Tuesday, 29 June 2010

राजनेती

गंगाजल. अपहरण. राजनेती. प्रकाश झा च्या चित्रपटांना बिहारची पार्श्वभूमी असते. बिहारातील राजकीय-सामाजिक समस्येच्या भोवती हे चित्रपट गुंफलेले असतात. बिहारमधील राजकारणच सर्वत्र विशेषतः देशातल्या प्रत्येक राज्यात आहे असं त्यातून सुचवलेलं असतं.

हिंदी चित्रपटांचं नातं काळाशी वा परिसराशी नसतंच. नाईलाजने अनेक चित्रपटांचा परिसर मुंबई हाच राह्यला आहे. अधून-मधून दिल्ली. काश्मीर, हिमाचल प्रदेश अनेक चित्रटांमध्ये डोकावतात. या उलट प्रकाश झा चे चित्रपट बिहारशी म्हणजेच काळाशी आणि परिसराशी नातं जोडू पाहतात. वस्तुतः त्यांचं चित्रीकरण बिहारात झालेलं नाही, चित्रपटाच्या शीर्षकात वा कथेत बिहारला स्थान नाही. परंतु अनेक स्थानांची नावं, पात्रांची भाषा यामधून बिहारी मसाला पेरलेला असतो.

रमणीय समुद्रकिनारा, हिमशिखरे, नेत्रसुखद निसर्ग वा परिसर, अत्याधुनिक उद्यानं. त्यामध्ये गाणी म्हणत नाचणारे नायक-नायिका त्याच्या चित्रपटांत अपवादानेच असतात.

हिंसा, भ्रष्टाचार यांचे डाग नायकाच्या हातावरही असतात पण तरीही प्रेक्षकांची सहानुभूती त्यालाच असते. चित्रपटाचा नायकही सामाजिक-राजकीय परिस्थितीचा बळी असतो. ही वस्तुस्थिती प्रेक्षक स्वीकारतात.

प्रकाश झा च्या चित्रपटांची पटकथा आटोपशीर असते. संवाद नेमके असतात. चित्रपटाला वेग असतो. घटनांनी गच्च भरलेला असतो. या प्रकृतीच्या चित्रपटांना गाणी मानवणारी नसतात. त्यामुळे नाईलाजाने एखादं गाणं डोकावतं पण गाण्यांसाठी त्याचे चित्रपट प्रसिद्ध नाहीत.

सामाजिक वा राजकीय समस्येचं चित्रण, उकल वा त्यावरील भाष्य, त्यावर केलेलं राजकीय वा सामाजिक विधान यासाठी प्रकाश झा प्रसिद्ध नाही. त्याचे चित्रपट करमणूक प्रधानच असतात. हिंसा हा त्या चित्रपटांच्या करमणूकीचा गाभा असतो. हिंसाचार आपल्या आजूबाजूला असतोच. त्यासाठी बिहारात वा अन्यत्र जाण्याची गरज नसते. हिंसाचार आपल्याला दिसतो, आपल्या अनुभवातही असतो. पण तरिही त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणजे हिंसा का व कशी उफाळून येते हे आपलं आपल्याला कळत नाही. प्रकाश झा वा बाजारू चित्रपट या विषयावर कॅमेरा फोकस करत नाहीत. त्यांचा भर हिंसेच्या नानाविध तर्‍हा मांडून लोकांचं मनोरंजन करणं यावर असतो. हिंसेच्या या नानाविध तर्‍हा बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक हॉलीवूडमधून आयात करतात. राजनेतीतले अनेक शॉट्स गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटातले आहेत, उदाहरणार्थ मोटारीत ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात नायकाच्या प्रेयसीचा अंत होणं. अर्थातच प्रकाश झा ला स्वतःची चित्रभाषा गवसलेली नाही. त्याचे चित्रपट वास्तवाशी नातं सांगण्याचा आव आणतात पण ते वास्तववादी नसतात. (वास्तववाद म्हणजे वास्तवाचं यथातथ्य चित्रण नसतं तर वास्तवाचं आपलं आकलन अधिक समृद्ध करणं असतं.)

