Saturday, 24 April 2010

आयपीएलची सुलतानी

• • आयपीएलच्या संघांची नावं पहा-डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्ज इलेवन, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स, कोलकता नाइट रायडर्स. मुंबई इंडियन आणि दिल्ली डेअर डेविल्स ही दोन नावं वगळता प्रत्येक संघाला म्हणजे संघाच्या मालकांना राजे, सरदार, सेनापती यांचंच आकर्षण आहे.
• रोमन सम्राट भल्यामोठ्या स्टेडियममध्ये ग्लॅडिएटर्सच्या झुंजी लावायचे. क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, टेनिसपटू यांनी आता ग्लॅडीएटर्सची जागा घेतली आहे. रोमन सम्राटांच्या जागा शरद पवार, ललित मोदी, विजय मल्ल्या, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांनी पटकावल्या आहेत.
• स्त्रियांना चेटकीण ठरवून जाळण्याची परंपरा युरोपात होती. आशियातही होती. भारतात तर अजूनही आहे. ललित मोदींनी नेमकं हेच अस्त्र वापरून सुनंदा पुष्करला शिंदळ ठरवली. माध्यम होतं २१ व्या शतकातलं. ट्विटर.
• राजदीप सरदेसाई, अर्णब गोस्वामी, एम. जे. अकबर यासारख्या तथाकथित उदारमतवादी वा प्रागतिक विचाराच्या संपादकांच्या मनाच्या सांदीकोपर्‍यात सरंजामशाहीच दडून बसलेली आहे, हे आयपीएलच्या निमित्ताने स्पष्ट झालं. सुनंदा पुष्करचं व्यावसायिक यश यांच्यापैकी एकाही संपादकाने ध्यानात घेतलं नाही. संपादकांनी शब्द जपून, मोजून मापूनच वापरले. त्यांना शब्दांत पकडता येणार नाही पण वृत्तवाहिन्या वारंवार प्रसारीत करत असलेली दृष्यं संपादकांचा दृष्टीकोन मांडत असतात.
• शशी थरूरना राजीनामा द्यायला लागल्यावर सरकार नावाची संस्था जागी झाली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणून. ललित मोदी सरकार नावाच्या संस्थेला आव्हान देतो म्हणून वेगवेगळ्या खात्यांनी आयपीएल आणि संबंधीत कंपन्यांची चौकशी सुरु केली. तोवर सर्व आलबेलच होतं.
• आयपीएलची एक टीम पदरी बाळगता येईल एवढा पैसा प्रफुल पटेलांकडे आहे. विजय मल्ल्यांनी तर एक टीम पाळलेली आहेच. पण या दोघांच्या मुली (मल्ल्यांची सावत्र मुलगी) पॉकेट मनी मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये नोकरी करतात. आपला आयपीएलशी संबंध नाही हा पटेलांचा दावा फक्त पवार (आणि पवारवादी) यांनाच पटेल.
• सुप्रिया पवार यांच्या नवर्‍याचं, सदानंद सुळे यांचं नाव या वादात ओढलं गेलं. त्याबद्दल मिडियाला कोर्टात खेचण्याची धमकी त्यांनी दिली होती. पण वस्तुस्थिती पुढे आल्यावर त्यांनी माघार घेतली. नातेवाईकबाजी हे सुलतानशाहीचं, सरंजामशाहीचंच लक्षण आहे.
• मॅचच्या तिकिटांचे दर भीषण महाग. मॅच पाह्यला येणार्‍यांना पाण्याची बाटलीसुद्धा बरोबर ठेवण्याची मुभा नाही. १२ रुपयांची बाटली २००-३५० रुपयाला विकत घ्यायची. सामना संपल्यानंतरच्या पार्टीच्या तिकीटाचे पैसे. तिकीटांचा काळाबाजार. प्रसारणाचे हक्क, स्टेडियमवरच्या सोडाच पण प्रसारणातल्या जाहीरातींचे हक्क, मल्टिप्लेक्सेसमध्ये सामना पाहण्याचे हक्क, त्रिमिती प्रसारणाचे हक्क, शर्ट, टोप्या, इत्यादींचे हक्क. मॅच फिक्सिंगचाही आरोप आयपीएलवर होतो आहेच. आयपीएलने अब्जावधी रुपये निर्माण केले. अर्थात त्यातून संपत्ती किती निर्माण झाली ह्याचा हिशेब कोणीही मांडलेला नाही. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नव्हे तर त्याची गुंतवणूक करून अधिक काळा पैसा निर्माण करण्यासाठी आयपीएल हा कदाचित् या शतकातला सर्वात मोठा उद्योग ठरेल. युरोपातले फुटबॉल क्लब, अमेरिकेतले बास्केटबॉल वा बेसबॉलचे संघ या सर्वांच्या तोंडात मारेल असं यश आयपीएलने मिळवलं. प्रगत औद्योगिक राष्ट्रांना नामोहरम करण्याची ही युक्ती भारतासारख्या विकसनशील देशांने शोधली. हे शरद पवारांचं योगदान.
• महाराष्ट्र शासनाने मात्र षट्कार ठोकला आहे. आयपीएलची निर्मितीच करमणूक आणि करमणूकीतून अब्जावधी रुपये कमावण्यासाठी झाली. मात्र महाराष्ट्र शासनाने आयपीएलच्या सामन्यांना करमणूक कर लावण्याबाबत अजून निर्णयच घेतलेला नाही. शासन कोणत्या का पक्षाचं असेना ते नक्कीच आधुनिक वा औद्योगिक समाजाचं नाही. राजाच्या लहरीनुसार निर्णय घेणारं आहे.

