Sunday 10 May 2015

मॉन्सून आणि आपला काळ...





एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती असलेल्या जनसमूहांनी व्यापलेला भौगोलिक प्रदेश आणि त्यावरील एकछत्री अंमल ह्याला म्हणतात राष्ट्र-राज्य वा नेशन-स्टेट. ही संकल्पना युरोपची. म्हणजे अटलांटिक महासागराच्या किनार्‍याची.

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हा हिंदी महासागराचा भाग आहेत. तीच आहे मॉन्सूनची जन्मभूमी वा जन्मसागर. हिंदी महासागर ज्या किनार्‍यांना वा देशांना कवेत घेतो तिथे राष्ट्र-राज्य (अर्थात नेशन-स्टेट) ही युरोपियन संकल्पना लागू होत नाही. या देशांची अर्थव्यवस्था आणि संस्कृती मॉन्सून ठरवतो. या विविधतेला सामावून घेणारी राष्ट्र-राज्य ही राजकीय व्यवस्था हिंदुस्थान, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया कुठेही नव्हती. ब्रिटीशांच्या, फ्रेंचांच्या आगमनानंतर ती कलम करण्याचं काम सुरू झालं. म्हणून तर भारत स्वतंत्र झाल्यावर तो एकसंघ राहणार नाही असं भाकीत अनेक विचारवंतांनी केलं होतं. आपल्याला पटो वा न पटो पण लोकशाही व्यवस्थेमुळे भारत एक देश म्हणून केवळ टिकला नाही तर मजबूतही झाला. विविधतेमध्ये विषमता होती पण विविध समूहांना सत्तेत सामावून घेणं वा त्यांची स्वायत्तता बरकरार ठेवून समाधान करण्याचे नानाविध मार्ग भारतीयांनी शोधले होते. अगदी प्राचीन काळापासून. जातिव्यवस्था हा त्यापैकी एक मार्ग होता. काश्मीर आणि ईशान्य भारतात लोकशाही व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला हे भारताचं मोठं अपयश. मात्र तिथेही फुटीरतावाद्यांना निवडणूकीच्या राजकारणात सामावून घेण्याची लवचिकता आणि उदारमतवाद आपण दाखवला.



*** ****** *****

रामायण, महाभारत हा इतिहास नाही. त्या गोष्टी आहेत. पण गोष्टींमध्येही आपल्या देशाचा भूगोल आणि राजकारण ह्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. दिल्लीतला पुराना किला म्हणजे इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी समजली जाते. बागपत, तालपत, सोनपत, इंद्रपत, पानीपत ही पाच गावं पांडवांना द्या आणि युद्ध टाळा, अशी शिष्टाई कृष्णाने केली होती. ही पाचही गावं आजच्या दिल्लीच्या आसपासच आहेत. अयोद्ध्याही उत्तर प्रदेशात आहे. सम्राट अशोकाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे गंगा-यमुनेच्या खोर्‍य़ातली आहे.
सिंधूंचं खोरं (पंजाब) वा गंगा-यमुनेचं खोरं (दोआब) हे खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन आणि अर्वाचीन काळात. आजही भारताची अन्न सुरक्षा या राज्यांवरच अवलंबून आहे.
दख्खन म्हणजे दक्षिण. तिथल्या अर्थव्यवस्थेची मदार खरीप पिकांवर आहे. हरितक्रांतीची सुरुवात पंजाब, हरयाना, पश्चिम उत्तर प्रदेश इथे झाली. वायव्येकडचा पंजाब वगळता जातिसंघर्ष या प्रदेशात अधिक तीव्र आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश ह्या राज्यांमध्ये प्रदीर्घकाळपर्यंत उच्चवर्णीयांचं शासन होतं. ह्यातील पंजाब वगळता बाकी सर्व राज्य बीमारू समजली जातात.



