Thursday 5 May 2011

महाराष्ट्र दिन २०११: भूगोलाचं राजकारण:

१. मुंबई कुणाची?


महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, पश्चिमेस कोकण आहे, उत्तरेस खानदेश आणि विदर्भ आहेत. पूर्वेला मराठवाडा आहे. असं म्हणताना नाशिक-नगर ते कोल्हापूर-सोलापूर हा पट्टा म्हणजेच महाराष्ट्र असं अभिप्रेत असतं. याच पट्ट्याला पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं.

खानदेश म्हणजे तापीचं खोरं. नाशिक-नगर-नांदेड पर्यंत गोदावरी खोरं. आजही राज्याची सर्वाधिक लोकसंख्या गोदावरी खोर्‍यातच आहे. ही दोन्ही खोरी कोणे एके काळी संपन्न होती. तापी नदीच्या खोर्‍यात दोन-तीनच जिल्हे येतात. निम्मा विदर्भही गोदावरी खोर्‍यातच येतो. वैनगंगा ही गोदावरीचीच उपनदी समजली जाते. वैनगंगेचं पात्र गोदावरीशी स्पर्धा करणारच आहे. गोदावरी खोर्‍याचा विस्तार मोठा आहे. देवगिरीच्या यादवांचं राज्य तिथेच होतं. पुण्याच्या पेशव्यांना पैठणचे सावकार कर्ज द्यायचे. शिवाजी महाराजांच्या उदयानंतर महाराष्ट्राचं राजकीय केंद्र कृष्णा खोर्‍यात सरकलं. मराठवाडा संतांची भूमी पण पंढरपूर कृष्णाखोर्‍यात. शिवकाळातलं कृष्णा खोरं दुष्काळीच होतं. म्हणून तर मराठे मुलुखगिरी करू लागले. कोकण किनारपट्टीवरील बंदरांमधला माल सह्याद्री ओलांडूनच देशावर यायचा. या व्यापारावर नियंत्रण ठेवणं म्हणजेच उत्पन्न मिळवणं यासाठीच तर किल्ले उभे राह्यले. महाराष्ट्रातले ८० टक्के किल्ले सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत. व्यापार-उदीमातून मिळणार्‍या संपत्तीसाठी किनारपट्टीवर नियंत्रण ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. टापूच्या सलगपणापोटी हा प्रांत घ्यावा लागला अन्यथा उत्पन्नाच्या दृष्टीने तो आतबट्ट्याचाच आहे, असं एलफिस्टनने पेशवाई बुडवल्यावर लिहूनच ठेवलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही वेगळी स्थिती नव्हती. म्हणून तर त्यांनी तीन वेळा सूरत लुटली. त्याचा परिणाम म्हणूनच ब्रिटीशांनी आपलं ठाणं मुंबईला हलवलं. मुंबई त्यावेळी सात बेटांची होती. मुंबईहून वसई-गुजरात मार्गे व्यापार करण्यासाठी सह्याद्री ओलांडावा लागत नाही. त्यातच बेटांचं संरक्षण करणं तुलनेने सोपं होतं. ठाणे जिल्ह्याचं गॅझेटिअर पाह्यलं तर मुंबई म्हणजे वसई-डहाणू पट्ट्यात गुजराथी भाषा अधिक प्रचलित आहे असंच म्हटलं आहे. मुंबईमध्ये गुंतवणूक केली ब्रिटीश, गुजराती आणि त्यातही पारशी लोकांनी. सात बेटांमधला समुद्र बुजवल्यावर मुंबईचं रुपांतर गिरणगावात झालं. (मुंबईतल्या सर्व कापडगिरण्या सखल भागातच आहेत.) मराठी माणसं केवळ मजूर आणि पांढरपेशे  म्हणून आली.  प्रामुख्याने कोकण आणि दुष्काळी कृष्णाखोर्‍यातून. या लोकसंख्येच्या बळावरच मराठी लोकांनी मुंबईवर हक्क शाबीत केला. तोच कित्ता हिंदी भाषिक गिरवू लागले आहेत. गावाची अर्थव्यवस्था म्हणजे शेती. जमीन आणि शेती बव्हंशी वडिलोपार्जित असते. शहर व्यापार-उद्योग यावर उभं असतं. ते जरी वडिलोपार्जित असले तरी सतत नवे धंदे, उद्योग शहरात निर्माण होत असतात. त्यामुळेच नशीब काढायला लोक पूर्वापार शहरातच जातात.

