Saturday, 2 January 2010

उत्पल बोर्दोलोई

दोल म्हणजे देऊळ, दोलोई म्हणजे देवळात काम करणारा. अर्थात तो पुजारी नसतो. झाडलोट करणारा, पुजेची तयारी करणारा कोणीही. बोर्दोलोई तेच. म्हणजे सेकंड क्लास ब्राह्मण, इति उत्पल बोर्दोलोई. त्याची खापर पणजी बालविधवा होती. जीवनाला कंटाळून तिने नदीत उडी मारली. काही ब्रिटीश सैनिकांनी तिला वाचवलं आणि मिशन-यांच्याकडे सोपवलं. यथावकाश तिचा बाप्तिस्मा झाला, पुढे विवाहही झाला. ही गोष्ट कळल्यावर उत्पलला ईशान्य भारतातील ख्रिश्चनांच्या सामाजिक इतिहासात रस वाटू लागला. याच विषयावर काम करायचं त्याने ठरवलं. पण हे काम तो तडीस नेईलच याची मला खात्री वाटत नाही.

उत्पलची आणि माझी भेट बहुधा १९९८ साली झाली. आम्ही दोघंही डेक्कन हेराल्ड या बंगलोरच्या वर्तमानपत्रात वार्ताहर होतो. मी मुंबईला तर तो गोहाटीला. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्यं माझ्याकडे होती तर संपूर्ण ईशान्य भारत उत्पलकडे सोपवलेला होता. उत्पलला पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले होते. स्टेट्समन दैनिकाचा ग्रामीण वार्तांकनाचा पुरस्कार त्याला सलग दोन वर्षं मिळाला. त्यानंतर मानवी हक्क विषयक पुरस्कारही मिळाला. उत्पलचा जनसंपर्क दांडगा होता पण तो स्वभावाने कलहप्रिय होता. पत्रकारितेबाबतचे त्याचे उसूल पक्के होते. गोहाटीच्या राजभवनात पत्रकार परिषद होती. ईशान्य भारतातल्या एखा पत्रकाराचा दबदबा खूप होता. उत्पलला माहीती मिळाली होती की त्या पत्रकाराने राज्य सरकारकडून दारू विक्रीच्या दुकानाचा परवाना मिळवलाय. उत्पलने त्या आदेशाची प्रत मिळवली आणि त्याच्या प्रती पत्रकार परिषदेच्यावेळी सर्व वार्ताहरांना वाटल्या.

उत्पल दणकून दारू प्यायचा. बरळायचा. भांडणतंटा करायचा. त्याच्यासोबत सलगपणे चार-दोन तास काढणं कोणत्याही सहका-या अवघड जायचं. डेक्कन हेराल्डमध्ये असताना आमची भेट फक्त एकदा झाली. बंगलोरमध्ये. वार्ताहरांच्या मिटिंगला. आम्ही दोघे एकाच हॉटेलात उतरलो होतो. मध्यरात्रीच्या सुमारासही तो टिव्ही लावून बडबड करत होता असं त्याच्या रुम पार्टनरने सांगितलं. मिटिंगमध्येही तो दारूचे घुटके घेत असायचा. त्याच्या कोटाच्या खिशात चांदीची फ्लास्क असायची. त्या चपटीमध्ये कमी दारू यायची म्हणून तो पाणी न घालता कच्ची दारूच प्यायचा. आम्हाला सांगायचा की सर्दी झालीय म्हणून तो रमचे घुटके घेतोय, “ इटस् मेडिसिन.”

दुपारी त्याला मी सिग्रेटमध्ये तंबाखू घालताना बघितलं. तर म्हणाला त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे म्हणून तो थोडा गांजा पित होता. आणि पोट बिघडलं तर या माझ्या प्रश्नावर तो गंभीरपणे म्हणाला, चार तांदळाच्या दाण्याएवढी अफू रोज खाल्ली तर पोटाला उत्तम. मी म्हटलं, तू एक दवाखानाच टाक. रम, गांजा, अफू ही औषधं घेण्यासाठी रांग लागेल तुझ्या दवाखान्यापुढे. यथावकाश चरस, भांग, ताडी-माडी यांचेही औषधी गुण कळतीलच तुला.

