Friday, 4 February 2011

गॅब्रिअल गार्सिया मार्खेज आणि जादुई वास्तववाद

कथात्म साहित्यात अतर्क्य, अद्‍भुत, तर्कहीन असे घटना, प्रसंग वा घटक वापरून वास्तवाची जाण आणि ज्ञान समृद्ध करण्याची सुरुवात आधुनिक काळात फ्रांझ काफ्काच्या मेटामॉर्फसिस या कथेपासून झाली, असं सामान्यतः मानलं जातं. ग्रेगोर साम्झा हा माणूस सकाळी उठतो तेव्हा त्याच्या ध्यानात येतं की आपलं एका अवाढव्य कीटकात रुपांतर झालं आहे, अशी या कथेची सुरुवात आहे. कीटकामध्ये रुपांतरीत झालेल्या ग्रेगोर साम्झाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येतं याचा सुरेख आढावा घेऊन, अखेरीस त्याला उचलून घराबाहेर फेकून दिलं जातं या मुद्द्यावर कथेचा शेवट होतो. उपयुक्तता संपली की कोणत्याही माणसाला कुटुंबात वा समाजात काहीही स्थान नसतं हे सत्य अत्यंत प्रभावी आणि भेदक पद्धतीने काफ्काने मांडलं. हे सत्या मांडण्यासाठी माणसाचं कीटकात रुपांतर होणं हा चमत्कार वापरला. या कथेचं आकलन करून घेण्यासाठी मॅजिकल रिअ‍ॅलिझम वा जादुई वास्तववाद ही संज्ञा साहित्य समीक्षकांनी वापरली, असं मराठी वाचकांना विलास सारंग यांनी सांगितलं आहे. चमत्कार, अद्‍भुत, अतर्क्य अशा घटकांची रेलचेल प्राचीन साहित्यात, लोकसाहित्यात वा लोकपरंपरेत भरपूर आहे. कारण हे सर्व साहित्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेलं नाही. मानवी जीवन, निसर्ग, विश्व यांच्यातील विविध घटितांचा अर्थ लावण्याच्या, परस्पर संबंध जोडण्याच्या वा शोधण्याच्या गरजेतून या साहित्याची निर्मिती झाली. त्यामुळे या साहित्याला मिथ्यकथा वा पुराणकथा असं म्हटलं जातं. या साहित्यात विज्ञान, साहित्य, धर्म, जीवन एकात्मता आहे. आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निसर्गाचं आणि विश्वातील घटितांचं आकलन करून घेण्याच्या पद्धती बदलल्या. निसर्गाच्या अतिसूक्ष्म ज्ञानामुळे अधिक प्रगत तंत्रज्ञान रचता येऊ लागलं. अर्थातच त्यामुळे उपभोग्य वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन आणि उपभोग वाढला. त्यामुळे मानवी जीवनाबद्दलचं आकलन बदलून गेलं. तत्वज्ञानाची विज्ञानापासून, धर्माची तत्वज्ञानापासून फारकत झाली. जीवन अधिकाधिक मानवकेंद्रीत बनलं. साहित्यही मानवकेंद्रीत बनू लागलं. माणसांच्या प्रश्नांबद्दल अधिकाधिक बोलू लागलं. चमत्कार, अद्‍भुतरम्यता, अतर्क्य घटना-प्रसंग यांचं आकर्षण कमी झालं नाही मात्र या घटकांना सामाजिक वा सांस्कृतिक प्रतिष्ठा उरली नाही. अशा काळात मेटॅमॉर्फसिस या कथेने वास्तवाचं भेदक आकलन करून घेण्यासाठी चमत्कार या घटकाचा उपयोग करून घेतला. रातोरात माणसाचं कीटकात रुपांतर होऊ शकत नाही हे वाचक जाणतातच पण कथेमध्ये ते वस्तुस्थितीचा स्वीकार करतात. कथात्म साहित्य एक प्रतिसृष्टी निर्माण करतं आणि या प्रतिसृष्टीला वास्तव जगाचे नियम आणि दंडक लागू होत नाहीत मात्र त्यामुळे स्थळ-काळाने बद्ध असलेल्या वास्तवाचं अधिक सूक्ष्म आकलन होतं, हे या कथेने सिद्ध केलं. काफ्काने प्राचीन कथात्म साहित्यातले चिरकाल टिकणारे घटक, क्लृप्त्या यांचं आधुनिक साहित्यात पुनरुज्जीवन केलं.


