Tuesday, 2 June 2015

दोन कविता

मी

शोधतो आहे माझी भाषा
पिशाच्चांच्या प्रदेशात
त्यांच्या भूतचेष्टांमध्ये
हरवून जाईन मी त्यांच्यात
उलट्या पायांनी चालू लागेन
बैल, घोडा वा चिमणी
कुणाचंही रुप धारण
करून क्षणार्धात अंतर्धान पावण्याची
किमया मलाही साध्य होईल
इच्छामात्र उरलो की भाषेची
गरजही संपून जाईल
तेव्हा तू रिट्रीव्ह कर
तुला पाठवलेल्या कविता
त्यामध्ये मी असेन


समुद्र 

व्हिटी, फाऊंटन, युनिव्हर्सिटी वा मंत्रालय वा नरिमन पॉइंटच्या
एखाद्या इमारतीत असताना जाणवत नाही
अर्ध्या किलोमीटरवर आहे समुद्र
मुंबईत दिसतोच तो
पण नसतो आपल्या जवळ
आपल्याला दिसतात फेसाळलेल्या लाटा
किनार्‍यावर धडकणार्‍या
समुद्र असतो रोमँटिक
बीच कँडीच्या दगडाआड
प्रेयसीसोबत गुजगोष्टी करणारा
दूर कुठेतरी सूर्याला पोटात घेणारा
कोळ्यांना म्हणजे तांडेलाला विचारा
तो सांगेल त्याचा समुद्र
तिथे किनारा असतो क्षितिजावर
आणि पाण्यामध्ये नसतात कोणत्याही खाणाखुणा
जीपीएस सिस्टीम नसताना केवळ आकाशात बघून
पाण्यावर चालायचं असतं माशांच्या शोधात
तांडेल फोकस्ड असतो समुद्रावर
त्याला दिसतात त्याच्या लाटांमधले सूक्ष्म बदल
तापमानातले, वार्‍यातले, भरती-ओहोटीचे
त्यावरून तो ताडतो समुद्राच्या पोटात असणारे
माशांचे थवे
बांगडे, सुरमई, पापलेट आणि काय काय...
तो सांगेल तिथे जाळं टाकल्यावर
मिळते चांदीची मासोळी
एकदा उतरा त्या खुल्या समुद्रात
लाईफ बोट किंवा अन्य कोणत्याही
आधाराशिवाय
मग समजतं भरती आणि ओहोटी काय असते ते
ओहोटी खेचत असते आत आत
घसा कोरडा पडतो तिच्याशी झगडताना
हात-पाय थकून जातात
समुद्राच्या पाण्यातला देह
घामाने भिजून जातो
जिवंत जलसमाधी घेणार आपण
ह्याची खात्री होते आपली
तरिही आपण तरंगत राहतो
चमत्कार वाटावा अशा सहजतेने
भरती फेकून देते देहाला
किनार्‍यावर
तिचे मनोमन आभार मानत
लडखडत, रांगत आपण कसेबसे पोचतो
वाळूच्या किनार्‍यावर
नशिबवान असतो आपण
जेली फीशच्या वा पतंगाच्या दंशापासून
वा शार्कच्या जबड्यातून सुटलेले
भर उन्हात आपण गाढ झोपी जातो
तापलेल्या वाळूवर
स्वप्नामध्ये दिसतो
निळा, हिरवा, जांभळा समुद्र
आणि फेसाळलेल्या लाटा
अंगोपांगात मुरलेला असतो खार्‍या पाण्याचा गंध

2 comments:

  1. समुद्र आता स्वप्नात दिसतोय तसा वास्तवात नाही.भविष्यातील लोकांना अशी स्वप्नेहि पडणार नाहीत !त्याच्या स्वप्नात गटार रूपातला समुद्र असेल .ज्यात कोळी नसतील .असतील फक्तं वळवळनारे किडे .

    ReplyDelete