Saturday, 26 March 2016

भारत माता की जय


हिंदुराष्ट्रवाद्यांचं म्हणणं असं आहे की या देशातील शासनाने बहुसंख्यांक हिंदूच्या राजकीय इच्छाशक्तीचं जतन आणि संवर्धन केलं पाहीजे.
बहुसंख्यांक हिंदुंच्या राजकीय इच्छाशक्तीचं जतन आणि संवर्धन करण्यात भारतीय राज्यघटना पुरेशी नाही हे त्यामध्ये अनुस्यूत आहे.
अयोध्येतील मशिदीचा मुद्दा वस्तुतः स्थानिक होता. १८५६ मध्ये ब्रिटीशांनी मशिदीभोवती कुंपण घातलं आणि हिंदू ज्या चबुतर्‍यावर प्रार्थना करायचे त्याची डागडुजी केली. मशिदीत नमाज पढला जायचा आणि चबुतर्‍य़ावर भजन.
रामजन्मभूमीच्या जागेवरील मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली असा हिंदूंचा, स्थानिक हिंदूंचा दावा होता. 
१९८४ पासून विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा हाती घेतला. मंदिरासाठी विटा जमवणे, शिलान्यास करणे, कारसेवकांच्या बलिदानाचं भांडवल करणे (त्यामध्ये अनेक दावे खोटे होते. इंडिया टुडेने त्याचे पुरावे प्रसिद्ध केले होते), कारसेवकांच्या अस्थी कलशांच्या मिरवणुका काढणे, या धार्मिक कार्यक्रमांमधून हिंदू राष्ट्रवाद चेतवला गेला. बाबरी मशीद पाडली तेव्हा हा हिंदूराष्ट्रवाद केवळ चरमसीमेला पोचलेला नव्हता तर बहुसंख्य हिंदूंच्या मनात भिनला होता.
सेक्युलॅरिस्टांची त्यावेळी काय भूमिका होती....त्यांनाही अयोध्येतील प्रार्थनास्थळांवर नियंत्रण हवं होतं. त्यासाठी अयोध्येचा समावेश टुरिस्ट सर्कीटमध्ये करण्यात आला. शरयू नदीकाठाचं सुशोभीकरण करण्यात आलं. नदीच्या पात्रात मंच उभारून राम-सीतेच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. रामायण या मालिकेने राम ही पुराणकथा वा साहित्य नसून इतिहास आहे हे ठसवण्यात महत्वाची भूमिका निभावली.
वंदे मातरम् आणि भारता माता की जय, या घोषणांचा वाद नव्याने उकरून काढण्यात आला आहे. १९०५ साली ब्रिटीशांनी बंगालची फाळणी केली त्यावेळी वंदे मातरम हे गीत रविंद्रनाथ टागोरांनी गायलं. म्हणजे त्याची दोनच कडवी. तेव्हापासून वंदे मातरम ही घोषणा आणि तिचं साकार रुप म्हणजे भारतमातेची प्रतिमा जनमानसात रुजू लागली. त्यावेळची भारतमाता अन्न, वस्त्र, निवार्‍याचं प्रतीक होती. सर्वधर्मीय तिला वंदन करत होते. रा. स्व. संघाची भारतमाता देवी या स्वरूपात प्रकट झाली हातामध्ये भगवा ध्वज घेणारी. या भारतमातेचा जयजयकार करण्याचा आग्रह होतो आहे. गोची अशी की भारतमाता हा शब्द अगोदरच जनमानसात स्थिर आहे
भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये धार्मिक प्रतीकं वा चिन्हं जनमानसामध्ये दृढमूल झाली. या ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करणारी अब्राह्मणी चळवळही धार्मिक प्रतिमा वा चिन्हं रुजवू पाहात असते. धार्मिक समाजामध्ये शासनाने मात्र सेक्युलर भूमिका घेतली पाहीजे असं भारतीय राज्यघटना सांगते.
परंतु राजकारणात काँग्रेसने गडबड केली. परिणामी हिंदू राष्ट्रवाद वाढीस लागला. सेक्युलॅरिझम भारतीय राजकारणाला नेहमीच गुंगारा देत राह्यला आहे.