Wednesday 15 April 2015

बगाराम तुळपुळे



बगाराम तुळपुळे ह्यांचं निधन झाल्याची बातमी आज साधना दधिचने दिली. दत्ता ईस्वलकरचा फोन आला तो म्हणाला अंत्यसंस्कार वगैरे सर्व पार पडलं आहे. कामगार चळवळीचे नेते, वस्त्रोद्योगाचे तज्ज्ञ, दुर्गापूर पोलाद कारखान्याचे माजी महाव्यवस्थापक असलेले बगारामजी प्रसिद्धीच्या झोतात कधीही नव्हते. त्याचा त्यांना तिटकाराच होता. प्रसिद्धीतून वैयक्तीक महत्वाकांक्षा साधण्याचं राजकारण होतं, समूहांचे प्रश्न त्यामुळे सुटत नाहीत, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या धारणेला साजेसे अंत्यसंस्कार कुटुंबियांनी केले.

१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झालेले बगाराम तुळपुळे ह्यांनी समाजवादी कामगार चळवळीची पायाभरणी केली. हिंद मजदूर सभा या केंद्रीय कामगार संघटनेचे ते काही काळ अध्यक्ष होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट, गिरणी कामगार अशा विविध कामगार संघटनांची बांधणी त्यांनी केली. १९७७ साली जनता पार्टीच्या विजयानंतर दुर्गापूर पोलाद कारखान्याच्या महाव्यवस्थापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नवी जबाबदारीही त्यांनी अतिशय समर्थपणे पेलली आणि सार्वजनिक उपक्रमांचा कारभार कसा चालवावा ह्याचा वस्तुपाठ दिला. २०११ साली श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने कामगार चळवळीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनोहर कोतवाल, यशवंत चव्हाण आणि बगाराम तुळपुळे ह्या तीन कामगारनेत्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबईच्या व्हीजेटीआय महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी परीक्षा ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे दत्ता देशमुख कम्युनिस्ट चळवळीतून शेतकरी-कामगार नेते म्हणून उदयाला आले. बगाराम आणि दत्ता देशमुख ह्या दोघांनाही साने गुरुजींचा सहवास लाभला होता.

वस्त्रोद्योग हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. वस्त्रोद्योगाचं राष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी १९८४ साली केंद्र सरकारने नेमलेल्या विशेषज्ञ समितीचे ते सदस्य होते. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे १९८५ चं वस्त्रोद्योग धोरण निश्चित करण्यात आलं. इकॉनॉमिक अँण्ड पोलिटीकल विकली या नियतकालीकामध्ये या धोरणावर विस्तृत चर्चा झाली होती त्यामध्ये बगाराम तुळपुळे ह्यांनीही भाग घेतला होता. डॉ. दत्ता सामंत ह्यांच्या नेतृत्वाखालील गिरणी संपाचं विश्लेषण करणारा एक लेख बगाराम तुळपुळे ह्यांनी साधना साप्ताहिकामध्ये लिहीला होता. कापसाचे दर आणि पुरवठा, संयुक्त कापडगिरण्यांमधील तंत्रज्ञान, सूतगिरण्या, यंत्रमागांची वाढती संख्या, प्रचलित कामगार कायदे, वस्त्रोद्योगाचं धोरण ह्याची चिकित्सा करून बगारामनी असा निष्कर्ष काढला होता की या संपामुळे गिरणी कामगारांचा लाभ होण्याची शक्यता नाही. बगारामजींचा हा लेख १९८१ सालात प्रसिद्ध झाला असावा.

