Showing posts with label जयंत पाटील. Show all posts
Showing posts with label जयंत पाटील. Show all posts

Monday, 6 September 2010

राष्ट्रवादीचा आंतरराष्ट्रीयवाद

राष्ट्रवादी काँग्रेस या भारतातील राजकीय पक्षाचं अधिवेशन अमेरिकेत पार पडलं. सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांच्या अधिवेनाचं स्थळ पक्षाच्या रणनीतीनुसार ठरतं. म.गांधी काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्यावर काँग्रेसची अधिवेशनं मुंबई, कोलकता, सूरत अशा शहरातून फैजपूर सारख्या गावांमध्ये होऊ लागली. भाजपचं एक अधिवेशन केरळमध्ये झालं होतं. कम्युनिझम हा वैश्विक विचार आहे. नानासाहेब गोरे यांनी कम्युनिझमचा मराठी अनुवाद विश्वकुटुंबवाद असा केला होता. मात्र यापैकी कोणत्याही पक्षाचं अधिवेशन परदेशात झाल्याचं ऐकिवात नाही. संकुचित अस्मिता जपणार्‍‍या संस्था-संघटनांनाच परदेशात अधिवेशनांची गरज भासते.

भारत ब्रिटीश साम्राज्याचा भाग होता त्यावेळी भारतातील क्रांतीकारक वा स्वातंत्र्यप्रेमी इंग्लड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, अफगाणिस्तान, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका येथे विविध संघटना, संस्था स्थापन करून भारतातील स्वातंत्र्यलढ्याला मदत करत असत. स्वातंत्र्यानंतर काश्मीर, नागालँड, पंजाब, आसाम, तमिळनाडू येथील फुटीरतावादी संघटना-संस्थांनी परदेशामध्ये आपआपल्या संघटनांची कार्यालयं उघडली. विश्व हिंदू परिषदेच्या शाखा अनेक देशांमध्ये स्थापन झाल्या. भारतातून आध्यात्मिक गुरुंची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरु होती आणि आजही या धंद्यात बरकत आहेच. त्याशिवाय मराठी, बंगाली, पंजाबी, तमिळ इत्यादी विविध भाषिक अस्मिताही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेतच. मराठी साहित्य संमेलनं, नाट्यसंमेलन आता अमेरिकेत वा दुबईत होऊ लागली आहेत.

मराठी समाजात असा समज आहे की परदेशात स्थायिक झालेल्या मराठी माणसांमध्ये ब्राह्मणांची संख्या मोठी आहे. माझा एक मित्र ब्राह्मणांबद्दल म्हणजे ब्राह्मण्याबद्दल बोलताना म्हणाला, ब्राह्मणांचं मातीशी असलेलं नातं तुटलं त्यामुळे ते बहुजनांच्या विरोधात गेले. म्हणजे असं की म.गांधींच्या खुनानंतर ब्राह्मणांना गावं सोडून शहरात स्थलांतर करणं भाग पडलं आणि त्यानंतरच्या पिढीने परदेशातच बस्तान ठोकलं. हे विश्लेषण ढोबळमानाने बरोबरच आहे. माझ्या माहितीतल्या ब्राह्मण कुटुंबातली एक तरी व्यक्ती परदेशात स्थायिक झालेली आहे. पण गावं फक्त ब्राह्मणांनीच सोडली नाहीत. महार, चांभार, सुतार, लोहार, इत्यादी अन्य बलुतेदारही शहरात आले. जमिनी कसणार्‍यां कुणबी-मराठा-कुणबी, माळी, वंजारी इत्यादी समाजातील अनेक लोकही शहरात स्थायिक झाले. महाराष्ट्रातील ४०-४५ टक्के लोक शहरात राहतात म्हणजे सर्व जाती-जमातीचे लोक शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. परदेशात स्थायिक होण्यात ब्राह्मणांनी आघाडी घेतलेली असली तरी अन्य जाती समूहांचे लोकही मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थायिक झाले आहेत. एनआरआय मराठी ब्राह्मणेतर समाजात अर्थातच मराठा समूहाची लोकसंख्या अधिक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने अमेरिकेत अधिवेशन आयोजित केलं.

परदेशात मूळ असणारी व्यक्ती भारताची पंतप्रधान होता कामा नये या मुद्द्यावर शरद पवार, पूर्णो संगमा आणि तारीक अन्वर या तिघांनी काँग्रेस पक्षातून आपली हकालपट्टी करून घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं प्रयोजनच संपुष्टात येतं, असा निर्वाळा या पक्षाचेच माजी सदस्य, रत्नाकर महाजन यांनी दिला. शरद पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याकडे राष्ट्रीय दृष्टीकोन नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण स्पर्धा असेल मात्र या संबंधांतून काँग्रेस पक्षाचा कारभार अधिकाधिक लोकशाहीवादी करणं, काँग्रेस पक्षातील पक्षश्रेष्ठी वा हाय कमांड यांची पकड ढिली करणं जेणेकरून काँग्रेस पक्षाची वाटचाल जवाहरलाल नेहरूंच्या काळातील मूल्यांवर व्हावी, हे शरद पवारांचं उद्दिष्ट असावं. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक पाया मराठा समाज हा असला तरीही अन्य जातिसमूहांना पक्षनेतृत्वात पवारांनी जाणीवपूर्वक स्थान दिलं आहे. पूर्णो संगमा, तारिक अन्वर हे पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत तर डी. पी. त्रिपाठी हे पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ब्राह्मण यांना पवारांनी राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वात स्थान दिलं आहे. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री आहेतच पण त्यांचे पुत्र आमदार तर पुतणे खासदार आहेत. तिन्ही भुजबळ नाशिक जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. पुणे जिल्हा पवारांचा तर नाशिक भुजबळांचा. मधुकर पिचड हे आदिवासी समाजातले आहेत त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलंय. अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेची सूत्रं बिगर-मराठा, बिगर-महाराष्ट्रीय व्यक्तींकडे सोपवण्यात आली आहेत.  परदेशस्थ भारतीयांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास सर्वोतपरी मदत करणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परदेशातील शाखांचं कामाचं स्वरूप असेल.  परदेशी राष्ट्रवादी हे एक प्रॉफिट मेकिंग व्हेन्चर असेल, अशी पक्षनेतृत्वाची दृष्टी आहे.

जयंत पाटील, आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक मराठा-मराठा, मराठा-बिगर मराठा नेतृत्वातील सुंदोपसुंदी पवारांनी नियंत्रणात ठेवली आहे. प्रत्येक जातीच्या नेतृत्वाचा आपल्या पक्षात उत्कर्ष करण्याचं एक राजकीय मॉडेल (एखाद्या बिझनेस मॉडेलप्रमाणे) पवारांनी विकसीत केलं आहे. काँग्रेस जेव्हा या मॉडेलप्रमाणे चालू लागेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरजच भासणार नाही. शरद पवारांची ही दृष्टी त्यांच्या पक्षातील दुसर्‍या क्रमांकाच्या फळीने आत्मसात केली नाही तर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिरफळ्या उडतील.