Friday 26 November 2010

योगेंद्र यादवः प्रोफेसर से तमासगीर ?

फारबिसगंज पोलिसस्टेशनच्या जवळ एका पत्र्याच्या छपराखाली डॉ. अलख निरंजन यांनी आपला दवाखाना सुरु केला. १९३१ साली. त्याकाळात पुरनिया जिल्हा काला आजार या रोगासाठी कुप्रसिद्ध होता. पुरनिया डिस्ट्रीक्ट बोर्डाने दिलेल्या जागेतील हा दवाखाना गोरगरीबांना मोठा आधार होता कारण हा तरूण डॉक्टर पैशासाठी कोणाचीही अडवणूक करत नव्हता. पेशंट जे काही देईल त्यात तो समाधान मानत असे. डॉक्टरी हे त्याचं सेवाव्रत होतं. २००३ साली डॉ. निरंजन यांनी वयाची शंभरी गाठली तेव्हा पुरनिया जिल्ह्यातून एक हजार लोक त्यांचं अभिनंदन करायला पाटण्याला गेले. हे सर्व त्यांचे एकेकाळचे पेशंट होते.

१९५४ साली प्रकाशित झालेल्या मैला आँचल या कादंबरीत फणिश्वरनाथ रेणू यांनी डागदरबाबू हे पात्र, डॉ. निरंजन यांच्यावरच बेतलं होतं. कादंबरीची सुरुवातच पुरनिया जिल्ह्यातल्या मलेरिया आणि काला आजार यांच्या प्रकोपाने होते. मैला आँचल ही कादंबरी हिंदी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. प्रेमचंद यांच्यानंतर रेणू हाच हिंदी भाषेतला महत्वाचा कादंबरीकार समजला जातो. रेणू हे केवळ कादंबरीकार नव्हते. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यानंतर ते समाजवादी आंदोलनात सक्रीय होते. जनवाणी या समाजवादी पक्षाच्या मुखपत्रात त्यांचे रिपोर्ताज प्रसिद्ध होत असत. त्यांच्या कथा-कादंबर्‍या वाचताना विविध जाती समूहांचं आणि त्यांच्यातील सत्तास्पर्धेचं दर्शनही घडतं. ब्राह्मण आणि कायस्थ यांच्याकडील सत्ता बहुजनांकडे हस्तांतरीत करण्यात यादव वा मध्यम जाती महत्वाची भूमिका निभावतील याकडे रेणू यांनी १९५४ सालीच लक्ष वेधलं होतं. जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व रेणू यांनी स्वीकारलं होतं. मात्र जे.पी. भूदान चळवळीत गेल्यावर, डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाकडे ते आकर्षित झाले. संसोपाने बांधी गाठ, पिछडा पावे सौ मे साठ या घोषणेमुळे मध्यम जातीयांमध्ये राजकीय जागृती झाली. साठच्या दशकात उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसच्या अंमलाला आव्हान दिलं. ब्राह्मण, मुस्लिम, दलित या जातीच्या समीकरणावर काँग्रेसचं बेरजेचं राजकारण उभं होतं. या सुमारास बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांचं नेतृत्व पुढे आलं. कर्पूरी ठाकूर बिहारचे पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर जातीने न्हावी होते. चले जाव आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांनी २६ महिने कारावास भोगला. बिहारातील दलित आणि पददलित (महादलित) यांचे ते नेते होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचा विवाह त्यांच्या गावी पार पडला. त्यावेळी कर्पूरी ठाकूर यांनी सर्व सरकारी अधिकार्‍यांना ताकीद दिली होती की विवाहसमारंभाला उपस्थित राह्यलात तर कारवाई केली जाईल. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनाही विवाह समारंभाचं निमंत्रण नव्हतं. दहा-अकरा हजार रुपयात विवाह समारंभ पार पडला. बिहारच्या जनतेने जेपींना लोकनायक ही पदवी दिली, तर कर्पूरींना जन नायक. लोक नायक आणि जन नायक दोघेही विचारसरणी आणि वर्तन यामध्ये साधेपणाचा आदर्श घालून देणारे होते.

२५ जानेवारी २०१० रोजी, कर्पूरी ठाकूर यांची ८६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी या प्रसंगी जाहीर केलं की कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावं अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मे महिन्यात नितिशकुमार औराही हिंगना या गावात फणिश्वरनाथ रेणूंच्या कुटुंबाला भेटायला गेले होते. रेणूंच्या पहिली कादंबरी शोकात्म आहे तर दुसरी कादंबरी परती परिकथा नेहरूंच्या विचारधारेने प्रभावित झालेली आहे. नव्या भारताच्या निर्माणाभोवती गुंफलेली आहे. रेणू यांनी आपलं जीवन समाजाला समर्पित केलं होतं पण आमच्या कुटुंबासाठी वा देशासाठी (म्हणजे बहुधा पुरनिया जिल्हा वा बिहार) परिस्थिती फारशी बदललेली नाही, अशी शब्दांत रेणूंच्या पत्नीने आपली खंत व्यक्त केली. आपली आणि देशाचीही परिस्थिती बदलेल, असा ठाम विश्वास नितिशकुमारांनी व्यक्त केला.

नितिशकुमार यांनी यादव-पासवान-मुसलमान या जातीय समीकरणाच्या विरोधात महादलितांची आघाडी बांधली. या आघाडीला त्याने समाजवादी विचारधारा आणि राजकारणाची भक्कम जोड दिली आहे. कर्पूरी ठाकूर, फणिश्वरनाथ रेणू यासारख्या समाजवादी नेत्यांपासून आपण राजकारणाचा मुळारंभ करत आहोत, असे स्पष्ट संकेत नितिशकुमारांनी आपल्या विरोधकांना आणि भाजपलाही दिले आहेत.

लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आणि नितिशकुमार, कर्पूरी ठाकूरांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊनच राजकारणात आले. लालू असो वा पासवान, सत्तेच्या साठमारीत त्यांनी विचारधारा खुंटीला बांधून ठेवली. लालूंनी तर कर्पूरी ठाकूरांचं नाव पुसून टाकण्याचाच चंग बांधला होता. नुक्त्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू-पासवानांचा बाजार कायमचा उठला.

योगेंद्र यादव बिहारच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. डॉ. लोहियांचे खंदे समर्थक, किशन पटनायक यांचा चेला. बिहार विधानसभेच्या निवडणुक निकालांबाबत त्याने केलेलं भाकीत अचूक ठरलं. मात्र सेफॉलॉजीत पारंगत होताना त्याने विचारधारा वगळून राजकारणाचा अभ्यास करण्याची शिस्त आत्मसात केली हे क्लेशकारक आहे. ३१ ऑक्टोबरच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये योगेंद्रचा बिहारच्या निवडणुकांबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. बिहारच्या राजकारणाला असलेली विचारधारेची मिती त्याने विचारातच घेतलेली नाही. यादव-पासवान युती नितिशला आव्हान देऊ शकते असं सावध विधान त्याने या लेखात केलंय. प्रत्येक विषयाची करमणूक करण्याचं माध्यम म्हणजे टिव्ही. करमणूक करायची ऐतिहासिक, सामाजिक, वैचारीक संदर्भ कापून काढून केवळ वर्तमानातील मोजक्या घटकांची चर्चा करत राह्यची असते. कोणत्याही घटनेचं टिव्हीवरील विश्लेषण याच अंगाने जातं. निवडणुक निकालांची चर्चाही याच परिप्रेक्ष्यात केली जाते. बिजली-सडक-पानी, मंडल-कमंडल, विकास-जातीवाद अशा शब्दांच्या पुड्या सोडून जातीच्या समीकरणांची मांडामांड केली जाते. टिव्हीच्या या गुणधर्माला अनुलक्षून किशन पटनायक यांनी प्रोफेसर से तमासगीर शीर्षकाचा लेख एनडीटीव्हीचे प्रणव रॉय यांच्यावर लिहिला होता. तो योगेंद्रलाही लागू होतो आणि एकेकाळी जेपी आणि लोहिया यांच्या दर्शनांनी प्रेरीत झालेल्या निखिल वागळेलाही.

9 comments:

  1. sunil, i have heard and read a number of times, editors or owners of TV channels do NOT anchor discussions on their respective channels in the U.S. or U.K. This ensures, the anchor doesn't rule the discussion and lets participants talk more. Any comment on this?

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख... कर्पूरी ठाकूर हे लालूंचे गुरू.. त्यांच्याच कारकिर्दीत लालूंचा उदय झाला, हे माहिती होतं, पण त्यांचा साधेपणा पहिल्यांदाच समजला..

    आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टीव्ही खरोखरच एवढा वाईट आहे का?

    ReplyDelete
  3. सर अगदी बरोबर आहे. पण असेच उथळ विश्लेषण करणाऱ्यांची मिडीयामध्ये चलती आहे. त्यांना मिळणाऱया झटपट प्रसिद्धि आणि तथाकथित व्यावसायिक यशामुळे अशाप्रकारचे तमासगिरच मिडीयात नव्याने येऊ पाहणा-यांचे आयडॉल आहेत. माध्यम कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटशी मतलब आहे. आणि सिलेक्टीव्ह विषयात पत्रकारीतेचा धर्म पाळणा-या या आयडॉल्स ढोंगीपणाही आता लोकांना चांगलाच ठाऊक होऊ लागला आहे. त्याच्यामागील संभाव्य कारणे काय असू शकतात हे ही आता गुपित राहिलेले नाही.

    ReplyDelete
  4. In order to understand Nitish's politics beyond TV's stereotyping your blog argues for an ideological connect between JP-Lohia- Karpuri on the backdrop of Renu. The way you start your argument with Renu's text is absolutely brilliant.

    Following your blog I read about Kishan Patnaik today. Moklik creates a narrative that connects various dots with a perspective. These causal connections provoke me to read more. Thanks for your insights.

    -Dnyanada

    ReplyDelete
  5. लेख आवड्ला..बिहारच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा एक वेगळा अ‍ॅगल समजला..धन्यवाद.
    -मेघना ढोके

    ReplyDelete
  6. Sir where can I get that article by Kishan Patnaik? Wanna to read it.

    Thanks for this good article.

    ReplyDelete
  7. @Marathe,
    "विकल्पहीन नही हैं दुनिया"
    लेखकः किशन पटनायक

    ReplyDelete
  8. सुनील, तू छान लिहितोस. विश्लेषणाची तुझी वेगळी शैली आहे. मराठी पत्रकरिता सोडून तू मराठीतून विचार करणाऱ्या मोठ्या वर्गाचे नुकसान केलेस. वर्षभर मी तुझा ब्लॉग फॉलो केला. तू केवळ तुझ्यापुरता विचार करू नकोस. अनेकजणांना तुझ्या लेखनातून आपण विचार करावा असे वाटले, तरी ते खूप महत्त्वाचे आहे.----धनंजय

    ReplyDelete