Thursday, 26 August 2010

हिंदूः नेमाडे, साने आणि बाकीचे मुद्दे ...

श्यामची आई हे पुस्तक कादंबरी आहे. किंबहुना श्यामची आई, धडपडणारा श्याम ही कादंबर्‍यांची मालिका आहे. साने गुरुजींचं साहित्यिक मूल्य नेमाडे यांच्या आधी कोणीही जोखलेलं नव्हतं. श्याम या पात्राबाबत साने गुरुजींनी जे लिखाण केलं आहे त्यामध्ये कल्पिताचा भाग फारच कमी आहे. जवळपास नाहीच. श्याम म्हणजे स्वतः साने गुरुजी, त्यांची आई, वडील, आजी, भाऊ, मित्र सर्व आपल्या नावानिशी, स्थळ-काळानिशी या कलाकृतीत अवतरतात. साने गुरुजींचं हे लिखाण आत्मचरित्र वा आत्मकथन नाही. श्यामची आई असो वा धडपडणारा श्याम, धडपणारी मुले यापैकी कोणत्याही लिखाणाला कथावस्तू वा प्लॉट नाही. मात्र या लिखाणातील सर्व घटना, प्रसंग, पात्र मानवता या सूत्राला घट्ट बिलगून असतात. साने गुरुजींचं जगणंच मानवतेने व्यापलेलं असल्याने ते सरळ, साध्या, सोप्या, ओघवत्या शब्दांत मांडल्यानेच त्यांची ही पुस्तकं थोर साहित्यिक कृती ठरल्या.

जीवन मांडणं हीच कला, असा संदेश नेमाडेंनी यातून घेतला की काय, असा प्रश्न पडतो. कोसला वगळता नेमाडेंच्या सर्व कादंबर्‍य़ांमध्ये प्लॉट नाही. मेघनाद कुलकर्णी फोनवर गप्पा मारताना म्हणाला, नेमाडे हे देशीवादी नाहीत की वास्तववादी नाहीत ते डायरीवादी आहेत. नेमाडेंच्या कादंबर्‍यांमध्ये (कोसला वगळता) प्लॉट नाही, पात्रं नाही याकडेच मेघनादचा रोख असावा. नेमाडेंच्या या कादंबर्‍या (हिंदू सहित) वैचारिक भूमिका, मांडण्यासाठी लिहिल्या आहेत. या कादंबर्‍यांमधील वैचारिक चर्चा हाच आकर्षणाचा बिंदू असतो. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेला बहुजन समाजातील तरूण हा नेमाडेंचा वाचक असतो. याच वाचकाला उद्देशून नेमाडे कादंबरी लिहितात. ग्रामीण भागातील या तरूणाची नाळ शहराशी जुळत नाही. शहर त्याला परकं वाटतं पण गावाकडे परत फिरणं त्याला जमत नसतं. या सामाजिक वास्तवातून तो एका चमत्कारीक नैतिक संघर्षात अडकतो. त्याला शहरी मूल्य पटत नसतात आणि त्याची जडण-घडण करणारी गावातली मूल्यंही गावातच ढासळू लागली असतात. या वाचकवर्गाला नेमाडे अभिमान देऊ पाहतात, अस्मिता देऊ पाहतात, म्हणूनच नेमाडपंथ तयार होतो. त्यांचे अनुयायी तयार होतात. म्हणजेच नेमाडे विश्वाला वा त्यांच्या भाषेतला चपखल शब्द निवडायचा तर आदी वाचकाला संबोधित करणारे आदी लेखक ठरत नाहीत. वैश्विकतेला ते धर्म, जात, प्रदेश यामध्ये विखंडीत करतात. जीवन मांडणं हीच श्रेष्ठ कला ही भूमिका कोणाला पटेल वा कोणाला पटणार नाही. त्या मुद्दयावर कुणाशी पंगा घेण्याचं काही कारणच नाही. मुद्दा अस्मितावादाचा आहे.