Monday, 21 June 2010

फादर्स डे

आईच्या किर्तीवर जगतो तो अधम, बापाच्या ख्यातीवर मिरवतो तो त्याच्यापेक्षा मोठा अधम तर सासर्‍याच्या मोठेपणावर रूबाब करणारा तो अधम शिरोमणी. हा अर्थ सांगणारं एक संस्कृत सुभाषित वडलांनी लहानपणी शिकवलं होतं. श्यामची आई या कादंबरीत पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींनीही पिता-पुत्रांमधल्या सनातन संघर्षाची दखल घेतली. कोसला या कादंबरीतील पांडुरंगाने बापाच्या विरोधात बंडांचं निशाणच हाती घेतलं. मुगले आझम या चित्रपटातील परिकथेला वास्तवाचा भक्कम आधार याच सनातन संघर्षाचाच आहे. बहुतेक हिंदी चित्रपटातले नायक बापाच्या विरोधात बंड पुकारूनच आपली हिरोगिरी सिद्ध करायचे. अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन या प्रतिमेपर्यंत हाच सिलसिला जारी होता.

एकविसाव्या शतकात हा सनातन संघर्ष निकाली निघाला का काय, अशी शंका येते. मार्केट इकॉनॉमीने वा बाजारपेठेने फादर्स डे आणला आणि समस्त पुत्रांनी आपआपल्या बापांचे गोडवे गायला सुरुवात केली. २० जून वा त्याच्या आगेमागे वर्तमानपत्रात आलेले सेलिब्रिटीजच्या मुलांचे वा सेलिब्रिटी मुलांनी आपल्या बापाबद्दल लिहिलेले लेख पाह्यले तर दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगेमधल्या पितापुत्रांच्या संबंधांची आठवण होईल. आई, बाप आणि सासरा तिघांच्याही किर्तीवर वा मोठेपणावर जगणारे, रुबाब करणारे, अभिमानाने आई-बापांचा वारसा मिरवणारे बक्कळ लोक सध्या सर्व क्षेत्रात सापडतील. विसावं शतक जर बंडखोरांचं असेल तर एकविसावं शतक अधमांचं वा अधमाधमांचं आहे असंच म्हणावं लागेल. अशा प्रकारचं सपक आणि सरबरीत भाष्य करायचा मोह अनेकांना आवरता येणार नाही. मुद्दा आहे समाजात होणारे बदल टिपण्याचा आणि हे बदल घडवून आणणर्‍या शक्ती कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा.

पिता-पुत्रांमधल्या सनातन संघर्षाची मूळं कुटुंबाच्या आणि समाजाच्या आर्थिक-सामाजिक रचनेत असतात. एकत्र कुटुंब पद्धती वारसा हक्कावर आधारलेली होती. संपत्तीवरचं, मालमत्तेवरचं नियंत्रण अर्थात कुटुंबातल्या सत्तेचं नियंत्रण मुलाकडे जाणं निश्चित होतं. सत्तेचं हे हस्तांतरण शक्य तितक्या लवकर व्हावं याकडे आईचा ओढा असतो कारण सर्वाधिक सत्ता तिच्यावर गाजवली जात होती. त्यामुळे आई नेहमीच मुलाला फितूर असायची. सत्तांतर लांबणीवर टाकण्यामध्ये बापाचे हितसंबंध असतात. त्यासाठी तो अनेक चाली खेळत असे. संपत्ती आणि सत्ता जेवढी मोठी त्याप्रमाणात या संघर्षाची रंगत वाढते. बहुसंख्य लोकांची संपत्ती आणि सत्ता अतिशय छोटी असते. त्यामुळे कुटुंबातील संघर्षाला व्यापक परिमाण मिळत नसलं तरीही त्याची तीव्रता कमी नव्हती. पिता-पुत्रांच्या संघर्षात होणारी आईची घुसमट अनेक कलाकृतींमध्ये प्रकट होते. बाजारू हिंदी चित्रपटांना काळ्या-पांढर्‍या रंगातच क्षोभनाट्य रंगवायचं असल्याने त्यांनी अनेकदा आई या पात्राला फाटा देऊन मेलोड्रामा गडद केलेला असतो, उदा. शराबी हा अमिताभचा चित्रपट.

