Thursday, 17 June 2010

फुटबॉलच्या मैदानावर लाल-पांढरे

अ, ब आणि क त्रिकोणात उभे असायचे. अ च्या एका दिशेला ब तर दुसर्‍या दिशेला क. प्रतिस्पर्धी अंगावर चालून आले की अ, ब किंवा क कोणाकडेही बॉल पास करायचा. बॉल कोणत्या दिशेला न्यायचा हे सर्वांनी मिळून ठरवलेलं असायचंच. अ, ब, क च्या जागा घ्यायला ड, इ, ई, फ असे इतर असायचेच. बॉल कुठेही गेला की त्रिकोणात छोटे पास देत आगेकूच करायचे. हे लाल टी शर्टवाले.

या उलट पांढरे टी शर्टवाले. त्यांच्या रांगा होत्या. पहिली रांग, तिच्यापाठून दुसरी रांग. त्यांचा भर शक्तीवर. म्हणजे त्यांचा गोली जोरदार किक मारायचा ती एकदम लाल टी शर्टवाल्यांच्या गोलपोस्टच्या जवळ जायची. पांढरे टी शर्टवाले पळत जाऊन बॉलचा ताबा घ्यायचे. लांब लांब पासेस द्यायचे ही पांढर्‍या शर्टवाल्यांची व्यूहरचना.

लाल शर्टवाल्यांच्या पायातून बॉल काढून घेणं पांढर्‍यांना जमतच नव्हतं. लालवाल्यांचा खेळ दृष्ट लागण्यासारखा, डोळ्याचं पारणं फेडणारा होता. पांढर्‍यांच्या गर्दीतून गोलपोस्टकडे ते बॉल टोलवत न्यायचे. तिथे बॉल गेला की सुरु होतो कौशल्याचा आणि नशिबाचा खेळ. कारण तोवर सर्व पांढरे बॉलला रोखायला सरसावलेले असायचे. रणकंदनच व्हायचं आणि पांढरे बॉल परतवण्यात यशस्वी व्हायचे.

लाल टी शर्टवाले चणीने लहान होते. उंचीनेही लहान होते. छोटे पास देत आगेकूच केल्याने त्यांची दमछाक कमी व्हायची. बॉलवर नियंत्रण त्यांचंच असायचं. या उलट पांढरे. ते मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पळायचे. त्यातही गोल हाणणारे अधिक वेगाने धावायचे. लालवाल्यांची बचावाची फळी मात्र निवांत असायची. बॉलवर त्यांचंच नियंत्रण असल्याने बचावाला असणारे दोघे पांढर्‍यांची टोळी वा त्यांच्यातले चार-दोन सरसावले तरी फाफलून जायचे.
पांढरे धिप्पाड होते. कॉर्नर कीक मिळाली की बॉल डोक्याने टोलवायचे. या उलट लाल. कॉर्नर कीक मिळाल्यावरही त्रिकोणात बॉल घुमवत सरपटी खेळ खेळायचे. त्यामुळे पांढर्‍यांना बचावासाठी भरपूर वेळ मिळायचा. एवढ्या पायांतून बॉल गोलमध्ये ढकलण्याची संधी कमी मिळायची. मिळाली तरी पांढर्‍यांचा गोली भारी होता. तो बरोब्बर बॉल अडवायचा.
अखेरीला संधी मिळाल्यावर पांढर्‍यांनी बॉल लाल्यांच्या गोलपोस्टकडे टोलवला. लाँग पास. तिथे दोन पांढरे पळत पोचले. लाल्यांचा एक गोली. आणि दोन डिफेंडर. ही बचाव फळी अचानक हल्ल्याने फाफलली. लाल्यांच्या गोलीने जमिनीवर लोळण घेतल्यावर पांढर्‍यांच्या गणवेशातला काळा वेगाने पुढे सरकला. त्याने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. सामन्यावर नियंत्रण लाल्यांचं पण गोल पांढर्‍यांचा झाला.

लाल्यांनी पांढर्‍यांकडून काहीतरी शिकून दोन शैलींचा संगम करायला हवा होता. कौशल्याला, कलेला शक्तीची जोड द्यायला हवी होती.
(स्पेन आणि स्विर्त्झलंड यांच्या सामन्यात स्विर्त्झलंडचा विजय झाला. स्पेन युरोपियन चँपियन पण विश्वकप स्पर्धेत त्यांना पहिल्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अर्थात ते अजून स्पर्धेत आहेतच. छोटे पासेस ही दक्षिण अमेरिकन विशेषतः ब्राझीलची शैली. लाँग पासेस ही युरोपियन शैली.)

1 comment:

  1. The Spaniards should learn that possession alone cannot win them any match.
    btw, really good to see that the less popular teams are making their mark on this WC..

    ReplyDelete