Monday, 27 September 2010

कांद्याची चाळ

कांदे चाळायचे म्हणजे काढणी झाली की साफ करायचे. चाळलेले कांदे ठेवायचे कुठे, तर चाळीत. लाकडाच्या चौकटीला चारही बाजूंनी लाकडाचे कठडे ठोकायचे. सर्व चौकटींना लाकडाच्या वा बांबूच्या पट्ट्या. त्या चौकटीवर आणखी दोन-तीन मजले चढवायचे आणि चाळलेले कांदे त्यात साठवायचे. चाळीला छप्पर असायचं गवताचं. गवत कोकणातून यायचं. पुढे उसाचं पाचट आलं. त्यानंतर कौलं आली. आणि आता पत्रे.


मुंबईत चाकरमानी यायला लागल्यावर मास हौसिंगचं स्ट्रक्चर म्हणून चाळ आली. सागवानी लाकडाचे खांब, सागाच्याच तुळया. विटांच्या जाड भिंती. लाकडाचे जिने. लाकडाचा कठडा. लाकडाचे गज. एका बाजूने चाळ उघडी. त्या बाजूला लांबलचक व्हरांडा. म्हणजे कॉमन बाल्कनी. तिचे कठडे लाकडाचेच. त्याला गजही लाकडीच. एका मागे एक दोन खोल्या. मागच्या खोलीत स्वैपाक करायचा ओटा. तो आत्तासारखा कमरेएवढा उंच नव्हता. कारण बसून स्वैपाक करायची गावाकडची पद्धतच त्या काळात मुंबईत होती. लाकडाच्या किंवा कोळशाच्या शेगडीवर स्वैपाक करायचा. जेवायचं जमिनीवर बसून. पांढरपेशे पाटावर बसायचे. ओट्याच्या बाजूला न्हाणी म्हणजे मोरी. इमारतीच्या एका टोकाला संडास आणि नळ. ह्या नळाचं कनेक्शन मग खोल्यांमध्ये देण्यात आलं. घरात नळ असलेल्या खोलीचा भाव वधारला. नाशिक जिल्ह्यातली कांद्याची चाळ मुंबईत आल्यावर ‘बटाट्याची चाळ’ म्हणून विख्यात झाली. (ही बटाट्याची चाळ कांदेवाडीत होती.)

कलकत्ता राजधानी होती तेव्हा भारताची. मॅन्शन कलकत्त्याकडून आली. गोरे, अँग्लो इंडियन, पारशी, परदेशी ज्यू, मिलिटरी ऑफिसर्स, नोकरशहा मॅन्शन वा बिल्डिंगांमध्ये राह्यचे. त्यांची घरं ऐसपैस. पाश्चात्य धर्तीची. तिथे किचन, डायनिंग, हॉल, बेडरूम अशा सोयी. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र संडास आणि न्हाणीघर. मोलकरणींना, नोकरांना येण्याजाण्यासाठी गोल लोखंडी जिना. ‘आहे रे’ वर्गाची घरं अशी होती.

चाळी कामकर्‍यांसाठी, कामगारांसाठी, कारकुनांसाठी होत्या. चाळीत जसे कांदे भरतात तशीच माणसं चाळीत भरलेली असायची. बाप्येच राह्यचे. बायका-मुलं गावाकडे. बायका-मुलांना घेऊन चाळीत राह्यला सुरुवात केली पांढरपेशांनी. चाळीत हवा जरा तरी खेळायची. कामाठीपुर्‍यातल्या चाळी कोंडवाड्यासारख्या. हा ‘नाही रे’ वर्ग होता.

चाळ हेच मुंबईच्या घरबांधणीचं वा मास हौसिंगचं सूत्र प्रदीर्घ काळपर्यंत राह्यलं. चाळीचीच रचना घर म्हणून जनात आणि मनात होती. विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली इथे परांजप्यांनी चाळीच बांधल्या, पण विटांच्या आणि ऐसपैस. मधल्या चौकात केवळ कब्बडी नाही तर व्हॉली बॉल आणि बॅडमिंग्टनही खेळता येईल अशी ऐसपैस जागा. लांबरुंद व्हरांडा. चाळीच्या चारही बाजूंना भरपूर जागा सोडून कुंपण. म्हणजे तळमजल्यावरच्या लोकांना किचन गार्डनची सोय. सत्तरच्या दशकात मुंबईतले मध्यमवर्गीय ब्लॉक्समध्ये राह्यला जाऊ लागले. स्वतःच्या मालकीचे ब्लॉक्स आले. संडास, बाथरूम, शॉवर, बेसिन, सिंक यांचा प्रवेश मध्यमवर्गीयांच्या जीवनात झाला. पण जीवनाचा ढाचा चाळीतलाच राह्यला. ब्लॉक्सना लिफ्ट नव्हती. निम्म्याहून अधिक ब्लॉक्स वन रुम किचनचेच होते. कुटुंबाचा खाजगीपणा जपण्यासाठी ब्लॉक आले नाहीत तर जागा म्हणजे स्पेसची बचत करण्यासाठी आले. मुंबईच्या हौसिंगवर वा घराच्या रचनेवर कामकरी जीवनाचाच प्रभाव होता. घर फक्त जेवायला आणि झोपायला होतं. कुटुंबाचा विचारच नव्हता. लोक घरात जायचे ते केवळ जेवायला आणि झोपायला. चाळीत राहणारे हजारो लोक तर झोपायलाही रस्त्यावरच यायचे. बाळंतीणीला वा पेशंटला अपरात्री हॉस्पीटलात न्यायचं असेल तर गल्लीत रस्त्यावर झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी दोन जण टॅक्सीच्या पुढे धावत असत. बायका, मुलं, वृद्ध यांच्या वेगळ्या गरजा असतात, त्यासाठी घरांची रचना वेगळी हवी याचा विचार घरं बांधणार्‍यांनी केलाच नव्हता. चाळीत राहणार्‍यांनी घराप्रमाणे विचार करायला सुरुवात केली.