मार्केट इकॉनॉमी वा बाजारपेठ केंद्रीत अर्थव्यवस्थेत वारसा हक्क गुंतागुंतीचे असतात कारण संपत्तीच्या निर्मितीला अधिक महत्व असतं. जेवढे अधिक पाईप जोडाल तेवढा पैसा वाढत जाते. बहुतेक बाबी आऊटसोर्स केल्याने कोण कोणाचं शोषण करतोय हे कळेनासंच होतं. म्हणजे नाईके या बुटांचा कारखाना नसतोच. नाईके म्हणजे बुटाची स्पेसिफिकेशन्स अर्थात डिझाईन असतं. त्या डिझाईनबरहुकूम बुटांचं उत्पादन जगातल्या अनेक कारखान्यांमधून होतं. नाईके फक्त उत्पादनाच्या दर्जाच्या खबरदारी आणि जबाबदारी घेते. ती मार्केटिंग कंपनीच असते. कारखाने तिच्या मालकीचे नसतातच. कामगारांनी संप केला तरी उत्पादनात खंड पडत नाही. मुंबईच्या कापडगिरण्या बंद पडण्याचं महत्वाचं कारण आऊटसोर्सिंग हेच होतं. असो. मुद्दा हा की मार्केट इकॉनॉमीत कारखानेच नाही तर कुटुंबाचेही तुकडे पडतात. त्यामुळे बापाच्या विरोधात मुलांनी बंड करण्याच्या शक्यताच उरत नाहीत. किंबहुना बापाच्या संपत्तीवर, भांडवलावर वेगळा धंदा उभारून बापाचं आणि स्वतःचंही स्वातंत्र्य अबाधित ठेवता येतं. फादर्स डे साजरा करणार्‍यांच्या अ‍ॅस्पिरेशन्स वा आकांक्षा याच असतात. कोणाकडे किती संपत्ती आहे हा मुद्दा गौण असतो.

Thursday, 17 June 2010

फुटबॉलच्या मैदानावर लाल-पांढरे

अ, ब आणि क त्रिकोणात उभे असायचे. अ च्या एका दिशेला ब तर दुसर्‍या दिशेला क. प्रतिस्पर्धी अंगावर चालून आले की अ, ब किंवा क कोणाकडेही बॉल पास करायचा. बॉल कोणत्या दिशेला न्यायचा हे सर्वांनी मिळून ठरवलेलं असायचंच. अ, ब, क च्या जागा घ्यायला ड, इ, ई, फ असे इतर असायचेच. बॉल कुठेही गेला की त्रिकोणात छोटे पास देत आगेकूच करायचे. हे लाल टी शर्टवाले.

या उलट पांढरे टी शर्टवाले. त्यांच्या रांगा होत्या. पहिली रांग, तिच्यापाठून दुसरी रांग. त्यांचा भर शक्तीवर. म्हणजे त्यांचा गोली जोरदार किक मारायचा ती एकदम लाल टी शर्टवाल्यांच्या गोलपोस्टच्या जवळ जायची. पांढरे टी शर्टवाले पळत जाऊन बॉलचा ताबा घ्यायचे. लांब लांब पासेस द्यायचे ही पांढर्‍या शर्टवाल्यांची व्यूहरचना.

लाल शर्टवाल्यांच्या पायातून बॉल काढून घेणं पांढर्‍यांना जमतच नव्हतं. लालवाल्यांचा खेळ दृष्ट लागण्यासारखा, डोळ्याचं पारणं फेडणारा होता. पांढर्‍यांच्या गर्दीतून गोलपोस्टकडे ते बॉल टोलवत न्यायचे. तिथे बॉल गेला की सुरु होतो कौशल्याचा आणि नशिबाचा खेळ. कारण तोवर सर्व पांढरे बॉलला रोखायला सरसावलेले असायचे. रणकंदनच व्हायचं आणि पांढरे बॉल परतवण्यात यशस्वी व्हायचे.

