Thursday 14 January 2010

भगीरथ आणि एडमंड हिलरी....

भगीरथ ही पुराणकथेतलं पात्र आहे. तपश्चर्येने भगीरथाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली, अशी गोष्ट आहे. पुराणकथा बहुधा लोककथाच असतात. त्यांचा लेखक कुणालाच ठाऊक नसतो कारण त्यांचा एक लेखक नसतोच. या कथेचा काळ बहुधा इसवीसनपूर्व असावा.
एडमंड हिलरी हा मात्र हाडामांसाचा माणूस होता. विसाव्या शतकातला. जगातलं सर्वांत उंच शिखर ज्या जोडगोळीने सर्वप्रथम सर केलं त्यापैकी तो एक.
भगीरथाचा प्रवास गंगेच्या उगमापासून मुखापर्यंत झाला असं पुराणकथा सांगते तर एडमंड हिलरी गंगेच्या मुखापासून उगमापर्यंत प्रवास केला असं इतिहासात नोंदवलं गेलंय.
भगीरथाची गोष्ट बहुधा ऐकूनच माहीती असते. चांदोबा, मुलांची मासिकं, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आणि आता टेलिव्हीजन या माध्यमांद्वारे भगीरथाच्या गोष्टीचा प्रचार प्रसार होतो.
एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग भूगोलाच्या पुस्तकात, मुलांच्या मासिकात, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, बातम्या, अनेकानेक नियतकालीक, ग्रंथ, पुस्तकं, चरित्रं आणि डिस्कवरी वा नॅशनल जिऑग्राफिकसारखे चॅनेल, यामधून आपल्याकडे पोचतात.
एडमंड हिलरीचं नाव आता अजरामर झालं आहे. पण त्याला प्रसारमाध्यमात स्थान कधीतरी मिळतं. या उलट भगीरथाची वा गंगेची गोष्ट अजूनही टिव्ही चॅनेलवर सुरु असते आणि पुढचे अनेक वर्ष राहील. गंगेलाच भागीरथी म्हणतात त्यामुळे भगीरथाचं नावही अजरामरच झालंय तेही इसवीसनाच्या पूर्वीपासून.
भगीरथाची गोष्ट बारकाईने वाचली आणि भूगोलावर ठेवली तर मात्र भगीरथाचा प्रवास मुखापासून सुरु झाल्याचं ध्यानात येईल. म्हणजे असं की भगीरथाच्या हजारो पितरांनी म्हणे समुद्रावर हल्ला केला आणि समुद्राने त्यांचा पराभव केला आणि या युद्धातच ते कामी आले, असं गोष्ट म्हणते. गंगा हजारो मुखांनी बंगालच्या उपसागराला मिळते या वास्तवाचं ते गोष्टीमध्ये झालेलं रुपांतर असावं (विश्वनाथ खैरे यावर अधिक प्रकाश टाकू शकतील).
गंगेवर धरणं बांधलेली नव्हती तेव्हा कोलकता-आग्रा-कोलकता हा प्रवास बोटीने केला जायचा. अर्थातच भगीरथ मुखापासून चालू लागल्यावर गंगेच्या खोर्‍यातील नदीचं विस्तीर्ण पात्राने त्याला मोहीत केलं असणार. म्हणूनच या नदीचा संबंध त्याने आकाशगंगेशी जोडलेला असणार. आता आकाशातली गंगा जमिनीवर अवतरायची असेल तर पृथ्वी आणि आकाश यांना जोडणारा दुवा त्यावेळी तरी हिमालयच होता. स्वर्गातून जमिनीवर यायची गंगेची तयारी नव्हतीच. ते ब्रह्मदेवाने ताडलं होतं म्हणून तर तो भगीरथाला म्हणाला, बाबारे गंगेने आकाशातून पृथ्वीवर उडी घेतली तर तिला झेलणार कोण आणि झेललं नाही तर पृथ्वीचा सर्वनाश होईल. मग ब्रह्मदेवानेच त्याला सुचवलं भोळासांब शंकर गंगेला झेलू शकतो. भगीरथाने म्हणे हजार वर्षांची तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केलं. गंगेला आपल्या जटेत झेलायला भोळासांब तयार झाला. हिमालयाची शिखरं पाह्यली तर ती जटाभारांसारखीच दिसतात. त्यावरून ही कल्पना सुचली असावी हे हिमालयात गेलेल्या कुणालाही समजू शकेल.
गंगेला शंकराची खोड मोडायची होती. म्हणून तीने सर्व शक्ती एकवटून उडी मारली. शंकराचा जटाभार कितीही मोठा असला तरी त्यालाही वेदना झाल्याचं. क्रोधित होऊन त्याने गंगेला जटाभारात पूर्ण आवळून टाकली. भगीरथाने त्याला आठवण करून दिली तेव्हा कुठे शंकराने एक बारकी धार आपल्या जटेत सोडली. गंगोत्री, गोमुख इथे गेलेल्यांना ठाऊक आहे की गंगेचा उगम हिमनदीतच आहे.
