Tuesday, 27 July 2010

हिंदू वाचताना...पंजाबात...

चंडीगडला होतो. रमिंदरसिंगच्या चेहेर्‍याची ठेवण बघितली तर तो इराणी वाटतो, सुरिंदर थेट ग्रीक. रणजित म्हणाला. इखलाख इंडियन म्हणजे मुंडावंशी असावा मी मनाशी म्हटलं. अशोक नायर समोरच बसला होता. तो केरळी पण गोरा. त्याचा चेहरा नाही तरी रंग इराणहून आला की काय.

चंडीगडहून भाक्रा-नानगलला जात होतो. भारतात कुठेही प्रवास करा वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड रस्त्यारस्त्यावर दिसतात. गोहाटीला जा की चंडीगडला रस्त्यांची कामं जोरात. म्हणजे रस्त्यांच्या रुंदीकरणाची. अवाढव्य फ्लायओव्हर्सची. पुलांची. अगडबंब व्होल्वो बस सुसाट जाऊ शकेल असे रस्ते. रस्त्यांच्या कामामुळे ट्रॅफीक जाम. चिराग म्हणाला वाट लग गयी. मराठीतली वाट पंजाबापर्यंत पोचली. रात्री कोणत्या तरी हिंदी चॅनेलवर बातम्या सांगताना निवेदिका म्हणली ये तो चोर पे मोर हो गया. बातमी सुरु असाताना खाली अक्षरं—चोर पे मोर. मराठीतल्या चोरावर मोराची पाळमूळं तमिळमध्ये आहेत—चूर म्हणजे भात, मूर म्हणजे दही किंवा ताक, असं विश्वनाथ खैरे यांनी सिद्ध करून दाखवलंय. चूर-मूर, चोरावर मोर चं चोरपे मोर झालंय.

पंजाबात अनेकजण कोणत्याही हायवेला जीटी रोड म्हणतात. ग्रँट ट्रंक रोड. पाटलीपुत्र-तक्षशिला जोडणारी ही प्राचीन सडक. जीटी रोड म्हणजे अमृतसर-दिल्ली एवढा समजला जातो. दिल्लीच्या पुढेही तो जातो कोलकत्यापर्यंत. पंजाबातले धाबे फायुस्टार. तिथे जेवण काय तर चिकनचे सहा-सात प्रकार. मटणाचे तीन-चार प्रकार. सप्टेंबर ते एप्रिल मासे मिळू शकतात. ज्या महिन्यांमध्ये आर येतो तेव्हाच आम्ही मासे खातो, इखलाख म्हणाला. जुलै होता त्यामुळे मासे नाहीत. रमिंदरसोबत रेड लेबल पिताना मलईचिकन कबाब, चिकन सीग कबाब, चिली चिकन खात होतो. जेवताना व्हेज म्हटलं तर पर्याय अगदी लिमिटेड. दाल मखनी म्हणजे काळे उडीद. दाल फ्राय म्हणजे चणा डाळ. छोले नाश्त्याला असतात त्यामुळे राजमा. दम आलू म्हणजे बटाटा. आलू-मटर किंवा आलू-गोभी (फ्लॉवर). सॅलड म्हटलं की गाजर, टोमॅटो, काकडी आणि आल्या तर बीटाच्या चकत्या. वांगी, कोबी, फरसबी, लौकी, भोपळा, भेंडी, तिंडा, तोंडली, परवल अशा अनेक भाज्या धाब्यांवरून नाहीशा झाल्यात.