मेटामॉर्फसिस ही कथा गॅब्रिएल गार्सिया मार्खेजच्या हाती पडली एकविसाव्या वर्षी. ही कथा वाचल्यावर मार्खेज स्वतःशीच म्हणाला, मलाही अशी कथा लिहीता येईल. मार्खेजच्या पहिल्या कथेवरच नव्हे तर बोगोटाच्या वास्तव्यात त्याने लिहिलेल्या जवळपास प्रत्येक कथेवर काफ्काचा प्रभाव आहे. इव्हा इज इन हर कॅट, समवन इज डिसअ‍ॅरेंजिंग रोझेस या कथांच्या शीर्षकांवरूनच त्याची कल्पना येऊ शकेल. मार्खेजच्या या कालखंडातल्या कथा मृत्यु आणि भीती यांच्याभोवतीच फिरतात. मार्खेजच्या कथा स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आणि जाणकारांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. या कथांमुळेच मार्खेजला वर्तमानपत्रात नोकरी मिळाली. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात मार्खेजने बोगोटाच्या वास्तव्यातील कथांकडे पाठ फिरवली नसली तरी त्यांच्यापासून अंतर राखणं पसंत केलं. त्यानंतरच्या टप्प्यात त्याने लिहिलेल्या कथा वा कथात्म साहित्य यामध्ये मॅजिक वा जादू या घटकांचा सढळ वापर असला आणि त्या वास्तववावर भेदक भाष्य करणार्‍या असल्या तरीही तेव्हा मार्खेज हा फार मोठा लेखक समजला जात नव्हता. त्याच्या नावावर लीफ स्टॉर्म नावाची एक कादंबरी होती पण तिचाही फारसा गाजावाजा झाला नव्हता. मित्रांनीच पदरमोड करून ही कादंबरी प्रसिद्ध केली होती.

१९६७ च्या मध्यावर वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड ही कादंबरी ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिनाची राजधानी) इथे प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीने दक्षिण अमेरिकेच्या साहित्य विश्वात धरणीकंप घडवला. कादंबरी लेखनाचा उत्कृष्ट नमुना, अशा शब्दांत समीक्षकांनी तिचा गौरव केला. सामान्य वाचकांनीही समीक्षकांच्या मताला दुजोरा दिला. कादंबरीवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. कादंबरीच्या आवृत्या एकापाठोपाठ एक अशा संपू लागल्या. अखेरीला अशी वेळ आली की, दर आठवड्याला कादंबरीची नवी आवृत्ती बाजारात थडकू लागली. गाब्रिएल गार्सिया मार्खेज हा लेखक रातोरात मशहूर झाला. एखाद्या फुटबॉलपटूला किंवा बोलेरो संगीताच्या गायकाला मिळणारी प्रसिद्धी मार्खेजला मिळाली.....

अशा शब्दात पेरूचा लेखक मारियो व्हर्गास लोयझाने ह्या कादंबरीचं गुणगान केलं.

