Thursday 31 August 2017

पंजाबातील डेरे आणि राजकारण


   पंजाबामध्ये एकूण १२ हजार गावं आहेत आणि ९ हजार डेरे आहेत. चंडीगडहून प्रकाशित होणार्‍या देशसेवक या पंजाबी वर्तमानपत्राने ह्यासंबंधातील सर्वेक्षण २००७ साली प्रसिद्ध केलं होतं. डेरा सच्चा सौदा चे बाबा राम-रहीम ह्यांनी शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंघ ह्यांची वेशभूषा केल्याने त्यावर्षी पंजाबात आणि अन्यत्र शीख समुदायांनी गदारोळ केला होता.
पंजाबला मी पहिल्यांदा भेट दिली २००७ साली. पंजाबातील शेती आणि शेतकरी ह्यांचा अभ्यास करण्यासाठी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने मला तिथे पाठवलं होतं. चंडीगडमधला माझा सहकारी इखलाख सिंग हा माझा पंजाबातील गाईड होता. पंजाबचा इतिहास, भूगोल आणि वर्तमानाची ओळख त्याच्यामुळे झाली.

    शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा कायदा आहे, त्या कायद्यानुसार या समितीच्या गुरुद्वारांची देखभाल व नियंत्रण केलं जातं, प्रत्येक गुरुद्वाराच्या निधीचा हिशेब ठेवला जातो, त्याचं लेखापरिक्षण होतं, समितीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुका होतात, समितीचा कारभार आदर्श आहे असं नाही पण कायदा, नियम यांचं नियंत्रण आहे. डेरा सच्चा सौदा किंवा अन्य कोणत्याही डेर्‍यांमध्ये अशी व्यवस्था नाही, करोडो रुपयांच्या व्यवहारांचा, मालमत्तेचा हिशेब नाही, अशी शब्दांत अनेक सरकारी अधिकारी (प्रामुख्याने शीख) आपली नाराजी मांडायचे.

   पंजाबातील विविध डेरे आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती ह्यांच्यामध्ये संघर्ष आहे.  ह्या डेर्‍यांचे भक्त वा अनुयायी ह्यांना गुरुद्वारांमध्ये स्थान नाही. कारण ह्यापैकी बहुतेक दलित वा अन्य मागासवर्गीय आहेत. गुरुद्वारांनी त्यांना जवळ केलं तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं इखलाख सिंग म्हणाला.
   
   २०११ च्या जनगणनेनुसार पंजाबमधील अनुसूचित जातींची लोकसंख्या ३१.९ टक्के आहे. हरयाणामध्ये २०.२ टक्के आहे. तर शेजारच्या हिमाचल प्रदेशात अनुसूचित जातींची लोकसंख्या २५.२ टक्के आहे. चंडीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. या शहरात अनुसूचित जातींची लोकसंख्या १७.५ टक्के आहे.  अनुसूचित जाती, अन्य मागासवर्गीय जातींबाबत केला जाणार्‍या सामाजिक भेदभावामध्ये डेरा संस्कृतीची पाळंमुळं आहेत. सामाजिक भेदभावाच्या विरोधातील विद्रोहाचं हे डेरे प्रतीक बनले आहेत.
      
