Wednesday, 13 September 2017

तणमोर आणि पारधी समाजातील पुनरुत्थान – भाग १









वाशिम जिल्ह्यातल्या वडाळा या गावी गेलो होतो. हे गाव पारध्यांचं. गावातील  ५०-६० कुटुंबं कोलकत्याला रवाना झाली होती. कोलकत्याला ते कटलरी (तावीज, नेलपॉलिश, बांगड्या, ब्रेसलेट, गळ्यातल्या माळा, प्लास्टिकच्या छोट्यामोठ्या वस्तू इत्यादी) विकत घेतात. भुवनेश्वर आणि जवळच्या गावात जाऊन विकतात.
याचा शोध एका महिलेने लावला, कुलदीप राठोड म्हणाले. घरामध्ये भांडण झालं म्हणून ती घर सोडून बाहेर पडली. अकोला रेल्वे स्टेशनला गेली. तिथून कोलकत्याला. परतली तेव्हा तिची आर्थिक स्थिती बरी होती. उपजिवीकेचा नवा मार्ग तिने गावाला दाखवला. दुसर्‍या खेपेला ती निघाली तेव्हा तिच्या सोबत आठ-दहा कुटुंब होती. दरवर्षी ही संख्या वाढू लागली. भुवनेश्वरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये फिरत्या विक्रेत्याचं काम ही कुटुंबं काही महिने करतात आणि गावी परतात. दिवसाला हजार रुपयांची कमाई होते, असं एक महिला म्हणाली. एकाच गावात दोन वा चार कुटुंबं विक्री करतात त्यामुळे धंद्यावर परिणाम होतो. त्यांची भांडणं जात पंचायतीत येतात, असं कुलदीप राठोड यांनी सांगितलं.

कटलरीचा बिझनेस दोन-तीन महिने चालतो. काही कुटुंबं कापूस वेचायला जातात. अदिलाबाद वा तेलंगणातील काही जिल्ह्यांमध्ये. त्याशिवाय सोयाबीनच्या सोंगणीचं कामही करतात. त्यासाठीही गावाबाहेर काही महिने राहावं लागतं. सारं कुटुंबं प्रवासाला निघतं. बाया, बाप्ये आणि लहान मुलंही. चालता येणारे आजी-आजोबाही जातात. कारण मागे राहणार्‍यांच्या पोटापाण्याची काळजी कोण घेणार. वडाळा गाव वसलं १९६५ साली आणि गावात प्राथमिक शाळा सुरू झाली १९९० च्या दशकात. मुलं शाळेत बसू लागली २-४ वर्षांनंतर. कारण त्यांना एका जागी काही तास बसण्याची सवयच नव्हती. मुलांना शाळेची गोडी लागली. स्थलांतरामुळे शाळा बुडते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुलदीप, साहेबराव, सेवा ह्या तरुणांनी त्यावर मार्ग काढायचा निश्चय केला आहे.

संस्कृत भाषेत पारध म्हणजे शिकार. शिकार करणारे ते पारधी. पारध्यांची भाषा मराठी नाही. गुजरात वा राजस्थान कडची वाटते. पारधी भाषेमध्ये वाघर म्हणजे जाळं लावून शिकार करणारे ते वाघरी, कुलदीप आणि सेवा ह्यांनी सांगितलं. पण फासे-पारधी हेच नाव आता रूढ झालं आहे. गाय पारधी, बैल पारधी, फासे पारधी, गाव पारधी अशा अनेक नावांनी ते स्वतःची ओळख सांगतात. मध्य प्रदेश आणि विदर्भातले पारधी प्रामुख्याने शिकारीवर उपजिवीका करायचे. त्यांचा समावेश गुन्हेगार जमातींमध्ये झाला नाही. त्यामुळे ते विमुक्त जमातींमध्येही नाहीत. मराठवाडा वा पश्चिम महाराष्ट्रातले पारधी म्हणजे दखनी पारधी. हे पारधी चोर्‍याचपाट्या करणारे, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही बेटीसंबंध ठेवत नाही, अशी माहिती वडाळ्याच्या ग्रामस्थांनी दिली. मराठवाडा वा पश्चिम महाराष्ट्रातले पारधी गुन्हेगार म्हणून विमुक्त जमातीत मोडतात. त्यांची कथा वेगळी आहे. दरोडे घालणारे पारधी वा अन्य जमाती आजही दारिद्र्यरेषेखाली का आहेत, असा प्रश्न विचारायला हवा. 

