मॉन्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दावरून आला. अरब दर्यावर्दी होते. त्यांच्यासाठी मौसिम म्हणजे हंगामी वारे. वर्षातून दोन वेळा दिशा बदलणारे वारे हा मॉन्सूनचा शास्त्रीय अर्थ. भारतीयांसाठी मोन्सून म्हणजे पावसाळा. कारण ह्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. पाऊस आकाशातून येतो म्हणून भारतीयांनी त्याचा संबंध नक्षत्रांशी जोडला आणि त्याआधारे ठोकताळे लावले. हवामानाचा संबंध त्यामुळे आपण नक्षत्रांशी आणि वैयक्तिक वा सामुहिक अनुभवाशी लावतो.
हवामानाचे घटक कोणते, त्याचं मोजमाप कसं करायचं, ह्यासंबंधात सामान्यजनांना फारशी माहिती नसते. १५९३ साली गॅलिलीओने तापमान मोजण्याचं उपकरण शोधलं. १६४४ साली टोरीचेलीने वातावरणाचा दाब मोजणारे उपकरण शोधलं. तापमान, वायूचा दाब, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ह्यांचे मोजमाप करणारी उपकरणे पाश्चिमात्य देशात शोधण्यात आली. त्यानंतर वेधशाळांची उभारणी सुरु झाली. भारताचा कारभार हाती आल्यानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १८४७ साली पहिली वेधशाळा मुंबईत कुलाबा येथे स्थापन केली. ब्रिटीश साम्राज्याचे हितसंबंध राखण्यासाठी वेधशाळांची स्थापना करण्यात आली. गोरे सैनिक मलेरियाचे बळी पडत. म्हणून पर्जन्य मापक उपकरणे गरजेची होती. व्यापार समुद्रमार्गे होता. त्यामुळे वादळांची पूर्वसूचना जहाजांना देण्यासाठीही वेधशाळा गरजेच्या होत्या. पुढे महसुलाचा प्रश्न आला. म्हणून मॉन्सूनचा वेधही गरजेचा ठरला. त्यामुळे वेधशाळांची संख्या वाढू लागली. भारतीय हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासाला अशी सुरुवात झाली. भारत हवामानशास्त्र विभागाची रीतसर स्थापना झाली.
डॉ. रंजन केळकर ह्यांनी भारत हवामानशास्त्र विभागात ३८ वर्षे काम केलं आहे. भारत हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य केलं. निवृत्तीनंतर त्यांनी हवामान ह्या विषयावर चार-पाच ग्रंथ लिहिले. मात्र हे ग्रंथ इंग्रजी भाषेत आहेत. मराठी भाषेत त्यांनी अनेक नियतकालिकातून मॉन्सून, हवामान, वातावरण ह्या विषयावर अनेक लेख लिहिले. मुलाखतीही दिल्या. दुसऱ्या देशांत हवामानाचे अंदाज अचूक ठरतात, पण आपल्याकडे मात्र चुकतात, काही घटनांचं पूर्वानुमान आपल्याकडे केलं जात नाही, आपलं विज्ञान वा तंत्रज्ञान पुरेसं प्रगत नाही का, असे प्रश्न त्यांना विचारले जाऊ लागले. म्हणून ह्या विषयावर अतिशय सुगम मराठीत महाराष्ट्राच्या हवामानाचा उलगडा करणारं छोटेखानी परंतु अतिशय मौलिक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. विद्यार्थी, शेतकरी, जिज्ञासू वाचक आणि विशेषतः पत्रकार ह्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवायला हवं. कृत्रिम पाऊस, एल निनो, ला निना, जागतिक तापमान वाढ, दुष्काळ, इत्यादी आजच्या महत्वाच्या विषयांबाबत अपुऱ्या आणि अनेकदा चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमे बातम्या, दृष्टीकोन आणि मते प्रसारित करत असतात ही बाब हे पुस्तक वाचल्यावर ठळकपणे जाणवते.