शंकराने सोडलेल्या गंगेच्या बारक्या प्रवाहाला घेऊनच भगीरथ निघाला. गंगा थोडीच निमूटपणे त्याच्यापाठून जाणार. ती रोरावत, पहाडांना टकरा देत, वळणं घेत, भगीरथाला चकवा देण्याचा पुरेपुर प्रयत्न करत धावत होती. ती क्रुद्ध होतीच. गंगेच्या रौद्र रुपामुळेच तिला भागीरथी म्हणतात. भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमावर गेलं तर ते सहज कळतं, असं संजीव माझा थोरला भाऊ म्हणाला. तो दरवर्षी हिमालयात काही दिवस हिंडत असतो.
गंगेला शांत करणं भगीरथाच्या आवाक्याबाहेर होतं. समोर जे येईल ते उध्द्‍वस्त करत ती चालली होती. डोंगर, शिळा, झाडं, जंगलं काहीही तिच्या कचाट्यातून सुटत नव्हतं. अनेकदा ती भगीरथाच्या पुढेच धावत असायची. भगीरथ बरंच चालून गेला पण त्याला मागे वा पुढे गंगा भेटेना. तेव्हा तो हैराण झाला. गंगेने जन्हू ऋषींचा आश्रमच गिळंकृत केला होता. त्यामुळे चिडलेल्या जन्हूंनी आख्खी गंगाच पिऊन टाकली होती म्हणे. भगीरथाने जन्हूंना साकडं घातलं. मग जन्हूंनी तिला कानातून बाहेर काढली. म्हणून तर तिला जान्हवी म्हणतात. हा प्रदेश बहुधा ऋषीकेश असावा. हेमंत कर्णिक (माझा हिमालयप्रेमी मित्र) म्हणतो ऋषीकेश ही पर्वतरांगांची सुरुवात आहे तर हरद्वार हा मैदानाचा शेवट. तपश्चर्या करणार्‍या ऋषींचं शरीर मातीत विलीन झालं केवळ केस उरले म्हणून त्या प्रदेशाला ऋषीकेश म्हणतात, असं पुराणं सांगतात. म्हणजे नदीच्या खोर्‍याची उकल जन्हू ऋषींच्या गोष्टीने केली.
त्यानंतर गंगेच्या मुखापर्यंत येताना प्रत्येक घाटावर गोष्टीच गोष्टी आहेत. पण भगीरथाचं ऐतिहासिक कार्य गंगेला जन्हू ऋषींच्या तावडीतून सोडवल्यावर संपलं. मग त्याने आपल्या पितरांचं तर्पण केलं. गंगेच्या मुखापासून भगीरथाची गोष्ट सुरु होते. नदीच्या प्रत्येक टप्प्याचं आकलन करून घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात. या गोष्टींची गंमत केवळ कल्पनाशक्ती वा अद्‍भुतरम्यतेत नाही, त्यांची मुळं वास्तवात आहेत आणि ते वास्तव म्हणजे केवळ भूगोल नाही तर, निसर्गातली घटितं--नदी, माणूस आणि चराचरसृष्टी यांचे वास्तवातले संबंध यांची उकल ही पुराणकथा करते. सर्वच कला या असत्य असतात पण त्या सत्याच्या सर्वाधिक जवळ असतात, या पिकासोच्या म्हणण्याची आठवण व्हावी अशी ही पुराणकथा आहे (हीच कशाला जवळपास सर्वच पुराणकथा अशाच आहेत).
एडमंड हिलरीच्या गंगाप्रवासाच्या बारीकसारीक नोंदी ग्रंथात, पुस्तकात आहेत. हिलरी वा त्याच्या साथीदारांनी काढलेले फोटो वा फिल्मही आहे. मात्र हिलरीच्या गंगा पर्यटनाने एकही गोष्ट सांगितली नाही. त्यांनी वास्तवाच्या नोंदी चोख ठेवल्या आहेत. परंतु तरिही त्याचं पर्यटन सत्याप्रत सोडाच तथ्यापर्यंतही पोचलं नाही. भगीरथाने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या त्यामुळे संपूर्ण भारतातल्या जनतेचं भावविश्व समृद्ध झालं. भाषा समृद्ध झाल्या. अनेक वाक्‍प्रचार, म्हणी या पुराणकथेमुळे रुढ झाल्या. माणसा-माणसातली नाती, माणूस-निसर्ग आणि अवघं विश्व यांच्यातली नाती अशा अनेक संबंधांवर पुराणकथांनी प्रकाश टाकला. आणि या गोष्टींमध्येच बेमालूनपणे निसर्गातील घटितांचा कार्यकारण भावही पकडला.
पुराणकथांच्या या अजब रसायनाला मॅजिकल रिअ‍ॅलिझम म्हणता येईल, अशी चर्चा युरोप-अमेरिकेतले आणि भारतातलेही साहित्य रसिक करू लागले आहेत. काफ्कापासून सुरु झालेला मॅजिकल रिअ‍ॅलिझमचा (वाचाः विलास सारंग यांचं सिसिफस आणि बेलाक्वा) युरोपियन साहित्यातला प्रवाह सरस्वती नदीसारखा लुप्त झाला त्यानंतर दक्षिण अमेरिकत प्रकट झाल्यावर भारतीय पुराणकथांचा अर्थ लावू लागला, असं म्हणावं लागेल. हे म्हणजे वास्को द गामाने भारताला जायचा मार्ग शोधला, कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, असं युरोप केंद्रीत बोलणं होईल.