२००० साली मी डेक्कन हेराल्ड सोडला. उत्पलची बंगलोरला बदली झाली. त्यानंतर उत्पलची गाठभेट होण्याची संधीच आली नाही. २००५ साली गोहाटीला गेलो तेव्हा उत्पलचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. डेक्कन हेराल्डमध्ये फोन केला. त्याने नोकरी सोडल्याचं कळलं. त्याच्या घरचा फोन नंबर वा पत्ताही संपादकीय विभागात मिळाला नाही. गोहाटीतल्या पत्रकारांना त्याचं नाव माहीत होतं, अनेकजण त्याचे मित्र वा सहकारी होते पण कोणाकडेही त्याचा फोन नंबर मिळाला नाही. तो कुठे राहतो हेही फारच कमी पत्रकारांना ठाऊक होतं. कुणीही त्याला भेटायला उत्सुक नव्हतं. अनेकांना तो जिवंत आहे का याबाबतही शंका होती.

या खेपेलाही असंच झालं. कोणाकडेच त्याचा पत्ता वा फोन नंबर मिळेना. शिलाँगला मानोष दास या टाईम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराची ओळख झाली. उत्पलचा ठावठिकाणा बी. बी. लोहकर सांगू शकेल असं तो म्हणाला. त्याने लोहकरला फोन केला. गोहाटीला बेदब्रत लोहकरची भेट झाली. त्याने चार-दोन फोन नंबर दिले परंतु त्यापैकी एकही उत्पलचा वा त्याच्या कुटुंबियांचा नव्हता. एका संध्याकाळी बेदब्रत म्हणाला आपण त्याच्या घरीच जाऊया. उत्पलचं घर, खारघुली टेकडीवर होतं. तिथे ब-यापैकी झांडंझुडुपं होती. कधी कधी तिथे कोल्हे, सापही निघतात, असं बेदब्रत म्हणाला. तोही ब-याच वर्षांनी उत्पलच्या घरी जात होता. अंधार झाला होता. पत्ता विचारत आमची गाडी कच्च्या रस्त्याने सरकत एका गेटपाशी थांबली. हेच उत्पलचं घर, बेदब्रत म्हणाला.
अंधार होता. तीन कुत्री आम्हा दोघांवर चाल करून आली. गेट बंद होतं म्हणून आम्ही निर्धास्त होतो. आवारापलिकडे दुमजली घर होतं. दरवाजा उघडला. लेंगा, शर्ट, स्वेटर, मफलर आणि कानटोपी चढवलेला एक माणूस बाहेर आला. तो प्रकाशात आणि आम्ही अंधारात होतो. उत्पल बोर्दोलोई आहेत का, असं आम्ही आरोळ्या देत विचारलं. बेदब्रत म्हणाला, ते उत्पलचे वडिल असावेत. तो माणूस परत आत गेला. काही क्षणात बाहेर आला. एका कुत्र्याला बांधलं. दुसरी कुत्री भुंकायची बंद झाली. मग आम्ही गेट उघडलं. घराकडे गेलो. कुत्र्यांना आवरणारा माणूसच उत्पल होता.
त्याने मला आणि बेदब्रतला ओळखलं. तात्काळ तो मिडियाबद्दल बोलू लागला, डॉ फ्रँकन्स्टाईनची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. काही वर्षांपूर्वी त्याने डुकराचं हृदय माणसाला बसवल्याचा दावा केला होता आता तो माणसाचं मुंडकं डुकराला लावतोय, असा ओचकारे काढणारा विनोद त्याने केला. त्यावेळी गोहाटीच्या वर्तमानपत्रात या डॉक्टरचं प्रकरण गाजत होतं. त्याच्या हॉस्पीटलच्या आवारात आणि इमारतीत बेपत्ता झालेल्या दोन इसमांची मुंडकी सापडली त्यामुळे गावक-यांनी हॉस्पीटलला आग लावल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. बेदब्रत ज्या वर्तमानपत्रात काम करत होता, त्यामध्ये मात्र हॉस्पीटलच्या इमारतीत मुंडकी सापडल्याच्या वृत्ताला पुष्टी दिलेली नव्हती. उत्पलचा रोख अर्थातच बेदब्रतवर होता.

