Sunday, 27 September 2009

चौकटीबाहेरचे चिंतन

प्रिय किशोर,
बोलणं आणि ऐकणं स्केल-अप केलं की लिहिणं-वाचणं होतं. बोलताना ऐकणारा साक्षात समोर असतो. तो आपल्याला ओळखत असो वा नसो. लिहिताना मात्र वाचकाच्या प्रतिमेला उद्देशून आपण लिहितो. निवडक पळशीकर या पुस्तकाची तू लिहिलेली प्रस्तावना वाचताना तू माझ्याशी बोलतो आहेस हे मला कळलं.
व्यक्ती, विचारवंत, विचारव्यूह आणि मांडणीची शैली म्हणून वसंत पळशीकरांची ओळख तू अतिशय नेमकेपणाने करून दिली आहेस. परिक्षेला बसणारा विद्यार्थीच सर्व मुद्दे तपशीलात लिहून दाखवू शकतो. सर्वसाधारण वाचक आपल्याला जे ठाऊक आहे त्याला दुजोरा देणारे मुद्दे ध्यानात ठेवतो तर चोखंदळ वाचक आपल्या ठाऊक असलेल्या मुद्द्यांचे संदर्भ ताडून पहातो आणि वेगळे मुद्दे नोंदवून ठेवतो. वसंत पळशीकरांच्या निबंध संग्रहाला तू लिहिलेल्या प्रस्तावनेत यापैकी प्रत्येक वाचकाला काही ना काही मिळेलच.
पळशीकरांच्या निबंधांची निवड करण्याचा पेच तू मांडला आहेसच मात्र तो ब-याच अंशी सोडवलाही आहेस. तो पूर्णपणे सोडवणं खुद्द पळशीकरांनाही जमणार नाही एवढं लिखाण त्यांनी केलं आहे. हे अवघड काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून पळशीकरांचं विचारधन पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याचं महत्वाचं काम तू केलंयस. लोकवाङमयगृह आणि सुनील कर्णिकचे त्यासाठी आभारच मानायला हवेत.
निवडलेल्या निबंधांची साक्षेपी ओळख करून दिल्यामुळे पळशीकरांचा विचारव्यूह त्या काळातील सामाजिक-राजकीय संदर्भात समजून घेण्यास मदत होते. पळशीकर ज्या काळात लिहित होते त्या काळात शासनाच्या हस्तक्षेपाने राजकीय-सामाजिक-आर्थिक पुनर्रचना केली पाहिजे या विचाराला सर्वसाधारणपणे मान्यता होती. पळशीकरांनी मात्र शासनापेक्षा लोकांचा सहभाग हा या पुनर्रचनेचा केंद्रबिंदू मानला. हा तू मांडलेला मुद्दा अन्य कोणी विचारवंताने पळशीकरांच्या संबंधात नोंदवल्याचं मला ठाऊक नाही. संपूर्ण पळशीकर ग्रंथरुपात उपलब्ध नाही. विविध नियतकालीकांमधील शेकडो लेख मिळवणं वाचकाला शक्य नाही, त्यामुळे निवडक पळशीकर हाच पळशीकरांच्या साहित्याचा दस्तऐवज होईल. (भा. ल. भोळेने संपादित केलेले वसंत पळशीकरांचे जमातवादासंबंधातील लेख ग्रंथरूपात उपलब्ध आहेतच. ते महत्वाचे आहेत मात्र ते एकाच विषयाशी संबंधीत आहेत.)
विसाव्या शतकात विकसीत झालेल्या समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यात गांधी विचाराची मांडणी आणि विस्तार पळशीकरांनी केला असं माझं आकलन आहे. नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यानुषंगाने उपस्थित झालेले अनेक मुद्दे यासंबंधातही पळशीकर मूलगामि मांडणी करू शकले. त्यांच्या पिढीच्या अनेकांना ते शक्य झालं नाही.
नानासाहेब गोरे, स. ह. देशपांडे आणि ज. वि. पवार यांच्याशी पळशीकरांचे वाद झाले असा उल्लेख तू केला आहेस. ज. वि. पवारांसोबत झालेला वाद माझ्या वाचनात नाही. स.ह. देशपांडेंच्या सोबत झालेला वाद भारतातील हिंदु-मुस्लिम समस्येची मांडणी कशी करावी या संबंधातील होता. सेक्युलर आणि पुरोगामि विचारवंतांनी केलेल्या मांडणीतील उणिवांचा फायदा उठवत, स.ह. देशपांडेंनी हिंदुत्ववादी मांडणीची गरज अधोरेखित केली होती. ग्रंथापेक्षा लोकजीवन-लोकसंस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून पळशीकरांनी त्यांचा प्रतिवाद केला होता. या अर्थाने तो निव्वळ वैचारीक वाद होता. नानासाहेब गोरे हे केवळ वैचारिक वादात नव्हते कारण ते एका पक्षाचे नेते होते. त्यांनी वैचारिकतेसोबतच कार्यक्रमाचाही मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे पळशीकर दोन पावलं मागे सरल्याचं मला स्मरतं। साता-याला झालेल्या लोकशाही समाजवाद या विषयावरील चर्चेत पळशीकरांनी मांडलेल्या टिपणाच्या संदर्भात प्रकाश बाळनेही नेमका हाच म्हणजे कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला होता। पळशीकरांनी केलेल्या वाद-विवादांचा आढावा कदाचित् पानांच्या मर्यादेमुळे तुला घेता आला नसावा. परंतु पुढच्या आवृत्तीत त्याचा समावेश करता आला तर उत्तम.
या पुस्तकाच्या आणि प्रस्तावनेच्या निमित्ताने तुला आपला वाचक आणि विषयही गवसलेला आहे. त्यामुळेच आता दणकून लिखाण करायला हवंस।
कळावे,
सुनील तांबेनिवडक वसंत पळशीकर
चौकटीबाहेरचे चिंतन
संपादक- किशोर बेडकिहाळ
प्रकाशन- लोकवाङमय गृह

No comments:

Post a Comment