गंगाजल. अपहरण. राजनेती. प्रकाश झा च्या चित्रपटांना बिहारची पार्श्वभूमी असते. बिहारातील राजकीय-सामाजिक समस्येच्या भोवती हे चित्रपट गुंफलेले असतात. बिहारमधील राजकारणच सर्वत्र विशेषतः देशातल्या प्रत्येक राज्यात आहे असं त्यातून सुचवलेलं असतं.
हिंदी चित्रपटांचं नातं काळाशी वा परिसराशी नसतंच. नाईलाजने अनेक चित्रपटांचा परिसर मुंबई हाच राह्यला आहे. अधून-मधून दिल्ली. काश्मीर, हिमाचल प्रदेश अनेक चित्रटांमध्ये डोकावतात. या उलट प्रकाश झा चे चित्रपट बिहारशी म्हणजेच काळाशी आणि परिसराशी नातं जोडू पाहतात. वस्तुतः त्यांचं चित्रीकरण बिहारात झालेलं नाही, चित्रपटाच्या शीर्षकात वा कथेत बिहारला स्थान नाही. परंतु अनेक स्थानांची नावं, पात्रांची भाषा यामधून बिहारी मसाला पेरलेला असतो.
रमणीय समुद्रकिनारा, हिमशिखरे, नेत्रसुखद निसर्ग वा परिसर, अत्याधुनिक उद्यानं. त्यामध्ये गाणी म्हणत नाचणारे नायक-नायिका त्याच्या चित्रपटांत अपवादानेच असतात.
हिंसा, भ्रष्टाचार यांचे डाग नायकाच्या हातावरही असतात पण तरीही प्रेक्षकांची सहानुभूती त्यालाच असते. चित्रपटाचा नायकही सामाजिक-राजकीय परिस्थितीचा बळी असतो. ही वस्तुस्थिती प्रेक्षक स्वीकारतात.
प्रकाश झा च्या चित्रपटांची पटकथा आटोपशीर असते. संवाद नेमके असतात. चित्रपटाला वेग असतो. घटनांनी गच्च भरलेला असतो. या प्रकृतीच्या चित्रपटांना गाणी मानवणारी नसतात. त्यामुळे नाईलाजाने एखादं गाणं डोकावतं पण गाण्यांसाठी त्याचे चित्रपट प्रसिद्ध नाहीत.
सामाजिक वा राजकीय समस्येचं चित्रण, उकल वा त्यावरील भाष्य, त्यावर केलेलं राजकीय वा सामाजिक विधान यासाठी प्रकाश झा प्रसिद्ध नाही. त्याचे चित्रपट करमणूक प्रधानच असतात. हिंसा हा त्या चित्रपटांच्या करमणूकीचा गाभा असतो. हिंसाचार आपल्या आजूबाजूला असतोच. त्यासाठी बिहारात वा अन्यत्र जाण्याची गरज नसते. हिंसाचार आपल्याला दिसतो, आपल्या अनुभवातही असतो. पण तरिही त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणजे हिंसा का व कशी उफाळून येते हे आपलं आपल्याला कळत नाही. प्रकाश झा वा बाजारू चित्रपट या विषयावर कॅमेरा फोकस करत नाहीत. त्यांचा भर हिंसेच्या नानाविध तर्हा मांडून लोकांचं मनोरंजन करणं यावर असतो. हिंसेच्या या नानाविध तर्हा बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक हॉलीवूडमधून आयात करतात. राजनेतीतले अनेक शॉट्स गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटातले आहेत, उदाहरणार्थ मोटारीत ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात नायकाच्या प्रेयसीचा अंत होणं. अर्थातच प्रकाश झा ला स्वतःची चित्रभाषा गवसलेली नाही. त्याचे चित्रपट वास्तवाशी नातं सांगण्याचा आव आणतात पण ते वास्तववादी नसतात. (वास्तववाद म्हणजे वास्तवाचं यथातथ्य चित्रण नसतं तर वास्तवाचं आपलं आकलन अधिक समृद्ध करणं असतं.)
first half is good... second half is really boring... I was waiting when the film is going to finish ;)
ReplyDelete