ह्याउलट दक्षिण भारतात (अपवाद गुजरातचा) खरीप हंगाम बेभरवशी असल्याने कृषी प्रक्रिया आणि अन्य उद्योगांची कास धरण्यात आली. परिणामी हरितक्रांती न झालेली राज्यं आज पुरोगामी समजली जातात. स्वातंत्र्योत्तर काळात ह्या राज्यांमध्ये शेतकरी जातींच्या हाती सत्ता गेली, हे त्यामागचं एक प्रमुख कारण असावं.

***** ****** ****** ******

सिल्क रूट वा रेशीम मार्ग हा शब्द वा संज्ञा खूप लोकप्रिय आहे. आशिया आणि युरोप ह्यांना जोडणार्‍या रस्त्याचं कौतुक केलं जातं. ही युरोप केंद्रीत भाषा आहे. कारण युरोपमधून आशियामध्ये कोणताही पक्का माल वा कच्चा माल येत नव्हता. तिथल्या लोकरीपेक्षा मध्य आशियातली लोकर उच्च दर्जाची होती. चामड्याच्या बाबतीतही तीच स्थिती होती.

रेशीम मार्ग वा सिल्क रूट वस्तुतः मध्य आशिया-रशियातील व्यापाराने गजबजलेला होता. चीनमधून रेशमाचं कापड, चहा, चिनीमातीची भांडी, भारतातून धान्य, सुती कापडांची ठाणं, साखर आणि गुलाम, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून घोडे, लोकर, चामडं.

दरवर्षी सात, आठ वा दहा हजार घोडे काबूलला येतात. साखर, कापड, मसाले आणि गुलाम घेऊन हिंदुस्थानातून दहा, बारा, पंधरा हजार काफिले काबूलला येतात. काबूलच्या व्यापार्‍यांचा नफा ३००-४०० टक्के आहे. खुरासान, इराण, अनातोलिया आणि चीन मधूनही काबूलला माल येतो. इथून तो हिंदुस्थानला रवाना होतो, अशी नोंद बाबरने त्याच्या बाबरनाम्यात केली आहे.

खैबरखिंड व्यापारी तांड्यांनी गजबजलेली होती. त्यामुळे त्याच खिंडीतून आक्रमक आले. बाबरच्याही आधीपासून. आक्रमक कोणीही असोत इराणी, अफगाणी वा मोगल, व्यापाराला त्यांनी नेहमीच सरंक्षण दिलं. व्यापारी मार्गांवर कायदा-सुव्यवस्था नांदली पाहीजे याकडे दिल्लीच्या प्रत्येक सुलतानाने लक्ष दिलं. शेरशहा सूरी हा अफगाण होता. पाटणा ते पेशावर हा प्राचीन व्यापारी मार्ग (तक्षशीला ते नालंदा) त्याने नव्याने बांधला. तोच आजचा ग्रँट ट्रंक रोड. (ग्रँट ट्रंक रोडवर सर्वाधिक शानदार ढाबे आहेत. देसी घी, देसी मख्खनवाले) या मार्गावर सराया, पाणपोया, जनावरांचे तबेले शेरशहा सूरी ने बांधले. कोणत्याही व्यापार्‍याला दगाफटका झाला, त्याची हत्या झाली, त्याचा माल लुटला गेला तर गुन्हा घडलेल्या परिसरातील गावांना म्हणजे त्या गावांच्या मुखियांना जबाबदार धरलं जाईल असा हुकूम शेरशहा सूरीने काढला होता. बुखारा, समरकंद इत्यादी मध्य आशियातील राजवटींशी व्यापारी मार्गावरील शांतता-सुव्यवस्थेसाठीचे करार अकबराने केले होते. खैबरखिंडीतून आक्रमक आले पण त्यांनी कधीही व्यापारी तांड्यावर हल्ले केले नाहीत की त्या तांड्यांना लुटलं नाही. किंबहुना अशी लूटमार करणार्‍या टोळ्यांना जरब बसवली. आक्रमकांनी किंवा हिंदुस्थानच्या राजवटीने.

