Monday, 21 December 2009

सराई घाट

विमानतळाहून गोहाटी शहरात येताना वाटेतच निलांचल टेकड्या आहेत. एका टेकडीवर कामाख्या मंदिर आहे. ब्रह्मपुत्रेच्या काठाने अर्धचंद्राकृती वळण घेतल्यावर लागतो सराई घाट. नदी खाली आणि रस्ता वर. नदीत हाऊसबोटींवरची रेस्त्रां आहेत. नदी पात्रातल्या उमानंद मंदिराकडे जाण्यासाठी होड्या, मोटारबोटी तिथेच उभ्या असतात. ब्रिटीश व्हॉईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक ढाक्याहून स्टीमरवरून इथेच उतरला होता. २७ ऑगस्ट १८७४ रोजी. तोपावेतो आसाम बंगालचाच भाग होता. लॉर्ड नॉर्थब्रुकने तो बंगालपासून वेगळा काढला. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली आणि पूर्व बंगालला आसाम जोडून टाकला. पुढे १९११ साली ही फाळणी रद्द झाली आणि आसामला पुन्हा स्वतंत्र प्रदेशाची मान्यता मिळाली. १९७२ पर्यंत आसामची राजधानी होती शिलाँग. मेघालय राज्य वेगळं काढल्यानंतर आसामची राजधानी गोहाटीला हलवण्यात आली. लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीवरच ही माहिती देण्यात आलीय. या कमानीच्या भोवती छोटीशी बाग आहे. पाच रुपये प्रवेश फी आहे. या कमानीच्या आश्रयाने काही प्रेमी युगुलं गुजगोष्टी करण्यासाठी विसावलेली असतात.
१६३१ साली मुगलांनी आसामवर निर्वाणीची चढाई केली आणि त्यावेळी झालेल्या तहात अहोम राज जयध्वज सिंघाला अनेक अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्या. आपली मुलगी त्याला शाही जनानखान्यात पाठवावी लागली. २० हजार तोळे सोनं, त्याच्या सहापट चांदी आणि ४० हत्ती हा खंडणीचा पहिला हप्ता होता. तीन लाख तोळे चांदी आणि ९० हत्ती वर्षभरात देण्याची अट होती. या अटी पूर्ण होईपर्यंत काही दरबा-यांना मुगलांकडे ओलीस ठेवावं लागणार होतं. त्याशिवाय ब्रह्मपुत्रेच्या पश्चिम आणि उत्तरेकडील प्रदेशावर पाणी सोडावं लागणार होतं. असं म्हणतात की जयध्वज सिंघाचा मृत्यु या अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्यानेच झाला. मृत्युशय्येवर असताना जयध्वज सिंघाने राज्याची सूत्रं चक्रध्वज सिंघाच्या हाती सोपवली. मात्र त्यापूर्वी परभवाचा डाग धुवून काढण्याची आण घातली. चक्रध्वजसिंघाने जैंतिया, कचारी इत्यादी राज्यांसोबत असलेल्या संबंधांमध्ये बदल घडवून आणला. सैन्याच्या उभारणीची सूत्रं लाचित बोरफुकनकडे दिली. त्या सुमारास आग्रा दरबारातून आलेल्या ब्रेकिंग न्यूजने चक्रध्वज सिंघा आणि लाचित बोरफुकन यांना मुगलांच्या विरोधात बंड करण्याचा निर्धार पक्का केला. ही बातमी होती शिवाजी महाराजांच्या पलायनाची. चार-पाच जिल्ह्यांमध्ये राज्य असणारा शिवाजी जर मुगल सत्तेला आव्हान देऊ शकतो तर आसामने मुगलांचा निर्णायक पराभवच करायला हवा, असं त्या दोघांनीही मनावर घेतलं. १६६७ मध्ये लाछित बोरफुकनने गोहाटी मुगलांच्या ताब्यातून मुक्त केलं. लष्कर आणि आरमार दोन्ही सेनांनी या लढाईत भाग घेतला. परंतु ख-या युद्धाला तोंड फुटायला अवकाश होता. गोहाटीच्या पाडावाची बातमी दिल्लीला गेल्यावर औरंगजेबाने आसामवर स्वारी करण्यासाठी राम सिंगाची नियुक्ती केली. शिवाजी महाराजांच्या पलायनानंतर राम सिंगाला मिळालेली ही पनिशमेंट ट्रान्सफर होती असं काही आसामी इतिहासकार सांगतात. राम सिंगाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश बंगालच्या सुभेदाराला म्हणजे शायस्ताखानाला मिळाले होते. त्याची बोटं तर दस्तुरखुद्द महाराजांनीच छाटली होती.
