Saturday 11 December 2010

बातमीदाराचा मृत्यु

"कळते-समजते" या ब्लॉगचा मी नियमीत वाचक होतो. "सहयोगी बातमीदार" असाही ब्लॉग त्यामध्येच होता. पत्रकारांच्या विश्वातील विविध घडामोडींची दखल कळते-समजते मध्ये तत्परतेने घेतली जायची. मराठी पत्रकारितेत काय चाललंय म्हणजे विविध वृत्तपत्रसमूहांतील कुरबुरी, पत्रकार-व्यवस्थापन यांचे संबंध, उपसंपादकाच्या डुलक्या, पत्रकारांच्या बदल्या, बढत्या, राजीनामे, नव्या जबाबदार्‍या अशा अनेक बातम्या कळते-समजते वर मिळत. पत्रकारांनी स्वतःची आचारसंहिता तयार केली पाहिजे असा या ब्लॉगचा आग्रह असावा कारण त्यामुळेच या ब्लॉगवर बीबीसी, रॉयटर्स इत्यादी कंपन्यांची बातमीदारीविषयक धोरणे वा भूमिका यांची माहिती देणार्‍या लिंक्स होत्या. प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या बुजुर्ग आणि आदर्श पत्रकारांचं योगदान इत्यादी माहितीच्या लिंक्सही त्यावर होत्या. पत्रकारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, तोडबाजीची उदाहरणे इत्यादी बाबतही सविस्तर माहिती या ब्लॉगमधून दिली जात असे. त्या शिवाय ब्लॉगर्स-पत्रकारांची यादी, त्यांच्या ब्लॉगांच्या लिंक्स हेही त्यावर मिळायचंच. मोकळीकचे किमान ५० ते ६० टक्के वाचक कळते-समजते कडून यायचे.


हा ब्लॉग चालवणार्‍या टीमची नावं मला माहीत नव्हती. विसोबा खेचर, बापू आत्रंगे या नावांमुळे लेखनशैलीवरून त्या व्यक्तीचं नाव ताडणं एवढंच शक्य होतं. अधिकृतरित्या या ब्लॉगचे जनक आणि त्याचे कर्तेकरविते अज्ञातच होते आणि आहेत. हा ब्लॉग का बंद झाला तेही कळलं नाही. अर्थात त्यासंबंधांत अनेक अंदाज, वावड्या उठवल्या जात आहेत. कोण म्हणतं कोणा तरी एका वृत्तसमूहाच्या मालकाचा त्यामागे हात असावा, कोण म्हणतं ब्लॉग चालवणार्‍या टीममध्ये बेबनाव झाला, कोण म्हणतं सहयोगी बातमीदार रोजच्या रोज अपडेट होत नव्हता म्हणजे ब्लॉगर्सच्या टीममध्येच फाटाफूट झाली असावी. पण त्यापैकी एकाही मुद्द्याला सबळ आधार देणं अशक्य आहे.

ब्लॉग, वेबसाईट, सोशल नेटवर्किंग साइट म्हणजे कंप्युटर आणि इंटरनेट यांच्या संमीलनातून उभं राह्यलेलं आभासी जग आहे. या आभासी जगाचा पाया अर्थातच वास्तवात असतो. बातमीदाराच्या मृत्युला कोण कारणीभूत आहे याचा छडा लावणं जवळपास अशक्यच आहे कारण बातमीदार या ब्लॉगवर जे काही छापलं जात होतं त्याची जबाबदारी वास्तव जगात कोणावर आहे हे बातमीदारने कधीही उघड केलं नाही. बातमीदारचे सूत्रधार म्हणजे केवळ प्रतिबिंब होते. त्यामुळेच त्यांच्यावर कोणताही दबाव वा दडपण आलं असलं तरी त्यांच्या पाठिशी उभं राहणं, त्यांना मदत करणं त्यांच्या समर्थकांना शक्य नव्हतं. बातमीदारची वास्तव जगात ओळखच नसल्याने त्याचा आवाज बंद करणं एखाद्या तालेवाराला सहज शक्य झालं असावं. अदृश्य माणसाचा मृत्यु व्हावा तसा बातमीदार आभासी जगातून अंतर्धान पावला. त्याचा मागमूसही राह्यला नाही. तो कदाचित् उद्या पुन्हा प्रकट होईलही पण कोणालाही त्याचा भरवंसा वाटणार नाही. हेतू कितीही चांगले असले, लिखाण कितीही संयत आणि जबाबदारीने केलेलं असलं तरिही त्या लिखाणाची वा संपादनाची जबाबदारी घेण्याची हिंमत नसेल तर तो केवळ षौक वा चूस ठरते.

बातमीदार हा ब्लॉग नव्हता तर ब्लॉगच्या माध्यमाचा वापर करणारं इलेक्ट्रॉनिक लिटील मॅगेझिन होतं. अनामिक राहण्याची सोय ही बातमीदारांच्या पथ्यावर पडली असेलही पण त्याहीपेक्षा अनामिक राहण्याचा रोमँटिसिझम त्यांच्याकडे अधिक होता (बापू आत्रंगे हे नाव त्यामुळेच आलं असावं). वास्तव जगतात आणि मायावी वा आभासी जगातही, दुष्कृत्यं करणारे वा समाजविघातक विचारांचा प्रसार करणारे अनामिक वा गोपनीय राहू इच्छितात. त्यांचे मार्गावरून सज्जन चालू लागले की त्यांचा असा करूण मृत्यु होतो. एका अश्रूचीही श्रद्धांजली त्यांना मिळत नाही.

5 comments:

  1. Got to know of this blog after its death. sad. Its sad,and shocking. To day's Loksatta talks about Morality of Profession of Big Names in this field. Such blogs would have been helpful to know insides of this glamorous world. Vijaya Chauhan

    ReplyDelete
  2. ’हेतू कितीही चांगले असले, लिखाण कितीही संयत आणि जबाबदारीने केलेलं असलं तरिही त्या लिखाणाची वा संपादनाची जबाबदारी घेण्याची हिंमत नसेल तर तो केवळ षौक वा चूस ठरते.’ -- हा तुमचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. परंतु बातमीदारचे सर्वच लेखन कुठे ’संयत’ होते? ज्या पत्रकरितेच्या नीतीबद्दल ’बातमीदार’ला आस्था होती ती नीती ती वेबसाईट स्वत: पाळत नव्हती. कितीतरी बातम्यांमध्ये पूर्वग्रहांचे काटे दिसायचे. जे पेरलं तेच उगवतं नाही का? परंतु असे नफ्फट व्यासपीठ उपयोगाचे असते. -- अर्थात त्यासाठी जबाबदारी घ्यायची तयारी हवी. - ज्ञानदा

    ReplyDelete
  3. मला वाटतं सुरू झाले म्हणजे ते संपतेच. पण हा ब्लॉग चांगला होता. तो आता अपडेट होत नाही हे मलाही आत्ताच कळतेय...

    ReplyDelete
  4. media criticism is must and it should continue with some1 taking up the que from batmidar.

    we need a new batmidar for now...

    ReplyDelete
  5. demise of batamidar was silent one.surely a loss. it was a source of some interesting blogs and bloggers in marathi.mokalik, brihatkathha and many more...i refereed this in my daily column pahila chaha in daily gavakari nashik

    ReplyDelete