१९८० नंतरच्या पिढीला व्यक्तीचा, कुटुंबाचा खाजगीपणा याची समज यायला लागली. त्यांच्या घराच्याबद्दलच्या अपेक्षाही बदलायला लागल्या. आता हौसिंग कॉम्प्लेक्स असतात. टू वा थ्री बेडरुम किचन, टेरेस अशी घरं. ब्रॉडबँड इंटरनेट, टाटा स्काय, पाइप गॅस, वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीवर पाणी गरम करण्याची सोय. क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल, बाग. आता चाळी नाहीत, ब्लॉक्स नाहीत, फ्लॅटच्या स्कीम नाहीत. सरकारी अनुदान मिळतं कांद्याच्या चाळी बांधायला.

कोणे एके काळचे ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ वर्ग आता ‘होते रे’ झाले आहेत. नवश्रीमंतांसारखाच नव-गरीब वर्ग तयार झालाय. झोपडपट्टीत राहणारा. फक्त मुंबईत नाही तर सर्व शहरांमध्ये.

7 comments:

  1. मोह्सिना मुकादम यांच्याशी बोलताना त्यांनी चाकणकडं मुस्लिम शेतकरी चाळीला ’बराकी’ म्हणतात असं सांगितलं होतं. पुरानंतरच्या पुण्यात पूरग्रस्तांसाठी ’बराकी’ बांधल्या होत्या ते आठवलं. Temporariness - was the embedded key character in that word I guess. ’बटाट्याच्या चाळीपेक्षा किती निराळी ही कांद्याची चाळ.- ज्ञानदा.

    ReplyDelete
  2. माझ्या गावा कडे (ओतूर, डिस्ट पुणे) कांदे साठवण्याच्या जागेला खरोखरीच कांद्याची चाळ म्हणतात.लांब, बुटकी, एकमजली असते .वरुन छप्पर आणि बाजूने साधी जाळी(चिकन मेश). हवा खेळती राहते. आणि पौस नुकसान करीत नाही. प्रत्येक शेताच्या कडेला अशा लांबट चाळी दिसतात.
    त्याचा या शहरातल्या चाळीशी संबंध असेल का?
    अनिल अवचट

    ReplyDelete
  3. नशिक जिल्हयातल्या माझ्या गावी बहुतेक सग्ळ्यांच्या मळ्यात कांद्याच्या चाळी आहेत..कांद्याचा उग्र वास सगळीकडे असतो..पावसाळ्यात तर फ़ारच..बाजारपेठेत पोहोचू न शकलेला कांदा सड्तो..बाहेर चिखल असतो..त्यात हे कांदे फ़ेकून द्यावे लागत्तात..त्या लाल राबडीच्या दुर्गधीत श्वास घेणे अवघड..त्या राबडीतूनच ये-जा करावी लागते.. मुंबईच्या चाळी आणि या चाळी..नुस्त्या साठ्व्णुकीच्या जागा..असे म्हणावे का..?
    -Meghana Dhoke

    ReplyDelete
  4. मोल्सवर्थच्या शब्दकोशात चाळ या शब्दाचे दोन-तीन अर्थ आहेत. त्यापैकी एक आहे..
    चाळ (p. 279) [ cāḷa ] m P (चाळणें To sift &c.) Searching, seeking, looking for, quest. 2 Turning and shifting; turning and tossing about; whether turning over and relaying orderly, or tumbling over as in rummaging. Hence fig. turning schemes and tentative measures; adopting various devices, expedients, and shifts. v कर.

    अनिलचं म्हणणं खरं आहे. चाळीची रचना हवा खेळती राहून कांद्यांचा टिकाऊपणा वाढवणारी होती. हाच मुद्दा मी वेगळ्या प्रकारे मांडलाय. म्हणजे कांद्याच्या चाळीचं वर्णन करून. कारण माझा विषय कांद्याची चाळ हा नव्हता.