वीज अचानकपणे पडते तसा दुष्काळ अचानकपणे येत नाही. त्याच्या आगमनाची चाहूल लागत नाही. सर्वजण वाट पहात राहतात आणि पुरेसा पाऊस वेळेवर पडत नाही आणि दुष्काळ पडल्याचं आपल्याला कळते. दरवर्षी मॉन्सूनची वाटचाल आपल्या गरजेनुसार वा इच्छेनुसार व्हावी अशी अपेक्षा व्यर्थ आहे, असं स्पष्टपणे सांगताना डॉ. केळकर राज्याच्या हवामानाबाबत सकारात्मक भूमिका मांडतात. पडणाऱ्या पावसाचा पुरेपूर वापर करून घेणे गरजेचं आहे, असं ते सांगतात. वरुणराजा रुसला, बळीराजा निराश, निसर्गाचा कोप अशा निराशाजनक मथळ्याच्या बात्म्यांबद्द्ल ते नापसंती व्यक्त करतात. पावसाचा पुरेपूर वापर करायचा तर कृत्रिम पाऊस हे दुष्काळ निवारणाचा उपाय नाही ह्याची पक्की खुणगाठ बांधली पाहिजे. ढग म्हणजे हवेत तरंगणारया जलबिंदूंचा संचय असतो. बाष्पाचे रुपांतर जलबिंदूत होण्यासाठी सूक्ष्म कणिकांची गरज असते. विशिष्ट रसायने ढगांवर फवारून हे कार्य साधता येते. मात्र त्यासाठी नियमितपणे, पद्धतशीर आणि मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आखायला हवा. ढगांची निवड, बीजारोपण केल्यानंतर पडणारा पाऊस, त्याचं मोजमाप, त्या पाण्याची साठवणूक काटेकोरपणे करायला हवी, असंही ते बजावतात. कृत्रिम पावसामुळे नैतिक, राजनैतिक, सामाजिक, न्यायिक प्रश्न निर्माण होतील, त्याची सोडवणूक करूनच हा कार्यक्रम आखायला हवा असं डॉ. केळकर अधोरेखित करतात.
एल निनो आणि ला निना ह्यांचा मॉन्सूनवर होणारा परिणाम ह्यासंबंधात अनेक गैरसमजुती आहेत. प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान वाढण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया २-७ वर्षातून एकदा घडते. त्याचा भारतातील मॉन्सूनवर विपरीत परिणाम होतो. ह्या प्रक्रियेला एल निनो म्हणतात. ला निना ही प्रक्रिया त्याच्या विरुद्ध आहे. ह्या प्रक्रियेमध्ये प्रशांत महासागराचे तापमान कमी होते. त्याचा भारतीय मॉन्सूनवर अनुकूल परिणाम होतो. ह्या समजुती घट्ट रुजवण्यात प्रसारमाध्यमांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. भारतात दुष्काळाच्या २४ वर्षांपैकी १३ एल निनो वर्षं होती. २९ एल निनो वर्षांपैकी १६ वर्षं भारतात दुष्काळ पडला नव्हता, ह्याकडे डॉ. केळकर लक्ष वेधतात. तीच गत ला निना ची आहे. एल निनो आणि ला नीना २-७ वर्षातून एकदा घडणाऱ्या प्रक्रिया आहेत तर मॉन्सून भारतात दरवर्षी हजेरी लावतो असं सांगून लेखक ह्या दोन प्रक्रियांचा भारतीय मॉन्सूनशी असणाऱ्या संबंधांवर लेखक प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. एल निनो आणि ला निना ह्या प्रक्रियांमुळे प्रशांत महासागरातील मासेमारीवर विपरीत परिणाम होतो. अमेरिकेतील मासेमारी उद्योगाला फटका बसत असल्याने ह्या दोन प्रक्रियांचा अभ्यास करण्याला उत्तेजन दिले जाते. मात्र अनेक पत्रकारांना हवामानशास्त्र संशोधनातील अर्थ-राजकीय पैलूंची माहिती नसते. त्यामुळे ह्या दोन घटीताचं स्तोम प्रसारमाध्यमांनी माजवलं आहे.
ग्लोबल वार्मिंग हाही असाच अर्धवट माहितीवर चर्चा केला जाणारा विषय आहे. वैश्विक तापमानवाढीच्या संदर्भात सामान्यपणे एका बाबीकडे दुर्लक्ष होते. पृथ्वीवरील जमिनीचे तापमान जितक्या जलद गतीने वाढत जाते आहे, तितक्या गतीने समुद्राचे तापमान वाढत चाललेले नाही, ही बाब डॉ. केळकर खुलासेवार मांडतात. हिंदी महासागर आणि युरेशियाचा भूखंड ह्याच्यातील तापमानातील तफावत कालानुसार वाढत गेली तर भविष्यात मॉन्सूनचे प्रवाह बळकट होतील आणि पावसाचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे ह्या शक्यतेवर जगभरच्या शास्त्रज्ञांचे एकमत आहे, असं डॉ. केळकर नोंदवतात.
महाराष्ट्राचा भूगोल, कृषी-हवामान विभाग, सौर उर्जा, पवन उर्जा अशा अनेक विषयांची प्राथमिक माहिती ह्या पुस्तकात आहे. प्रसारमाध्यमांनी हे पुस्तक आपल्या संग्रहीच नाही तर पत्रकारांच्या प्रशिक्षणाठी समाविष्ट करायला हवं.
पूर्व प्रसिद्धी- दै. एग्रोवन
No comments:
Post a Comment