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. नदीचं मुख हा शब्द इंग्रजीतील रिव्हर-माऊथ या शब्दावरूनच तयार केला असावा. नदी समुद्राला मिळते त्या स्थळाला वेगवेगळ्या भाषेत तिकडच्या भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळी नावं असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ कोकणात त्यासाठी खाडी हा शब्द वापरला जातो. केरळातील बॅक वॉटर्स म्हणजे नदीच्या मुखाशी बांधलेले बंधारे आहेत. जेणेकरून समुद्राचं पाणी नदीत येत नाही पण नदीतलं अतिरिक्त पाणी समुद्रात सोडलं जातं. मल्याळम भाषेत त्याला काय शब्द आहे, तो मला ठाऊक नाही.

    नदी समुद्राला जिथे मिळते तिथे उभं राह्यलं तर त्या स्थळाला नदीचं मुख का म्हणतात ते सहज समजतं. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी नदी प्राशन करते तर ओहोटीच्या वेळी नदीचं पाणी समुद्रात सोडते म्हणजे उलटी करते. त्यामुळे रिव्हर-माऊथ हा शब्द प्रचलित झाला असावा.
    नदीचं मूळ या शब्दाचा डोकं वा चेहरा, याच्याशी काहीही संबंध नाही. वृक्षाच्या मूळाप्रमाणे नदीचं मूळ हाच अर्थ आहे. म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे की, नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये कारण दोघांच्याही मूळाशी चिखलच असतो.

    अधिक माहिती सरिता कोषात सापडू शकेल. मराठी भाषेत दोन खंडामध्ये भारतातील नद्यांचा कोष प्रसिद्ध झाला आहे.

    मी मॅजिकल रिअ‍ॅलिझमवर अधिक लिहावं असं वैशालीने सुचवलं. तुम्ही मला नदी मुख या शब्दाचं कूळ विचाराताय आणि ब्लॉग वेगळ्याच विषयावर आहे. लिहिलेलं वाचल्यावर प्रत्येकाला काय घ्यावसं वाटतं, हे वाचल्यावर गंमत वाटते आणि उद्‍बोधनही होतं.
    लिखाण करताना हे मुद्दे ध्यानी घेतलेच पाहिजेत.
    प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. liked Bhagirath blog,, It is really amazing how you link purankatha. one drawback I find in my childhood is I did not hear stories. In kathamala they were so keen that we hear only science dominated or karunamay stories That I hardly remember any adbhut ,magical experience

    Sadhana.

    ReplyDelete
  4. tujhya likhanachya pieces madhli imagery khoop vichar karayla lavnari aste. natkat jenva symbolism neet vaparla jato tenva jo ananda hoto tasa mala baryachda hota tujhe pieces vachtana. Karan aplyakade natka kade phar kami loka likhanacha independent form mhanun baghtat. To form apan seriously ghenari vyakti asu tar pratyek velela itar form madhe kahitari 'halavnara'/ vichar karayla lavnara sapadla ki te natkat kasa translate hou shakel yacha vichar karayla hota. He khalcha vachun me (natkatlya) juxtaposition cha khoop vichar kela.

    Irawati

    ReplyDelete
  5. hallo
    can u write more on magical realisum?
    vaishali chitnis

    ReplyDelete
  6. Naniwadekar has left a new comment on your post "भगीरथ आणि एडमंड हिलरी....":

    नदीचे मुख (river-mouth) हा शब्द मराठींत कधीपासून अस्तित्वात आहे? कारण तोंडाचा संबंध प्राशनाशी आहे, आणि mouth-पाशी तर नदी समुद्रात विसर्जित होते. इंग्रजीतही जिथे सागरा सरिता मिळते त्या ठिकाणाला mouth का म्हणतात, कळलेलं नाही. 'नदीचे मूळ' हा शब्दप्रयोगही डोकं-चेहरा असा वरचा भाग सुचवतो.

    नानिवडेकर


    नानिवडेकरांच्या शंकेला उत्तर देण्यासाठी मी कॉमेंट लिहिली पण का कोणास ठाऊक त्यांची कॉमेंट पुसली गेली. म्हणून ती पुन्हा प्रसिद्ध करतोय.
    सुनील

    ReplyDelete