Showing posts with label Phanishwarnath Renu. Show all posts
Showing posts with label Phanishwarnath Renu. Show all posts

Tuesday, 17 August 2010

हिंदू आणि रेणू

समाजात बोलल्या जाणार्‍या भाषेचा अवकाश प्रचंड असतो. त्यापैकी फारच थोडा ऐवज म्हणजे शब्द, शब्दप्रयोग, त्यांचे विविध अर्थ, वाक्यरचना, इत्यादी साहित्यात येतो. साहित्यिक भाषेच्या कक्षा रुंदावणं, ती अधिक समावेशक करणं हे काम लेखकाने करायचं असतं. फणिश्वरनाथ रेणू यांची मैला आँचल ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत आधुनिक हिंदी साहित्याने लोकभाषेची, लोकसाहित्याची केवळ तोंडदेखली दखल घेतली होती. मैला आँचल या कादंबरीत पहिल्यांदा बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या मैथिली भाषेला मान्यता देण्यात आली. महात्मा गांधी या कादंबरीत गन्ही महत्मा होतात. आंड ठेचलेला बकरा, खस्सी म्हणून अवतरतो. हिंदी साहित्यातील मैलाचा दगड म्हणून ही कादंबरी आज ओळखली जाते. परंतु पन्नासच्या दशकात ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा ही हिंदी भाषेतली कादंबरी नाही अशी टीका तिच्यावर करण्यात आली होती. मराठी साहित्यात भाषिक अवकाश विस्तारण्याचं काम लिटल मॅगेझिनच्या चळवळीने सजगपणे केलं. नेमाडे या चळवळीतले बिनीचे शिलेदार होते. कोसलाच्या यशात भाषेचाच मोठा वाटा आहे. गल्लीच्या नाक्यावरच्या मवाल्यांची भाषा मराठी साहित्याला ठाऊकच नव्हती, भाऊचा धक्का म्हणतात तो तोच, असं अशोक शहाणे यांनी एका लेखात म्हटलं आहे. हिंदू मध्ये अहिराणी, खानदेशी, मराठवाडी, अशा अनेक मराठीचे नमुने आहेत. महानुभावी गद्य ते अरुण कोलटकर यांच्यापर्यंतच्या कवितांची उद्धरणं आहेत. हिंदी, उर्दू, खडी बोली, गुजराती असे अनेक भाषांचे तुकडे आहेत. मराठी साहित्याची भाषा संपन्न करण्याचा वसा नेमाडे यांनी निष्ठेने सांभाळला आहे.
मैला आँचल (मळलेला पदर) ही कादंबरी आँचलिक (प्रादेशिक) असल्याचं रेणू यांनी स्वतःच म्हटलंय. प्रादेशिक भाषेत लिहिलेली, प्रदेशाचं वर्णन करणारी वा प्रादेशिक आशयसूत्र असणारी कादंबरी म्हणजे प्रादेशिक कादंबरी नाही. लोकसंस्कृतीमूलक कादंबरी म्हणजे आँचलिक कादंबरी. अर्थातच या कादंबरीत व्यक्तिवाद, व्यक्तीस्वातंत्र्य या पाश्चात्य मूल्यांना कळीचं स्थान नसतं. नेमाडे यांच्या अन्य कादंबर्‍यांच्या तुलनेत हिंदू सर्वाधिक लोकसंस्कृतीमूलक आहे. व्यक्तिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांबाबत नेमाडे यांना असणारा तिटकारा या कादंबरीत अधोरेखित करण्यात आलाय.
फणीश्वरनाथ रेणू १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सशस्त्र क्रांतिकारक होते, नेपाळमधील राणाशाहीच्या विरोधातील आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. समाजवादी आंदोलनात ते सक्रीय होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती आंदोलनातही ते सामील झाले. रेणू यांचे नायक त्यामुळेच राजकीय वा सामाजिक कृती करणारे असतात. नेमाडे यांची भाषिक कृतीवर नितांत श्रद्धा आहे. मुलाखतींमध्ये त्यांनी तसं स्पष्ट म्हटलं आहे. नेमाडेंचे नायकही प्रामुख्याने भाषिक कृती करणारेच आहेत. पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील किंवा हिंदूमधला खंडेराव प्रामुख्याने