१९८८ सालात गिरणी कामगारांची स्थिती अधिक बिकट झाली होती. राजकीय पक्ष आणि सर्व पक्षांच्या कामगार संघटनांकडे ह्या प्रश्नावर कोणताही निश्चित उपाय नव्हता. आंदोलन थंडावलं होतं. त्यावेळी दत्ता ईस्वलकर आणि मी, समता आंदोलन या समाजवादी संघटनेत काम करत होतो. दत्ता ईस्वलकर गिरणी कामगार होता. या प्रश्नावर काहीतरी कृती करायला हवी असं तो उद्वेगाने म्हणाला. आम्ही दोघे बगाराम तुळपुळेंना भेटायला गेलो. बगारामजींनी दत्ताचं म्हणणं पूर्ण एकून घेतलं. वस्त्रोद्योग फायद्यात चालवण्यासाठी कच्च्या मालाचं म्हणजे कापसाचं पुरेसं उत्पादन हवं, योग्य तंत्रज्ञान हवं आणि बाजारपेठ हवी. या तिन्ही गोष्टींची अनुकूलता असताना गिरणी कामगारांवर अशी परिस्थिती येत असेल तर केवळ व्यवस्थापनाला दोष देऊन भागणार नाही तर वस्त्रोद्योग धोरणाचा अभ्यास करायला हवा. धोरण सदोष असेल तर गिरण्यांकडील अतिरीक्त जमीनीची विक्री केल्यावरही गिरण्या चालणार नाहीत आणि कामगारांना मात्र नुकसान भरपाईसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागेल. तात्पर्य काय तर वस्त्रोद्योग धोरणाचा अभ्यास करा, त्यावर एक टिपण तयार करा आणि मग आपण चर्चा करू. त्यानुसार आम्ही दोघांनी एक टिपण तयार करून त्यांची भेट घेतली. त्यांनी त्या टिपणात काही सुधारणा केल्या आणि म्हणाले, सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक आयोजित करा. त्यामध्ये या टिपणावर चर्चा करून कार्यक्रम निश्चित करूया. 

बगाराम तुळपुळे चर्चेचे अध्यक्ष असल्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघ, दत्ता सामंत ह्यांची कामगार आघाडी, लाल निशाण पक्षाचे कॉ. यशवंत चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधर चिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अहिल्याताई रांगणेकर, शिवसेना, भारतीय मजदूर संघ अशा नानाविध संघटनांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला आले. पाच-सहा तास चर्चा झाली. एक कापडगिरणी सहकारी तत्वावर चालण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करावा आणि वस्त्रोद्योग धोरणावर राष्ट्रीय परिषद मुंबईत घेण्यात यावी. कापड गिरणी सहकारी तत्वावर चालवण्याच्या प्रस्तावाबाबत कॉ. यशवंत चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. कमानी कारखान्याचं सहकारीकरण करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. अपना बाजाराचे माझी महाव्यवस्थापक, गजानन खातू, अहमदाबाद टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशनचे तज्ज्ञ ह्यांनीही ह्याकार्यात सहभाग घेण्याचं मान्य केलं. त्यानुसार राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला पण राज्य सरकारने तो बासनात बांधून ठेवला. वस्त्रोद्योगावरील राष्ट्रीय परिषद बगाराम तुळपुळेंच्या अध्यक्षतेखाली पोदार महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. त्या परिषदेला डॉ. दत्ता सामंत ह्यांनीही हजेरी लावली होती. त्यानंतर बंद गिरणी कामगार संघटना स्थापन करण्यात दत्ता ईस्वलकरने पुढाकार घेतला आणि प्रदीर्घ काळाच्या लढ्यानंतर कामगारांनी घराचा हक्क मिळवला. पण त्यासाठी २०१४ साल उजाडलं.

