Tuesday 13 August 2013

ऑगस्ट क्रांती दिन 2013

नऊ ऑगस्ट रोजीच्या काँग्रेस अधिवेशनाला महात्मा गांधी मुंबईत आले. त्यांचं स्वागत केलं मुंबईचे महापौर, युसुफ मेहेरल्ली यांनी. त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये गांधीजीं मेहेरल्लींना म्हणाले, ब्रिटीश सरकारला निर्वाणीचा इशारा देणारी घोषणा कोणती असावी, ह्याचा मी विचार करतो आहे. मेहेरल्ली तात्काळ म्हणाले, क्विट इंडिया अर्थात चलेजाव. 
नऊ ऑगस्ट च्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ही घोषणा केली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र जनतेला दिला. या घोषणेनंतर धरपकड सुरु झाली. त्याच वेळी अरुणा असफअलीने तिरंगा फडकावला आणि वीजेच्या चपळाईने ती गायब झाली. चलेजाव आंदोलन संपेपर्यंत ती आणि अच्युत पटवर्धन हे दोन नेते ब्रिटीशांच्या हाती लागले नाहीत. 1942 च्या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस सोशॅलिस्टांनी केलं. युसुफ मेहेरल्ली, अरुणा असफअली, अच्युत पटवर्धन, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण हे सर्व काँग्रेस सोशॅलिस्ट होते. साहजिकच सोशॅलिस्टांना स्वातंत्र्य दिनापेक्षा क्रांतीदिनाचं महत्व अधिक होतं.
चलेजाव ची घोषणा ज्या मैदानावर गांधीजींनी दिली तिथे हुतात्मा स्मारक उभारावं ह्या मागणीसाठी समाजवादी दर क्रांती दिनाला सत्याग्रह करायचे. चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून गोवालिया टँक मैदानापर्यंत मोर्चाने यायचे. चित्रकार ओके ह्यांनी ह्या स्मारकाची छोटी प्रतिकृती केली होती. त्या प्रतिकृतीला वंदन करणं हाच सत्याग्रह असायचा. पोलीस अर्थातच अटक करायचे.
पुढे 1970 का 71 मध्ये गांधी स्मारक समितीने तिथे एक स्तंभ उभारला. त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते, मंत्री हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी पायधूळ झाडू लागले. 1992 साली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांतीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. मंडप सजावटीचं काम रघुवीर तळाशिलकरांकडे होतं. तळाशिलकरांकडे मी काही दिवस काम केलेलं असल्याने आठ ऑगस्टला रात्री मी तिथे चक्कर मारली. ऑगस्ट क्रांतीच्या नेत्यांची व्यक्तिचित्र मंडपात लावली जात होती. त्यात एक चित्र महंमदअली जिना ह्यांचं होतं. मी तळाशिलकरांना विचारलं हे कोणाचं चित्र लावताय, तर ते म्हणाले युसुफ मेहेरल्लींचं. मी म्हटलं हे चित्र जिनांचं आहे. त्यावर तळाशिलकरांनी आयोजकांच्या नावे बोटं मोडली. त्यांनी जे फोटो दिले त्यावरून आम्ही चित्र केली. असो. तू आता ताबडतोब मेहरल्लींचा फोटो घेऊन ये. जी. जी. पारीख ह्यांच्या घरी जाऊन मी मेहेरल्लींचा फोटो आणला. तळाशिलकरांनी त्यांच्या कलाकाराकडून सुंदर पोर्ट्रेट बनवून घेतलं.
कालपरवापर्यंत सोशॅलिस्ट दर क्रांतीदिनाला मिरवणूकीने हुतात्म्याना वंदन करायला येत होते. पण त्यांची संख्या रोडावत गेली. 9 ऑगस्ट 1942 रोजीचे काँग्रेस अधिवेशनाला हजेरी लावलेले तरूण सोशॅलिस्ट हळू हळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागले होते. उरलेले वृध्दापकाळामुळे येऊ शकत नव्हते. मृणाल गोरे ह्यांच्या निधनानंतर लाल रंगाचा ऑगस्ट क्रांतीचा बॅनर हाती घेऊन येणारा मोर्चा कायमचा पडद्याआड गेला.
तिरंग्यावर काँग्रेसचा हात आणि राष्ट्रवादीचं घड्याळ मिरवणारे झेंडे ग्रँट रोड स्टेशनपासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत लागलेले. मैदानावर एका बाजूला काँग्रेसचा एका बाजूला राष्ट्रवादीचा मेळावा.
ऑगस्ट क्रांतीचं नेतृत्व करणारे, गोवालिया टँक मैदानावर हुतात्मा स्मारकाची मागणी करण्यासाठी संघर्ष करणारे मात्र काळाच्या पडद्याआड. काही वर्षांपूर्वी चार म्हातारे हातात क्रांतीचा लाल बॅनर घेऊन लटपटत चालत यायचे. आता तेही नाहीत.


कालाय तस्म्यै नमः

1 comment:

  1. फार सुंदर माहिती सांगितली. आभारी आहे.

    ReplyDelete