Friday, 25 November 2011

पंडित सत्यदेव दुबे : “ करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा...”


उस भविष्य में
धर्म-अर्थ र्‍हासोन्मुख होंगे
क्षय होगा धीरे-धीरे सारी धरती का
सत्ता होगी उनकी
जिनकी पूंजी होगी
जिनके नकली चेहेरे होंगे
केवल उन्हें महत्व मिलेगा
राज्यशक्तियां लोलुप होंगी
जनता उनसे पीडीत होकर
गहन गुफाओं में छिप-छिप कर दिन काटेगी

धर्मवीर भारती यांच्या अंधा युग, या नाटकाचा प्रारंभ, त्यांनीच रचलेल्या या विष्णु पुराणाने होतो. महाभारत युद्धाचे दिवस आहेत. कौरवांचा पराभव निश्चित झाला आहे. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी हटून बसला आहे. मित्र-शत्रू असा आपपर भेद न करता हे अस्त्र अवघ्या पृथ्वीला भस्मसात करणार आहे. या प्रमुख ताणाभोवती हे नाटक रचलं आहे. या नाटकाने भारतीय रंगभूमीला आत्मविश्वास दिला. आपल्या इतिहास-परंपरेत आपली मूळं घट्ट रोवून, आधुनिकतेला आपलंसं करता येतं ही जाण नव्हे तर दर्शन भारतीय रंगमंचालाच नाही तर साहित्य-संस्कृतीला या नाटकाने दिलं, असं म्हटलं जातं. शंभर वर्षांत एखादंच असं नाटक लिहीलं जातं, अशा शब्दांत गिरीश कर्नाड यांनी या नाटकाचा गौरव केला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पहिले संचालक, इब्राहीम अल्काझी यांनी या नाटकाचे खेळ दिल्लीतल्या फिरोजशा कोटला आणि पुराना किला या वास्तूंमध्ये सादर केले. १९६३ साली.

अंधा युग हे नभोनाट्य होतं. १९५३ साली ते आकाशवाणीने प्रसारीत केलं होतं. देशाची फाळणी करण्याचा निर्णय हीच घोडचूक होती, वेडाचार होता ही भूमिका मांडण्यासाठी लिहिलेल्या या नाटकाची व्याप्ती आणि खोली एवढी वाढली की अवघ्या विश्वाला कवेत घेण्याची क्षमता त्या संहितेत होती. या नाटकाचे प्रयोग आसामी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये झाले.  अल्काझी, रामगोपाल बजाज, एम.के रैना, मोहन महर्षी, रतन थिय्याम या श्रेष्ठ भारतीय रंगकर्मींनी या नाटकाचे खेळ आपआपल्या अर्थनानुसार देशात आणि परदेशात विविध वास्तूंमध्ये सादर केले.

अंधा युग विस्मृतीतच जाणार होतं. मात्र सत्यदेव दुबे नावाच्या रंगकर्मीने या नाटकाची क्षमता अचूक हेरली होती. नभोनाट्याला रंगमंचावर आणण्यासाठी नाटकाच्या संहितेवर ते दहा वर्षं काम करत होते. त्यावेळच्या मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईला क्रिकेटपटू होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आलेले दुबे, इब्राहिम अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये रमले. अल्काझी दिल्लीला गेल्यावर थिएटर युनिटचं नेतृत्व दुबेजींकडे आलं. अंधा युग ची संहिता त्यांनी अल्काझींनाही पाठवून दिली होती. दिल्ली आणि कोलकत्यातल्या हिंदी नाट्य महोत्सवात दुबेजींनी अंधा युग सादर केलं. दुबेजींनी केलेल्या या नाटकाच्या खेळात गुंगा सिपाही ही भूमिका राजेश खन्नाने केली होती तर अश्वत्थामा होता, नासीरुद्दीन शहा. दुबेजींचा प्रयोग अल्काझींनी पाह्यल्यानंतर या नाटकाने इतिहास घडवला.

असं युगप्रवर्तक नाटक शोधून काढणारे सत्यदेव दुबे यांच्याबरोबर माझी भेट ठरली 2004 साली. त्यांनीच मला फोन करून वेळ मागून घेतली आणि वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये भेटायला ये असं सांगितलं. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी पोचलो. दुबेजी माझीच वाट पाहात होते.
काय पिणार? त्यांचा प्रश्न.
रम.
किती पेग?
दोन पेग.
कोक?
नाही. लिंबू.
त्यांनी वेटरला मोठ्ठी ऑर्डर दिली. पाच पेग रम, दोन कोकाकोला, दोन लिंबू कापून. थंड पाणी. बर्फ नको. माझ्या प्रश्नांकित चेहेर्‍याकडे पाहून दुबेजींनी खुलासा केला-- सारखं सारखं त्याला बोलवायचं आणि ऑर्डर रिपीट करायची म्हणजे आपल्या बोलण्यात व्यत्यय येणार. त्यापेक्षा एकदाच काय ती ऑर्डर दिली की आपणही मोकळे आणि तोही.