    चाकणकडले शेतकरी कांद्याच्या चाळींना बराकी म्हणत, अशी माहिती ज्ञानदाने मोहसिना मुकादम यांचा हवाला देऊन दिली आहे. बराक हा शब्द मोल्सवर्थच्या शब्दकोशात मला सापडला नाही. तो सरळ सरळ इंग्रजी शब्द आहे. बराकी बांधल्या सैनिकांसाठी म्हणजे पहिल्या वा दुसर्‍या महायुद्धाच्या काळात. त्यालाच बीडीडी वा बीआयटी चाळ म्हटलं जातं. त्या वरळीला, मुंबई सेंट्रलला अजूनही आहेत. बराकी सरकारने बांधल्या. बराकींच्या आधीपासून चाळी होत्या. त्या सरकारने बांधलेल्या नाहीत.

    चाळ हा शब्द आणि इमारतीचं डिझाईन कांद्याच्या चाळीवरूनच आलं आहे. मुंबईत मास हौसिंगची संकल्पना ब्रिटीशांच्या आगमनानंतरच आली. त्या काळात चाळ बांधण्यासाठी आर्किटेक्टच्या दाखल्याची, नकाशाची वगैरे आवश्यकता नव्हती. चाळ ही ग्रामीण संस्कृतीची मुंबई शहराला मिळालेली देणगी आहे, असं म्हणता येईल. माझ्या या दाव्याला केवळ परिस्थितीजन्य पुराव्याचाच आधार आहे. पहिली चाळ मुंबईत कोणी बांधली, केव्हा बांधली, कंत्राटदार कोण होता वगैरे तपशील वा माहिती माझ्याकडे नाही.

    परंतु मुंबईवरील चर्चेत वा कोणाही वास्तुविशारदाने चाळ या शब्दाची आणि रचना वा डिझाईनची उपपत्ती सांगितल्याचं माझ्या वाचनात नाही.

    ज्ञानदा, अनिल आणि मेघना तिघांच्याही मुद्द्यांना उत्तर मिळाली का.

    सुनील

    ReplyDelete
  5. किती ट्रॅजिक -- बाजारात जाण्यापूर्वीचे कांदे आणि श्रमिक शहरी स्थलांतरित हे चाळीतच कोंबलेले. सुनील- तुम्ही हे प्रथम उलगडून सांगितलं आहे.

    आणि हे दिलीप चित्रे कॉपीराईट- कुछ दिन पहिले एक चाळमें डबलरूम के अंदर, रहेता था एक क्लर्क का जोडा....( चाल- एक हंसका जोडा) . :)- ज्ञानदा.

    ReplyDelete
  6. नमस्कार.
    पुण्याच्या कृषि महाविद्यालयात पहिल्या वर्षी आम्हाला जे वसतिगृह मिळाले त्या प्रथम महायुद्धाच्या वेळी बांधलेल्या barracks होत्या. एक रांगेत सारख्या 10 खोल्या आणि दोन रान्गाच्या मधे थोड़ी मोकळी जागा. कांद्याच्या चाळी आणि मुम्बैच्या चाळी यात हे समान सूत्र आहेच.
    आताही या प्रकारची घरे बांधली जात आहेत. संडास - बाथरूम आतमध्ये, परन्तु बाकी सगळे चाळीसारखेच. मागच्या वर्षी बंगलोरला एक मित्राच्या घरी गेलो. जुन्या एअरपोर्ट रस्त्यावर. बाथरूम सुध्हा मोठे असेल अशा आकाराच्या दोन खोल्या. सुरु व्हायच्या आतच घर संपते. एका रांगेत अशी चार घरे, तीन मजली ईमारत, तळमजल्यावर मालक. अशा घरांमध्ये राहणारा वर्ग हा एकतर एकटे पुरुष, किंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न या शहरांच्या तुलनेत कमी आहे. अगदी पुण्यातही अशी घरे जागोजागी बांधली जात आहेतच. आताच्या तरुण पिढीत एकूण राहणीमान भले सुधारले असेल, पण खूप तरुण लोक अजूनही अशा अतिशय छोट्या घरांमध्ये राहतात.

    Barracks are specialised buildings for permanent military accommodation; the word may apply to separate housing blocks or to complete complexes. Their main object is to separate soldiers from the civilian population and reinforce discipline, training and esprit de corps. They were sometimes called discipline factories for soldiers.[1] Like industrial factories, they are sometimes synonymous with shoddy or dull buildings although there are examples of magnificent architecture such as the Collins barracks and others in Paris, Berlin, Madrid, Vienna or London. ( Wikipedia ) Nadeem

    ReplyDelete
  7. छानच आहे लेख. मी पुलंच्या 'बटाट्याच्या चाळ' या पुस्तकात आलेला शब्द 'बटाट्याची चाळ' याचा काही अर्थ आहे का हे शोधत होतो. थोडेफार उत्तर मिळाले असे वाटते. पण आणखी काही माहिती असेल तर जरूर सांगा. मीही चाळीतच लहानाचा मोठा झालो. माझ्या चाळीच्या आठवणी मी माझ्या ब्लॉगवर लिहिल्या आहेत. जरूर पाहा आणि कळवा.

    https://ppkya.wordpress.com/2016/02/13/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b3/

    ReplyDelete