Wednesday 3 February 2010

महागाई

वांझेने दाविले गरवार लक्षण
चिरगुटे बांधूनी वाथयाला
तशी शब्दज्ञानी करिती चावटी
ज्ञान पोटासाठी विकोनिया
----तुकाराम

मोठा आणि गुंतागुंतीचा विषय सपक किंवा अनाकलनीय करून मांडण्याची हातोटी मराठी माध्यमांनी आत्मसात केली आहे. रमेश पाध्ये सोडला तर कुणीही मराठी लेखक महागाईचा गांभीर्याने पाठलाग करताना दिसत नाही. मराठीच नव्हे तर इंग्रजी वा हिंदी भाषेतले, टिव्हीवर वटवट करणारे पत्रकार पोटाशी चिरगुटे बांधून आपल्याला ज्ञानाचा गर्भ राह्यला आहे अशी बतावणी करत असतात.

औद्योगिक राष्ट्रांमध्ये (प्रगत वा पाश्चात्य) वस्तू वा जिन्नसांच्या पुरवठ्याप्रमाणे किंमती वर-खाली होत असतात. कारण जिन्नसांच्या किंमती वाढल्या तर विक्री कमी होते साहजिकच नफाही कमी होतो. जिन्नसांच्या मागणीपेक्षा वस्तूचा पुरवठा कमी असेल तर महागाई होणारच, हे सूत्र म्हणूनच पाश्चात्त्य वा प्रगत औद्योगिक देशांमधून आलं आहे. जिन्नसांचा पुरवठा वाढवला की महागाई नियंत्रणात येते. हे सूत्र आपल्या देशात पूर्णपणे लागू होत नाही. महागाईचा संबंध आपल्या देशात सरकारशी असतो कारण शेती उत्पादन आणि शेतमालाची साठवण, वितरण आणि मार्केटिंग यावर सरकारचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण असतं.
गहू आणि तांदूळ या धान्यांची खरेदी सरकारतर्फे किमान हमी भावाला करण्यात येते. हा प्रचंड धान्यसाठा सरकारी गोदामांमध्येच असतो. साखरही लेव्हीच्या दराने कारखान्यांकडून घेतली जाते आणि खुल्या बाजारात कारखान्यांनी साखर विक्री करण्यावरही सरकारचं नियंत्रण असतं. कोणती धान्यं किमान हमी भावाला शेतकर्‍यांकडून खरेदी करायची आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत कोणत्या दराला वितरीत करायची, हे निर्णय सरकार घेतं. सरकारने घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही सरकारी यंत्रणेने करायची असते. निर्णय घेणारे आणि त्यांची कार्यवाही करणरे यांचे हितसंबंध आणि कारभारातला पारदर्शीपणा यावर महागाईचं प्रमाण आणि तीव्रता अवलंबून असते.

अन्नधान्यांची किमान हमी भावात खरेदी करणं आणि त्याची साठवणूक करणं हे केंद्र सरकारचं काम आहे. केंद्राकडून अन्नधान्याचा साठा उचलणं आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राज्यात त्याचं वितरण रास्त दरात करणं, हे राज्य सरकारचं काम आहे. गेल्या वर्षीचा गहू आणि तांदळाचा साठा केंद्राच्या गोदामात पडून आहे. मार्च-एप्रिल महिन्यात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून गव्हाचं विक्रमी पिक अपेक्षित आहे. सरकारी गोदाम गेल्यावर्षीच्या अन्नधान्याने भरलेली असल्याने नव पिक साठवायला जागा नाही अशी आजची स्थिती आहे. याचा अर्थ राज्यांनी गहू आणि तांदूळाचा साठा उचललेला नाही. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार गहू ( रु. १०.८०) व तांदूळ (रु.१५.३७) दराने राज्य सरकारांना उपलब्ध करून देत आहे. परंतु राज्यांनीच हा साठा उचलेला नाही. यासंबंधातली आकडेवारी ना केंद्र सरकारने जाहीर केली ना राज्य सरकारांनी दिली आहे. आपण धान्यसाठा का उचलला नाही याची कारणंही एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्याने दिलेली नाहीत. आपल्या देशात जवळपास सर्व पक्षांचे मुख्यमंत्री आहेत. पण कोणीही ही माहिती देत नाही. पत्रकारांनीही ही माहिती न देताच महागाईच्या राजकारणाच्या बातम्या आणि वृत्तांत लिहायला सुरुवात केली.

5 comments:

  1. आपला रोख नेमका कुणावर आहे? प्रताप आसबेंवर का?

    ReplyDelete
  2. Simple, crispy and precise. you should elaborate on different dimensions of food price inflation in the same style......