ह्या कादंबरीच्या १०,००० प्रती छापायचा प्रकाशकाचा विचार होता. परंतु ही संख्या दुपटीने वाढवण्यात आली. ब्युनॉस आयर्समध्ये पंधरा दिवसात पहिली आवृत्ती संपली. स्पॅनिश भाषेतील ह्या कादंबरीचा ३० भाषांमध्ये अनुवाद झाला. तीन कोटी पेक्षा जास्त प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत. ह्याच कादंबरीने मार्खेजला १९८२ साली नोबेल पारितोषिक मिळवून दिलं. वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड च्या आधीचं आणि नंतरचं असे मार्खेजच्या व्यावसायिक जीवनाचे दोन भाग झाले. मॅजिकल रिएलिझम ही संज्ञा ह्याच कादंबरीमुळे प्रचारात आली. वास्तवादाचा कोंडलेला प्रवाह ह्या कादंबरीने मोकळा केला, असंही म्हटलं जातं. मार्खेजची पहिली कादंबरी लीफ स्टॉर्म १९५५ साली प्रसिद्ध झाली. प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळण्यासाठी मार्खेजला एक तप प्रतीक्षा करावी लागली. या कादंबरीच्या यशानंतर मॅजिकल रिअ‍ॅलिझम ही संज्ञा मार्खेजच्या आणि लॅटिन अमेरिकन साहित्याशी कायमची जोडली गेली. लॅटिन अमेरिकन कादंबरीच्या उत्कर्ष काळातले बिनीचे लेखक होते—मारियो व्हर्गास लोयझा, योर्ग लुई बोर्‍हेस, कोर्तासा. यांच्यापैकी कुणीही मॅजिकल रिअ‍ॅलिझमचे पुरस्कर्ते नव्हते. द किंगडम ऑफ द वर्ल्ड (१९५०) ह्या अलेजो कारपेंटीयरच्या (क्यूबा) कादंबरीत दक्षिण अमेरिकी साहित्यातील जादुई वास्तववादाची मूळं आहेत असं मानलं जातं. कारपेंटियरने मार्व्हलस रिएलिटी अशी संज्ञा वापरली होती. असं म्हटलं जातं की कारपेंटियरचं एक्स्प्लोजन इन कॅथेड्रल हे पुस्तक वाचल्यावर मार्खेजने वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड चा पहिला खर्डा बाजूला ठेवला आणि नव्याने लिहायला सुरुवात केली. लॅटिन अमेरिकन लेखकांशी मार्खेजचा परिचय बर्‍याच उशीराने झाला. त्याच्यावर प्रभाव होता युरोप आणि अमेरिकेतील लेखकांचा. मार्खेजच्या कथात्म साहित्याचा आढावा घेतला तर तो काफ्का, हेमिंग्वे आणि अखेरीस लॅटिन अमेरिकेतील जादूई वास्तववाद असे ढोबळ टप्पे दिसतात.

मराठी साहित्यात १९६० नंतरच्या लेखक-कवींनी विद्रोहाचा झेंडा फडकवला.( हे लेखक प्रामुख्याने युरोपियन साहित्याने विशेषतः काम्यू, सार्त्र यांच्या लिखाणाने प्रभावीत झालेले होते.) कलावादाचे नकली बुरुज त्यामुळे ढासळून पडले. विविध जनसमूहांच्या आकांक्षांनी लेखन व्यवहारात मुसंडी मारली. विविध जातींच्या लेखकांनी समर्थ आशय साहित्यात आणला. वेगेवगळी आशयसूत्रं आणि भाषेचे नमुने आल्याने मराठी साहित्य समृद्ध झालं. परंतु लेखन हा एक बौद्धिक व्यवहार आहे, लेखकाने एक जीवनविषयक विधान करायचं असतं. हे विधान विज्ञानाप्रमाणे गणिताने सिद्ध होत नसतं तर कल्पनाशक्ती, भाषा, कथावस्तू, पात्रं ह्यामधून उभं करायचं असतं, ह्याची सुस्पष्ट जाणीव समकालीन मराठी साहित्यात विशेषतः कथा-कादंब-यांमध्ये नाही. देशीवादाच्या आक्रमक रूपाने घाटाचा एवढा तिरस्कार केला आहे की लेखन ही कला असते, ही सामान्य बाबच अनेक लेखक विसरून गेले आहेत. त्यामुळे समाजशास्त्रीय अभ्यास आणि दैनंदिन्या आत्मकथनात्मक वा वास्तववादी कथा-कादंबरी म्हणून मिरवल्या जात आहेत.

मॅजिक, अद्‍भुतता, कल्पनाशक्ती यांची वास्तवाशी सांगड घालण्याचं मार्खेजचं तंत्र उलगडण्यासाठी त्याचं जीवन, त्याच्या परिसराचं सामाजिक-राजकीय वास्तव यांचा शोध घ्यावा लागतो. मार्खेजच्या जादूई वास्तववादाचं तंत्र आणि मंत्र उलगडलं तर मराठी कथात्म साहित्याचं घाट आणि कला यांचं आकलन अधिक समृ्द्ध होईल.