मी रंगकर्मी नाही. २००४ साली एका प्रादेशिक मराठी दैनिकात मुंबईतील राजकारणाच्या बातम्या देणारा मी एक सामान्य पत्रकार होतो. नाटक सोडाच पण सिनेमाचाही मी चोखंदळ रसिक उरलो नव्हतो. दारूकामाचं सामान टेबलवर आल्यानंतर दुबेजी म्हणाले की त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणुक लढवण्याचं ठरवलंय, त्यासाठी त्यांना माझ्याकडून मार्गदर्शन हवं होतं. आजचा चार्वाक नावाचा एक दिवाळी अंक आम्ही चार-पाच मित्र काढत होतो. त्या अंकात दुबेजींनी मुलाखत द्यावी अशी विनंती करायला मी आणि सतीश तांबे त्यांना कधीतरी भेटायला गेलो होतो. मुलाखत मी घेणार नव्हतो. पण त्यावेळी त्यांनी माझा मोबाईल फोन नंबर त्यांच्या मोबाईल फोनमध्ये टिपून ठेवला होता. राजकारण कव्हर करणारा मी पत्रकार आहे, अशी नोंद त्यांनी करून ठेवली असावी. त्यामुळे असेल कदाचित् पण निवडणुकीला उभं राह्यचं मनात आल्यावर त्यांनी मला फोन केला. निवडणुका, लोकशाही, निवडणुक लढवण्यामागची त्यांची भूमिका या विषयावर दुबेजी सविस्तर बोलू लागले. रामराज्य परिषद, आरएसेस, भारतीय जनसंघ यापैकी कोणत्या तरी संघटनेत होते वा त्यांचा संबंध आला असावा, असं त्यांच्या बोलण्यावरून वाटलं. पण नंतर त्यांनी या संघटनांबद्दल नाराजी व्यक्त केली. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा प्रश्न अगदीच बोगस आहे, अशी टिपणी केली. मुसलमानांकडून आपण खूप गोष्टी शिकायला हव्यात, असं ते ठासून मांडत होते. उदाहरणार्थ, सध्या एड्स या रोगाचा प्रसार होत असताना, हिंदूंनीही सुंता करण्याचा गांभीर्याने विचार केला पाहीजे कारण त्यामुळे शिश्नाची त्वचा काहीशी निबर होते आणि समागम करताना तिला व्रण पडण्याची वा तिच्यातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता कमी असते, अशी दुबेजींची कारणमीमांसा होती.

आमची दुसरी मिटिंग एमआयजी क्लबमध्येच पण दुपारी झाली. अभिनय या विषयाच्या संबंधात ते आणि चेतन दातार यांची चर्चा सुरु होती. चेतनचं बोलणं दुबेजी लक्षपूर्वक ऐकत होते. चेतन बोलत असताना दुबेजी हळूवारपणे म्हणाले, थांब.
चेतन बोलायचा थांबला.
दुबेजी म्हणाले, श्वास घे.
चेतनने श्वास घेतला.
आता बोल.
चेतनने त्याचं वाक्य पूर्ण केलं.
सोड श्वास.
चेतनने श्वास सोडला.
काही मिनिटं हा सिलसिला चालू होता. चेतन त्याच्या मनात होतं तेच बोलत होता पण दुबेजींच्या श्वास-निःश्वासाच्या सूचना पाळत. श्वास, उच्छ्ःवास, निःश्वास या क्रियांचा बोलण्यावर, आवाजावर आणि अर्थातच अभिनयावर काय परिणाम होतो, त्याचा तो अभ्यास सुरु होता. गप्पा नेहमीप्रमाणेच या विषयावरून त्या विषयावर भरकटतच होतं पण श्वास, उच्छ्ःवास, निःश्वास यांची लय बदलली की आवाजात काय फरक पडतो यावर दुबेजी लक्ष ठेवून होते.

