कमरेला लंगोटी, डोक्याला मुंडासं, खांद्यावर घोंगडी या मराठी शेतकर्याच्या वेशात महात्मा जोतिराव फुले, ड्यूक ऑफ कनॉटच्या भेटीला गेले. दागदागिन्यांनी मढवलेल्या उंची वस्त्रांमधील सरदार आणि सरदारपुत्रांना खडसावत त्यांनी त्यांनी ड्यूकला सुनावलं की खरा भारत खेड्यांमध्ये राहतो. इंग्लडच्या राणीला भारताची सद्यस्थिती सांगायची असेल तर आपण एखाद्या खेड्यामध्ये जा आणि शहरातील अस्पृश्यांच्या वस्तीला भेट द्या, अशी विनंतीही त्यांनी इंग्लडच्या राजपुत्राला केली. ही गोष्ट आहे १८८८ सालची.
१९३१ साली महात्मा गांधी गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले होते. इंग्लडचा राजाने—किंग जॉर्ज पाचवा, त्यांना चहासाठी निमंत्रण दिलं. राजाचं निमंत्रण हा आदेश असतो. त्याचं पालन करायचं तर राजवाड्यात जाण्याचा पोषाख घालूनच जावं लागतं, असं गांधीजींना सांगण्यात आलं. पण गांधीजींनी आपला वेश बदलण्यास नकार दिला. अंगावर खादीची शाल, कमरेला पंचा आणि पायात खडावा या वेशात गांधीजी बकिंमहम पॅलेसमध्ये गेले. राजा चहाचे घुटके घेताना, गांधीजी त्यांच्यासाठी खास मागवलेलं बकरीचं दूध पित होते.
म.फुले व्यवसायाने कंत्राटदार वा उद्योजक होते. म. गांधी वकील होते. मात्र देशाचं प्रतिनिधीत्व करताना त्यांनी देशवासीयांची वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला नाही की दारिद्र्याचं प्रदर्शन करून देशवासियांना आर्थिक मदत द्यावी याची याचना केली नाही. पारतंत्र्यात भारतीय जनता वा तिचे पुढारी यांना दारिद्र्याची लाज वाटत नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र पुढार्यांना देशातील दारिद्र्याची शरम वाटू लागली. खर तरं दरिद्री लोकांचीच त्यांना लाज वाटू लागली. नेहरू जेव्हा परदेशी पाहुण्यासोबत मुंबईत यायचे तेव्हा विमानतळावरून शहरात येण्याच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपड्यांवर पांढरी कापडं पांघरून दारिद्र्य झाकण्याचा शिरस्ता रूढ झाला होता.
२०१० सालात गांधी आणि फुले यांचा वारसा सांगणार्या भारतीय राजकारण्यांनी मात्र त्यांच्याकडे स्वाभिमान सोडाच पण आत्माभिमानाचीही उणिव आहे हे जगाला दाखवून दिलं. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यक्रमाला येणार्या निमंत्रितांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीही नावं होती. अन्य पाहुण्याप्रमाणेच त्यांच्याकडेही ओळखपत्राची मागणी केली जाईल, अशी सूचना अमेरिकन दूतावासाने दिली. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ त्यामुळे नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही यासंबंधात नाराजी व्यक्त केली जात आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या. पण मुंबईकर मात्र अमेरिकन दूतावासाच्या या पवित्र्याने दुखावले नाहीत. दूतावासाने दिलगिरी प्रदर्शित केल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबामांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ओबामांचं विमान भारतातून इंडोनेशियाला रवाना झाल्यावर दोघांनाही मंत्रीपदावरून दूर व्हावं लागलं. जनतेत सोडाच आपआपल्या पक्षात त्यांचं काय वजन आहे हे त्यामुळे स्पष्ट झालं.
म. फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ छगन भुजबळांनी ओबामा यांना भेट दिला. हा ग्रंथ जोतिरावांनी वर्णभेदाच्या विरोधात आंदोलन करणार्या अमेरिकेतील काळ्या लोकांना (त्या वेळच्या भाषेत निग्रो) अर्पण केला होता. गुलामगिरीची अर्पण पत्रिकाही इंग्रजी भाषेतच होती. या ग्रंथात जोतिरावांनी हिंदु धर्माची समीक्षा केली आहे. भारतात आर्य ब्राह्मण इराणातून समुद्रमार्गे आले आणि त्यांनी इथल्या भूमिपुत्रांवर गुलामगिरी लादली असा सिद्धांत या ग्रंथात आहे (भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीतही या सिद्धांताला पुष्टी देण्यात आलीय). युरोपातून समुद्रमार्गे अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या परकीयांनी अमेरिकेतील मूळ रहिवाशांचा निःपात केला आणि आफ्रिकेतील काळ्यांना गुलाम केले, हे सांगून जोतिरावांनी अमेरिकन-आफ्रिकन आणि शूद्रातिशूद्र या समूहांची परिस्थिती समान आहे या तथ्याकडेही जोतिरावांनी लक्ष वेधलं आहे.
आजच्या परिस्थितीत म. फुलेंचा, शेतकर्याचा असूड हा ग्रंथ ओबामांना भेट द्यायला हवा होता. शेतकर्यांना लुटणार्या भट-ब्राह्मणांवर याही ग्रंथात जोतिरावांनी कोरडे ओढले आहेत. मात्र त्या सोबतच इंग्रजी राजवटीच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय शेतकर्यांची स्थिती बिघडली आहे यावरही जोतिरावांनी असूड हाणला आहे. अमेरिकेतील शेती उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली व्हावी हा विषय ओबामांच्या अजेंड्यावर होता. अमेरिकेच्या या मागणीला भारत धूर्तपणे बगल देत आहे. विकसीत देशांनी आपआपल्या देशातील शेतीला खुली आणि छुपी अनुदानं देण्याचं थांबवलं तरच विकसीनशील देश त्यांच्या बाजारपेठा शेती उत्पादनासाठी खुल्या करण्याचा विचार करतील, अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. सध्याचे केंद्रीय शेतीमंत्री आणि छगन भुजबळ यांचे नेते, शरद पवार यांनी ही भूमिका अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याच भूमिकेचा अतिशय तोलून मापून पण ठामपणे उच्चार केला. याच भूमिकेचा १९ व्या शतकातील उद्गार म्हणजे शेतकर्याचा असूड हा ग्रंथ.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्यूगो शावेझ यांनी ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका हा ग्रंथ ओबामांना भेट दिला. अमेरिकेने केलेला लॅटिन अमेरिकन राष्ट्रांच्या शोषणांचा इतिहास एदुआर्दो गॅलिनो या लेखकाने या ग्रंथात पुराव्यानिशी मांडला आहे. गॅलिनो हा थोर लेखक असला तरीही त्याची पुस्तकं भारतात वा जगात सहजपणे उपलब्ध होत नव्हती. शावेझ यांनी ओबामांना त्याचं पुस्तक भेट दिल्यावर महिन्याभरात त्या पुस्तकाच्या नव्या आवृत्या निघाल्या. शावेझ अमेरिकेच्या विरोधात अतिशय कडवी आणि झुंझार भूमिका घेतात त्यामुळे त्यांनी हा ग्रंथ ओबामांना देण्यात औचित्यही होतं.
भुजबळांनी संघर्ष केला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याशी. त्यांच्याकडून राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय शहाणपणाची अपेक्षा करणंच व्यर्थ आहे. असे नेते स्वतःला म. फुलेंचे वारसदार समजू लागले आहेत.
Showing posts with label Obama. Show all posts
Showing posts with label Obama. Show all posts
Thursday, 11 November 2010
Subscribe to:
Posts (Atom)