पंजाबात वर्षाला तीन ते चार पिकं घेतात. खरीपात बासमती किंवा धान, रब्बीत गहू. मालव्यामध्ये बासमती, धान किंवा कापूस. रब्बीत गहू. एक-दोन एकर जमीन परवडत नाही कसायला. त्याशिवाय अ‍ॅबसेंटी लँडलॉर्डची संख्या जास्त. हे लोक जमीन खंडाने कसायला देतात. वर्षाकाठी एकरी ३५ ते ४५ हजार रुपये मिळतात. दोआबात म्हणजे बियास-सतलज या नद्यांच्या मधल्या भागात, (रणजित म्हणाला पर्शियनमध्ये अब म्हणजे नदी) बटाट्याची लागवड याच जमिनीवर आहे. मालव्यात आणि मांझा (गुरुदासपूर, होशियारपूर) मध्ये हीच जमीन भाजीपाल्यासाठी वापरतात. होशियारपूरकडे सैनी लोकांची वस्ती मोठी. शतकानुशतकं ते भाज्या, फळं यांचं उत्पादन घेतात. इखलाखसिंग म्हणाला. कंभोज, सैनी हे भाजीपाला पिकवण्यात माहीर आहेत. हे म्हणजे आपल्याकडचे माळी असावेत.

सुखपालसिंग म्हणाला शेती किफायतशीर हवी म्हणजे आज माझ्याकडे १० एकर जमीन असेल तर पाच-दहा वर्षात त्यामध्ये आणखी १० एकराची भर घालता आली पाहीजे. जमीनीतून सतत उत्पन्न काढत राह्यचं. भूगर्भातून पाणी उपसत राह्यचं. धान, बासमती, बटाटा, गहू. कणभर जमीन पडीक ठेवायची नाही. खतं, कीटकनाशकं मारत राह्यचं. उत्पादन वाढवत न्यायचं. जमिनीचं काही का होईना. मालव्यातल्या काही भागात खतं आणि कीटकनाशकांनी भूजल प्रदूषित झालंय. रब्बी शेरगील हा गायक आता याच्या विरोधात जाहीरपणे बोलू लागलाय. तालुक्याच्या गावाला एक लिमोझिन असते. लग्नात भाड्याने देण्यासाठी दिवसाचं भाडं वीस हजार रुपये. आमच्याकडे लग्न साधं असतं. गुरुद्वारात होतं. कर्मकांड, मंत्रतंत्र यांचा फारसा बडेजाव नाही. रिसेप्शनला मात्र भरपूर दारू हवी. म्हणजे लायसन्स काढण्यापासून लग्नाची तयारी सुरू होते, इखलाख सांगत होता. पंजाब, हरयाना या राज्यात सर्वांना मुलंच हवी असतात. त्यामुळे गर्भलिंगचिकित्सा हा मोठा बेकायदेशीर धंदा जिल्ह्या-जिल्ह्यात फोफावलाय. मुक्तसरचा शिवचरणसिंग ब्रार मला म्हणाला होता, जमिनीची वाटणी होते म्हणून मुली नको असतात आम्हाला. त्यामुळे गावागावात वरांची संख्या मोठी आहे पण मुलीच मिळत नाहीत. सिक्कीममधून मुली आणून हरयानात त्यांची विक्री करतात. एका मुलीची किंमत ५० हजार रुपये. मागच्या आठवड्यातच दोन केसेस उघडकीला आल्या.

रोपडचं नाव रुपनगर करण्यात आलं. यावर्षी कळलं की रुपनगरचं नाव आता शहीद भगतसिंग नगर करण्यात आलंय. रोपड सतलुजच्या किनार्‍यावर आहे (नदी ओलांडली की दोआबा). तिथे मोहोंजोदडोच्या काळातलं एक नगर मिळालयं. म्हणजे रोपड प्राचीन शहर आहे. प्राचीन विटांचं नगर. तीनशे वर्षांपूर्वीची कुणा मुसलमानाची टोलजंग इमारत म्हणजे कबर वगैरे असावी. तिही विटांचीच. आणि आजचं रोपडही विटांचंच. सतलुजच्या किनार्‍यावरील मैदानी प्रदेशात एकमेव टेकाड होतं. त्या टेकाडाखालीच प्राचीन शहराचे हे अवशेष सापडले. टेकाड बहुधा सतलुजच्या गाळाचं असावं कारण एकही दगड मला तरी भेटला नाही त्यावर. रूमवर परतल्यावर हिंदू वाचायला सुरुवात केली.