लाल टी शर्टवाले चणीने लहान होते. उंचीनेही लहान होते. छोटे पास देत आगेकूच केल्याने त्यांची दमछाक कमी व्हायची. बॉलवर नियंत्रण त्यांचंच असायचं. या उलट पांढरे. ते मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पळायचे. त्यातही गोल हाणणारे अधिक वेगाने धावायचे. लालवाल्यांची बचावाची फळी मात्र निवांत असायची. बॉलवर त्यांचंच नियंत्रण असल्याने बचावाला असणारे दोघे पांढर्‍यांची टोळी वा त्यांच्यातले चार-दोन सरसावले तरी फाफलून जायचे.
पांढरे धिप्पाड होते. कॉर्नर कीक मिळाली की बॉल डोक्याने टोलवायचे. या उलट लाल. कॉर्नर कीक मिळाल्यावरही त्रिकोणात बॉल घुमवत सरपटी खेळ खेळायचे. त्यामुळे पांढर्‍यांना बचावासाठी भरपूर वेळ मिळायचा. एवढ्या पायांतून बॉल गोलमध्ये ढकलण्याची संधी कमी मिळायची. मिळाली तरी पांढर्‍यांचा गोली भारी होता. तो बरोब्बर बॉल अडवायचा.
अखेरीला संधी मिळाल्यावर पांढर्‍यांनी बॉल लाल्यांच्या गोलपोस्टकडे टोलवला. लाँग पास. तिथे दोन पांढरे पळत पोचले. लाल्यांचा एक गोली. आणि दोन डिफेंडर. ही बचाव फळी अचानक हल्ल्याने फाफलली. लाल्यांच्या गोलीने जमिनीवर लोळण घेतल्यावर पांढर्‍यांच्या गणवेशातला काळा वेगाने पुढे सरकला. त्याने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. सामन्यावर नियंत्रण लाल्यांचं पण गोल पांढर्‍यांचा झाला.

लाल्यांनी पांढर्‍यांकडून काहीतरी शिकून दोन शैलींचा संगम करायला हवा होता. कौशल्याला, कलेला शक्तीची जोड द्यायला हवी होती.
(स्पेन आणि स्विर्त्झलंड यांच्या सामन्यात स्विर्त्झलंडचा विजय झाला. स्पेन युरोपियन चँपियन पण विश्वकप स्पर्धेत त्यांना पहिल्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अर्थात ते अजून स्पर्धेत आहेतच. छोटे पासेस ही दक्षिण अमेरिकन विशेषतः ब्राझीलची शैली. लाँग पासेस ही युरोपियन शैली.)

