Monday 21 December 2009

गोहाटी गुगुलिंग

ती क्षितिजाची रेषा, तिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात, सविता खिडकीतून बघत म्हणाली. मी वाचत होतो म्हणून केवळ हुंकार दिला. मला वाटलं ती गंमत करतेय.
काही वेळाने ती म्हणाली ती बघ एक बोट दिसतेय. मी डुलक्या घेत होतो. मला वाटलं ती गंमत करतेय. किंवा ढगाच्या आकाराबद्दल बोलतेय.
नंतर मी विचारलं, आपण कुठे आहोत काही कळतंय का.
सह्याद्रीच्या रांगा दिसतायत ती म्हणाली.
मी चमकलो. विमान ईशान्येला चाललंय, सह्याद्री कसा दिसेल, सातमाळ्याच्या डोंगररांगा असतील आणि खिडकीतून खाली पाह्यलं. विमान जवळपास २८ हजार फुटांवर असावं. सूर्याचा पिवळा प्रकाश आसमंतात भरून होता. वर आभाळ स्वच्छ होतं. खाली मात्र धूसर दिसत होतं. अधून-मधून डोंगरांच्या रांगा दिसायच्या. सविता मला क्षितिजाची रेषा दाखवू लागली. ती ढगांची रेषा होती. स्वच्छ आभाळातली. सविताला वाटलं ती पृथ्वीची कडा आहे, खाली निळा समुद्र आहे, एक बारका ढगाचा ठिपका तिला आगबोट वाटला होता. मी म्हटलं जमीन खाली असेल तर समुद्र कसा वर दिसेल, तेव्हा तिला नजरबंदी झाल्याचं कळलं.
कलकत्त्याला विमान धावपट्टीवर झेपावलं. आमच्या सिटा सर्वात शेवटच्या रांगेत होत्या. विमानाची चाकं धावपट्टीवर टेकल्यावर जोरदार धक्का बसला. खूप प्रवासी नव्हे पाहुणे उतरले. नवे पाहुणे विमानात आले. आता ४५ मिनिटांत गोहाटी, मी म्हटलं. त्या पाठोपाठ अनाउन्समेंट झालीच—हम गोहाटी जाएंगे...
लोकप्रिय गोपिनाथ बोरदोलोई विमानतळावर ११.३० वाजता उतरलो. विमानतळाबाहेर येईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. संध्याकाळ झाल्यासारखा प्रकाश होता. विमानतळाहून शहराकडे जाणा-या रस्त्यावर कमालीचा ट्रॅफिक होता. रस्त्याचं काम सुरु होतं. आमची टॅक्सी हळू हळू सरकत होती. ताशी ५ किमी वेगाने. आमचं हॉटेल २४ किमी दूर होतं. १९८४ आणि त्यानंतर २००५ साली मी गोहाटीला याच रस्त्याने गेलो होतो. विमानतळापासून हॉटेलपर्यंतचा प्रवास तेव्हा झकास वाटला होता. गेल्या चार-पाच वर्षात गोहाटी पूर्ण बदलून गेलंय. शहर वेगाने वाढत चाललंय. वाहनांनी भरून गेलंय. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, आठ चाकी, सर्व प्रकारची वाहनं होती. बैलगाड्या नव्हत्या. आसाममधले गाई-बैल अगदीच खुजे असतात. शेळ्या-मेंढ्याही फूट-दीड फूट उंचीच्या. १०-१५ शेळ्या आणि तितक्याच मेंढ्यांचा कळप हाकत दोन जण चालले होते. प्रत्येक जनावराच्या गळ्यात दोरी होती. सर्व दो-या एका मुख्य दोरीला बांधलेल्या होत्या. मुख्य दोरी ज्याच्या हातात होती, तो खेचेल त्या दिशेने प्राणी फरफटत जात होते.
हॉटेल होतं पलटन बाजारमध्ये. वाहनांची, माणसांची गर्दी. फेरीवाले, भाजीवाले, चहावाले, सिग्रेट-पानवाले. संध्याकाळी सराई घाटावर गेलो. तिथे पोचेपर्यंत अंधार पडला. अंधारात नदीवरच्या हाऊसबोटी आणि त्यामधली रेस्त्रां सस्पेन्स चित्रपटातले शॉटस् वाटले. नदीकाठाला लगटून असलेल्या फूटपाथने चालत होतो तर मुताचा वास. अंधार, धुकं. रस्त्यावरचे दिवे कोमेजलेले दिसत होते. रस्ता ओलांडला आणि दुस-या अंगाने चालत पुन्हा वर सराई घाटावर आलो. वाहनांना, फेरीवाल्यांना चुकवत चालावं लागत होतं. त्यात अंधार.
संध्याकाळी सहा वाजता पॅरॅडाईज रेस्त्रांमध्ये जेवायला गेलो. आसामी जेवण. तृप्त झालो. हॉटेलवर जाण्यासाठी मोबाईल फोनवरचा गुगुल मॅप पाह्यला. पॅरॅडाईजपासून आमचं हॉटेल दोन किलोमीटरवर होतं. आम्ही चालतच निघालो. गुगुल मॅप हातातच होता. चुकीचं वळण घेतलं की चार-पाच पावलं गेल्यावर लगेच कळायचं. अंधार, खड्डे, वाहनं, सिग्नल सर्वांना पायात घेत हॉटेलपर्यंत पोचलो.
त्यानंतर आसामात, मेघालयात असताना, गुगुल मॅपकडे विचारपूस करतच प्रवास करत होतो. गावाचं नाव गुगुल सर्चमध्ये टाकलं की त्यांच्या इतिहास-भूगोलाची माहिती देणा-या वेबसाईटस् हातातल्या पडद्यावर झळकायच्या. त्यांच्यावर नजर टाकली की डोक्यातले अनुभवाचे, स्मृतींचे दिवे पेटायचे. भेटणारी माणस त्यावर आणखी प्रकाश टाकायची. चाचपडत का होईना पुढे सरकता यायचं.
डिसेंबर ९, २००९

No comments:

Post a Comment