त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय ही बातमी कळल्यावर पत्रकारांचे त्यांना फोन यायला लागले. मुलाखत हवी म्हणून. दुबेजी म्हणायचे, मुलाखत घ्यायला केव्हाही या. पण पैसे किती देणार ते सांगा. वार्ताहर स्तंभित व्हायचे. पेड न्यूजच्या काळात, उमेदवारच मुलाखतीसाठी पैसे मागतोय त्यामुळे हैराण झाले. दुबेजींचं म्हणणं होतं, तुम्ही माझी मुलाखत छापणार वा प्रसारित करणार म्हणजे वाचक वा दर्शक यांना तुम्ही ती विकणार तर मला माझा वाटा मिळाला पाहिजे. मी फुकट मुलाखत कुणालाच देणार नाही. फुकट बातमी द्यायची असेल तर मी पत्रकार परिषद घेईन. दुबेजींना पैशाशी ना सोयर होतं ना सुतक. पण प्रश्न तत्वाचा होता. तिथे तडजोड नाही. आता हे तत्व कोणतं हा मोठा गहन प्रश्न होता. कोणत्या नाटकावर आपण काम करतोय म्हणजे विचार करतोय यावर ते बोलत होते. मध्येच मला म्हणाले, हे छापून टाक कुठेतरी, म्हणजे काय की ती मेधा पाटकर कोण, कशासाठी लढतेय हे मला काहीच माहीत नाही. पण एक बाई अशी लढतेय हे कळल्यावर मला समाधान वाटतं. तसंच कोणतं तरी काम करणार्‍या माणसाला नाटकातही एक माणूस त्याच्यासारखंच काही काम करतोय एवढं तर कळेल. तेवढं पुरतं.

मी आणि सतीश तांबे त्यांना भेटायला साहित्य सहवासमधल्या त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. चालताना काठी का तत्सम आधार लागायचा. त्यामुळे जिने चढता-उतरता येत नव्हते. त्यामुळे चेले, चाहते, मित्र या गोतावळ्याचं मिळून त्यांचं कुटुंब बनलं होतं. अर्थात तरिही ते राह्यचे एकटेच. आम्ही दोघे गेलो तेव्हा म्हणाले, आय कॅन मेक कॉफी आणि लंगडत स्वैपाकघरात गेले. कॉफीचा डबा उघडला तर पावडर संपलेली. त्यांनी शेजारी फोन केला आणि कॉफी आहे का विचारलं, त्यांच्याकडेही नव्हती. दुबेजींनी तात्काळ विनंती केलीआपल्या बिल्डिंगमधल्या अशा माणसाचा नंबर द्या की त्याच्याकडे कॉफी असेल.
संवादात ते कमालीचे तीक्ष्ण होते. अंकुर, निशांत, भूमिका, जुनून, कलयुग, आक्रोश,विजेता या चित्रपटांचे संवाद दुबेजींनी लिहिले आहेत. (अंकुर, भूमिका, विजेता आणि मंडी या चित्रपटांच्या पटकथाही त्यांच्या आहेत.) दुबेजी श्रेष्ठ रंगकर्मी. पद्मश्री, कालिदास सन्मान असे अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार त्यांना रंगभूमीला केलेल्या योगदानाबद्दल मिळाले आहेत. भूमिका या चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला तर जुनून या चित्रपटाच्या संवादासाठी फिल्मफेअर पारितोषिक मिळालं.

सतीश तांबेच्या एका कथेचं त्यानेच नाट्य रुपांतर केलं होतं. कथेचं नाव होतं-- बिनबायांच्या जगात ब्रह्मचार्‍याचं लग्न. मित्राचं लग्न ठरल्याबद्दल सुरु झालेल्या पार्टीत अनुभवी मित्र, वराला सल्ले द्यायला सरसावलेले असतात. कथेच्या शेवटी वाचकाला कळून चुकतं की स्त्रीचं लैंगिक सुख वा आनंद हा नेमका कशात आहे, हे पुरुष नावाच्या प्राण्याला कळलेलंच नाही. या कथेच्या नाट्यरुपाचं वाचन एका रविवारी दुबेजींच्या घरीच करायचं ठरलं. काही मित्रही आले. नाटक दुबेजी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. चर्चा नाटकापेक्षा साहित्यात वा नाटकात लैंगिकतेचं कसं चित्रण झालंय यावर सुरु होती. दुबेजींनी तर मोठं भाषणच दिलं पण ते सेक्स या विषयावर. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली चर्चा दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत चालली. निघताना दुबेजी सतीशला म्हणाले, नाटक चांगलं आहे पण त्याचं नाव बदल आणि पुन्हा लिहून काढ.