    शीख धर्माचा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध आहे. भेदाभेद अमंगळ अशीच गुरु ग्रंथसाहिबाची शिकवण आहे. अमृतसरचं मंदिर म्हणजे हरमिंदर साहिबची उभारणी करण्यासाठी शीलापूजनाला लाहोरच्या एका सुफी संताला म्हणजे मुसलमानाला पाचारण करण्यात आलं होतं. गुरु ग्रंथ साहिबामध्ये जयदेव, नामदेव, कबीर, शेख फरीद अशा अनेक संतांच्या रचना संग्रहित करण्यात आल्या आहेत. लहंदा (पश्चिम पंजाब), ब्रज, खडी बोली, संस्कृत, सिंधी, पर्शियन अशा अनेक भाषांतील रचना या गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. बहुभाषिक आणि बहुपंथीय रचनांचा हा एकमेव धार्मिक ग्रंथ असावा. पण तरिही पंजाबात अस्पृश्यता पाळली जात होती. दलितांचे वेगळे गुरुद्वारा आहेत, जातीय शोषणही आहे. शीख म्हणजे शिष्य. अमृतधारी म्हणजे केस, कंगवा, कच्छ, कृपाण आणि कडं धारण करणारे शीख. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीवर या अमृतधारी शीखांचं वर्चस्व आहे. अमृतधारी शीख शाकाहारी असतात. खालसा ही संघटना गुरु गोविंद सिंघांनी स्थापन केली. मोगलांच्या अन्याय-अत्याचारांपासून रयतेचं संरक्षण करण्यासाठी राज करेगा खालसा ही घोषणा दिली. पाच क कारांचं पालन करणारे खालसा जनतेचे रक्षणकर्ते आहेत. मात्र शीख जातिव्यवस्था, अस्पृश्यता पाळू लागले, त्यांनी दलितांना गुरुद्वारात प्रवेश करायला मज्जाव केला, त्यामुळे वेगवेगळे डेरे निर्माण झाले, अशी कारणमीमांसा इखलाखने सांगितली.
    
    पंजाबामधील जातींची पाळंमुळं मध्य आशियातील विविध टोळ्या वा जमातींमध्ये आहेत असा दावा डॉ. बुद्ध प्रकाश या अभ्यासकाने पोलिटीकल अँण्ड सोशल मूव्हमेंटस् इन एन्शियंट पंजाब या ग्रंथामध्ये केला आहे. बधवार, बेदी ही आडनावं म्हणजे जाती असणारे समूह भद्र जमातीचे, बहल वा बहेल यांचं मूळ बाल्हिक जमातीमध्ये तर अरोडा वा अरोरा अरट्ट, अरास्ट्रक या जमातीचे, कांग म्हणजे कांग किऊ या जमातीचे, मेहरांचं मूळ मागा वा मगा जमातीत आहे. पंजाबातील जाती वा आडनावं आणि मध्य आशियातील जमातींची यादीच डॉ. बुद्ध प्रकाश यांनी सादर केली आहे. या यादीनुसार जाट म्हणजे यवनज वा आयोनियन. जाट हे मूळचे पशुपालक. सिंध प्रांतात ते शेळ्या-मेंढया, गाई-म्हशी आणि उंटांचे कळप घेऊन ते येत असत. पुढे ते सिंधू नदीच्या वरच्या अंगाला स्थलांतरीत झाले.  राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ते स्थायिक झाले. जाट मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसायात आहेत. जाटांची सर्वाधिक लोकसंख्या माझा या प्रदेशातली. माझा म्हणजे पंजाबातील मध्यवर्ती प्रदेश. पर्शियन भाषेत आब म्हणजे पाणी. पंच आब म्हणजे पंजाब. हा प्रदेश हिंदुस्थान आणि पाकिस्तान यामध्ये विभागला गेला आहे. सतलुज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या त्या पाच नद्या. या पाच नद्यांचा पंचनद पुढे सिंधुला मिळतो. हिमालयात उगम पावणार्‍या या बारमाही नद्यांमुळे पंजाब सुजलाम-सुफलाम आहे. वर्षाला दोन ते तीन पिकं घेतात इथले शेतकरी. या पाच नद्यांचा मध्यवर्ती प्रदेश म्हणजे माझा. माझा या पंजाबी शब्दाचा अर्थच मध्यवर्ती असा आहे. पंजाबची राजधानी होती लाहोर. ती माझा प्रदेशातच आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक ह्यांचं जन्मगाव, राय भोई की तलवंडी (आता नानकाना साहिब) हे लाहोरजवळ आहे.  
    