    ReplyDelete
  3. पोटाशी चिरगुटे बांधून आपल्याला ज्ञानाचा गर्भ राह्यला आहे अशी बतावणी करत असतात…. हे निरीक्षण मार्मिक आहे. मराठी पत्रकारितेत केवळ महागाईसारख्या विषयाचाच नव्हे तर एकंदर सगळ्याच महत्त्वाच्या विषयाचा विचका का होतो आहे, हे त्यातून कळतं. एखाद्या विषयाचा नीट अभ्यास करून, त्याचे सगळे पैलू मांडण्याची, एक अजेंडा सेट करून (विधायक अर्थाने) त्याप्रमाणे तो विषय चालविण्याची जबाबदारी टाळून अपु-या माहितीवर आधारित शेंडा ना बुडखा असणा-या बातम्या देण्याचं प्रमाण खूपच आहे. एखाद्या विषयाचं रिपोर्टिंग करणं हे आपलं काम आहे ते विसरून तुटपुंज्या माहितीलाच अभ्यास मानण्याची गैरसमजूत करून घेऊन भाष्य, शेरेबाजी करण्याकडे ब-याच बातमीदारांचा कल असतो. त्यात फॅक्टस मांडण्याला सगळ्या कमी महत्त्व दिलं जातं किंवा सरळ दुर्लक्ष केलं जातं. सोर्सेसची समृध्दी नसल्यामुळे बहुतांश वेळा एकाच व्यक्तिशी बोलून आख्खी बातमी त्यावर बेतली जाते आणि शिवाय फोडणी देण्यासाठी मसालेदार तपशील-संबंध असो नसो-त्यात घुसडले जातात. काही जण अभ्यासूपणाचा दाखला देण्यासाठी आकडेवारीच्या जंजाळात बातमी अडकवून टाकतात, त्यात कॉन्टेक्स्ट किंवा फोकसचा अभाव असल्याने बातमीत नेमकं काय म्हणायचंय ते ही ब-याचदा कळत नाही. लोकसत्तानं पवारांना ठोकायचं एवढाच अजेन्डा ठेवलेला दिसतोय, त्यामुळे कालच्या अंकात डाळींची आय़ात करण्यासंदर्भात जी बातमी दिलीय त्यात सगळ्याच गोष्टींचा विपर्यास करण्याचा चंग बांधलेला दिसतोय, वरून शेतक-यांचा असूड हा शब्द वापरण्याची हौस असल्याने महात्मा फुल्यांना पण वेठीला धरलंय.
    एकूणच मराठी पत्रकारितेच्या दृष्टीने कन्टेन्ट, फॅक्टस, अचूक माहिती, कॉन्टेक्स्ट या मूल्यांचं नेमकं काय स्थान आहे, यावर तुम्ही लिहिलंत तर तरूण पत्रकारांना एक इनसाईट नक्कीच मिळेल त्यातून.

    ReplyDelete
  4. रोज सकाळी १० वाजता मार्केट सुरु होण्याआधी सर्व बिसिनेस न्यूज चनेल वर जे शहाणे लोक बोलत असतात ते खरोखरच ज्ञानाचा गर्भ राहिल्यासारखे बोलतात. आपल्याकडे सर्वच विषयांवर चटपटीत बोलणाऱ्या लोकांनी ज्ञानासाठी थोडेफार तरी संशोधन पाहिजे हा मुलभूत नियमच तोडला आहे. विविध विषयातले ४ लोक जमा करून तुकडे गोळा करण्यात सर्वच न्यूज वाहिन्या धन्यता मानतात.रमेश म्हणाल्या प्रमाणे सगळ्यांना शेरेबाजीत विलक्षण रस आहे!

    महागाई वरून इतके वादळ सगळे उठवत आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारात यायला सुरुवात झाली आहे. चना २८००-२९०० वरून २०००-२१०० पर्यंत घसरलाय. तूर ६००० पर्यंत गेलेली, आज ३५००-४००० रुपये आहे. काल कर्नाटकातील एका तूर उत्पादक संघटनेने शेतकर्यांना जून जुलै पर्यंत थांबण्यास सांगितले.

    Reuters ने कालच २०१० साठीचा Commodity Poll प्रसिद्ध केला. त्यात सर्वच प्रमुख धान्य पिके, सोय आणि पाम हि तेल पिके यांचे २०१० मध्ये भाव २ ते १३ टक्के कमी राहण्याचे संकेत दिलेत. साखर मात्र आता पर्यंतचे किमतीचे सर्व आकडे मोडून वर जाईल, आणि वर्षाच्या शेवटी भाव थोडे उतरतील असे सांगितले आहे. बघुयात काय होतेय.

    ReplyDelete
  5. विश्लेषण उपयुक्त. वरच्या दोन्ही टिपण्यांशी सहमत.

    ReplyDelete