Friday, 23 July 2010

हिंदू वाचण्यापूर्वी...

सिंधू आणि बिंदूः

निखिलेश चित्रेने विक्राळ वा आदी लेखकांमध्ये मराठीतल्या दोनच लेखकांची—भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर, गणना केली. आपल्या अल्पाक्षरी भाषणात बाल्झाक, प्रूस्त (फ्रेंच) आणि एदुआर्दो गॅलिनो (उरुग्वे) या लेखकांच्या रांगेत त्याने या दोन मराठी लेखकांना बसवलं आहे.

म.गांधी, विनोबा, साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहिया, यांची नावं देशी परंपरेत घेताना देशातील कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी राजकीय प्रवाहांशी नेमाडे फटकून असतात. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर परंपरेला नेमाडे आपलेसे वाटतात. मराठा, जाट या जातींची निर्मिती ब्रिटीशांनी केली अशी त्यांची मांडणी आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर ब्राह्मणांनी मुस्लिमांच्या विरोधात केला, मराठे तो ब्राह्मणांच्या विरोधात करत आहेत आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात शिवसेना उद्या शिवाजी महारांजांच्या प्रतिमेला वापरेल, हे नेमाडे यांचं विधान शिवधर्माची घटना लिहिणार्‍या आ.ह. साळुंखे यांना कितपत रुचेल याची शंका वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा सर्व भारतीय भाषांमध्ये पोचलेला एकमेव मराठी लेखक आहे, याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलेलं असलं तरीही त्यांनी हिंदू असण्याचा अभिमान बाळगणार्‍या नेमाडे यांना आंबेडकरवादी चार हात नाही तरी दोन हात दूर ठेवणंच पसंत करतील. नेमाडेंना अडगळीचं जतन करायचं आहे. या अर्थाने ते काँन्झर्वेटिव ठरतात. उदारमतवादी हिंदू हीच त्याची भूमिका आणि ओळख आहे.

हिंदु ही कादंबरी प्रकाशित होण्याच्या दिवशीच हिंदुत्ववाद्यांनी नेमाडे यांचा पुतळा जाळला, असं प्रकाशनाच्या कार्यक्रमात समर खडस या लोकसत्तेच्या बातमीदाराचा हवाला देऊन सांगण्यात आलं. पण दुसर्‍या दिवशीच्या मुंबईच्या वर्तमानपत्रात मी तरी ही बातमी वाचली नाही. सनातन प्रभात या हिंदुत्ववादी संघटनेने नेमाडे यांच्या हिंदू संकल्पनेवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ब्लॉगवर ती उपलब्ध आहे. असो.

हिंदूच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना नेमाडे म्हणाले लेखक हा समाजाशी जोडला गेलेला असतो. समजाच्या मनाच्या तळात बुडी मारून तो आपलं विधान, कथानक आणि पात्रं बाहेर काढतो. लेखकाची कलाकृती अर्थात लिखाण आणि समाजाचा सांधा जुळला तरच ती कादंबरी वा लेखन लोकप्रिय होतं. अर्थातच नेमाडे यांची अशी प्रामाणिक धारणा आहे की ते मांडत असलेला देशीवाद भारतीय समाजाच्या मनात मुरलेला आहे.
कोणत्याही समाजाला, व्यक्तीला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी लेखक वा साहित्यिक आपली लेखणी झिजवतात. ही ओळख इतिहासात बुडी मारून, परंपरेचे पदर उलगडत करून घ्यायची की आत्ता प्राप्त क्षणाच्या सर्वांगीण ज्ञानाने करून घ्यायची? नेमाडे अर्थातच इतिहास, परंपरेचा वेध घेणारे आहेत. समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादीही नेमकं हेच करू पाहतात. कोणत्याही राजकीय विचारप्रवाहांप्रमाणेच नेमाडेंचा देशीवादही शत्रूलक्ष्यी मांडणीच्या जवळ जाणारा आहे.