Tuesday, 15 June 2010

भोपाळ वायुकांडः ठेंगण्या लोकांचा ध्यास

उलटा चोर कोतवाल को डाँटे, अशी म्हण हिंदी भाषेत आहे. भोपाळ वायुकांडाबाबत अपराधी कोण आणि न्यायाधीश कोण हेच कळेनासं झालंय. केंद्रीय कायदामंत्र्यांनी न्यायालयावर ठपका ठेवलाय तर पंतप्रधानांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समितीला अहवाल द्यायला सांगितलाय. भोपाळ वायुकांडाला जबाबदार असलेल्यांना दोषी ठरवून न्यायालयाने तात्काळ जामीन दिलाय.
विधिमंडळ, न्यायालय, सरकार म्हणजे अर्थातच मंत्रिमंडळ, नोकरशाही, पोलीस आणि तपासयंत्रणा या सर्वांना पैसे चारून वॉरन अँडरसन आणि युनियन कार्बाईड यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली नाही. देशातील माणसांची प्रतिष्ठा आणि जगण्याचा हक्क यांची सांगड भांडवली विकास, परदेशी गुंतवणूक, औद्योगिकरण यांच्याशी घातल्यामुळे विकासाची किंमत कोणीतरी द्यायला हवीच, यावर देशातील राज्यकर्त्या वर्गाचं एकमत आहे. राज्यकर्ता वर्ग म्हणजे अर्थातच विविध समाजघटकांचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, नोकरशहा आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणारे आणि त्यांच्या समकक्ष असणारे खाजगी क्षेत्रातील कामगार, नोकर, अधिकारी वर्ग.
गरीबीची लाज बाळगू नका. गरीब असलो तरीही आपल्याला ताठ मानेने जगण्याचा हक्क आहे. किंबहुना श्रीमंतांनी, धनदांडग्यांनी गरीबांची सेवा करणं हा आपला धर्म मानला पाहीजे अशी म. गांधींची शिकवण होती. याच आधारावर त्यांनी बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला. पाश्चात्य विकसीत राष्ट्रांचं विकासाचं प्रारुप आपल्या देशाला उपयोगाचं नाहीच पण जगासाठीही इष्ट नाही अशी गांधीजींची भूमिका होती. संपत्तीची निर्मिती करणं याला कोणतंही सरकार प्राधान्य देतं. तेच नेहरू वा त्यांच्यानंतरच्या सरकारांनी केलं. लहान मुलं आणि बुटका माणूस यांची उंची सारखी असली तरी आपण त्यात फरक करतो. कारण लहान मुल मोठं होणार असतं. त्याची उंची वाढणार असते. बुटकी माणसं मोठीच असतात. त्यांची उंची वाढणार नसते. भांडवलशाहीने जगातील बहुसंख्य देशांना ठेंगणं बनवलं आहे. विकसीत पाश्चात्य राष्ट्रांचा कित्ता आपण गिरवला तर आपणही उंच होऊ असं या ठेंगण्या लोकांना वा देशांना म्हणजे या देशांमधील राज्यकर्त्या वर्गाला वाटत असतं. पाश्चात्य देशांनी वसाहतींमधील लोकांच्या शोषणातून संपत्ती निर्माण केली. आपल्याला संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणत्या तरी जनसमूहांचं शोषण करावं लागणार, विकासाची ही किंमत गरीबांनी म्हणजे मुंबईतले कापडगिरणी कामगार, जंगल वा अविकसीत प्रदेशातील आदिवासी यांनी द्यावी, अशी या राज्यकर्त्या वर्गाची धारणा आणि भूमिका असते.
भोपाळचं औद्योगीकरण करायचं तर युनियन कार्बाईडचा कारखाना आला पाहीजे, त्याचं डीझाईन सुरक्षा विषयक मुद्दे डोळ्याआड करा, वायुगळती झाली तरीही अमेरिका वा अमेरिकन कंपन्या दुखावतील असा निर्णय घेऊ नका. आपण आज गरीब आहोत, शक्तीहीन आहोत, जेव्हा शक्ती कमावू वा तिसरी शक्ती बनू तेव्हा अमेरिका वा प्रगत देशांना धडा शिकवू किंवा तेव्हाच त्यांच्यासमोर ताठ मानेने उभे राहू शकू, ही राज्यकर्त्या वर्गाची धारणा होती. त्यामुळे वायुगळतीमुळे मेलेल्यांना वा कायमचे अपंग झालेल्यांना नुकसान भरपाई देताना युनियन कार्बाईड वा अमेरिका यांच्या दबावापुढे मान तुकवण्याच्या निर्णयावर वस्तुतः सहमती असते. तशी सहमती होती म्हणूनच सरकार आणि न्यायालय दोघांनीही गुन्हेगांरांचे जोडे उचलण्यात धन्यता मानली.
एन्रॉन प्रकरणी शरद पवार, नरसिंहराव आणि वाजपेयी सरकारांनी हेच केलं. सरदार सरोवर प्रकल्पाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने केलेले सर्व दावे खरे ठरले तरीही सरकार, न्यायालय यांच्या भूमिका बदलल्या नाहीत. ठेंगण्याच्या देशातील राज्यकर्त्या वर्गाला औद्योगिक, विकसीत देशांतील माणसांएवढं उंच व्हायची आकांक्षा आणि ध्यास असेल तर गरीबांच्या घरावर, जगण्यावर वा जगण्याच्या हक्कावर वरवंटा फिरवला जाणारच.

Wednesday, 2 June 2010

निमित्त चेराबंडा राजूच्या कवितेचं......