बगारामजी केवळ कामगार पुढारी नव्हते. अभियांत्रिकीची पदवी परिक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते. विज्ञान ननैतिक असतं पण तंत्रज्ञान अनैतिक वा नैतिक असतं याची जाण त्यांना होती. शंभर टक्के उत्पादन निर्यात करणार्‍या अत्याधुनिक सूतगिरण्यांचं लाभहानीचं गणित आर्थिकदृष्ट्या देशाला आतबट्ट्याचं कसं ठरतं ह्यावर ते उत्तम विवेचन करत. उच्चतंत्र आणि विकास या विषयावर ठाण्याच्या लोहिया व्याखानमालेत त्यांनी तीन व्याखानं दिली त्याची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. या तीन व्याखानांचा संदर्भ, सुस्मृत राम बापट ह्यांनी विचारवेध संमेलनातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणात घेतला होता. या भाषणात राम बापट ह्यांनी नवभांडवलशाहीची म्हणजे जागतिकीरणानंतरच्या भांडवलशाहीची मूलगामी मीमांसा केली. २००४ सालच्या विचारवेध संमेलनाचं अध्यक्षस्थान बगाराम तुळपुळेंनी भूषवलं होतं. कामगार संघटनांनी वेतन आणि अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सामुदायिक सौदेबाजीच्या (कलेक्टिव बार्गेनिंग) तत्वाचा अंगीकार करावा हे कामगार लढ्यात मान्यता पावलेलं सूत्र आहे. त्याविषयावरही एक छोटेखानी पुस्तिका बगारामजींनी लिहीली होती. दुर्गापूर पोलाद कारखान्याच्या कारभारावरही त्यांनी एक छोटी पुस्तिका लिहीली होती. बगारामजी तज्ज्ञ होते मात्र विस्तृत लेखनापेक्षा कृतीवर त्यांचा भर होता. आणि लेखन करताना मतं आणि भूमिका ह्यापेक्षा डेटा म्हणजे आकडेवारी माहिती यामधून समाजवादी भूमिका मांडण्याकडे त्यांचा कल होता. त्यातूनच पुढे कार्यक्रम आकार घेत असे.

प्रभा तुळपुळे या बगारामजींच्या पत्नी. महाश्वेता देवींच्या अरण्येर अधिकार या बिरसा मुंडाच्या जीवनावरील बंगाली कादंबरीचा अनुवाद त्यांनी मराठी भाषेत केला. महाश्वेतादेवींच्या साहित्याचा मराठी वाचकांना परिचय त्यामुळे झाला. मला नेमकं आठवत नाही पण ८० च्या दशकात प्रभा तुळपुळेंनी हा अनुवाद केला असावा. बगारामजींची मुलगी इंदवी ही सेवादलात होती. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात रचनात्मक आणि संघर्षाच्या कार्यात ती कार्यरत आहे. बगारामजींच्या सर्व कुटुंबाने समाजवादी मूल्य आणि जीवन आत्मसात केलं आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

Tuesday 7 April 2015

समाजवादी शक्तींच्या एकजूटीचं स्वप्नं पाहणारे जी. जी.