प्राप्त क्षणाचं सर्वांगीण ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न श्याम मनोहर करतात. श्याम मनोहरांचा प्रयत्नही अस्सल देशी परंपरेतलाच आहे. वेदांचं उलट-सुलट पाठांतर करण्यात ब्राह्मणांनी आपली अक्कल वाया घालवली, मेलेली जनावरं फाडण्याचं काम ज्या जातींनी केलं त्यांनी प्राण्यांच्या शरीरशास्त्राची पायाभरणी केली नाही. म्हणजे ब्राह्मण आणि महार, ढोर यांच्यापैकी कुणीही बुद्धि वापरलेली नाही, याकडे श्याम मनोहर लक्ष वेधतात. समाजातील बुद्धिच्या स्थानाची चर्चा करताना, श्याम मनोहर व्यक्तीवर कॅमेरा फोकस करतात.


समुद्राच्या पाण्याचे गुणधर्म त्या पाण्याच्या एका थेंबात असतात. नेमाडेंना सिंधूचं आकर्षण आहे, तर श्याम मनोहरांनी थेंबावर लक्ष केंद्रीत केलं आहे. नेमाडे आणि श्याम मनोहर, हे दोन लेखक मराठी साहित्याचे दोन ध्रुव असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी फारा वर्षांपूर्वीच नमूद केलं आहे.

Wednesday, 14 July 2010

कॉर्पोरेट शैली

सुबोध, नविना आणि मी, पुण्याहून एकत्र आलो. फुटबॉल वर्ल्डकप, विशेषतः स्पेनचा संघ यावर बोलत होतो. मग अर्थातच इंग्लड, जर्मनी, ब्राझील हेही आलेच संभाषणात. मी आणि सुबोधच बोलत होतो. नविना गप्प होती. दोन पुरुष भेटले की स्पोर्टस् हा विषय येणारच असं म्हणून रविनाला या विषयात रस नाही, असं सुबोधने मला सुचवलं.

सुबोध अदबीने प्रश्न विचारतो. संभाषण चालू ठेवण्यासाठी हलकासा विनोद करतो, स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी नाही पण संभाषण इंटरेस्टिंग करण्यासाठी त्याच्या विदेश वास्तव्यातला एखादा किस्सा सांगतो किंवा नुस्तीच एखादी आठवण, उदाहरणार्थ पुण्याच्या कोपा कबाना या रेस्त्रांमध्ये आम्ही ब्राझील-नेदरलँड मॅच पाह्यली हे मी सांगितलं तेव्हा तो म्हणाला रिओ मध्ये कोपा कबाना हे रेस्त्रां आहे. त्याचा गेट-अप कमालीचा गॉडी आहे. तसं रेस्त्रां मी तरी अजून जगाच्या कोणत्याही भागात पाह्यलेलं नाही.

न्यूज पेपर्स अधिकाधिक सनसनाटी होत आहेत असं अतिशय सामान्य मत तो व्यक्त करतो कारण त्याचा उद्देश संभाषण सुरु ठेवणं हा असतो. सामान्य विषयावर सामान्य मतं द्यायची, वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्यायची, माहिती देणं, माहिती कोटं करणं, माहिती घेणं यासाठी संभाषण चालू ठेवायचं. स्वतःबद्दल अतिशय माफक बोलायचं. सोबतच्या प्रत्येक माणसाला संभाषणात सामील करून घ्यायचा प्रयत्न करायचा. त्याची काळजी घ्यायची. आपल्या कामाशी संबंध नसलेल्या विषयांवर मतं मांडणं, चर्चा करणं, गप्पा मारणं हा त्याच्यालेखी टाइमपास असावा. गुंतवणूक फक्त कामाच्या विषयात आणि कामापुरती, ही त्याची शैली आहे.

