पारधीच तणमोराचा शोध घेऊ शकतात. पारधीच तणमोराची शिकार करू शकतात आणि म्हणून पारधीच तणमोराचं जतन आणि संवर्धनही करू शकतात ह्या विश्वासाने संवेदना या संस्थेने पारधी समाजात जागृतीची मोहीम सुरू केली. अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये. हिंमतराव पवारांचा शोध संवेदना या संस्थेनेच लावला. तणमोराला एकदा खांद्यावर बसवायचा आहे, एवढी एकच इच्छा आहे माझी, असं हिंमतराव पवार सांगत होते.

तणमोराचं ठावठिकाणा लागतो त्याने उडी मारल्यावर. त्याच्या उडीच्या जागेच्या आसपास माद्यांनी घरटी केलेली असतात. ही घरटी शोधून काढायची आणि त्यांना संरक्षण पुरवायचं. म्हणजे शेतात घरटं असेल तर शेतकर्‍य़ाला सावध करायचं त्याला सांगायचं की बाबारे, या घरट्याला अपाय होणार नाही अशा प्रकारे शेतीची काम कर. हे काम पारध्यांनी करायचं तर त्यांनी खायचं काय? पारध्यांकडे ना जमीन, ना शिक्षण, ना व्यवसाय वा नोकरी. जैवविविधता कायद्याचा आधार आम्ही घेतला आणि कामाला सुरूवात केली, असं कौस्तुभ पांढरीपांडे म्हणाला. हा हौशी पक्षी निरीक्षक तणमोराचा शोध घेताना पारधी समाजात मिसळून गेला. तणमोराचं जतन, संवर्धन करायचं तर पारधी समाजाचे जगण्याचे प्रश्न सोडवायला हवेत आणि हे प्रश्न सोडवायचे तर पारधी समाजाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा पुरेपुर उपयोग करायला हवा असंही त्याने आणि त्याच्या मित्रांनी हेरलं. त्यासाठी संवेदना ही संस्था स्थापन केली. पारधी समाजातील तरुणांमधून नेतृत्व निर्माण करण्यासाठी कार्याला सुरुवात केली. या प्रवासात जैव विविधता कायदा त्यांना भेटला. या कायद्यानुसार गावातील, शिवारातील जैव विविधता जपण्यासाठी वन विभाग आणि अन्य विभागांचं सहकार्य मिळतं. या कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून संवेदना या संस्थेने वडाळा आणि अन्य पारधी गावांच्या आसपासच्या झुडुपी जंगलांच्या संवर्धनाचे हक्क गावांना मिळवून दिले. ह्या झुडुपी जंगलामध्ये चराई बंदी करण्यात आली. त्यामुळे गवतच नाही तर अनेक वनस्पतींचं आणि वृक्षांचं संवर्धन झालं. डुकरं, ससे, हरणं, नीलगाई ह्यांची संख्या वाढली. गवताची विक्री करून  वडाळा गावातल्या अनेक पारध्यांनी गाई विकत घेतल्या.

जैव विविधतेच्या जतनातून आपल्याला रोजगार मिळू शकतो, आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल होतो हे ध्यानी आल्यावर पारधी तरुणांमध्ये जागृतीची लाट निर्माण झाली. जैव विविधतेचं जतन करण्याचे वेगवेगळे मार्ग केवळ पारधीच नाही तर गावातील अन्य समाजाचे तरुणही शोधू लागले. आंब्याच्या जाती कितीतरी असतात. लोणच्याचे आंबे वेगळे तर मुरांब्याचे वेगळे, रसाचे आणखी वेगळे. ह्या देशी जाती आता अस्तंगत होऊ लागल्या आहेत. केवळ बाजारपेठेसाठी आंब्याचं उत्पादन सुरू झाल्यामुळे केशरच सर्वत्र लावला जातो. हे ध्यानी आल्यावर आंब्याच्या देशी वाणांची नर्सरी उभारण्याची कल्पना संवेदना ने मांडली. ह्या कल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. गावकरीच या नर्सरीतून रोपं विकत घेऊ लागले.

पारधी समाजात जात पंचायतीचं प्राबल्य फार. जन्म, विवाह, घटस्फोट, मृत्यु म्हणजे वारसा, उपजिविका करताना निर्माण होणारे प्रश्न जात पंचायतीत सोडवणुकीसाठी येतात. ह्या जात पंचायतीत राजा, वजीर, पंच यांची मनमानी चालते. जात पंचायतीला पर्याय देता येईल का असा प्रश्न पारधी समाजातील तरुण विचारू लागले. त्यासंबंधात चर्चा सुरू झाली. जात पंचायतीत महिलांना स्थान नाही हाही प्रश्न चर्चेला आला. विवाहाचा निर्णय कुटुंबाने घेण्यापेक्षा तरुण-तरुणीने परस्पर संमतीने घ्यायला हवा असा विचार अनेक तरुण मांडू लागले. जात पंचायतीला तांडा पंचायत हा पर्याय निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. तांडा पंचायत गावाची असेल, त्यामध्ये प्रत्येक सदस्याला स्थान असेल, तांडा पंचायत म्हणजेच ग्रामसभा. तांडा पंचायतीने एक कार्यकारी समिती नेमावी त्यामध्ये महिलांनाही स्थान असेल अशी मांडणी तरुण करू लागले. जैव विविधता, रोजगार, शिक्षण, महिलांचं सबलीकरण वा लिंगभाव हे प्रश्नही तांडा पंचायतीत चर्चिले जावेत, त्यावर तांडा पंचायतीने उपाय योजना सुचवावी, सरकारी योजनांचा लाभ गावकर्‍यांना मिळवून द्यावा अशी मागणी होऊ लागली.

एका दुर्मिळ पक्षाच्या जतन-संवर्धनाच्या प्रयत्नातून पारधी समाजाच्या उत्थानाचा प्रवास सुरू झाला. तणमोर त्याचं प्रतीक बनू लागला आहे.


No comments:

Post a Comment