Monday, 12 April 2010

उत्सुकतेने मी झोपलो........

कथा नाही. कथानक नाही. पात्रं आहेत पण कचकडी. समाज आहे, समाजरचना आहे, पण वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर दिसणार्‍या बातम्यांसारखी. निबंध नाही पण विचार आहे. विचार प्रक्षोभक वाक्यं आहेत. “उत्सुकतेने मी झोपलो”, ही श्याम मनोहरांची कादंबरी अशी आहे.
“कळ” ही श्याम मनोहरांची कादंबरी, कादंबरीच नाही असं भालचंद्र नेमाडे म्हणाले होते. अनेक कथांची गोधडी आहे, असं आणखी कुणीतरी म्हटलं होतं. “कळ” त्यानंतर “खूप लोक आहेत”, त्यानंतर “उत्सुकतेने मी झोपलो”. आता “खेकसत म्हणायचं आय लव्ह यू” (ही कादंबरी मी वाचलेली नाही). कळमध्ये कथा आहेत पण कथानकाचा लोप होत जातो. पात्रं कचकड्याची होत जातात. समाजरचना वा समाज वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर दिसणार्‍या बातम्यांसारखा येतो. विचार प्रक्षोभक वाक्यं जवळपास प्रत्येक परिच्छेदात भेटतात.
ग्रेट म्हणजे काय, ग्रेट कलाकृती घडवण्याची भीती मराठी माणसाला का वाटते, ज्ञान म्हणजे काय, जीवनाचं रहस्य काय, ते कसं कळतं, विज्ञान कोणतं सत्य उकलतं, सत्य जाणून घेण्यासाठी काय करायचं असतं, असे अनेक प्रश्न लेखकाने “कळ” या कादंबरीपासून थेटपणे उपस्थित करायला सुरुवात केली. गोष्ट म्हणजे काय, मराठी समाजात गोष्ट का नाही, असे प्रश्न उपस्थित केले. “उत्सुकतेने मी झोपलो” मध्ये गोष्ट, कथा, कथानक सिनेमाच्या सेटसारखे येतात. लेखकाला जे म्हणायचं ते निबंधात सांगता येणार नाही म्हणून पात्रं येतात. खूप पात्रं असूनही गर्दी नाही कारण पात्रं पपेट शो मधल्या बाहुल्यांसारखी आहेत.
फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील थोर कादंबरीकार समजला जातो. त्याने एकही कादंबरी पूर्ण लिहिलेली नाही. आपली हस्तलिखितं जाळून टाकावीत अशी सूचना त्याने त्याच्या मित्राला केली होती. त्या मित्रानेच कादंबरीची प्रकरणं जुळवली. कारण प्रकरणांचा अनुक्रमही काफ्काने दिलेला नव्हता. काफ्काच्या या कादंबर्‍या नंतर थोर कलाकृती ठरल्या. तोवर अशी कादंबरी युरोपला ठाऊकच नव्हती. एकही कादंबरी पूर्ण न लिहिणारा लेखक थोर कादंबरीकार ठरला. सकस आणि यशस्वी कथा, कादंबर्‍या, नाटकं लिहिल्यानंतर श्याम मनोहर पूर्णपणे वेगळ्या कादंबरी लेखनाकडे वळलेले आहेत. त्यामुळेच सध्याच्या त्यांच्या कादंबर्‍या कथात्म लिखाण आहे की नाही याचा निवाडा करण्याची घाई कशाला.
लेखकानेच निर्माण केलेलं कथानक, पात्रं यांच्याशी लेखकाचा जो व्यवहार होतो त्यातून कथात्म लिखाण आकारतं असं साधारणपणे मानलं जातं. त्यातून निर्माण होणार्‍या कलाकृतीशी वाचकचा संबंध निर्माण होतो. वाचक त्या कलाकृतीशी स्वतःचं नातं जोडतो. लेखक, कथानक, पात्रं ही अर्थातच भाषेच्या माध्यमातून वाचकाशी बोलतात. या खेळात वाचकालाही सामील करून घेणं त्याला केवळ प्रेक्षक न ठेवणं, जेणेकरून कलाकृती इंटरअ‍ॅक्टिव करणं (पारंपारिक कथात्म लिखाणातली इंटरअ‍ॅक्टिविटी थेट नसते. ती वाचकाच्या आकलनावर सोपवलेली असते. ती वाचकसापेक्ष असते. “कळ” पासूनच्या श्याम मनोहरांच्या लिखाणातली इंटरअ‍ॅक्टिविटी लेखकसापेक्ष आहे. आकलनाच्या कोणत्याही पातळीवर निवेदक वाचकाशी संवाद साधू पहातोय.) हा प्रयत्न फार कमी लेखक जाणतेपणी करताना दिसतात. सतीश तांबे हे या कोटीत बसणारं कथा लेखन करतात.
कथात्म लिखाण करण्याची श्याम मनोहरांची प्रेरणा वाचकाचं मनोरंजन करणं ही नाही, मनोरंजनातून प्रबोधन करणं ही नाही, वास्तवाचं डॉक्युमेंटेशन करणं ही नाही, हितोपदेश करणं ही नाही, भाषेचे, शैलीचे, घाटाचे प्रयोग करणं ही नाही, समाजात क्रांती घडावी, समाजात बदल घडावेत ही नाही. जीवनाचा शोध घेणं, जीवन रहस्याचा उलगडा करणं, त्या प्रयत्नात वाचकाला सामील करून घेणं यासाठी श्याम मनोहर कथात्म लिखाण करतात.
शिल्पकला, चित्रकला, संगीत, काव्य, लेखन अशा कोणत्याही कलेपेक्षा जीवन जगण्याची कला सर्वश्रेष्ठ आहे, असं कृष्णमूर्ती म्हणायचे. कळ पासून सुरु झालेल्या श्याम मनोहरांच्या कादंबर्‍या या प्रश्नाच्याच जवळ जाणार्‍या आहेत. श्याम मनोहरांच्या साहित्याचा जे. कृष्णमूर्तींशी असलेला संबंध हरिश्चंद्र थोरात या समीक्षकाने एका निबंधात उलगडून दाखवला आहेच.
श्याम मनोहरांनी “धस स्पेक झरुत्रुष्ट” या फ्रेडरिख नित्शे यांच्या ग्रंथाचा अनुवाद केल्याचं सांगितलं जातं. (तो अनुवाद कुठे गेला कुणास ठाऊक.) “धस स्पेक झरुत्रुष्ट” हा काही झरुत्रुष्टाच्या उद्धरणांचा वा त्या उद्धराणांच्या अर्थनाचा ग्रंथ नाही. ते झरूत्रुष्टाचं चरित्रही नाही. नित्शेने त्याचं तत्वज्ञान झरुत्रुष्टाच्या गोष्टीतून मांडलंय.
जे. कृष्णमूर्ती, फ्रेडरिख नित्शे ही नावं चोखंदळ मराठी वाचकांना अपरिचित नाहीत. समीक्षकांना तर नाहीतच नाहीत. श्याम मनोहरांनी त्यांचं आशयद्रव्य या लेखकांकडून घेतललं नाही. परंतु या दोन लेखकांनी आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मांडणीची नवी वाट, नवा घाट, नवी भाषा आणली. मराठी साहित्यात विशेषतः कथात्म साहित्यात श्याम मनोहरांनी हाच प्रयोग केलेला आहे. असा प्रयोग करायला कमालीचा आत्मविश्वास, प्रखर बुद्धिमत्ता आणि धाडसं लागतं. कितीही कादंबर्‍या लिहून झाल्यावर पुरून उरेल एवढा या तीन गुणांचा खजिना श्याम मनोहर यांच्याकडे आहे.

