Monday 3 January 2011

नथूराम विभूती ? दादोजी कोंडदेव व्हिलन?

हिंदी भाषेत पुतळ्याला मूर्ती म्हणतात. मराठीतही तोच शब्द रूढ केला पाहीजे. कारण मूर्ती या शब्दासोबत मूर्तीपूजा येते. आणि भारतीयांना तीच अभिप्रेत असते. पुतळ्याकडे वा मूर्तीकडे आपण शिल्प वा कलाकृती म्हणून बघतच नाही. श्रद्धेनेच पाहतो. कलाकृती म्हणजे काय ह्याची जाण आपल्या संस्कृतीमध्ये आहे का हाच प्रश्न पडतो. शिवराय आणि जिजामाता सोन्याचा नांगर चालवत आहेत आणि शेजारी दादोजी उभे आहेत हे शिल्प आहे. तो दादोजींचा, शिवरायांचा वा जिजाऊंचा पुतळा नाही. या एकसंघ कलाकृतीतून केवळ दादोजींचा पुतळा कापून काढायचा आणि अन्यत्र हलवायचा असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला. शहरातल्या लोकांना नागरी सुविधा पुरवणं हे महापालिकेचं काम आहे. अशा संस्थेने पुतळे उभारणं, हलवणं या गोष्टींमध्ये लक्ष घालणं अ‍ॅब्झर्ड अर्थात असंगत आहे. पण आपल्याकडे सरकार वा स्थानिक स्वराज्य संस्था अशा भलत्याच गोष्टींमध्येपुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलनं, साहित्यिक वा कलावंतांचा सत्कार, कलाकृतींना बक्षिसं, इत्यादीमध्ये, गुंतलेली असतात. कारण सांस्कृतिक राजकारणाची पालखी उचलणं या संस्थांना भाग पडतं.

पेशवाईच्या उदयानंतर महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची सुरुवात झाली असावी. राजानेच प्रधानाच्या हाती राज्याची सूत्रं दिल्याने ही घसरगुंडी सुरु झाली. या वादात ब्राह्मणांच्या विरोधात समस्त ब्राह्मणेतराची एकजूट उभारण्याची दृष्टी वा व्हिजन स्वातंत्र्यपूर्व काळात होती. महाडच्या चवदार तळ्यावर होणार्‍या सत्याग्रहात ब्राह्मणेतर पक्ष सामील व्हायला तयार होता. त्यांची अट अशी होती की या सत्याग्रहात ब्राह्मणांचा सहभाग असता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही अट स्वीकारायला ठाम नकार दिला. ब्राह्मण्याच्या विरोधात ही चळवळ आहे, कोण्या एका जातीच्या विरोधात नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणासी धरावे पोटाशी ज्योति म्हणे, असं म्हणणारे जोतिबा फुले बाबांसाहेबांना गुरुस्थानी होते. स्वातंत्र्योत्तर काळातही म्हणजे १९८० सालात मंडल आयोगाची स्थापना होईपर्यंत भारतातील जातिसंघर्षाचं सांस्कृतिक परिमाण ब्राह्मण्यविरोध हेच होतं, राखीव जागा आणि जमिनीचं फेरवाटप हा आर्थिक-सामाजिक कार्यक्रम होता.

१९९० नंतर मात्र ब्राह्मणेतर जातिसमूहांच्या एकजूटीची विविध जातनिहाय विभागणी होऊ लागली. हे तुकडीकरण एकविसाव्या शतकात अधिक विस्तारत गेलं. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु होते का, ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. ह्या समितीवर फक्त ब्राह्मण आणि मराठे या दोनच जातीच्या विद्वानांची नियुक्ती सरकारने केली अशी टीका महात्मा फुले यांच्या विचाराचे अभ्यासक, हरी नरके यांनी केली. त्यांच्यामते ब्राह्मण आणि मराठे यांच्यासमवेत अन्य जातींच्या विद्वांनांचाही या समितीत समावेश करायला हवा होता. मराठा समाजाला स्ट्रॅटेजिक पाठिंबा आपण देऊ पण सत्तेच्या वाटपात आपण मराठा समाजाशी स्पर्धा करू असंच माळी समाज अर्थातच हरी नरके सांगू पाहात आहेत.
 