   १९४२ साली मुंबईत झालेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी महात्मा गांधी रेल्वेने आले. त्यावेळचे मुंबईचे महापौर, युसूफ मेहेरल्ली त्यांच्या स्वागताला व्हिक्टोरिया टर्मिनसवर हजर होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने पद्मा प्रकाशन या संस्थेमार्फत युसूफ मेहेरल्ली यांनी ´क्विट इंडिया (चले जाव) या नावाची पुस्तिका काढली होती. ह्या पुस्तिकेची तडाखेबंद विक्री त्यावेळी झाली होती (सायमन गो बॅक ही घोषणाही युसूफ मेहेरल्ली यांची). अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या या अधिवेशनात ब्रिटीशांना निर्वाणीचा इशारा देण्याचं गांधीजींनी निश्चित केलं होतं. त्यासाठी सुयोग्य घोषणा त्यांना गवसली नव्हती. पद्मा प्रकाशनाच्या पुस्तिकेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ८ ऑगस्ट १९४२ रोजी, अधिवेशनामध्ये हीच घोषणा गांधीजींनी केली आणि त्यासोबत करेंगे या मरेंगे हा मंत्र त्यांनी दिला. गोवालिया टँक मैदानावरील त्या विराट सभेला जी. जी. पारीख ह्यांनीही हजेरी लावली होती. आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांना अटक झाली आणि ११ महिन्यांच्या कारावासाची सजा त्यांना झाली.
  युसूफ मेहरल्ली, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, नरेंद्र देव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे इत्यादींनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना १९३४ साली नाशिक कारागृहात केली होती. केवळ हेच नेते समाजवादी नव्हते तर अनेक समाजवादी गट त्या दिशेने विचार करत होते. काँग्रेस पक्ष आणि संघटना भांडवलदार आणि साम्राज्यवाद्यांची हस्तक आहे असा निर्वाळा तिसर्‍य़ा कम्युनिस्ट इंटरनॅशनलने दिला होता. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य लढा आणि समाजवाद ह्यांची सांगड कशी घालायची असा प्रश्न मार्क्सवादी विचाराच्या अनेक तरुणांना आणि गटांना पडला होता. त्याचं निःसंदिग्ध उत्तर काँग्रेस समाजवादी पक्षाने दिलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिनिधीत्व काँग्रेस करते मात्र येऊ घातलेल्या स्वातंत्र्यात कामगार आणि शेतकर्‍यांची सत्ता स्थापन करायला हवी असा विचार काँग्रेस समाजवाद्यांनी मांडला. स्वातंत्र्य लढा आणि डावा विचार ह्यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता. म्हणूनच ऑगस्ट क्रांतीच्या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी समाजवादी पुढे सरसावले. गांधी, नेहरू, पटेल इत्यादी काँग्रेस नेत्यांना ८ ऑगस्ट रोजीच अटक करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या छोट्या गटांनी आंदोलन सुरू जारी ठेवण्याची आखणी युसूफ मेहरल्ली यांनी केली होती. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, अरुणा असफअली हे या आंदोलनाचे नेते होते. जी. जी. पारिख आजचे असे एकमेव समाजवादी असतील की ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागापासून सहकारी चळवळ, ग्रामविकास, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, संपूर्ण क्रांती आंदोलन या सर्व आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडली.
   जनता विकली हे इंग्रजी साप्ताहिक जयप्रकाश नारायण आणि अच्युत पटवर्धन ह्यांनी १९४६ साली सुरू केलं. त्यावेळी काँग्रेस समाजवादी पक्षाचं मुख्यालय मुंबईला होतं. माझ्या माहितीप्रमाणे, अपोलो बंदर येथील जनता विकलीच्या कार्यालयाची जागा अच्युत पटवर्धन ह्यांनी मिळवली होती. युसूफ मेहेरल्ली, अच्युत पटवर्धन, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण वे साईड इन या रेस्त्रांमध्ये चहा पित गप्पा मारायचे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाचं मुख्यालय दिल्लीला स्थलांतरित झालं. मात्र जनता विकलीचं कार्यालय मुंबईत राह्यलं आणि त्याची जबाबदारी जी. जी. पारीखांनी घेतली ती अजून त्यांच्याच खांद्यावर आहे. जनता विकली च्या कार्यालयातच नरेंद्र देव खोज परिषदेचं कार्यालयही थाटण्यात आलं होतं. स्वांतत्र्य लढा, सहकारी चळवळ, कामगार चळवळ, ग्राम विकास, स्वदेशी अशा विविध चळवळींशी जी. जी. पारीख तेव्हापासून जुळलेले आहेत.