चर्चा म्हणा वा गप्पा, देशातल्या लोकशाही व्यवस्थेसंबंधात चालल्या होत्या. चेराबंडा राजू या तेलगू कवीच्या कवितेच्या काही ओळी म्हणून शेखरने हेमूच्या युक्तिवादात खोडा घातला., हे झाड सुंदर आहे, तरी मी ते तोडणारे कारण मला घर बांधायचंय. आपल्या देशातली लोकशाही सुंदर झाडासारखीच आहे, शेखर म्हणाला.
आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था जनसामान्यांना न्याय देणारी नाही. या व्यवस्थेवर देशी आणि परदेशी भांडवलदारांनी वा कॉर्पोरेट कंपन्यांची पकड आहे. शासन अर्थात दमन यंत्रणा म्हणजे पोलीस, सैन्यदलं त्यांच्याच दावणीला बांधली गेली आहेत. ही जुलमी शासनव्यवस्था उलथून टाकल्यानंतरच या देशात लोकशाही क्रांती होईल त्यानंतरच समाजवादी क्रांतीचा रस्ता मोकळा होईल, या मांडणीवर माओवादाची सशस्त्र चळवळ उभी आहे.
शस्त्राच्या बळावर शासन ताब्यात घ्यायचं तर विचारसरणी वा तत्वज्ञान यापेक्षा व्यूहरचना महत्वाची असते. निव्वळ शस्त्रांच्या आधारे क्रांती करता येत नाही. सशस्त्र संघटना उभारायची तर भाडोत्री गुंड वा बाजारबुणगे उपयोगी नसतात. संघटनेला कोणत्या ना कोणत्या समूहांमध्ये सामाजिक-राजकीय पाया असावा लागतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कामगार वर्ग हा क्रांतीचा वाहक आहे असं मानलं जात होतं. कामगार चळवळ अर्थवादात आणि सनदशीर अर्थात लोकशाही चौकटीत स्थिरावल्याने, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सशस्त्र क्रांतीचा वाहक कामगार नाही तर शेतकरी असेल असं काही मार्क्सवादी-लेनिनवादी गट मानू लागले. शहरांमध्ये शासनयंत्रणा मजबूत असते. पोलीस वा निमलष्करी दलांच्या हालचाली वेगाने होऊ शकतात. त्यामुळेच शासनव्यवस्था जिथे दुर्बळ आहे तिथे संघटन उभारणी करून शासनाला जेरीस आणणं अशी व्यूहरचना आखण्यात आली. ग्रामीण भागापर्यंत लोकशाही व्यवस्थेचे थोडे-फार फायदे पोहोचू लागल्याने आदिवासी समूहांना क्रांतीचे वाहक बनवणं तुलनेने सोपं असल्याचं क्रांतीकारकांच्या ध्यानी आलं. आदिवासींच्या शेतीतून अतिरिक्त उत्पादन होत नसल्याने त्यांचा बाजारपेठेशी संबंध नाही. प्रदेश दुर्गम असल्याने तिथे शासनयंत्रणा सर्वाधिक दुर्बळ आहे. नेपाळपासून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आदिवासी भागांना जोडणारा सलग पट्टा निर्माण करता येईल हे ध्यानी घेऊन दंडकारण्य राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली. आदिवासींमध्ये जातिव्यवस्था नसल्याने या समाजात अंतर्विरोध नाहीत ही बाब संघटन उभारणीसाठी उपयुक्त ठरते हेही ध्यानात घेऊन सशस्त्र क्रांतीकारकांनी आपली रणनीती आखली. यथावकाश नक्षलवादी, मार्क्सवादी-लेनिनवादी यांचं नामकरण माओवादी असं झालं.