हिंदू ही कादंबरी आहे की खंडेरावाचं चरित्र ? कादंबरी असो वा चरित्र, एकही पात्रं भक्कमपणे उभं रहात नाही. अगदी खंडेरावही आभासी आहे. कथावस्तू वा प्लॉट नाही, पात्रं नाहीत. मात्र अनेक माणसांच्या गोष्टी त्यात आहेत. सूक्ष्म निरिक्षणं, भाषेची अतिसूक्ष्म जाण, अतिशय प्रभावी वर्णनं, अनेक विषयांवर चर्चा यांनी ही कादंबरी खच्चून भरली आहे. ही चर्चा करताना नेमाडे यांनी काही वादांना खंबीरपणे निमंत्रण दिलं आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी मराठवाड्यात स्थायिक झालेल्या विदर्भातील दलित नेत्यांनी केली आणि तिला मराठवाड्याबाहेरच्या उच्चवर्गीय समाजवाद्यांनी पाठिंबा दिला, असं नेमाडे यांनी या कादंबरीत म्हटलं आहे. नामांतराचा विषय अनेक साहि्त्य संमेलनात आला. नामांतर होईपर्यंत अनेक संमेलनांनी या संदर्भात ठराव केले. मात्र दलित साहित्य असो वा अन्य मराठी लेखकांच्या कलाकृती असोत, नामांतराचा विषय मराठी कथा-कादंबरीमध्ये अपवादानेच आला. देशातली पाणी टंचाई अर्थात अपुरा पावसाळा हे अस्पृश्यतेचं मूळ होतं, याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलं आहे. बौद्ध धर्म हा शहरीच होता, गौतम बुद्धाने ज्यांच्याकडून अनेक विषयांची माहिती वा ज्ञान करून घेतलं त्यांच्याबद्दल इतिहासात फारच कमी माहिती मिळते, याकडेही नेमाडे यांनी लक्ष वेधलं आहे. ब्राह्मण आणि पूर्वाश्रमीचे महार हिंदू या व्यापक अस्मितेशी फटकूनच राहतील याकडे नेमाडे यांनी हिंदू मध्ये निर्देश केला आहे. मराठे पेंढारी होते. शिंदे-होळकरांनी या पेंढार्‍यांना हाताशी धरून लुटमारीचं सत्र सुरु केलं, मराठेशाहीच्या या अवनत काळाची दखल मराठी साहित्याने घेतलेली नाही.

कादंबरीत कुणबी वा कष्टकरी जीवनाचं उदात्तीकरण आहे. जीवनातले अनेक विरोधाभास अधोरेखित करण्यात आले आहेत, उदा. कष्ट करणार्‍याला कधीही संपत्ती वा प्रतिष्ठा मिळत नाही, त्यामुळे शोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक होऊच शकत नाही मात्र त्याबद्दल एक अपराधी भावना सतत तेवती राहते. पुरुषस्थानी व्यवस्था आणि स्त्रियांचं शोषण हा न सुटणारा विरोधाभास आहे. स्त्रियांची उंची पुरुषांपेक्षा कमी असते, या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आलंय.

वाचनीयता आहेच. पण अनेक पानं वगळली तरी कादंबरीच्या आकलनात फरक पडणार नाही. आत्ताच आलेल्या एका एसएमएसने हिंदूवरील पोस्टच्या मालिकेची अखेर चपखलपणे होते.....
मोरगावच्या खंडू मोराने
फुलवलेला आठवणींचा पिसारा,
धरून ठेवणार्‍य़ा घटकाच्या अभावी
ठरला फक्त पसारा...

10 comments:

 1. हो? असंच का शेवटी? मी आत्ता कुठे साठेक पानं पचवलीयेत.
  --मेधा

  ReplyDelete
 2. Jyanna Nemadencha sara pravaas mahit ahe te Hindu waachtilach kashala?
  Vijay Diwan

  ReplyDelete
 3. I kept debating with your blog as read it.

  In my first reading I found Hindu- very didactic. It almost posed with an attitude- ‘ Let me show you how to understand the archeology of identity formation’. I was worked up in my first reading. But in the second reading I liked it better. I loved the intense parts where Khanderao mourns for the loss of the relational world. I loved his thick descriptions and noticed his arrogance and positional warfare against the Westernized liberalism.

  However, the first chapter is an evidence of master-craftsmanship. Nemade never appeals to me when he writes about sex and money. He is pretty dismissive about both these zones of human life. But I get hooked on to his creative descriptions of the past and the family! Hindu’s glitch is the absence of new/radical cultural insight. By the time it has arrived, all that Khanderao is excavating about the South Asian past is already an open secret! Ayesha Jalal-s of the world have done their job pretty well.

  Thanks,
  Dnyanada

  ReplyDelete
 4. sunil

  nemaaDe aaNi reNu yaanchii tulanaa naahii.

  ashok shahane

  ReplyDelete
 5. As I said earlier we had high expectations from Nemade. In first 222 pages I could not get any link. Pustak khilavun thevat nahi ani mhanunach pratyekjan savdi pramane vachtoy.

  Ajay Walimbe

  ReplyDelete
 6. प्रिय सुनील,
  मेधाने पाठवलेल्या लिंकमुळे तुझा ब्लॉग वाचनात आला. मग मी सारी कामं बाजूला ठेऊन तुझं लेखन वाचत गेलो. वाचत गेलो आणि वाचतच गेलो. मी बरेच लेख वाचून काढले. तू वाचतोस खूप, पाहतोस खूप आणि ते सारं तुझ्या विचारांसकट सोप्या आणि वाचनीय शैलीत लिहितोस. अनेक नवनव्या गोष्टींकडा लक्ष वेधतोस. मला त्यामुळे तुझं हेवा वाटला. हे सारं अगोदर वाचनात का आलं नाही, असंही वाटलं. आपल्याकडल्या कोणत्याही नियतकालिकाला यातला काही reprint करावं असं का वाटला नाही, असं खेदही जाता जाता वाटून गेला. 'हिंदू' दुसऱ्यांदा वाचतो आहे. काही वाचक फार सहजी ती निकालात काढतात. त्यात नेमाडे यांचे काही जुने हिशोबही नकळतपणे चुकते करण्याचा भाग असतो. काही नेमाड-पंथी ती डोक्यावर घेऊन नाचायचेच काय ते बाकी असतात. तुझं लेखन balanced आहे. विचार करायला लावणारं आहे.
  यानिमित्ताने तू बऱ्याच वर्षांनी भेटलास याचं आनंद झाला.
  - मुकुंद टाकसाळे

