Showing posts with label Jatin Desai. Show all posts
Showing posts with label Jatin Desai. Show all posts

Wednesday, 29 June 2011

जे डे

ज्योतिर्मय डे या मुंबईतील पत्रकाराची हत्या छोटा राजन यांच्या सांगण्यावरून झाली असं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. मारेकर्‍यांनेच तसा जबाब पोलिसांना दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई एका मराठी वृत्तवाहिनीवरच्या कार्यक्रमात म्हणाले की त्यांचा पोलिस तपासावर विश्वास नाही. त्याच कार्यक्रमात सहभागी झालेले वृत्तवाहिनीचे संपादक, निखिल वागळे यांनी छोटा राजनच्या २००८ सालच्या एका मुलाखतीचा हवाला देऊन सांगितलं की छोटा राजन काँट्रॅक्ट किलिंग म्हणजे सुपारी घेऊन कोणाला ठार मारत नाही. दस्तुरखुद्द छोटा राजनच असं सांगतोय तर पोलिस कशाच्या आधारावर म्हणतात की जेडे यांची हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाली, असा सवालही वागळे यांनी केला. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दुसर्‍या ज्येष्ठ पत्रकार, स्मृती कोप्पीकर यांनीही जेडे यांच्या स्वच्छ चारित्र्याची ग्वाही दिली आणि जे डे संबंधात बातम्या देताना पत्रकारांनी म्हणूनच भान बाळगायला हवं, असं मत व्यक्त केलं.


निखिल वागळे, जतीन देसाई आणि स्मृती कोप्पीकर हे लढाऊ पत्रकार आहेत. पत्रकारांचे हक्क आणि कर्तव्य याबाबत ते जागरूक असतात, पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरतात. जे डे यांच्या हत्येच्या निषेधात मुंबईत पत्रकारांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनाही भेटलं. या शिष्टमंडळात द हिंदू या दैनिकाचे संपादक, एन. राम यांच्यासह आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे संपादक, निखिल वागळे यांचाही समावेश होता. जे डे यांच्या हत्येचा तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. जे डे हे एक इमानदार पत्रकार होते, त्यांनी कधीही तोडबाजी केलेली नाही, असा निर्वाळा माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिला होताच. जे डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशनही भुजबळ यांच्या हस्ते झालं होतं. जे डे यांच्याबद्दल पत्रकारांना आदर होता. ते मितभाषी होते. दुसर्‍या पत्रकाराला मदत करायला सदा तत्पर असत, आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ तरूण पत्रकारांना मिळावा या भावनेने ते काम करत. त्यांच्या सोर्सिंग नेटवर्कबद्दल सर्वांनाच आदर होता. त्यांच्या हत्येच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळेच मिळाला.

जे डे यांच्या हत्येप्रकरणी सात मारेकर्‍यांना अटक झाल्यावर मात्र निखिल वागळे, जतीन देसाई या झुंजार पत्रकारांनी पोलिसांचं अभिनंदन करण्याऐवजी त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह लावणं पसंत केलं. पोलिसांनी केलेला तपास योग्य आहे की नाही याची खातरजमा न्यायालयात झाल्यानंतर या प्रकरणीचं सत्य बाहेर येऊ शकेल. परंतु त्या आधीच पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह लावणं, तेही तीन वर्षांपूर्वीची छोटा राजनची मुलाखत आधाराला घेऊन हे जबाबदार पत्रकारितेचं लक्षण नाही. जे डे यांची हत्या करण्यामागे छोटा राजनचा हेतू काय होता, त्यामागचं कारण काय होतं हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेलं नाही. एनडीटिव्ही इंडिया या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, प्रमुख मारेकर्‍याने पोलिसांना सांगितलं की तो जे डे यांना ओळखत नव्हता. त्याला एवढंच सांगण्यात आलं की ज्याची गेम करायची आहे तो दाऊद टोळीचा माणूस आहे. त्याच बातमीत असंही सूचित करण्यात आलं होतं की छोटा राजन हलक्या कानाचा असल्याने त्याने जे डे ला ठार करण्याचा आदेश चुकीच्या माहितीवर विसंबूनही दिला असावा. जे डे यांनी दाऊद टोळीतील कुणा गुंडाची मुलाखत वा उद्धरणं घेतल्याने वा बातमीत वापरल्याने छोटा राजनला सजग झाला असंही बातमीत म्हटलं होतं. जे डे यांनी परदेशात जाऊन छोटा राजनची भेट घेतली होती, दाऊदच्या हस्तकाची मुलाखत वा उद्धरणही त्यांनी परदेशात जाऊनच घेतलं होतं, अशी माहितीही सदर बातमीत दिली होती.

ही सर्व माहिती बातमीदाराला कोणी दिली, त्याचा उल्लेख बातमीत नव्हता. परंतु ही माहिती बहुधा पोलिसांनीच प्लांट केली असावी किंवा दिली असावी. कारण गुंडटोळ्यांकडे अशी माहिती देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नसावेत. हत्या झाल्यापासून केवळ १७ दिवसात, सर्वच्या सर्व सात मारेकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना कसून तपास करावा लागला असेल. आणि दरम्यान भरपूर माहिती आणि क्लू त्यांच्यापाशी आले असावेत, असा तर्क करता येतो. जे डे यांना आपले सोर्सेस नीट सांभाळता आले नसावेत वा केव्हा कोणती व कोणाची बातमी द्यावी याचं त्यांचं गणित चुकलं असेल एवढंच आपण या माहितीच्या आधारे म्हणू शकतो.

जनहित डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणार्‍या बातमीदारीत असा पेच फार कमी वेळा उभा राहतो. एखादी बातमी वा माहिती देत असताना वार्ताहराने आपली नैतिकता कशी सांभाळावी ? बातमी ताजी, सत्य आणि पूर्ण असली पाहीजे ही खबरदारी बातमीदाराने घेणं अपेक्षित असतंच पण त्याबरोबर आपण जे काही छापतो आहोत—विषय आणि व्यक्तींविषयी, ते प्रामाणिक आहे का, जबाबदार आहे का, योग्य आहे का, विषय आणि व्यक्ती विषयी सहानुभूती बाळगणारं आहे का आणि त्यांचा आदर करणारं आहे ना, असे प्रश्न बातमीदाराने स्वतःलाच विचारायचे असतात. यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर संपूर्ण बातमी पुन्हा लिहायला हवी. जनहित डोळ्यासमोर बातमीदारी करताना ही शिस्त पाळता येते. या शिस्तीचा भंग जे डे यांनी केला होता का ? या प्रश्नाचं उत्तर कदाचित् आपल्याला कधीच मिळणार नाही. परंतु पत्रकारांनी आपल्या सहकार्‍यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत न्याय मागताना, आंदोलन करताना, पोलिस तपासावर अविश्वास व्यक्त करताना, बातमीदारीची आणि पत्रकारितेची नैतिकता आपण किती आचरणात आणतो याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. अन्यथा पत्रकाराची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना वा हल्लेखोरांना अटक झाल्यावरही पोलिस तपासाबाबत नापसंती आणि अविश्वास जाहीरपणे व्यक्त करण्याची नोबत येईल.