   पंजाबात जाटांच्या अनेक उपजाती आहेत. उदा. ओजला, ब्रार, इत्यादी आडनावं. जाट प्रामुख्याने शेतकरी आणि सैन्य दलात आहेत, तर खत्री उदा. अरोडा, व्यापार-उदीम, व्यवसायात आहेत. खत्री म्हणजे क्षत्रिय. पण पंजाबातील खत्री प्राचीन काळापासून व्यापार-उदीमात आहेत. शीखांचे सर्व दहा गुरू खत्री जातीचे आहेत. जाट असोत वा शीख वा राजपूत वा अन्य जाती, त्यांनी शीख धर्माचा स्वीकार केला आहे. ग्रंथ हाच गुरू अशी त्यांची श्रद्धा आहे. मूर्तीपूजा, मनुष्यरुपी गुरू वा प्रेषित वा अवतार ह्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही.
    
    ह्याउलट पंजाबातील डेरे. देहधारी गुरुशिवाय मुक्ती वा आध्यात्मिक साधना अशक्य आहे अशीच बहुतेक डेर्‍यांची धारणा आहे. निरंकारी मिशन, राधास्वामी, डेरा सचखंड, डेरा सच्चा सौदा, नामधारी असे अनेक डेरे पंजाबात आहेत. निरंकारी मिशनचं मुख्यालय दिल्ली इथे आहे. ते शीख नाहीत कारण त्या डेर्‍याच्या संस्थापकाचा दावा होता की तो जगद्गुरु आहे आणि त्याची पत्नी जगन्माता. मात्र निरंकारी शीख धर्माच्या अनुयायांना आपलंसं करतात. गुरु गोविंद सिंघांनी खालसा ची स्थापना करताना पंच प्यारे ही संज्ञा आपल्या  पाच निष्ठावंत अनुयायांना उद्देशून वापरली. एका निरंकारी गुरुने सात सितारे अशी कल्पना मांडली होती. राधास्वामी पंथाची धारणा अशी की राधा म्हणजे देह त्याचा स्वामी म्हणजे आत्मा. नामधारी स्वतःला शीख मानणारे आहेत पण ते कधीही शीख धर्माच्या मुख्य धारेत नव्हते असा शीखांचा दावा आहे. डेरा सच्चा सौदा म्हणजे राधास्वामी पंथाची शाखा आहे. एका डेर्‍यातून दुसरा डेरा निर्माण होत असतो.

   ह्या डेर्‍यांचे अनुयायी मतदानाच्या वेळी आपल्या आध्यात्मिक गुरुचा संदेश शिरसावंद्य मानतात. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी लोकनीती या संस्थेने (सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचा उपक्रम) केलेल्या मतदानपूर्व नमुना सर्वेक्षणात २३ मतदारांनी सांगितलं की ते कोणत्या ना कोणत्या डेर्‍याचे अनुयायी आहेत. या डेर्‍यांना भेट देणार्‍य़ा १३ टक्के लोकांनी नमुना सर्वेक्षणात सांगितलं की ते मतदान करताना डेर्‍याचा आदेश पाळतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे नेते आध्यात्मिक गुरुंचे उंबरठे झिजवतात. डेरा सचखंड बालन हा प्रामुख्याने रविदास समाजाचा डेरा आहे. २०१२ च्या निवडणुकांमध्ये या डेर्‍याने बहुजन समाज पार्टीला पाठिंबा दिला. परिणामी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली आणि शिरोमणी अकाली दल-भाजप युतीला सत्ता काबीज करणं शक्य झालं असं विश्लेषण अनेक अभ्यासकांनी केलं आहे.

   शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक समिती हा डेरा मानला तर त्यावर शिरोममी अकाली दलाचं वर्चस्व आहे. या समितीच्या अधिपत्याखालील गुरुद्वारे, तिथे दररोज चालणारी कारसेवा (लंगर वा सार्वजनिक भोजनासाठी शिधा गोळा करणं, सैपाक करणं, भांडी घासणं, इत्यादी) हा शिरोमणी अकाली दलाचा कार्यक्रम मानायला हवा. मतदारांशी एवढा दैनंदिन संपर्क कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. नेमकं हेच मॉडेल अन्य डेर्‍यांनी आपलंसं केलं आहे. त्यातून धर्म आणि राजकारणाची कॉकटेल पंजाब-हरयाणामध्ये तयार झाली आहे.

  महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ११.८ टक्के आहे. म. फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय चळवळी उभ्या राह्यल्या. त्यांचा आणि धर्माचा वा पंथाचा संबंध उरला नाही. अशा प्रकारची प्रगतीशील सांस्कृतिक वा राजकीय आंदोलनांची पंजाबातील परंपरा क्षीण आहे. खालिस्तानवादी दहशतवादी असोत की अन्य राजकीय प्रवाह, त्यांनी डेर्‍यांमार्फतच आपलं राजकारण पुढे रेटलं. 

  या राजकारणाला गती मिळाली ९० च्या दशकात. विविध बाबा, डेरे उपग्रह वाहिन्यांवर आपले कार्यक्रम सादर करू लागले. मांत्रिक, तांत्रिक, आध्यात्म, योग ह्यांचं पेव फुटलं. उदारीकरणामुळे आधुनिकतेचा कार्यक्रम समाजमानसात रुजला नाही. फक्त तंत्रज्ञानाच्या आयातीला प्रोत्साहन मिळालं. समोसा खाऊन कॅन्सरवर उपचार करता येतो असे बाष्कळ दावे करणारे बाबा उपग्रह वाहिन्यांवर दिसू लागले. सध्याची परिस्थिती अधिक भीषण आहे. प्राचीन भारतात अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होत असत त्याचं प्रतीक म्हणजे श्रीगणेश, असा दावा पंतप्रधान करतात. प्राचीन भारतातील विमानविद्या या विषयावर सायन्स काँग्रेसमध्ये निबंध वाचला जातो. अशा वातावरणात बाबा लोक गजाआड गेले तरी अवैज्ञानिक बाबा संस्कृतीला आळा घातला जाणार नाही. 

9 comments:

  1. उत्तम माहिती. या संदर्भाशिवाय डेरा सच्चा सौदा विषयीचं लेखन वरवरचं ठरू शकतं.

    ReplyDelete
  2. पंजाब-हरियाणा-मधले हे डेरा-प्रकरण आपल्याकडल्या मठासारखे दिसते. ह्या मठवाल्यांना त्या काळी आपल्या संतांनी विरोध केला होता. तसा कुणी पंजाबात
    झालेला दिसत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. मला नेमकं माहीत नाही पण पंजाब, हरयाणात डेरे खूपच आहेत. पाकिस्तानातील पंजाबातही आहेत. सुफी संतांचेही डेरे असत. हे डेरे पाकिस्तानातील पंजाबात आजही आहेत. गुगुल केलं तर त्यांची नावं व अधिक माहिती मिळेल.
      गुरु नानक ह्यांच्या पंथालाही पुढे डेर्‍याचं स्वरुप आलं. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा कायदा, ब्रिटीशांच्या काळात झाला. त्यामुळे जे केशधारी ते शीख असंं कायदा मानू लागला. शीख हा पंथ नाही तर स्वतंत्र धर्म आहे अशी मांडणी झाली होतीच. त्याला या कायद्याने बळ मिळालं. खत्री कुटुंबातला एक मुलगा सरदार (केशधारी) होण्याची परंपरा होती. ती पुढे क्षीण होत गेली.
      संत आणि डेरा पंजाबात हरयाणामध्ये एकजीव झाले आहेत.
      आपल्यासारखी संतांची परंपरा मला वाटतं भारतात कुठेही नसावी.

      Delete
  3. अतिशय रंजक पद्धतीने दिलेली उपयुक्त माहिती. आजच्या 'डेरा सच्चा'च्या संदर्भात पाहता या माहितीची गरज होतीच. तुम्ही जास्तीत जास्त लिहायला पाहिजे इथे. तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे, अजून खूप काही सांगायचे आहे तुम्हाला. आणि आम्हाला वाचायचे आहे.

    ReplyDelete
  4. धन्यवाद , विषयाचं हॉलिस्टिक स्वरूप समजलं , या माहितीसाठी धन्यवाद

    ReplyDelete
  5. माहितीपूर्ण. धन्यवाद.

    ReplyDelete
  6. सर , छान अभ्यासपूर्ण माहिती.

    ReplyDelete
  7. सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete