Wednesday 23 September 2009

लॅपटॉपवर सत्यजित राय-- २

रांड, सांड, सिढी, संन्यासी
उनसे बचे तो सेवा करे काशी

अच्युतराव पटवर्धनांच्या अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला गेलो होतो तेव्हा या ओळी मी ऐकल्या. रत्नाकर पांडे या काँग्रेसी नेत्याकडून. मात्र त्यावेळी वाराणसी शहरात जायला वेळ नव्हता. त्यानंतर ब-याच वर्षांनी मी आणि सतीश तांबे वाराणसीला गेलो होतो. तेव्हा या ओळींची प्रचिती आली. छोट्या गल्ल्यांमध्ये निवांत उभे असलेले वळू, दगडी पाय-यांचे घाट, यात्रेकरूंचा पिच्छा पुरवणारे पंडे वा संन्यासी आणि गंगापूजन करणा-या विधवा बायकांचे तांडे. काशी ही मृत्युची नगरी आहे. अनेक जण तिथे शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. अपराजितो या चित्रपटात सत्यजित रायने ओपूच्या आईची कहाणी सांगताना वाराणसी हे शहर एक पात्र म्हणून उभं केलंय. वाराणसीचं असं दर्शन अन्य कोणत्याही चित्रपटात घडत नाही.
अपूर्वचे वडील बायको-मुलाला घेऊन बंगालातून वाराणसीला येतात. तिथे गंगाकिनारी एका घाटावर ते बंगाली विधवांना पोथी वाचून दाखवायचे. त्यावर मिळणा-या दक्षिणेवर कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. वाराणसीच्या गल्ली-बोळांमध्ये ओपू खेळायचा. वडलांचा मृत्यु होतो. आई एका श्रीमंताघरी घरकाम करू लागते. लहानगा ओपू घरमालकाच्या हुक्क्यामधे निखारे भरताना ती पाहते आणि मुलाच्या भवितव्याची चिंता तिच्या चेहे-यावर स्पष्ट दिसते. आता इथे काम करायचं नाही असं ती मनोमन ठरवते. बंगालात आपल्या दूरच्या नातेवाईकाकडे ती राह्यला जाते. तिथे ओपूची शाळा सुरु होते. त्याला विज्ञानाची गोडी लागते. शालांत परिक्षेत तो जिल्ह्यातून दुसरा येतो. पुढच्या शिक्षणासाठी कोलकत्याला शिकायला जायचं ठरवतो. ओपू दूर जाणार या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. पण तरीही ती त्याला अनुमति देते. पै पै करून साठवलेली पुंजी त्याला देते. ओपूला स्कॉलरशिप मिळालेली असते. हेडमास्तरही त्याला मदत करतात. एका प्रिटिंग प्रेसमध्ये काम करून तो कॉलेजचं शिक्षण घेऊ लागतो. सुटीत गावी आईला भेटायला जातो. एक दिवस घरी राहतो. सकाळी लवकर उठून कोलकत्याला जाणारी रेल्वे पकडायची असते. तो अजून काही काळ घरी असावा असं आईला वाटत असतं. ती त्याला पहाटे उठवत नाही. त्याला जाग येते तेव्हा उशीर झालेला असतो. तो आईवर चिडतो. धुसफूस करत कपडे भरतो आणि स्टेशनवर जातो. तिकीट काढतो. आगगाडी येते. तेव्हा त्याला आईची आठवण येते. तो माघारी जातो. एक दिवसानंतर तो कोलकत्याला जातो. इथे आई आजारी पडते. वातामध्ये ओपू घरी आल्याचा तिला भास होतो. शेजारीण ओपूला कार्ड टाकते. ओपू धावत घरी येतो. तोवर सर्व संपलेलं असतं. ओपू झाडाखाली बसून अश्रू गाळतो आणि कोलकत्याला जायला निघतो.
या चित्रपटातला काळ खूपच मोठा आहे. अनेक स्थळं आहेत. त्यामुळे असेल कदाचित् पण प्रत्येक टप्प्यावर एडिटिंगने चित्रपटला गती दिलीय. ओपूचे वडील रात्री शेवटचा श्वास घेतात आणि दुस-या शॉटमध्ये कबुतरांचा थवा आभाळात झेप घेताना दिसतो. गंगेच्या घाटावरून आकाशात रेघोट्या ओढणारे कबुतरांचे थवे दिसतात. आई ओपूला घेऊन बंगालात परत जाते तेव्हा रेल्वेच्या खिडकीत ती बसलेली असते. तिच्या चेहे-यावरचे बदलणारे भाव आणि तिच्या नजरेने टिपलेली पळत्या झाडांची, गावांची, निसर्गाची दृष्यं काही क्षणात आपल्याला उत्तर भारतातून बंगालात घेऊन जातात. सत्यजित रायचे चित्रपट पाह्यले की पंचेद्रियांच्या संवेदना तीक्ष्ण होतात; आपले अनुभव, नातेसंबंध परिसराशी, निसर्गाशी घट्ट जुळलेले असतात त्यांना असलेल्या वैश्विक परिमाणाचं भान येतं.
अपराजितो मी लॅपटॉपवर पाह्यला. कानात इअरफोन घातले की पूर्ण एकाग्र होऊन चित्रपट पाहता येतो. थिएटरमध्येही आपण एकटेच असतो. तो एकटेपणा समूहातला असतो. समूहातल्या प्रत्येकाचा चित्रपटाचा अनुभव आणि आकलन वेगळं असतं. चित्रपट संपल्यावर एकमेकांशी चर्चा, गप्पा होतातच. त्यातून कलाकृतीचं आकलन अधिक समृद्ध होण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर चित्रपट पाह्यला तर ही मौज मिळत नाही.

No comments:

Post a Comment