बंगलोरला बदली झाल्यावर उत्पलचे वडील वारले. गोहाटी-शिलाँग मार्गावर जोराबाटच्या जवळ त्यांची शेती होती. गोहाटी शहराचा विस्तार आता त्याच परिसरात होऊ लागलाय. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी उत्पलला गोहाटीला परतणं भाग होतं. तोवर मिडिया बाजारपेठलक्ष्यी झाला होता. स्थानिक वर्तमानपत्रांचं अर्थशास्त्र बदलून गेलं होतं. उत्पल हा एकांडा शिलेदार होता. स्थानिक वर्तमानपत्राचा वा गोहाटी आवृत्तीचा संपादक म्हणून काम करायचं तर एकांडी शिलेदारी कामाला येत नाही. टीमला हाकावं लागतं. अर्थातच वर्तमानपत्रासाठी तो अनएम्लॉएबल ठरला. त्याने काही काळ लेख वगैरे लिहिले पण त्यात तो रमला नाही. स्थानिक वर्तमानपत्र पुरेसं मानधन देत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. परिणामी तो मिडीयाच्या रडारवरूनच लुप्त झाला. त्याने ट्रान्सपोर्टचा धंदा सुरु केला. त्यातल्या करप्शनने वैतागला. तो धंदा बंद केला. वारसाहक्काने मिळालेली प्रॉपर्टी डेव्हलप करायच्या मागे तो लागलाय पण त्यातही तो हैराण झालाय. कोणी लाच मागितली की त्याला भयंकर चीड येते. त्याच्यातला पत्रकार जागा होतो. माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून अनेकांना वठणीवर आणायचा उपद्व्याप त्याने सुरु केला. त्यामध्ये त्याला ब-यापैकी यशही मिळालं.
ईशान्य भारतातल्या ख्रिश्चनांचा सामाजिक इतिहास लिहिण्याचा प्रकल्प तो पूर्ण करेल का, असं मला बेदब्रतने विचारलं. ती फक्त त्याला सुचलेली कल्पना आहे. या प्रोजेक्टला फंडिंग मिळाल्याशिवाय तो काम सुरु करणार नाही. आणि फंडिंग मिळालं तरिही तो कोणत्या ना कोणत्या तक्रारी करत काम पुढे ढकलत राहील. कारण त्याला आतून तसं वाटत नाहीये. तो बहुधा चर्चच्या कामात अधिक गुंतलाय म्हणून त्याला सध्या ह्या कामात रस वाटत असावा. चर्चच्या कामामुळेच त्याची दारू सुटली असावी किंवा दारू सोडण्यासाठी त्याने चर्चच्या कामात स्वतःला गुंतवलं असावं.
बेदब्रत म्हणाला, पण त्याच्यात फारसा बदल झालेला नाही. मी म्हटलं खरं आहे, अजून निखारे धगधगतायत पण त्याने लेखणी चालवली नाही तर लवकरच त्यांची राख व्हायला लागेल.

3 comments:

  1. व्वा मस्त , छान... मोजक्या पण नेमक्या तपशीलातून व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे स्वभाववैशिष्ट्यासकट टिपल्यामुळे उत्पल बोरदोलोईचं चित्र छान उतरलंय. या पोस्टमध्ये व्यक्तिविषयी लिहिताना पाल्हाळ न लावता पत्रकारिता, ईशान्येतील सामाजिक अवकाश याचं सूत्र घट्ट असल्यामुळे त्याला एक वेगळं परिमाणही मिळालं आहे.

    ReplyDelete
  2. Khup divasani itke mast vyaktichitr vachayala milale.Maja aali. Khup hushar, saral aani vegali manas samajapasun dur jatat, he sagalikadech khare tharate.

    ReplyDelete
  3. अजून निखारे धगधगतायत पण त्याने लेखणी चालवली नाही तर लवकरच त्यांची राख व्हायला लागेल. :-).

    ReplyDelete