  ReplyDelete
 7. हजारो वर्षांची आपली कृषीसंस्कृती सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये परावर्तित होत असतानाचा शिफ्ट पकडण्याचा प्रयत्न नेमाड्यांनी केला आहे, असं मला वाटतं.

  ReplyDelete
 8. ज्ञानदा देशपांडेने मोहेंजोदडो ते मोरगाव ही पोस्ट तिच्या ब्लॉगवर-- बृहत्कथा, लिहिलीय.

  http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/09/blog-post_03.html

  त्यावरची माझी कॉमेंट खालीलप्रमाणे......

  राजा नागडा आहे, हे कोणीतरी सांगायला हवं होतंच. हे सांगण्यासाठी आता वर्तमानपत्रं, मासिकं, संपादक, प्रकाशक यांची गरज नाही. ब्लॉग हे माध्यम त्यासाठी चांगलं आहे. झाडाझडतीसाठी हेच माध्यम उत्तम आहे. पुस्तकांपेक्षा ब्लॉग हेच आता प्रबोधनाचे वाहक होणार आहेत.

  शेती जेव्हा पोटापुरती केली जात होती तेव्हा शेतकरी कुटुंब हे एक उत्पादक युनिट होतं. गावगाडा त्यावरच आधारलेला होता. अर्थातच त्यानुसार त्या कुटुंबाची मूल्य रचना आकाराला आली. या उत्पादक युनिटमध्ये मुक्त स्त्रीला मुक्त व्हायचं तर तिरोनी आत्यासारखा संन्यासच घ्यायला हवा किंवा लभान्या स्त्रियांसारखं गावाचं चारित्र्य सांभाळण्याचा व्यवसाय करायला हवा. शेतकरी कुटुंबातल्या स्त्रियांची पुढची पिढी म्हणूनच शहराकडचा नवरा हवा असं म्हणायला लागली. शहरामध्ये कुटुंब उत्पादक नसतात तर ग्राहक असतात. उत्पादक कुटुंबातून ग्राहक कुटुंबात प्रवेश झाल्यानेच स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या. बाजारपेठेसाठी शेती सुरु झाली की शेतकरी कुटुंबाचं म्हणजे उत्पादक कुटुंबाचं रुपातंर ग्राहक कुटुंबात होतं. गावगाडाही त्यानुसार बदलतो. खंडेरावाच्या घरात काम करणारा सालदार म्हणूनच तमाशा उभा करू शकतो. उत्पादक कुटुंबातल्या बायडी, तायडी या बहिणी ग्राहक कुटुंबात प्रवेश झाल्यावर वेगळ्या वागायला लागतात. म्हणून तर खंडेरावाला त्यांचा आणि त्यांच्या नवरोबांचा राग येतो. गावाकडच्या उत्पादक कुटुंबाची मूल्य हीच समृद्ध करणारी अडगळ. या अडगळीलाच तू बारीकीचं काम म्हणत असावीस. पण आपल्या समाजातील दांभिकपणाची मूळं या अडगळीतच आहेत.

  गावगाडामध्ये त्रिंबक नारायण अत्रे यांनी म्हणूनच ठेवलंय की बलुतेदारांना कामाचा मोबदला रोखीने दिला तरच कुणब्यांचं भलं होईल. विसाव्या शतकातले म्हणजे विसाव्या शतकातल्या उत्तरार्धातले कुणबी नगदी पिकं घेऊन, ग्राहक बनूनही कारूनारूंनी म्हणजेच बलुतेदारांनी बलुत्यावरच काम करावं असा आग्रह धरणारेच होते (वा आहेत). या संबंधांत अनिल अवचटांनी तपशीलात जाऊन लिहिलं आहे. असो. हे विषयांतर झालं.

  सुनील तांबे

  ReplyDelete
 9. Sharankumar Limbale said...

  thank you for your posts. i read it. ashi charhya aavashyakch aahe. hich khari lok sanskruti.

  ReplyDelete
 10. while reading nemade's novel i was struck by an ahirani saying which meant weigh it perfectly and included the word tuka for weighing. tooka also means weight or weighing in kannada.that makes me wonder whether Tukaram was a psydonym as Tukaram was vatandar for weights and measures according to reserchers and not a sho...pkeeper. I also found some other kannada words in nemade's novel.--gopal chippalkatti

  ReplyDelete