आपल्या संवेदनशीलतेचा बेगडीपणा कॉर्पोरेट शैलीच्या गावीच नसतो. म्हणून ती दुसर्‍याच्या संवेदनशीलतेलाही आव्हान देत नाही. त्यामुळेच मांडणी, चर्चा, गप्पा टाळून संभाषण चालू ठेवण्याचे, माहितीप्रधान ठेवण्याचे या मंडळींचे प्रयत्न असतात. हे लोक संपत्तीवान असतात. ते इकॉनॉमिस्ट वाचतात, लंडनचा टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचतात. कोस्टा, कॅफे कॉफी डे मध्ये कॉफी पितात, सिनेमा, क्रिकेट, फुटबॉल आणि देशोदेशातील खाण्याचे पदार्थ भारतात वा मुंबईत कुठे मिळतात या विषयावर बोलतात. हॉलीवूड आणि बॉलीवूडचे उत्तमोत्तम चित्रपट पाहतात. संगीताच्या मैफिलींना जातात. पाश्चात्य संगीताच्या कॉन्सर्टना जातात. त्यांच्याकडे उत्तम चित्रं भिंतीवर लावलेली असतात.

ही जगण्याची कॉर्पोरेट शैली. इतर कोणाच्या कशाला स्वतःच्याही हातात सापडणार नाही याची काळजी घेणारी. हे गडी अंगाला तेल लावून उभ्या राह्यलेल्या पैलवानासारखे असतात.

Friday, 9 July 2010

स्पॅनिश आरमाडाने जर्मन रणगाडा थोपवला......

खरगोश और कछुए की दौड जब तय हुयी,
उसी समय नही उससेही पहले खरगोश की पराजय सुनिश्चित हुयी थी,
कोई फर्क नही पडता था वो दौड़ता या सोता,
विजयी हर हालत में कछुआही होता....

जर्मनी हा ससा होता तर स्पेन कासव.
वेग, कमालीचा दम आणि ताकद ही जर्मनीची बलस्थानं होती. संघामध्ये तरुणांची म्हणजे अननुभवी खेळाडूंची संख्या जास्त होती. अर्थातच अधीरता हा त्यांचा गुण होता. आजपर्यंत झालेल्या एकूण सहा सामन्यांमध्ये स्पेनने गोलपोस्टवर मारलेल्या एकूण शॉट्सची संख्या सर्वाधिक म्हणजे १०३ आहे. पण या संघाने केलेल्या गोलची संख्या केवळ ७ आहे. या उलट सहा सामन्यांमध्ये जर्मनीने गोलपोस्टवर मारलेल्या शॉट्सची संख्या ८४ आहे आणि त्यांनी एकूण १३ गोल केले. अर्जेंटिना, इंग्लड यासारख्या मातब्बर संघाना संघांना जर्मनीने चार-चार गोल चढवून धूळ चारली होती. म्हणून जर्मनीचं कौतुक अधिक होतं.

छोटे पण अचूक पासेस, कमालीचा धीर-पेशन्स आणि बहारदार टीम वर्क ही स्पेनची खासियत होती. स्पेनचे खेळाडू पायाने चेंडू खेळवत प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडर्सना चकवत पुढे जात नव्हते (ड्रिबलिंग). आपल्या पायातला चेंडू तात्काळ आपल्या साथीकडे पास करायचा, असा त्यांचा खेळ होता. प्रतिस्पर्धी संघाच्या पेनल्टी क्षेत्रात जाऊन बॉलचा ताबा सुटणार असेल तर स्पेनचे खेळाडू आपल्या क्षेत्रापर्यंत चेंडू मागे न्यायचे आणि पुन्हा पुढे घुसायचे. मिडफील्डमधल्या गर्दीत अचूक पासेस देणं हे स्पेनचं कौशल्य होतं. चेंडूवर सर्वाधिक काळ नियंत्रण ठेवायचं, ९० मिनिटांमध्ये एखादा गोल होईलच आणि चेंडूवर नियंत्रण असेल तर प्रतिस्पर्ध्याला गोल करण्याची संधी मिळणार नाही. अशी स्पेनची व्यूहरचना होती. स्पेनचा सामना पोर्तुगाल वगळता कोणत्याही बलाढ्य संघाशी झाला नव्हता. दोन पेक्षा अधिक गोल स्पेनने प्रतिस्पर्धी संघावर कधीही चढवले नव्हते.

