Blog Archive

Sunday, 11 October 2009

कापूसकोंड्याची गोष्ट—२

मुघल बादशहा जहाँगीरकडून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद मिळाली. भारतीय सुती वस्त्रांची निर्मिती आणि निर्यात करण्याचा परवानाही मिळाला. मद्रास आणि सूरत इथे भारतीय कापसापासून वस्त्रं आणि अन्य उत्पादनं तयार करण्याचे कारखाने ब्रिटींशांनी काढले. कालिकत या बंदरातून सुती वस्त्रांची निर्यात सर्वप्रथम झाली. कॅलिको या नावाने भारतीय वस्त्रं इंग्लडात विकली जाऊ लागली. इंग्लडच्या बाजारपेठेत त्यामुळे जणू धरणीकंपच झाला. ब्रिटीश पार्लमेंटने रंगीत छपाई केलेली कॅलिको वस्त्रं वापरण्यावर बंदी घालण्याचा कायदाच केला. १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली. लोकर किंवा कापूस यांचं सूत काढण्याचं यंत्र स्पिनिंग जेनी प्रचारात आल्यानंतर औद्योगिक क्रांतीला आरंभ झाला असं ढोबळपणे मानलं जातं.

सूत कताई आणि वस्त्र विणणे यंत्राने होऊ लागल्यावर जगाचा पेहरावच बदलून गेला. तोपावेतो कापसाची वस्त्र अतिशय महाग होती. कारण त्यांचं ठोक पद्धतीने उत्पादनच होत नव्हतं. निम्म जग लोकरीचे किंवा कातड्याचेच कपडे वापरत होतं. सुती वस्त्रांचा वापर खूपच मर्यादीत होता. इंग्लडात सुरू झालेली औद्योगिक क्रांती नंतर इतरही युरोपीय देशांमध्ये—जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, इत्यादी पसरली. स्पिनिंग जेनीवर सूत काढण्यासाठी अमेरिकेतील कापूस वापरण्यात आला. म्हणजे त्या यंत्राची रचना अमेरिकन कापसाच्या गुणधर्मांवर आधारित झाली. लांब आणि मजबूत धागा ही अमेरिकन कापसाची वैशिष्ट्यं होती. साहजिकच या जातीच्या कापसाची मागणी वाढली.

अमेरिकेच्या म्हणजे आजच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिण भागात कापसाची शेती होत असे. कापसाची शेती करायची तर मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. कारण त्या काळी कापूस वेचण्यासाठी यंत्रं नव्हती. हजारो एकर शेतातील कापूस वेचणं आणि मशागतीची कामं करणं यासाठी गुलामांच्या टोळ्या कामाला जुंपल्या जात. अमेरिकन यादवीयुद्धाच्या मुळाशी कापसाचीच शेती होती. दक्षिणेकडची राज्यं युरोपला कापसाचा पुरवठा करत. त्यामुळे यादवी युद्धात युरोप आपल्याला मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. यादवी युद्ध सुरू झाल्यावर युरोपिय भांडवलदारांनी अमेरिकन कापसाच्या जाती अन्य देशांमध्ये नेऊन नव्या जातींची निर्मिती करून कापूस लागवडीत मोठी भांडवल गुंतवणूक करायला सुरुवात केली. इजिप्त या गुंतवणूकीमुळे कर्जबाजारी झाला आणि पारंतत्र्यात अडकला. आफ्रिका आणि आशिया खंडात अमेरिकन कापसाच्या जातींनी असा प्रवेश केला.

न्यूयॉर्क कॉटन एक्सेंजवर सट्टा खेळणा-या मुंबईतली काही सटोडियांनी अमेरिकन वाणाच्या कापसापासून तयार केलेलं बेणं गावागावात नेऊन रुजवलं. तोपावेतो ईस्ट कंपनीचं धोरणही बदललं होतं. भारतातून कच्चा माल निर्यात करायचा आणि पक्क्या मालाची आयात करायची असं धोरण कंपनीने वस्त्रोद्योगाबाबत ठरवलं. त्यामुळे कापसाच्या या व्यापारी शेतीला ईस्ट कंपनीने सर्वतोपरी साहाय्य केलं. गुजरात, सिंध, पंजाब, विदर्भ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र इथे झालेली कापसाची लागवड रेल्वे लाईनच्या बाजूने झाली हा योगायोग नाही. या सर्व रेल्वे लाईन बंदरांशी जोडलेल्या होत्या. कापसाच्या वाहतूकीसाठीच रेल्वेचा प्रामुख्याने उपयोग होता. बंदरातून हाच कापूस निर्यात केला जायचा. १८०१ मध्ये साडे पाच कोटी पौंडांचा कापूस भारतातून इंग्लडला निर्यात झाला. हा कापूस देशी वाणाचा होता. मात्र २० शतकात अमेरिकन वाणापासून तयार करण्यात आलेल्या कापसाच्या जातींचं उत्पादन वाढत गेलं.

भारतीय कापसाच्या जाती आखूड आणि नाजूक धाग्याच्या होत्या पण त्यांच्यावर बोंडअळी नव्हती. अमेरिकन वाणाच्या कापसावरच बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असे. अमेरिकन वाणाच्या कापसासोबतच बोंड अळीचा प्रवेशही भारतात झाला. मावा आणि तुडतुडे या रोगांना प्रतिकार करण्याची उपजत क्षमता या भारतीय कापसाच्या जातींमध्ये होती. बोंड अळीचा उपद्रव नाही, मावा तुडतुडे अशा रोगांना प्रतिकार करण्याची अंगभूत क्षमता या गुणांमुळे भारतीय कापसाच्या जातींचा उत्पादन खर्च कमी होता. अमेरिकन कापसाचं वाण आल्यानंतर हा उत्पादन खर्च काही पटींनी वाढला. अमेरिकन जातीपासून तयार केलेल्या कापसाचं बियाणं व्यापा-यांनी गावोगाव पोहोचवलं. त्या बियाण्यांच्या पाठोपाठ मावा, तुडतुडे, बोंड अळी इत्यादी रोगांवरची औषधंही गावागावात पोचली. बियाण्याच्या किंमती, रसायनं वा औषधं व्यापारी लोक उधारीवर शेतक-यांच्या गळ्यात मारायचे. ही एक प्रकारची कंत्राटी शेती होती. या कंत्राटी शेतीत शेतक-याच्या अधिकारांना, हक्कांना काही स्थानच नव्हतं. अमेरिकेतल्या यादवी युद्धाची, इंग्लड-युरोपातल्या औद्योगिक क्रांतीची किंमत युरोपातला मजूर आणि भारतातला शेतकरी यांना चुकवावी लागली.

कापूसकोंड्याची गोष्ट सुरु होते अमेरिकेतल्या गुलामांच्या शोषणाने। तिचा विस्तार झाला आशिया आणि आफ्रिका खंडात। शेतक-यांसोबतच वस्त्रोद्योगातल्या इतर समूहांच्या गळ्याभोवतीचा फासही आवळत गेला। एका कत्तिनीने म्हणजे कापूस कातणा-या महिलेने मांडलेली कैफियत वाचूया पुढच्या भागात।

टीपः संदर्भ, सनावळी, आकडेवारी इत्यादीसाठी जिज्ञासूंनी विविध ग्रंथ, अहवाल शोधावेत आणि वाचावेत.

No comments:

Post a Comment