संपूर्ण भारतातील सत्ता शस्त्राच्या बळावर ताब्यात घेणं हे माओवादी चळवळीचं उद्दिष्ट नाही. भारत या देशाच्या शासनाशी म्हणजे पोलीस तसेच सैन्य दलांशी स्पर्धा करणं अशक्यप्राय बाब आहे, याची खूणगाठ या चळवळीने बांधली आहे. देशाचे तुकडे झाले तरच शासनयंत्रणा अतिशय दुर्बळ होऊ शकते. त्यामुळेच देशातील प्रत्येक फुटीरतावादी चळवळीशी माओवाद्यांनी संबंध जोडले. त्यामुळे शस्त्रांचा पुरवठा आणि सशस्त्र लढ्याच्या प्रशिक्षणाची गरज काही प्रमाणात भागवता येऊ लागली. आदिवासी प्रदेशामध्येच विविध प्रकारची खनिज संपत्ती आहे. १९९० नंतर उदारीकरणाच्या धोरणामुळे या खाणी आणि उद्योग क्षेत्रात खाजगी गुंतवणूकीला संधी मिळाली. साहजिकच अनेक देशी-विदेशी कंपन्यांना नफ्यासाठी मोकळं रान मिळालं. त्यांचा आदिवासी प्रदेशातला प्रवेश सुकर करण्यासाठी सरकारने कंबर कसली. आदिवासींना या प्रदेशातून हुसकावून लावण्याचे कार्यक्रम (उदा. सलवा जुडूम) सरकारने पद्धतशीरपणे राबवले. जंगल, जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांवर आपला अधिकार वा नियंत्रण असलं पाह्यजे, ही जाणीव आदिवासींमध्ये जागवली माओवाद्यांनी. त्यामुळे त्यांना आदिवासी समूहांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली. या प्रदेशात भांडवलदार वा त्यांचे एजंट यांना माओवाद्यांनी लक्ष्य केलेलं नाही. माओवाद्यांनी सरकार म्हणजे पोलीस आणि निमलष्करी दलं यांच्याशी लढा पुकारला.
सरकारने दडपशाही सुरु केल्यावर आदिवासी समूह साहजिकच माओवाद्यांकडे ढकलले जाऊ लागले. पोलिस वा निमलष्करी दलं यांना माओवाद्यांनी अनेक प्रदेशात जवळपास नमवलं आहे. माओवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्यदलांचा वापर करावा असा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. माओवाद्यांच्या सापळ्यात सरकार अलगदपणे फसत आहे. लष्कराच्या आगमनानंतर आदिवासी प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही होईल. माओवाद्यांना मिळणारा आदिवासी समूहांचा पाठिंबा आणि सहानुभूती मोठ्या प्रमाणावर वाढेल. मणिपूर वा काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण होईल.
चेराबंडा राजू झाड कसं तोडावं हे सांगत नाही तर घराचा प्रश्न सोडवा हे सांगतोय. आदिवासी विकास योजना आणि त्यांचे कागदी घोडे नाचवून आपली लोकशाही बळकट होणार नाही. जंगल, जमीन आणि पाणी यावर आपलं नियंत्रण आहे हे आदिवासींच्या अनुभवाला यायला हवं. ऊन, पाऊस जसा आपल्याला दिसतो, जाणवतो तसं. साक्षात. माओवाद्यांचा पाडाव करण्यासाठी बळाचा वापर करताना याचं भान राज्यसंस्थेने ठेवायला हवं.