जर्मनीच्या खेळाडूंच्या पायात बॉल येतच नव्हता त्यामुळे चढाई करण्याची संधीच त्यांना मिळत नव्हती. स्पेनने चेंडूवर नियंत्रण ठेवून कॉर्नर कीकला गोल मारण्याची संधी साधली. स्वित्झर्लंडबरोबरच्या सामन्यात स्पेनचा संघ केवळ छोटे पासेस देत होता. जर्मनीबरोबर खेळताना स्पेनने क्रॉसेस आणि लाँग पासेस देऊन आक्रमणाचा दबाव जर्मनीवर सतत ठेवला. स्वित्झर्लंडबरोबरच्या खेळातल्या चुका स्पेनने दुरुस्त केल्या. जर्मनीच्या संघाचा कमकुवतापणा फक्त अधीरतेत होता. तो स्पेनने नेमका हेरला आणि आपल्या बलस्थानांची उजळणी केली. त्यामुळेच स्पॅनिश आरमाडाने जर्मन रणगाड्याला थोपवण्यात बाजी मारली.

वर्ल्डकप फायनलमध्ये स्पेनची गाठ नेदरलँडशी आहे. पॉल या ऑक्टोपसने स्पेनच्या विजयाचं भाकीत केलं आहे. पण वर्ल्डकपमध्ये जो जिता वही सिकंदर असतो. त्यानंतर उरतं ते सामन्यानंतरचं कवित्व.......

Tuesday, 6 July 2010

पुरुषप्रधान पत्रकारिता

जॉर्ज फर्नांडीस यांच्या विश्वासू सहकारी जया जेटली यांच्याबद्दल ३० जून रोजी ‘मेरा वो सामान लौटा दो’ या मथळ्याचा मजकूर लोकसत्तेत प्रकाशित झाला आहे.

• याच बंगल्यात जया जेटलींनी तहलकाकांडातील सौदेबाजी केल्याने जॉर्जना संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
• पण प्रदीर्घ दुराव्यानंतर आजारी जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनात पत्नी लैला फर्नांडिस यांचे पुनरागमन झाल्यापासून त्यांच्याशी जया जेटलींचा संघर्ष पेटला असून त्यांना या बंगल्यात प्रवेशाला ‘मनाई’ करण्यात आली आहे.
• लैला दूर असतानाच्या काळात देशविदेशातून हौशेने आणलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू, पुस्तके आणि फर्निचरनी जया जेटलींनी जॉर्ज यांचा बंगला सजविला होता. निदान तसा दावा त्या आज करीत होत्या.
• माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या सरकारी बंगल्यातील फर्निचर, पुस्तके आणि अनेक ‘दुर्मिळ’ वस्तू ताब्यात घेण्यासाठी फर्नांडिस यांच्या एकेकाळच्या सहकारी समता पार्टीच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांनी बंगल्यासमोर चांगलाच गोंधळ घातला.
• एका जमान्यात या बंगल्यात त्यांचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य होते. तो मोडण्याची भल्याभल्यांची हिंमत होत नसे. पण आज बंगल्यात ठेवलेले सामान आपल्याला परत न्यायचे आहे, असे वारंवार सांगूनही त्यांचे कुणी ऐकत नव्हते. हा बंगला तूर्तास लैला फर्नांडिस यांच्या ताब्यात आहे. ७ जुलै रोजी ८० वर्षीय जॉर्ज राज्यसभेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. अल्झायमरने ग्रासलेले जॉर्ज सध्या लैला फर्नांडिस यांच्या ताब्यात आहेत.