वडाळा हे गाव अकोला जिल्ह्यात आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ हे जिल्हे वर्‍हाडातले. वर्‍हाड प्रांत निझामाकडे होता. कापूस लागवडीसाठी तो ब्रिटीशांनी निझामाकडून घेतला आणि सेंट्रल प्रॉव्हिन्सला जोडला. सीपी अँण्ड बेरार वा मध्य प्रांत आणि बेरार असं त्या प्रदेशाचं नामकरण झालं. नागपूर या राज्याची राजधानी होती. वर्‍हाड हा प्रांत ब्लॅक कॉटन सॉईलचा वा काळ्या कसदार जमिनीचा. पूर्णा आणि वैनगंगा खोर्‍याचा. अकोला जिल्ह्यातील पूर्णा खोर्‍य़ाचा पट्टा खारपाणपट्ट्याचा समजला जातो. तिथलं भूजल खारं आहे. मात्र तिथली जमीन कमालीची सुपीक आहे. निव्वळ पावसाच्या पाण्यावरील खरीप आणि रब्बी हंगामात तिथे महामूर पिक येत असे. कापूस या नगदी पिकाची लागवड करण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने तिथल्या महसूल संहितेत बदल केले. गायरान जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कापसाच्या वाहतुकीसाठी यवतमाळ-मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वेलाईन टाकली. स्वतंत्र भारतातील हे एकमेव खाजगी रेल्वेलाईन आज कपाशीची नाही तर प्रवासी वाहतुक करते.

ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या या धोरणामुळे अनेक समूहांच्या उपजिवीकेवर संकट आलं. जनावरांना चारा मिळण्याची मारामार पडू लागली. ह्यासंबंधात एक ग्रंथच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केला आहे. त्याशिवाय झुडुपी जंगलावर अतिक्रमण झालं. झुडुपी जंगलावर अनेक समूहांचा उदरनिर्वाह व्हायचा. ते सर्व संकटात आले. जंगल कायदा आला आणि आदिवासींचा जंगलावरील हक्क हिरावून घेतला गेला. पुढे १९१२ साली शिकारीवर बंदी घालणारा कायदा आला. गावं, शहरं यांना वन्य जीव आणि वन्य जिवांची उत्पादने व सेवा पुरवणार्‍य़ा समूहांच्या जगण्याचा हक्क या कायद्याने हिरावून घेतला. पारधी, दरवेशी, मदारी, वैदू असे अनेक समूहांची उपजिवीकाच त्यामुळे हिरावून घेतली गेली. जमीन नाही, साधनसंपत्ती नाही, आधुनिक शिक्षण नाही, त्यामुळे सरकारी वा खाजगी क्षेत्रात नोकरी नाही, आपल्याकडील पारंपारिक कौशल्यं आणि ज्ञान ह्यांचा उपयोग करण्यावर कायद्याने बंदी. त्यामुळे लाखो लोकांची उपजीविका बेकायदेशीर ठरली. 