दुबेजींचं म्हणणं असं होतं की नाटक स्त्रीशिवाय असूच शकत नाही. नाटकात बाई हवीच. त्यामुळे तो विषय बरोबर आहे. ताण नीट पकडला आहेस पण स्त्री पात्र विरहीत असं नाटक नसतं कारण स्त्रीपात्र विरहीत जीवन नसतं. दुबेजींसाठी नाटक आणि जीवन वेगळं नव्हतं. मुलाखती दरम्यान एकाने त्यांना विचारलं की बरेच महिने दुबेजींनी नाटक केलं नव्हतं त्यामुळे ते अस्वस्थ आहेत का. दुबेजी उत्तरले, नाटक केलं नाही की सर्वात मोठा प्रॉब्लेम सेक्सचा होतो. सेक्स मिळत नाही ना. तो पत्रकार अवाक् झाला त्याने विचारलं, पंडीतजी हे उत्तर छापू का असंच्या असं. हो, जे बोललो ते छापण्यासाठीच बोललोय, दुबेजी उत्तरले. त्यांच्या नाटकांचे फक्त पाच-सात प्रयोगच का होतात, असं मी एकदा त्यांना विचारलं तर निरागसपणे ते उत्तरले, पाच-सात प्रयोग झाल्यावर मला क्लायमॅक्सच येतो. विविध अभिनेत्रींबरोबर नाटकात काम करणं वा  आपल्या नाटकाच्या कामात स्त्रियांना गुंतवणं ह्यातच त्यांचं लैंगिक वा शाररीक सुख सामावलेलं होतं. नाटक हाच त्यांचा सेक्स होता.

दुबेजींनी लिहीलेल्या एका नाटकाच्या वाचनाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. नाटकातली मध्यवर्ती भूमिका वा नायक, दुबेजींच्याच व्यक्तिमत्वावर बेतला होता. दुबेजींच्या जीवनातल्या ताण-तणावांचंच ते नाटक होतं. नाटक वाचून झाल्यावर दुबेजी म्हणाले, इतकी वर्षं नाटकात काढल्यावर इतका बेशरम झालोय की आता तुम्ही काहीही टीका करा, मी ऐकतो. त्यानंतरच्या चर्चेत कोणी प्रश्न विचारला तरच ते उत्तर देत होते. बाकी टीका, टिपण्णी, स्तुती, कौतुक उत्सुकतेने ऐकत होते. दुबेजींची जीवनविषयक दृष्टी त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधूनच अतिशय समग्रपणे व्यक्त होते. अभिव्यक्तीचं त्यांचं माध्यम नाटक हेच होतं. त्या नाटकाचा नायक रंगकर्मीच आहे पण सरकार, उद्योगपती वा अन्य कोणतीही संस्था यांच्या आर्थिक मदतीशिवाय तो नाटकं करत असतो. जवळचे मित्र, मैत्रीणी यांच्याकडे हक्काने पैसे मागून तो नाटकाचे खेळ करत असतो. ते त्याला कधी हिशेब विचारत नसतात की तो कोणाला कधी हिशेब देत नसतो. त्याचं जीवन छानछोकीचं वा सुखवस्तु नसतंच कारण नाटकाशिवाय तो अन्य काहीच करत नसतो. त्याला ना कपड्यालत्त्याचा षौक असतो, ना गाडीघोड्याचा, ना घरादाराचा. त्याला ना बायको असते, ना कुंटुंब. त्याला फक्त नाटक असतं आणि या नाटकाने जोडले गेलेले मित्र-मैत्रीणी. नाट्यकर्मी म्हणून तो श्रेष्ठ असतो पण नाटकाला, रंगभूमीला निर्णायक वळण देता येईल अशा एखाद्या संस्थेच्या संचालकपदी त्याची वर्णी लागलेली नसते. त्याला सदा हातातोंडाची मिळवणी करतच नाटकं करावी लागलेली असतात. या नायकाला एका मोठ्या संस्थेच्या संचालकपदाची ऑफर आलेली असते. कथानकात अन्य ताण-तणावही आहेतच. ही ऑफर त्याने स्वीकारावी की नाही, या विषयाभोवती ते नाटक फिरतं. तो अर्थातच ती ऑफर नाकारतो. हिंदी भाषेतले कादंबरीकार अमृतलाल नागर यांनी आपल्याला काय सांगितलं होतं हे आपल्या मित्रांना नायक सांगतो. जब पैदा हुआ था तो एक बंदा रुपया था मेरे पास, बचपनेमें एक चवन्नी चली गयी, जवानी के नशे में और एक चवन्नी गँवा बैठा. शादी होने के बाद, घर-गृहस्थीमें तिसरी चवन्नी भी चली गयी. अब एक चवन्नीही बची हैं, और मरते दम तक उसे नहीं छोडूंगा. अमृतलाल नागर हे वाक्य दुबेजींशीच बोलले होते. ते वाक्यच दुबेजींनी आपल्या नाटकात आपलीच भूमिका करणार्‍या पात्राच्या तोंडी टाकलंय. नाटक असेल वा अन्य कोणती कलाकृती वा संस्कृती ही कोणाच्या स्पॉनरशिपमधून उभी राहात नसते तर सर्जनशीलतेची कदर करणार्‍या प्रेमाच्या माणसांच्या आधाराने कलाकृती, कलाकार आणि संस्कृती घडत असते, अशी दुबेजींची धारणा होती. त्या धारणेनुसारच ते जगत होते.