हे व्यापारी मुसलमान नव्हते. हिंदू आणि जैन होते. मुलतानचे खत्री या व्यापारात आघाडीवर होते. त्यांना वाट पुसत राजस्थानचे मारवाडी, जैन यांनी आपलं बस्तान बसवलं. कोणत्या पिकाचं उत्पादन शेतकर्‍यांनी घ्यावं हे व्यापारी ठरवायचे. त्यासाठी शेतकर्‍य़ांना कर्ज द्यायचे. उत्पादित माल खरेदी करायचे. त्यावर प्रक्रिया करून घ्यायचे. त्यासाठी कर्ज पुरवठा करायचे. हा माल खरेदी करून देश-विदेशात विक्री करायचे. व्यापाराची पेढी आणि सावकारी दोन्ही व्यवसाय करणार्‍या या मोठ्या कॉर्पोरेशन्सच होत्या. बँकाही होत्या. हुंडीची पद्धत त्यांनीच विकसीत केली. ग्रामीण भागाचं फिनान्शिअल इन्क्लुजन त्यांच्यामुळे शक्य झालं. त्यामुळे सरकारचा अर्थात दिल्लीच्या राजवटीला उत्पन्नाचं स्थैर्य मिळालं. मॉन्सूनच्या चक्राचा अभ्यास करून ही व्यवस्था व्यापार्‍यांनी विकसीत केली. बँकांचं राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधींच्या काळात झालं पण अजून करोडो भारतीयांनी बँकेत खाती उघडलेली नाहीत. फिनान्शिअल इन्क्लुजनसाठी गावागावात बिझनेस कॉरस्पाँडन्टची नेमणूक करण्याची योजना रिझर्व बँकेने सुचवली आहे. जेणेकरून त्याच्यामार्फत गावातले लोक बँकेत खातं उघडतील आणि चालवतील. प्राचीन भारतातील व्यापाराचा आणि व्यापारी-सावकारीचा सखोल अभ्यास केला तर कदाचित अधिक परिणामकारक आणि प्रभावी कार्यक्रम रिझर्व बँकेला आखता येईल. पण आपले डोळे लागले आहेत पश्चिमेकडे.

**** ***** ****** *****

येमेन, इराण इत्यादीसंबंधातल्या बातम्या वाचल्या आणि नकाशा पाह्यला.
तैग्रीस आणि युफ्रॅटीस या दोन नद्यांच्या पाणी वाटपावरून इराक आणि इराण ह्यांच्यामध्ये काही काळ युद्ध सुरू होतं गेल्या शतकात.
तैग्रीस नदीच्या काठावर बगदाद हे शहर आहे. तीच इराकची राजधानी.
तैग्रीस आणि युफ्रॅटिसच्या संगमाजवळ बसरा आहे. तिथेच त्या समुद्राला मिळतात.
तो समुद्र म्हणजे इराणची खाडी.
उजव्या हाताला समुद्र ठेवून बसर्‍यावरून आपण चालत निघालो तर इराणची खाडी संपून अरबी समुद्र सुरू होईल होर्मूझची आखात पार केल्यावर. पूर्व दिशेला चालत राह्यलो तर काही दिवसांनी वा महिन्यांनी आपण इराणातील बलुचिस्तानातून पाकिस्तानातील बलुचिस्तानात येऊ आणि तिथून सिंध प्रांतात कराची शहरापर्यंत पोचू. ह्याच मकरान किनार्‍यावरून सिकंदर परतला होता.

प्राचीन काळातले व्यापारी याच मार्गाने भारतात येत असतील. उंटांवर सामान लादून.
शिडांच्या बोटींमध्ये भरपूर माल भरता येतो आणि अंतरही वेगाने कापता येतं.
व्यापाराचा हा मार्ग अतिप्राचीन आहे. म्हणजे पर्शियन साम्राज्याच्या काळापासून. दरायस, ससानियन वगैरे सम्राट होते तेव्हापासून. दरायसचा उच्चार दरयुश असाही करतात.
मुंबईमध्ये ससानियन रेस्टॉरंट, दरयुश बेकरी आजही आहे.