शेती करणारे समूह होते. त्यांना वस्तू व सेवा पुरवणारे समूह गावात होते. मात्र प्रत्येक गावामध्ये आवश्यक असणारी सर्व संसाधनं कधीही नसतात. त्यामुळे जंगलात राहणारे, जंगल आणि गाव ह्यांच्यामध्ये हिंडणारे, गावोगाव हिंडणारे असे हजारो समूह मूलतः पशुपालक भारतीय भूखंडात होते. त्यांची उत्पन्नाची साधनं ब्रिटीशांनी केलेल्या कायद्यांनी हिरावून घेतली. सरकारने त्यांना कोणता पर्यायही दिला नाही. त्यामुळे हे समूह आपआपले पर्याय शोधू लागले. त्यापैकी एक पारधी. वडाळा गावातले लोक फासे-पारधी. हरणं, नीलगाय, रानडुक्कर ह्या पिकाचं नुकसान करणार्‍या पशुंचा बंदोबस्त करणं, तितर, बटेर, ससा ह्यांच्या मांसाची विक्री करणं हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. सांबरशिंग, घोरपड ह्यांना पारंपारिक वैद्यकशास्त्रात औषधीचं स्थान आहे. त्यांचाही पुरवठा पारधी करायचे.  पारध्यांची शिकारीची साधनं आणि पद्धती अतिशय प्रगत होत्या. प्रत्येक प्राणी वा पक्षी ते जिवंत पकडत असत. त्यासाठी पर्यावरणाचं, पशु-पक्ष्यांच्या जीवनचक्राचं सूक्ष्म ज्ञान त्यांच्याकडे होतं. प्रथम ब्रिटीशांनी आणि त्यानंतर भारत सरकारने केलेल्या वन्यजीव विषयक कायद्यांनी त्यांचं हे ज्ञान मातीमोल केलं. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल ह्याचा विचारही सत्ताधारी वर्गाला शिवला नाही. कारण आधुनिक ज्ञान युरोपमधूनच येतं अशी धारणा ब्रिटीशांनी सुशिक्षित वर्गामध्ये खोलवर रुजवली.  त्यामुळे पर्यावरणाच्या, वन्य जीवनाच्या संगोपन-संवर्धनासाठी पारधी व अन्य जमातींच्या ज्ञानसंचिताचा उपयोग करण्यात आला नाही. वन विभागातल्या एकाही कर्मचार्‍याला कोणत्याही पशु वा पक्ष्याचा माग घेता येत नाही, त्यांची भाषा अवगत नाही, त्यांच्या जीवनचक्राविषयी काहीही माहिती नसते, जंगल म्हणजे लाकूडफाट्याचं कोठार अशीच त्यांची धारणा असते. असं असूनही जंगलं त्याच विभागाच्या ताब्यात असतात.


वडाळा आणि आसपासच्या ४०-५० गावातील पारध्यांचा विकास करायचा तर त्यांच्या पारंपारिक ज्ञानसंचिताला आधुनिक विज्ञानाची जोड द्यायला हवी, असा विचार कुलदीप, सेवा, साहेबराव, हिंमतराव इत्यादी पारधी समाजातील तरुण करू लागले. त्याला कारणीभूत ठरला कौस्तुभ पांढरीपांडे. हा तरुण नागपूरचा. विद्यार्थीदशेत अनेकांना पक्षी निरीक्षणाचा छंद असतो. कौत्सुभलाही तो छंद होता. त्या छंदाची जोपासना करण्यासाठी विदर्भ निसर्ग आणि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात तो ओढला गेला. लेसर फ्लोरिकन वा तणमोर ह्या अस्तंगत होणार्‍या पक्ष्याचा शोध घेण्यासाठी तो आणि त्याचे सवंगडी विदर्भातील गवताळ पट्ट्यामध्ये हिंडू लागले. वन विभागाचे अधिकारी, गावकरी, पारधी ह्यांच्या भेटीगाठी घेऊ लागले. तणमोराचा माग फक्त पारधीच घेऊ शकतात त्यामुळे तणमोराचं संगोपन-संवर्धन करायचं तर पारध्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही ही बाब त्यांच्या ध्यानात आली. तणमोर हा दुर्मिळ पक्षी पारधी समाजाच्या उत्थानाची प्रेरणा बनू लागला. 

3 comments:

  1. अतिशय चांगली माहिती. मध्यंतरी मी एका च्यानलवर रामोशी समाजाबद्दल एक कार्यक्रम पाहिला होता. तेव्हा वाटून गेलं होतं की पारधी समाजाबद्दल पण अशी माहिती असली पाहिजे. तुमचा लेख म्हणजे सरळसरळ किमान पाच एपिसोडचा ऐवज आहे. एक चांगला लेख वाचल्याचं समाधान मिळालं, पुन्हा एकदा.

    ReplyDelete
  2. खूपच छान माहिती

    ReplyDelete