भाषिक कृतीच करतात. ज्ञानाची बाजू कोणीतरी सांभाळायला हवी की नाही, असं खंडेराव स्पष्टच सांगतो. भाषिक कृतीवर निष्ठा असणार्‍या लेखकाचं समाजाचं आकलन आणि सामाजिक-राजकीय कृतीकडे झुकणार्‍या लेखकाचं आकलन यात फरक असतो. खंडेरावाला मोरगाव हे रामराज्य वाटतं. विविध धर्म, पंथ, जाती या गावात गुण्यागोविंदाने नांदत असतात. गरीबी असते, मागासलेपणा असतो. पण त्यात काहीच वाईट नसतं. शोषण वाईट असतं, असं खंडेरावच सांगतो. हिंदू मध्ये जातिव्यवस्थेच्या शोषणाची केवळ दखल घेण्यात आलीय. या शोषणाच्या सामाजिक, राजकीय अंगांचं चित्रण करण्यात आलेलं नाही. मोरगावातले लोक राजकीय दृष्ट्याही एकोप्यानेच राहतात, अशी समजूत होते. त्या गावातले आर्थिक, सामाजिक, राजकीय अंतर्विरोध समजत नाहीत. मैला आँचल ही कादंबरी मेरीगंज या गावाभोवतीच फिरते. या एका गावात रेणूने संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या ताण्याबाण्यांचं दर्शन घडवलं आहे. मैला आँचल वाचल्यावर काँग्रेसचा जनाधार मोठा असला तरीही ब्राह्मण, मुस्लीम आणि दलित हा त्या पक्षाचा आधार आहे हे कळतं. यादवांच्या नेतृत्वाखाली अन्य मागासवर्गीय जाती समाजवादी पक्षांच्या झेंड्याखाली संघटीत होत आहेत हे समजतं. आदिवासी या राजकीय प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत याचंही ज्ञान होतं. राजपूत, बनिया यांचा पाठिंबा जनसंघाला आहे हे समजतं. मैला आँचल वाचल्यावर बिहारच्या राजकारणाबद्दल वाचकाला कमालीची स्पष्टता येते. अरविंद दासचं रिपब्लिक ऑफ बिहार हे पुस्तक १९९२ साली प्रकाशित झालं. हे पुस्तक वाचल्यावर बिहारच्या राजकारणाच्या नाडीवर आपला हात आहे असं वाचकाला वाटू लागतं. पन्नासच्या दशकात या राजकारणाची नाडी परिक्षा रेणूने केल्याचं मैला आँचल वाचून समजतं. मोरगावचा इतिहास, भूगोल, निसर्ग, परिसर, समाज या सर्वांचा परिचय हिंदू मध्ये वाचकाला होतो पण देशाच्या वा महाराष्ट्राच्या सोडा, खानदेशाच्या राजकारणाबाबतही वाचक पूर्णपणे अनभिज्ञ राहतो.
जातिव्यवस्थेची दोन रुपं आहेत. एक उभं, डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे उतरंडीचं. तर दुसरं आडवं, म्हणजे सर्व जाती समान आहेत पण प्रत्येक जातीने स्वतःची पोटसंस्कृती जतन केली आहे. उभी जातिव्यवस्था आडवी केली पाहिजे म्हणजे विषमतेला नकार देऊन व्यामिश्र संस्कृतीचं जतन केलं पाहिजे अशी नेमाडे यांची भूमिका ढोबळपणे मांडता येईल. रेणूंनीही त्यांच्या कथा-कादंबरींतून याकडेच निर्देश केला आहे. मात्र रेणू यांची मांडणी नेमाडे यांच्याप्रमाणे अस्मितावादी नाही. हिंदू या अस्मितेची स्वतंत्र मांडणी करण्यासाठी हिंदू हे कादंबरी चतुष्टय लिहिण्याचा संकल्प आपण सोडला, असं नेमाडे यांनी प्रकाशनपूर्व मुलाखतींमध्ये म्हटलंय. ज्ञानेश्वर ते तुकाराम ही संत परंपरा महाराष्ट्राच्या अस्मितेचा बिंदू होऊ शकत नाही. अस्मितेसाठी सत्ताकेंद्र लागतं. म्हणून शिवाजी महाराज (नेमाडे यांच्या मताप्रमाणे मलिक अंबर ते शिवाजी ही परंपरा) हाच मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू होतो. कोणतीही अस्मिता संकुचितच असते. त्यामुळे कोणताही लेखक वा कलावंत अस्मितेची पुर्नमांडणी करण्यासाठी लेखन करत नाही. लोकसंस्कृतीची, लोकभाषेची कास धरताना रेणू असा अस्मितावादी झाला नाही. असो.