Monday 9 May 2011

महाराष्ट्र दिन २०११: भूगोलाचं राजकारण


२. नगर

प्रवरा ही गोदावरीची उपनदी. भंडारदरा येथे तिच्यावर धरण बांधल्यावर शेतीला पाण्याची सोय झाली. ब्रिटीशांच्या काळात बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे तत्व बाय प्रॉडक्ट होतं. पाणीपट्टीची वसूली होत असेल तरच शेतीला पाणी मिळायचं. नीरेचं पाणी त्यामुळे दहा वर्षं उपयोगातच आणलं गेलं नाही. पाणीपट्टी भरायची तर नगदी पिकं लावायला हवीत. नगदी पिकं लावायची तर बाजारपेठेची माहिती हवी किंवा त्या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग हवेत. ह्याची काहीच व्यवस्था नसताना पाणीपट्टी भरण्याची ऐपत तरी किती शेतकर्‍यांची असणार. पुन्हा शेतीत उद्योजकता कोण दाखवणार असे अनेक प्रश्न होते. महात्मा फुलेंनी पुण्याजवळ हडपसर येथे चाळीस एकर जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन तिथे विलायती भाज्या काढून पुण्यात विकून शेतकर्‍यांना त्यातही कुणबी शेतकर्‍यांना आदर्श घालून दिला होता.

नगर जिल्ह्यातील मलिक अंबरने राज्यात महसूल वसूलीची पद्धत--रयतवारी, घालून दिली. तीच पद्धत शिवाजी महाराजांनीही चालू ठेवली असं गावगाडा या ग्रंथात त्रिंबक नारायण अत्रे यांनी नोंदवलं आहे. या मलिक अंबरनेच मराठा सरदारांना एकत्र करून मराठी अस्मितेचाही पाया घातला असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे. हा झाला मध्ययुगीन इतिहास. भंडारदरा धरणाचं पाणी आल्यावर नगर जिल्ह्यात ब्रिटीशांनी साखर कारखाने काढले. उसाची लागवड सुरु झाली. कारखाने आले म्हटल्यावर कामगार आले. कामगार म्हणजे तर क्रांतीचे अग्रदूत त्यामुळे कम्युनिस्ट आले. कम्युनिस्टांचे स्पर्धक समाजवादी आले. काँग्रेस होतीच सर्वत्र. थोडक्यात नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय जागृती झाली. म्हणून तर पहिला सहकारी साखरकारखानाही नगर जिल्ह्यातच उभा राह्यला.  काँग्रेस शेटजी-भटजींचीच समजली जायची. गांधींजींनी काँग्रेस गावागावत नेली हे खरं पण काँग्रेसमध्ये ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे आलं नेहरूंच्या काळात. म्हणूनच तर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरू यांच्यात निवड करायची असेल तर ते नेहरूंबरोबर असतील. अण्णासाहेब शिंदे कम्युनिस्ट होते, तेव्हा ते भाऊसाहेब थोरातांचे नेते होते. नगर जिल्ह्यातल्या मागच्या पिढीतल्या सहकारी साखरकारखान्यांच्या संचालक मंडळांचे बहुतेक सदस्य कम्युनिस्ट, समाजवादी, शेकाप यांच्या मांडवाखालून गेलेले होते. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यावर विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जे बेरजेचं राजकारण केलं त्यामध्ये नगर जिल्ह्यातील नेतृत्वाला मध्यममार्गी राजकारणात आणून सोडलं. केवळ सत्तेसाठी या नेत्यांनी आपल्या निष्ठा बदलल्या असा आरोप त्यांच्यावर अन्याय करणारा ठरेल. संपत्ती निर्माण करूया वाटप होईलच हळू हळू हा विचार यशवंतरावांनी रुजवला.

नानासाहेब दुर्वे हे समाजवादी नेते मात्र आपल्या निष्ठांवर अढळ राह्यले. रंगनाथ पठारे ह्यांची ताम्रपट ही कादंबरी त्यांच्याच चरित्राने प्रेरीत झालेली आहे. दत्ता देशमुख कम्युनिस्ट होते. पुढे ते शेतकरी कामकरी पक्षात गेले तिथून लाल निशाण पक्षात. यशवंतरावांच्या जाळ्यात ते सापडले नाहीत. पण असे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते.

यशवंतराव कृष्णाखोर्‍‍याचे होते (त्यांच्या आत्मचरित्राचं नावच मुळी कृष्णाकाठ आहे). सहकारी साखर कारखानदारीबद्दल ते म्हणायचे, सहकाराचा घोडा आम्ही आणला, त्यावर सहकारी कार्यकर्त्यांना बसवलंही आम्ही, त्याला पळवलाही आम्हीच, सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचं यश हेच की ते घोड्यावरून पडले नाहीत. एकंदरीत सहकारी साखरकारखानदारीतील या बड्या नेत्यांबाबत यशवंतरावांचे विचार काय होते ते ह्यावरून कळतं. त्यांना शक्यतो विधानसभेचं तिकीट मिळू नये असेच डावपेच यशवंतरावांनी केले. म्हणून तर वसंतदादा पाटलांचा गट उभा राह्यला. असो. तोपावेतो नगर पुणे महसूल विभागात मोडत होता. विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखरकारखान्याच्या पायाभरणीसाठी जी ऊस बागायतदारांची मिटिंग आयोजित केली तिला गोविंदराव पवार म्हणजे शरद पवारांचे वडील काटेवाडीहून गेले होते. उसाची लागवड वाढल्याने गूळ उत्पादनात कोल्हापूरानंतर नगरचाच नंबर होता. सहकारी साखर कारखानदारी नगर जिल्ह्यात म्हणजे गोदावरी खोर्‍यात बाळसं धरू लागली आणि नगर जिल्ह्याचा समावेश नाशिक महसूल विभागात करण्यात आला. आजही नगरचा दरारा मोठाच आहे, केवळ साखर कारखानदारीतच नाही तर भाज्या, फळं, दूध अर्थात कृषी-औद्योगिक क्रांतीत. निम्मा जिल्हा दुष्काळी असूनही. साहजिकच महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व नगर जिल्ह्याकडे सहज गेलं असतं. तिथेच नेमकी कृष्णा खोर्‍यातल्या नेतृत्वाने पाचर मारली.


नगर जिल्ह्यातला कोपरगाव तालुका कृष्णा खोर्‍यात येतो. कृष्णा खोर्‍यातल्या नेतृत्वाने नगर जिल्ह्यातल्या गटातटांना खतपाणी घातलं. कोल्हे, काळे, थोरात, गडाख, विखे यांना एकमेकांशी झुंजवत ठेवलं आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नगर जिल्ह्यातल्या सर्वांना बाद करून टाकलं.
बाळासाहेब विखे-पाटलांनी म्हणून तर गोदावरी खोर्‍यातल्या शंकरराव चव्हाणांची पाठराखण केली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या तिन्ही कृष्णाखोर्‍यातल्या बड्या नेत्यांच्या विरोधात विखे आपलं राजकारण करत राह्यले. मात्र तरीही विखेंचा समावेश कधीही इंदिरा निष्ठांमध्ये झाला नाही. विखे पाटलांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलं अशोक चव्हाणांना पायउतार व्हावं लागल्यानंतर. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर नगर जिल्ह्यातल्या नेत्याचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत यायला तब्बल पन्नास वर्षं लागली.  

1 comment:

  1. तुमचे ब्लॉग वाचल्यावर स्टोरी टेलिंग मंजे काय, ते कळतं... लिखाणाचा फ्लो अप्रतिम, अगदी टीव्हीला हवा तसा

    ReplyDelete