   समाजवादी कार्यकर्त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात युसूफ मेहेरल्ली यांनी पुढाकार घेतला. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, अशोक मेहता ह्यांचाही सहभाग होता त्यामध्ये. जनता साप्ताहिकाच्या फाईलींमध्ये तो अभ्यासक्रम वाचायला मिळतो. नानासाहेब गोरे, प्रेम भसीन, सुरेंद्र मोहन, मधु दंडवते अशा नेत्यांनी जनता साप्ताहिकाचं संपादकपद सांभाळलं. त्यांच्या पश्चात जी.जींनी संपादकपदाची सूत्रं हाती घेतली. १९९२ साली चलेजाव आंदोलनाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रीलंकेतील चलेजाव आंदोलनाच्या समाजवादी नेत्यांनी जनता विकलीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. देशातील आणि विदेशातील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी जनता विकलीमध्ये केलेल्या लिखाणाचं श्रेय जी.जी. पारीखांना द्यायला हवं.
   एशियन सोशॅलिस्ट कॉन्फरन्सबाबत सध्याचे सोशॅलिस्ट अनभिज्ञ आहेत. आँग सांग सू ची चे वडील समाजवादी होते. एशियन सोशॅलिस्ट कॉन्फरन्सच्या कामासाठी मधु लिमये रंगूनला होते, मा.श्री. गोखले आधी कोलंबोला आणि नंतर रंगूनला होते. जवाहरलाल नेहरूंच्या अलिप्ततावादाला समाजवाद्यांनी दिलेलं ते उत्तर होतं. भारतीय समाजवाद युरोपकेंद्रीत नको तर आशिया केंद्रीत हवा अशी दृष्टी त्यामागे होती. १९९० साली म्हणजे शीत युद्धाच्या समाप्तीनंतर पंतप्रधान नरसिंहराव ह्यांनी लुक ईस्ट या परराष्ट्र धोरणाची पायाभरणी केली आणि नरेंद्र मोदी तेच धोरण पुढे घेऊन जाताना दिसतात. मात्र या धोरणाचे पूर्वसूरी समाजवादी होते ही बाब जनता विकलीच्या वाचकालाच कळू शकते. प्रश्न पर्यावरणाचा असो की जातीय विषमतेचा वा संप्रदायवादाचा किंवा आर्थिक शोषणाचा आणि विविध जनआंदोलनांचा त्याकडे समग्रपणे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोन जनता विकली या नियतकालीकामध्ये त्यावरील अनुकूल-प्रतिकूल चर्चेसह वाचायला मिळतो. किशन पटनाईक सामायिक वार्ताचे संपादक होते तोवर अशीच राजकीय दृष्टी त्यामध्ये अभिव्यक्त व्हायची. जनता आणि सामायिक वार्ता ह्यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद तेव्हाही होते पण त्या ताणातूनच समाजवादी दृष्टी वा भाष्य समृद्ध झालं. समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतर समाजवादी राजकीय दृष्टी आणि विश्लेषण जनता आणि सामायिक वार्ता ह्या दोनच साप्ताहिकांनी पुढे ठेवलं (नानासाहेब गोरे ह्यांच्यानंतर साधना साप्ताहिकाला राजकारणावर पकड असणारा संपादक लाभला नाही).
  काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतरही समाजवादी शक्तींची एकजूट हा विषय समाजवादी आंदोलनात सातत्याने चर्चिला जातो. कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे समाजवादी पक्ष केडरबेस्ड नाही ह्याचं वैषम्य अनेकांना वाटतं. त्यामुळे समाजवादी पक्षात आणि आंदोलनात फाटाफूट झाली अशीही अनेकांची धारणा आहे. देशभर पसरलेल्या विविध समाजवादी गटांना सामावून घेण्याची प्रक्रिया काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून सुरू झाली. समाजवादी चळवळीचं सामर्थ्य वा शक्तीस्थळ जनलढ्याच्या अग्रभागी राहून समाजवादी कार्यक्रम पुढे रेटण्यात आहे. त्यामुळे समाजवादी शक्तींची एकजूटीकरणाची प्रक्रिया इन्क्लुजिव हवी, विविध गटांनाच नव्हे तर काँग्रेस, जनता दलाचे विविध गट, आम आदमी पार्टी, विविध कामगार संघटना वा जनआंदोलनांमधील समाजवादी विचारधारेशी जुळलेले विविध कार्यकर्ते ह्यांच्याशी सतत संवाद ठेवण्याला हवा असं जी.जी. पारीख आवर्जून सांगतात. फरोख खान हे मुंबई समाजवादी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य १९९० च्या दशकात भाजपमध्ये सामील झाले परंतु युसूफ मेहेरल्ली सेंटर आणि जी.जी. पारीख ह्यांच्याशी ते जुळलेले होते. समाजवादी कार्यक्रमात वा उपक्रमात फरोख खान ह्यांना जी. जीं. नी नेहमी सामावून घेतलं.
   महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, युसूफ मेहेरल्ली ह्यांचा व्यक्तीमत्वाचा प्रभाव जीजींच्या व्यक्तीमत्वावर आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुबत्तेची मात्र राहणी कमालीची साधी. स्वातंत्र्य आंदोलनात स्वीकारलेली खादी त्यांच्या अंगावर नाही तर व्यक्तीमत्वामध्ये प्रतिबिंबीत झाली आहे. अतिशय शांत आणि लक्षपूर्वकपणे पुढच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, कितीही कडवी टीका अतिशय सहृदयतेने समजून घेणं आणि त्यानंतर आपली भूमिका खुलासेवार सांगणं हे जीजींच्या व्यक्तीमत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं पटलं नाही तरीही मनात किल्मिष राहात नाही. त्यांच्या निर्णयाशी मतभेद असूनही वैयक्तीक स्वार्थाचा लवलेश त्यामागे नाही ह्याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे टोकाचे मतभेद असूनही संवाद कायम राहतो.
 सहा फूट उंची, धारदार नाक, दाढी, डोळ्यातून ओसंडणारा स्नेहभाव असं जीजी मितभाषी आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर होते. समाजवादी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचे ते फॅमिली डॉक्टर होते. अनेक कार्यकर्त्यांना स्पेशालिस्टांकडे तपासणीसाठी पाठवताना ते संबंधीतांना चिठी देत. एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला त्यांनी चिठी देऊन एका स्पेशालिस्टाकडे पाठवला. मुंबईत तो नवखा असल्याने मी सोबत गेलो होतो. तपासणी, सल्ला वगैरे सोपस्कार आटोपल्यावर मी संबंधीत डॉक्टरांकडे फी ची चौकशी केली. त्यांनी मला जीजींची चिठी दाखवली--जीजींच्या चिठीतली शेवटची ओळ होती—प्लीज डोन्ट चार्ज हिम. जीजींच्या विनंतीचा मान ठेवायला हवा, असं सांगून डॉक्टरांनी कार्यकर्त्याला म्हटलं कोणत्याही मदतीसाठी निःसंकोचपणे मला फोन करा. बसरूर नावाचे समाजवादी कार्यकर्ते चिखलवाडीतल्या चाळीत एका खोलीत राह्यचे. त्यांची प्रकृती बिघडली. चाळीतल्या खोलीत त्यांची शुश्रूषा करणं अवघड होतं. जीजींनी आपल्या घरामध्ये त्यांची व्यवस्था केली.
   मंगला पारीख ह्या जीजींच्या पत्नी. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये त्या काही काळ शिकायला होत्या. त्यामुळे असेल कदाचित पण जीजींच्या घरात अमृता प्रीतम, के.के. हेब्बर इत्यादी चित्रकारांच्या प्रिंटस् अतिशय नेटकेपणे फ्रेम केलेल्या असायच्या. फर्निचर साधं पण मांडणी सौंदर्यपूर्ण. मंगलाताईही समाजवादी आंदोलनात सक्रीय होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये मंगलाताई आणि जीजी एकमेकांशी बोलायचे. कार्यकर्ते, नेते, मित्र-सहकारी, पुस्तकं, नियतकालीकं, वर्तमानपत्रं ह्यांचा घरात सतत राबता असायचा. मंगलाताई जीजींना अरे-तुरे करायच्या याची मला लहानपणी खूप गंमत वाटायची. कारण माझ्या घरात वा जीजी आणि मंगलाताईंपेक्षा वयाने लहान असणार्‍या समाजवादी नेते-कार्यकर्त्यांमध्ये असा संवाद अपवादाने कानी पडायचा. मागच्या वर्षी समाजवादी जनपरिषदेने पुण्यामध्ये दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. अध्यक्षस्थानी जीजी होते. त्यावेळच्या भाषणात ते म्हणाले माझी प्रकृती आता ठीक नाही, वयही झालं आहे. माझी पत्नी असती तर कार्यक्रमाला हजेरी लावायला विरोध केला नसता पण ती दुःखी झाली असती. या प्रस्तावनेनंतर राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.
   गेल्या वर्षी जीजींनी त्यांच्या वयाची नव्वदी पूर्ण केली. १० एप्रिल रोजी त्यांचा सत्कार करण्याचं समाजवादी चळवळीतील साथींनी ठरवलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजवादी शक्तींच्या एकजुटीचं एक पाऊल पुढे पडो ह्या शुभेच्छांसह जीजींना विनम्र अभिवादन.