नुसत्या संयुक्त महाराष्ट्राला फारसा अर्थ नव्हता. मागणी केल्यावर तो सहजपणे मिळाला असता. महाराष्ट्राला पैसा हवा म्हणून तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि लढा उभारण्यात आला. (संयुक्त महाराष्ट्र समितीचे सर्व ठराव इंग्रजी भाषेत आहेत.) मुंबईतला मजूर वर्ग मराठी तर भांडवलदार अमराठी. या भांडवलदारांचं महाराष्ट्रातल्या नेतृत्वाशी फारसं सख्य नव्हतं. मुंबईवर नियंत्रण ठेवायचं तर महाराष्ट्र काँग्रेस उपयोगाची नाही तर मुंबई काँग्रेसही हवी. त्यामुळेच तर पक्षाच्या घटनेत नसताना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आजही अस्तित्वात आहे ( हिंदी भाषेत प्रदेश म्हणजे राज्य). मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ज्योत तेवती ठेवावी पण त्याचं क्रेडीट विरोधकांना मिळू नये अशीच यशवंतरावांची चाल होती. बाळ ठाकरे (तेव्हा ते बाळ ठाकरेच म्हणूनच प्रसिद्ध होते) तेव्हा यशवंतरावांच्या हाताशी आले. मार्मिकच्या अंकाचं प्रकाशन यशवंतरावांच्याच हस्ते झालं. इंदिरा गांधी भले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल असतील पण नेहरूंनंतर त्यांच्या हाती पक्षाची सूत्रं गेल्यावर शिवसेना स्थापन झाली. त्यावेळी व्यासपीठावर होते रामराव आदिक. ( ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये निष्ठावंत हा परवलीचा शब्द होता.  त्या इंदिरा निष्ठांचे रामराव म्होरक्ये होते. ) मुंबईवर राज्य कुणाचं? दिल्लीचं की कृष्णाखोर्‍याचं? अशी रस्सीखेच सुरु झाली. त्यातून शिवसेना वाढू लागली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर कृष्णाखोर्‍याचं वर्चस्व होतं. पण मुंबईत कृष्णाखोर्‍याला कधी वाव मिळाला नाही. मुंबईचे मास लीडर नेहमीच बिगर मराठा राह्यले. स. का. पाटील हे काही मराठा नव्हते. त्यांच्या आधी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात साथी अशोक मेहता हे मुंबईकरांचे नेते होते. (नाव मेहता असलं तरी ते होते सोलापूरचे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे वर्गबंधू.) त्यांच्यानंतर मुंबईच्या कामगारांचं नेतृत्व होतं कॉ. श्रीपाद डांगे यांच्याकडे. मग जॉर्ज फर्नांडीस, बाळासाहेब ठाकरे, मृणाल गोरे, दत्ता सामंत असे नेते झाले. यातले बाळासाहेब ठाकरे वगळता सर्व नेते काँग्रेच्या विरोधातले. त्यामुळेही शिवसेनेला कधी रसद पुरवायची तर कधी बंद करायची असा खेळ मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते खेळत राह्यले. त्यातूनच पुढे शिवसेनेची स्वायत्त वाढ होऊ लागली.

मुंबईवर नेहमीच सत्ता राह्यली भांडवलदारांची. कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्ट यांच्यातून विस्तवही जात नव्हता तरीही जोवर डावी चळवळ होती तोवर त्यांच्यावर वचक तरी होता. पुढे समाजवादी संपले आणि कम्युनिस्ट नावापुरते उरले. त्यानंतरची मुंबई भांडवलदारांकडून बिल्डरांकडेच गेली. मुंबई क्रिकेट असोसिएशन ह्यांचीच की. पण महाराष्ट्राच्या राजकारण्यांना-- शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी सर्वांनाच तिथे अध्यक्षपद हवं असतं. असे नेते कोणाचे हितसंबंध सांभाळणार. त्यांच्यामुळेच तर गिरणगावाचं मॉलगावात रुपांतर झालं.



3 comments:

  1. माहितीपूर्ण पोस्ट. "पीपल्स हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स" नावाच्या पुस्तकाची आठवण झाली.

    राजेंद्र बापट

    ReplyDelete
  2. महाराष्ट्राकडे अशा भिंगातून पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

    अरुण देसले

    ReplyDelete
  3. महाराष्ट्रा बद्दल आणि बदल थोडक्यात पण सविस्तर कळले.

    ReplyDelete