टीप : प्रधान मास्तरांचं चरित्र-कार्य, अल्प परिचय कोणत्याही वृत्तपत्रात वाचा

आधुनिक भारत आणि सत्याग्रही समाजवाद हे आचार्य जावडेकरांचे दोन महत्वाचे ग्रंथ. हिंदुस्थानातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारापासून म. गांधीच्या नेतृत्वाखालील स्वांतत्र्य चळवळ या वाटचालीची चिकित्सा आचार्य जावडेकरांनी आधुनिक भारत या ग्रंथामध्ये केली. आधुनिक भारत हा इतिहास नाही, विविध विचारधारा आणि त्यांचा सामाजिक-राजकीय आधार यांचा साक्षेपी आढावा आहे. या ग्रंथातच आचार्यांनी सत्याग्रही समाजवाद या संकल्पनेची मांडणी केली. मार्क्सवाद आणि गांधी विचार यांच्या समन्वयाचा प्रयत्न म्हणजे सत्याग्रही समाजवाद. सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, सत्तेचे लाभ घेणार नाही परंतु बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी सत्तेवर अंकुश ठेवणार्‍या समतोल बुद्धीच्या यतिवर्गाची कल्पना भागवतांनी आधुनिक भारत या ग्रंथात मांडली. सत्याग्रही समाजवाद या ग्रंथामध्ये हीच संकल्पना अधिक विस्ताराने विशद केली. भारतातील नाही तरी महाराष्ट्रातील समाजवादी आंदोलनावर भागवतांच्या मांडणीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच निष्कलंक चारित्र्य, समाजवादी कार्यक्रमाशी अर्थातच आर्थिक-राजकीय सत्तेमध्ये बहुजनांना सर्वाधिक वाटा मिळावा यासाठी संघटन, रचना आणि संघर्ष, निवडणुकीच्या राजकारणातही या दोन्ही तत्वांचं भान ठेवणं. राजकीय सत्ता नाकारण्याचीही हिंमत दाखवणं, निवडणूकीचं राजकारण अंतिम नाही याबाबत स्पष्टता बाळगून निवडणूकीनंतर वा निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावरही कार्यरत असणं, ही वैशिष्ट्यं महाराष्ट्रातील समाजवादी नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, बाबा आढाव, मधु दंडवते, मधु लिमये अशी अनेक नेत्यांची नावं या संदर्भात घेता येतात. त्यापैकीच एक ग. प्र. प्रधान.
प्रधान मास्तरांवर आचार्य जावडेकरांचा म्हणजे त्यांच्या विचारधनाचा आणि भूमिकेचा खोलवर परिणाम होता. आधुनिक भारताचा उत्तरार्ध लिहिण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि आपला आवाका काय आहे याची वास्तववादी जाणीवही होती. साता उत्तराची कहाणी या ग्रंथात प्रधान मास्तरांनी १९४२ ची चळवळ ते जनता पक्षाच्या सत्तेचा उदय आणि अस्त, असा मोठा कालखंड पकडण्याचा प्रयत्न केला. आचार्य भागवतांप्रमाणे समाजवादी आंदोलनाला वैचारिक मार्गदर्शन करण्याची, सिद्धांत मांडण्याची प्रज्ञा आपल्याकडे नाही याची नम्र जाणीव प्रधान मास्तरांना होती. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक वाटचालीची चिकित्सा नाही तर आढावा घेण्यासाठी आणि तो सामान्य वाचकाला पचनी पडेल अशा तर्‍हेने लिहिण्यासाठी कादंबरीसदृश्य घाट निवडला. साता उत्तराची कहाणी ही राजकीय कादंबरी नाही वा इतिहास नाही. देशातील राजकीय, सामाजिक स्थित्यंतराचा चिकित्सक आढावाही नाही. या पुस्तकाने समाजवादी विचाराच्या तरुणांना राजकीय पैस काय असतो याचं भान दिलं. प्रधान मास्तरांची बहुतेक ग्रंथसंपदा स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक प्रवाहांची वैचारिक बैठक यांचा आढावा घेणारीच आहे.
आधुनिक भारत या ग्रंथात आचार्य जावडेकरांनी म. जोतिराव फुले यांच्या कार्याकडे काणाडोळाच केला आहे. खेडोपाड्यात पोचलेली समाजसुधारणेची पहिली चळवळ असा सत्यशोधक चळवळीचा उल्लेख त्यांनी जरूर केला पण चार-दोन पानातच त्यांनी हा अध्याय संपवून टाकला. त्यांना टिळकांबद्दल अधिक ममत्व होतं. प्रधान मास्तरांनाही टिळकांबद्दल ममत्व होतंच पण त्यांना सामाजिक प्रश्नांबद्दल आणि म्हणूनच म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित चळवळ, मागासवर्गीयांचे प्रश्न आणि आंदोलनं यासंबंधात विशेष आस्था होती.
प्रधान मास्तरांनी त्यांच्या पिढीला उद्देशून फारच कमी लिखाण केलं. राष्ट्र सेवा दलाचे बौद्धिक प्रमुख असल्याने राजकीय जाण असलेला समाजवादी वा सेवादलातला तरूण हाच त्यांचा वाचक होता. त्यांचं बहुतेक सर्व लिखाण याच वाचकवर्गासाठी आहे. (ही प्रेरणा त्यांनी साने गुरुजींकडून घेतली असावी). मी त्याच वाचकवर्गात होतो. आमच्या पुढच्या पिढीत प्रधान मास्तरांचे वाचक आहेत का? मला वाटतं फारच कमी. प्रधान मास्तरांना ज्या विषयात रस होता, ते ज्या आकांक्षांना संबोधित करत होते त्याच्याशी नव्या पिढीचा सांधा जुळत नाही. जुळणारही नाही.

टीपः या टिपणात मी आचार्य जावडेकर यांच्याऐवजी आचार्य भागवत यांचं नाव लिहिलं होतं. ही चूक माझे वडील, राम तांबे, अभय कांता आणि अनिल अवचट यांनी ध्यानी आणून दिली. चुकीची दुरुस्ती मी केली नाही कारण अभयच्या प्रतिक्रीयेच्या उत्तरात मी माफी मागितली. मात्र ब्लॉग वाचणारे प्रतिक्रीया वाचतीलच असं नाही हे अनिलच्या मेलवरून ध्यानी आलं. म्हणून ब्लॉगच्या टिपणात दुरुस्ती करून वाचकांची पुन्हा एकदा माफी मागतो.
सुनील तांबे