बसरा त्यावेळीही पर्शियात वा इराणमध्ये नव्हतं. तर अरबस्थानात होतं. आजही इराकमध्ये वा अरबस्थानातच आहे. म्हणजे असं की खाडी पर्शियाची वा इराणची पण तिचा दुसरा किनारा अरबस्थानात होता. सिंदबादच्या सफरींमधला सिंदबाद मूळचा बसर्‍याचा. तो ओमानला स्थायिक झाला. ओमान हा देश अरबस्थानातला. इराणच्या आखातातील अरबस्थानाच्या किनार्‍य़ावरचा. प्राचीन काळाच्या पर्शियातून येणार्‍या बोटी समुद्राच्या किनार्‍याने यायच्या कारण नौकांचं आणि नौकानयनाचं तंत्र प्रगत झालेलं नव्हतं. ओमानच्या लोकांनी म्हणजे अरबांनी मॉन्सूनच्या वार्‍यांचा अभ्यास केला आणि त्या वार्‍यांवर स्वार होऊन खुल्या समुद्रातून भारताच्या दक्षिण किनार्‍याला वळसा घालून पार चीनच्या किनार्‍यापर्यंत मजल मारली. इस्लामच्या उदयानंतर अरबांनी या व्यापारात जोरदार आघाडी घेतली.

सिंदबादच्या काळातील जहाज उभारून त्याच्या मार्गाने सफर करण्याचा ध्यास एका युरोपियन शोधकाने २० व्या शतकाच्या उत्तरार्धात घेतला होता. हा प्रकल्प ओमान सरकारने प्रायोजित केला. त्यासाठी जहाजबांधणीचं तंत्र आणि कारागीर मिळवण्यासाठी ओमानच्या राजाचा प्रधान त्या युरोपियन शोधकासोबत केरळमध्ये गेले. दोन दिवस ओमानचा प्रधान गायब होता. पैसे त्याच्याकडे होते त्यामुळे तो युरोपियन शोधक चिंतेत पडला. दोन दिवसांनी प्रधान उगवला. माझी एक बायको केरळातली. तिला मी तलाक दिला पण मेहेरची रक्कम द्यायची राह्यली होती. त्यासाठी तिच्या गावी गेलो होतो, असा खुलासा प्रधानाने केला.

आता शिडांची जहाजं इतिहासजमा झाली आहेत. त्यामुळे व्यापारासाठी मॉन्सूनचं महत्व राह्यलेलं नाही. खनिज तेलाचे जगातले ५७ टक्के साठे इराणच्या खाडीच्या सभोवार आहेत. म्हणून तर अमेरिका इराणला धमकावत असली तरी भारताने तिच्या सूरात सूर मिसळला नाही. आपलं ९० टक्के खनिज तेल इराणच्या आखातातून अरबी समुद्रमार्गे येतं. म्हणून तर येमेनपर्यंत भारतीय नाविक दलाने आपला दबदबा निर्माण केला आहे.

सम्राट अशोकाच्या काळात वर्तमानपत्रं वा वृत्तवाहिन्या नव्हत्या.पण या व्यापारी मार्गांवर त्याने शिलालेख उभारून धर्म मार्गाचा उपदेश केला आहे. त्यात बौद्ध धर्माचा उल्लेख नाही. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर ह्यांनी वेढलेला भारतीय उपखंड व्यापारी तांड्यांनी गजबजलेला होता. त्यामुळे धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधतेला सामावून घेणारी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती इथे विकसीत झाली. शेती, उद्योग आणि व्यापारातून. इस्लामी राज्य अर्थात युरोपियन राष्ट्र-राज्य या संकल्पनेनुसार पाकिस्तानची उभारणी करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. वायव्य सरहद्द प्रांतातील पठाण, बलुचिस्थानातील बलुच, सिंधमधील सिंधी ह्या समूहांना सत्तेत वाटा देणं बाजूलाच राह्यलं पण त्यांच्या आकांक्षांना पद्धतशीरपणे चिरडण्यात आलं. परिणामी लष्कर आणि अणुबॉम्ब या दोन गोष्टींमुळेच पाकिस्तानच अस्तित्व आज शिल्लक आहे.