स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी समाजातून आलेल्या राज्यपातळीवरील नेतृत्वाला मध्यमवर्गीय वा पांढरपेशांनी आव्हान दिलंच नव्हतं. त्यांना आव्हान मिळालं ओबीसी समूहांकडून. सेना-भाजपच्या नेतृत्वाखाली. १९९५ साली म्हणूनच महाराष्ट्रात खरंखुरं बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं. तेही एका ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली. मराठ्यांच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणेतर फळीच्या चिरफळ्या उडाल्याने नव्या राजकीय समीकरणात ब्राह्मण वा उच्चवर्णींयांनाही मोठा अवकाश मिळतो.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला आता मराठा-ब्राह्मण हे स्वरुप प्राप्त झालंय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेत दादोजी कोंडदेव व्हिलन बनले आहेत तर ठाण्याच्या साहित्यसंमेलनात राष्ट्रपित्याचा खराखुरा मारेकरी, वंदनीय विभूती ठरला आहे.


4 comments:

  1. Rosalind O'Hanlon's "Caste, Conflict and Ideology" throws light on the way this entire low caste protest picked momentum in Western India in the 19th century with Pratapsinha Raje Bhosale in Satara at the helm, trigerred by his personal hum...iliation when he was held in virtual house arrest by the Peshwa faction . . . the baton then passed on to Scottish and American missionaries who propogated the hitherto unexposed concepts of social equality and teachings that stemmed from the Enlightenment period in Europe. . . one such less known Scottish Mission school in Pune provided the context for the evolution of a visionary leader, Mahatma Jyotiba Phule. Phule, when faced with the same ideological conflict that led to last week's extreme and unjustifiable act of slicing through an artist's creation, did not resort to violent or extreme means but responded with a counter in the form of a powerful artistic creation "Trutiya Ratna" , possibly the first stage play in Marathi art history . . . We need more Phules who can lead movements that not only produce results but also in the process establish forms of expression that can be used as justifiable means of protesting across societies and causes..See More

    ReplyDelete
  2. मनोज कापडे4 January 2011 at 09:05

    शिवरायांचे रयतप्रेम, त्यांचा आदर्श, सर्वधर्मियांशी असलेले व्यवहार
    कुणब्यांकडे बघण्याची दृष्टी याचा सोयिस्कर विसर पडणा-यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे
    नव्या पिढीला सहयाद्रीच्या इतिहासातून पुढे काय मिळणार, या विषयी चिंता वाटते.
    म्हणूनच सांगावेसे वाटते की.........

    आत्महत्यांच्या जाळात
    कुणबी होरपळला
    शहरातल्या धावपळीत
    चाकरमानी बावचळला

    भविष्याच्या कुतरओढीत
    आठवेना मला आजा
    इतिहासावर जगतोय
    राजकीय मावळा माझा

    ReplyDelete
  3. तालिबानकडून बुद्धशिल्पाचा पाडाव किंवा बाबरी मशीद उध्वस्त करायचे कृत्य जसे निंदनीय आहे त्याचप्रमाणे कोणतेही शिल्प किंवा वास्तु नष्ट करणे चूक आहे. लाल महालातील शिल्प ही एक कलाकृति आहे आणि तिच्यात दुरुस्ती करणे अपेक्षित नाही.

    ReplyDelete
  4. Namskar,

    mi ek samanya nagrik aahe, tumchya post mi vachat aste. mala nehami ekach prashn satavto, itk sagal hot pn apn te ka thambu shakat nahi? kinva he sagal badlnyacha kahitari upay nahiye ka?
    kunich kahi ka karat nahi? mala sanga mi kay karu shakte?

    ReplyDelete