या नाटकाचेही आठ-दहाच प्रयोग झाले. नेमका त्याच सुमारास मी मुंबईत नव्हतो त्यामुळे मला ते पाह्यला मिळाले नाहीत. एका खेळाची आठवण मित्राने सांगितली. पडदा उघडतो आणि डिपंल खन्नाच्या मुलीचा डान्स सुरु होतो. घमासांग म्युझिक आणि नृत्य. अचानक ते थांबतं. नर्तकी विंगेत जाते. मग निवेदकाचा आवाज. पाह्यलात नाच, आता नाटक पहा. हे भन्नाट होतं. तुम्हाला हे सुचलं कसं असं मी दुबेजींना विचारलं. मुंबईत कुठेही वेळेवर पोचणं कठीण असतं. ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी, ट्रॅफिक, गर्दी. त्यातून माझ्या नाटकाला येतात मोजके प्रेक्षक. चार-दोन मिनिटं होणारच इकडे-तिकडे. नेमकी सुरुवातच चुकवली अशी हुरहुर त्यांना वाटायला नको. उशीरा आलेले प्रेक्षक रांगातून सरकायला लागले की वेळेवर आलेल्या प्रेक्षकांचे चेहेरे आंबट होणार. त्यापेक्षा नाच टाकला की वेळेवर आलेले आणि येऊ न शकलेले, दोघांचीही सोय होते, असं दुबेजी म्हणाले. दुबेजींना नाटक म्हणजे केवळ लेखक वा दिग्दर्शकाचं असतं असं वाटतच नव्हतं. त्यांच्या दृष्टीने नाटक हे समूहाचंच असतं. नाटककाराने लिहीलं असेल नाटक पण त्याला ते संपूर्णपणे कळलं असेलच असं नाही. नाटकाचं वाचन करून, प्रेक्षक, रंगमंच, नाट्यगृह असे अनेक घटक लक्षात घेत त्यात बदल करायचेच असतात, अशीच त्यांची धारणा होती.

सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला दुबेजी कोसळले. त्यांना पृथ्वी थिएटरमधून हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. ते कोमात गेल्याचं कळलं. त्यांचे मित्र-मैत्रिणी, चेले, चाहते यांचा परिवार मोठा आहे. वेळापत्रक ठरवून त्यांची देखभाल केली जातेय. कोमात असलेल्या दुबेजींसाठी नाट्यवाचनही केलं जातंय. दुबेजींच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा वा नोंद करणारा ग्रंथ शांता गोखले यांनी संपादीत केला. ऑक्टोबर महिन्यातच तो प्रसिद्ध झाला. दुबेजी कोमात असताना. नोव्हेंबरच्या २२ तारखेपर्यंत म्हणजे हा लेख लिहितानाही ते कोमातच आहेत असं समजलं. डॉ. आनंद जोशी यांनी कोमाच्या स्थितीविषयी एक लेख लोकसत्तेत लिहिला होता. त्यांनी म्हटलं होतं की कोमाच्या स्थितीत असलेल्या काही पेशंटना आपल्या मनात आणि शरीरात काय चाललंय हे कळत असतं, आसपासच्या हालचाली आणि ध्वनींचंही ज्ञान होत असतं पण शरीराद्वारे ते कोणताही प्रतिसाद देऊ शकत नसतात. दुबेजी अशा अवस्थेत असतील तर नक्कीच त्रिशंकू नावाचं नाटक लिहिण्याच्या कामाला लागले असतील. या नाटकाच्या वाचनाला अमक्यातमक्या दिवशी, अमक्यातमक्या ठिकाणी ये, या त्यांच्या एसएमएसची मी वाट पहातोय.