3 comments:

 1. श्यामच्या साहित्यातील तत्वज्ञान/ तात्विक अंग ह्यावर खरं तर तू एक giant लेख लिहायला हवास. कारण श्यामची लक्षवेधकता त्याच्या तात्विक बाजातच आहे. त्यामुळे तिचा उहापोह /उकल /भांडाफोड जे काही असेल ते होणे गरजेचे आहे. श्याम हा इतिहासात टिकून राहणारा लेखक आहे त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या अंगाने लिहिलं जाणे अत्यंत महत्वाचे आहे.

  सतीश

  ReplyDelete
 2. मनोहर आशय सूत्राला धरून लिहितात. पात्रांपेक्षा ते सूत्र महत्वाचे ठरते. त्या विचारप्रक्रियेत माणसे त्यांच्या इच्छांच्या भूतकाळाबरोबर नांदतात. त्यांच्या तृष्णा यांची मुळे कुठून उगवून आली तिथे मनोहर निर्देश करतात. प्रेरणा कितीही आदिम/ वैश्विक असतील तरी त्यांचे संस्कृतीसापेक्ष प्रकटीकरण ( मराठी माणूस असा का? भारतीय समाज असा का?) , यांना छिलत त्यातल्या माणूस असण्याचा अर्थ तपासत जाणे ही शैली फार सुंदर. 'उत्सुकतेने...' मधील बारसं , किंवा शेवटच्या तुकड्यातलं म्हातारपण. ( या क्षणाला प्रत हातात नाही. परंतु अशा कितीतरी जाणवलेल्या गोष्टी तुमच्या ब्लॉग मुळे आठवल्या. )
  कृष्णमूर्तींचा प्रभाव उलगडतो. परंतु नित्शे त्यांनी भाषांतरित केलाय हे मला ठाऊक नव्हतं. तुम्ही मांडलेली 'interactivity' ही संकल्पना महत्त्वाची ! मनोहरांना त्या हाडामासाच्या पात्रापेक्षा बहुधा हाडामासाचा माणूस त्यांच्या संहितेला कसा 'react' होतो हे provoke करायला आवडतं. ---dnyanada

  ReplyDelete
 3. तुमची निरीक्षणे योग्य आहेत. फक्त अशा लेखकाने स्वत:ला पुनरुक्त करणे अधिकच वाइट असे मला वाटते. 'कळ' पासून 'उत्सुकतेने… ' पर्यंत मी फार खुश होतो… असो.
  - Sanjay Joshi

  ReplyDelete