सुमारे ६० हजारांची फौज आणि ४० आरमारी नौका घेऊन राम सिंग आसामच्या मोहिमेवर आला. कोच बिहारची सेनाही मुगल फौजेला येऊन मिळाली. ही खबर मिळाल्यावर लाछित हबकला. एवढ्या प्रचंड फौजेला नमवणं सोप नव्हतं. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जबाबदारी आपल्यावर आलीय हे जाणून तो कामाला लागला.
ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर वसलेलं गोहाटी शहर हे टेकड्यांच्या रांगांनी वेढलं आहे. तिथे गनिमी काव्याने मुगलांना रोखण्याची व्यूहरचना लाचितने केली. निर्णायक लढाई ब्रह्मपुत्रा नदीत होणार होती. ब्रह्मपुत्रेच्या पात्राची रुंदी सराईघाटाकडे सर्वात कमी म्हणजे १ किलोमीटर होती. त्यामुळे तिथे मुगल आरमाराला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना लाछितने केली. त्याचा अंदाज अचूक ठरला. अहोम सैन्याने टेकड्यांच्या आश्रयाने मुगल सैन्याला रोखून धरल्याने राम सिंगाने आरमाराला आगेकूच करण्याचा आदेश दिला. निलांचल टेकड्या आणि सराईघाट यांच्या दरम्यानं असणा-या अर्धवर्तुळाकार किना-यावरील वाळूच्या ढिगा-यांवर मोर्चे बांधलेल्या अहोम सैन्याचा प्रतिकार मोडून काढून मोगल सैन्य किना-यावर उतरणार होतं. हे पाह्यल्यावर लाछित बोरफुकनच्या अंगात वीरश्री संचारली. तो आजारी होता परंतु नौकेवर स्वार होऊन तो मोगलांवर तुटून पडला. आणखी सात नौकांना त्याने आगेकूच करण्याचा आदेश दिला. त्याचं धैर्य पाह्यल्यावर माघारी वळणा-या नौकाही मोगल सैन्यावर तुटून पडल्या. अहोम सैन्याने पराक्रमाची शर्थ केली आणि मोगलांना मागे लोटले. अहोम राज्याच्या सीमेपर्यंत म्हणजे आजच्या मानस राष्ट्रीय उद्यानापर्यंत लाचितने त्यांचा पाठलाग केला. या लढाईत आसामला खाँसी, जैंतिया, नागा, कचारी यांचीही साथ मिळाली. भारतीय सैन्यामध्ये सराईघाटाच्या लढाईचा, व्यूहरचनेचा, युद्धकौशल्याचा आणि लाचितच्या नेतृत्वाचा अभ्यास केला जातो. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत लाचित बोरफुकनचा पुतळा आहे.
सराईघाटची निर्णायक लढाई जिंकल्यानंतर वर्षभरातच लाचित बोरफुकन आजारपणाने मृत्यु पावला. त्याच्या वारसदारानेच पुढे फितुरी करून गोहाटी पुन्हा मोगलांच्या हाती सोपवलं. १६८० पर्यंत मोगलांचा गोहाटीवर ताबा होता.
सराईघाटावर लाछित बोरफुकनचा पुतळा वा स्मारक हवं होतं. पण तिथे आहे लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेली कमान. १८७४ साली वाळूच्या ढिगावर उभी करण्यात आलेली ही कमान आता कलते आहे. आसाम आंदोलन १९८० च्या सुमारास सुरु झालं. लाचित बोरफुकनचा आणि सराई घाटाच्या लढाईचा विस्मृतीत गेलेला इतिहास त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी वर्तमानात आला. मोगल, ब्रिटीश, बंगाल, कोच बिहार, कचारी, नागा, खाँसी-जैंतिया आणि अर्थातच अहोम-आसामी हे प्रवाह आजही आसामचा इतिहास घडवत आहेत. मोगल-ब्रिटीश म्हणजे दिल्ली आणि आसाम म्हणजे अहोम, आसामी, बोडो, कोच राजबंशी, बंगाली, बांग्ला देशी, चहामळ्यांमध्ये काम करणारे मजूर (परराज्यातले आदिवासी), सुतिया, कचारी, असे अनेक वांशिक गट, हे समीकरण त्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे.

1 comment:

  1. An interesting bit of history from the North East. More about your adventures in Assam when you have time, please.

    ReplyDelete