Monday, 24 September 2012

अरविंद केजरीवालः आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हणू...राजकीय सत्तेचं स्वरुप कसं असावं याबद्दल मतप्रदर्शन करणं आणि विद्यमान राजकीय सत्तेच्या स्वरुपात बदल करण्यासाठी प्रयत्न करणं याला राजकारण म्हणतात. कोणतीही सामाजिक चळवळ जेव्हा या विषयाला स्पर्श करते तेव्हा ती राजकीय बनते. ख्रिस्त या शब्दाचा अर्थच मुळी अभिषिक्त असा आहे. ज्यू धर्मीयांना या पृथ्वीवरचं राज्य मिळवून देण्यासाठी तो पृथ्वीवर आला नव्हता तर तो अंतरात्म्याचं राज्य जिंकण्यासाठी आला होता. पण येशूने जेव्हा राजाचं राजाला द्या आणि ईश्वराचं ईश्वराला, असं म्हटलं तेव्हा ज्यू धर्माचे मुखंड त्याच्या विरोधात खवळून उठले. सुफी पंथीयांनाही छळाला सामोरं जावं लागलंच. गांधीजीनी काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं होतं, विनोबा भावेही काँग्रेसचे सदस्य नव्हते. जयप्रकाशांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान चळवळीत झोकून दिलं आणि पुढे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं रुपांतर संपूर्ण क्रांतीमध्ये करून राजकीय सत्तापालट करण्यात महत्वाची भूमिका निभावली.

आपण नेमकं कोणतं राजकारण करतो आहोत ह्याची स्पष्टता गांधी, विनोबा, जयप्रकाश इत्यादींना होती. अण्णा हजारे आणि किरण बेदी ह्यांची नेमकी अडचण हीच आहे की त्यांना आपल्या राजकारणाची दिशा लोकांपासून दूर जात आहे, ह्याची तीळमात्र चिंता नाही. आपण राजसत्तेला वाकायला लावतो ही मिजास हेच त्यांचं राजकारण आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता हे खरं पण ते आंदोलन सुसंघटीत होतं. अण्णा आणि किरण बेदी ह्यांना नेमका त्याचाच विसर पडला. त्यामुळे टीम अण्णामध्ये फूट पडणं अटळ होतं.

अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण ह्यांना भ्रष्टाचारासंबंधात अधिक स्पष्टता आहे. केवळ भ्रष्टाचार विरोध आंदोलनाला कोणताही मूल्याधार देऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं. आंदोलनाला मूल्याचा आधार लागतो, संघटना लागते आणि जनाधार लागतो, ह्याची गरज त्यांनी ओळखली होती. केजरीवाल ह्यांच्या संघटन कौशल्यामुळे जंतर-मंतरचं आंदोलन यशस्वी झालं होतं. नुक्त्याच झालेल्या जंतर-मंतर वरील आंदोलनात केजरीवाल ह्यांनी सुस्पष्ट राजकीयदृष्टी असलेल्या योगेंद्र यादव ह्यांना व्यासपीठावर बोलावलं. या आंदोलनासंबंधात योगेंद्र यादव यांनी एक लेख द हिंदू या दैनिकात लिहीला होता. त्यामध्ये त्यांनी असं सुचवलं की विद्यमान राजकीय व्यवस्था बदलायची असेल तर जनआंदोलनांची कास धरणार्‍या राजकीय संघटनेने हे आंदोलन पुढे न्यायला हवं. केजरीवाल ह्याच दिशेने आंदोलन हाकारू पाहात आहेत. ही बाब एक-दोन वर्षात कधीच घडत नसते पण ती प्रक्रिया सुरु करण्याचा केजरीवाल ह्यांचा प्रयत्न दिसतो.

हा प्रयत्न यशस्वी होईल का अपेशी ठरेल, ह्या प्रश्नावर चर्चा वा मतप्रदर्शन करता येतं. परंतु त्यासाठी केजरीवाल ह्यांना नेतृत्व, संघटनकौशल्य, कार्यक्रमांची कल्पकता दाखवावी लागेल. आंदोलनाला मूल्याधार आणि जनाधार निर्माण करावा लागेल. आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हणू.