सदर मजकूरातील ही उद्धरणे पाह्यल्यावर जया जेटली या महिलेला जॉर्ज फर्नांडीस यांच्या व्यतिरिक्त अन्य ओळख नाही अशी वाचकाची समजूत होईल. लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत जया जेटली यांचा उल्लेख जॉर्ज फर्नांडीस यांची मैत्रीण असा करण्यात आला होता. देशविदेशातून आणलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू, पुस्तके, फर्निचर, एका जमान्यात या बंगल्यात त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होते, इत्यादींची सांगड वाचकाने जया जेटली यांनी केलेल्या सौदेबाजीशी करावी अशी हेतूपूर्वक मांडणी बातमीदाराने केली आहे.

वस्तुतः जया जेटली यांनी जॉर्ज फर्नांडीस संरक्षणमंत्री असताना कोणतीही सौदेबाजी त्यांच्या सरकारी निवासस्थानी केलेली नव्हती. त्यामुळे जॉर्ज फर्नांडीस यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तहलकाच्या टेप्स आजही उपलब्ध होऊ शकतात त्या पाहून या आरोपातील सत्त्यासत्यतेची पडताळणी करता येते. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना वृत्तपत्र वा वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांच्या आधारे सौदेबाजीचा आरोप करणं जबाबदार पत्रकारितेचं लक्षण नाही. त्यातही आरोप करताना जॉर्ज फर्नांडीस यांना क्लीन चीट देऊन त्यांच्या पत्नीची भूमिका निभावणार्‍या स्त्रीवर सौदेबाजीचा आरोप करणं हे तर पुरुषप्रधान पूर्वग्रहाचं लक्षण आहे.

देशातील पारंपारिक हस्तकलांचं जतन आणि संवर्धन करण्यात जया जेटली यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील हस्तकलांचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलं. प्रत्येक राज्यातील हस्तकलांचा नकाशा त्यांनी बनवला आहे. या कामाला हिंदुस्थान मोटर्स, टाटा समूह अशा अनेकांनी अर्थसहाय्य केलं. हे नकाशे हस्तवस्तू संग्रहालयात अ‍ॅक्रिलीकच्या फ्रेममध्ये कायमस्वरूपी प्रदर्शित करण्याची योजना यावर्षीच्या जानेवारी महिन्यात पूर्ण होणार होती. निव्वळ अ‍ॅक्रिलीकच्या फ्रेम्ससाठी १० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी जवळपास १० वर्षं जया जेटली आणि त्यांचे सहकारी खपत होते. पारंपारिक कलावस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून दिल्ली हाट हा कायमस्वरूपी प्रदर्शनाचा कॉम्प्लेक्स दक्षिण दिल्लीमध्ये उभारण्यात जया जेटली आणि त्यांच्या सहकार्‍यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील खान मार्केट परिसरात दस्तकारी या पारंपारिक कलाप्रकारालाही कायमस्वरूपी घर मिळावं यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. पारंपारिक कलावस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्याला वाहून घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीचं आपल्या वैयक्तीक संग्रहाशी असलेलं नातं कमालीचं उत्कट आणि भावनिक असणार. मात्र हे समजण्याइतकी संवेदनशीलता बातमीदाराकडे नसल्याने बातमी लिहिताना त्याने सनसनाटी शैलीचा आधार घेतला.

मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी सौदेबाजी करणारी, त्या बंगल्यावर हुकूमत गाजवणारी, बंगल्यातील दुर्मिळ वस्तू, पुस्तकं, फर्निचर आपलं आहे असा दावा करणारी, मंत्र्याची बिनलग्नाची बायको अशी जया जेटली यांची विपरीत प्रतिमा त्यामुळे वाचकाच्या मनात तयार होते.