Thursday, 22 April 2010

दत्ता पांढरीपांडे

गडचिरोली जिल्ह्यातलं आलापल्ली हे गाव १९७९ सालापर्यंत फॉरेस्ट व्हिलेज होतं. म्हणजे गावाचा कारभार जंगल खात्याकडे होता. साग आणि बांबूचं हे जंगल. त्याशिवाय मोह, तेंदूपत्ता, आवळा, चारोळी अशा शेकडो वनस्पती आहेतच. साग आणि बांबू ही जंगलाची नगदी पिकं. त्यांची कटाई करण्याकरता माणसं लागतात, वाहतूकीसाठी ट्रका लागतात. त्यांची वस्ती जंगलखात्याने केली की ते फॉरेस्ट व्हिलेज होतं. माणसं राह्यला लागली की घरं, रस्ते, दुकानं, दवाखाने, शाळा, बाजार, न्हावी, टेलर असं काय काय हवं. जंगलखातंच ह्या गावाचा कारभार चालवणार म्हणजे पाणी, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्यसेवा वगैरे. त्यासाठी अनेक दुकानदारांना, हॉटेलांना, न्हावी, टेलर, कुंभार, सुतार यांना भाडेपट्ट्याने प्लॉट देणार. १९७९ नंतर आलापल्ली रेव्हेन्यू व्हिलेज झालं. म्हणजे गावाचा कारभार ग्रामपंचायतीकडे आला, वगैरे. आलापल्ली त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात होतं. पुढे चंद्रपूरातून गडचिरोली हा नवा जिल्हा कापून काढण्यात आला.
१९७९ साली शेखर आलापल्लीत आला. बंगलोरहून. प्रकाश आमटेच्या कामावरचा लेख त्याने फेमिनामध्ये वाचला. बंगलोरमधून तो मुंबईला आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसात जाऊन प्रकाश आमटेचा पत्ता घेतला. मुंबई, नागपूर आणि तिथून भामरागड असा प्रवास करून हेमलकसाला पोचला. काही वर्षं प्रकाशसोबत काम केलं. त्यावेळी जंगलखात्यातही आदिवासी मजूरांना किमान वेतन दिलं जायचं नाही. सरकार आणि सरकारी यंत्रणा अनेक प्रकारे आदिवासींना नाडत होती. या शोषणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये शेखर सामील झाला. जोगा मडावी या आदिवासी कार्यकर्त्यासोबत नागेपल्ली गावात काम करू लागला. तिथेच स्थायिक झाला. जातीने शेखर ब्राह्मण, त्याने लग्न केलं दलित मुलीशी. गडचिरोलीत कुठेत महार, हेमूने मध्येच विचारलं. अमेरिकेत आयरिश लोक आहेत तर गडचिरोलीत आंध्रातले लोक का नसतील, शेखर उत्तरला. जगदीश देशपांडे, नागेश हठकर या कार्यकर्त्यांसोबत शेखरने काम केलं. पण तो नागेपल्लीतच राह्यला. राजकीय कामामुळे घराकडे कधीच लक्ष देता आलं नाही. शोभा, त्याची पत्नी अंगणवाडी शिक्षिका आहे. तिनेच मुलांना शिकवलं. वाढवलं. पुढे शेखर लहानमोठी कामाची कंत्राटं घेऊन चरितार्थ चालवू लागला. राजकीय कार्यातही खंड पडला नाहीच. आलापल्लीपासून नागेपल्ली दोन किलोमीटरवर. आलापल्ली मोठं गाव. तिथे शेखर, दत्ता पांढरीपांडे, विश्वास असा तरूण पोरांचा चांगला ग्रुप जमला.
माझी आणि या ग्रुपची पहिली भेट बहुधा १९९१ साली झाली. त्यानंतर जवळपास दरवर्षी मी त्यांना आलापल्लीमध्ये भेटायचो. वर्षातून एकदा. नोव्हेंबर वा डिसेंबर महिन्यात. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाचं वृत्तसंकलन करायचो त्यावेळी. गेली दहा वर्षं मी त्यापासून दूर आहे. त्यामुळे भेट नाही. त्यावेळी शेखरकडे फोन नव्हता. दोघांकडे मोबाईल फोन आल्यावर माझं आलापल्लीला जाणं झालं नाही. एकमेकांचे फोन माहीत नसल्याने भेटही झाली नाही. मागच्या महिन्यात हेमू नागपूर, गडचिरोली इथे हिंडत होता. त्याला मी शेखरचा पत्ता दिला. आलापल्लीला तो शेखरला भेटला. खूष झाला. हेमूकडून शेखरने माझा नंबर घेतला. या आठवड्यात तो मुंबईला आला. तेव्हा आम्ही भेटलो.
शेखरचं घर लाकडाचं. कोणत्याही आदिवासीच्या घरासारखंच. त्याच्या दारातही सदा शेकोटी पेटलेली असायची. डिसेंबर महिन्यातल्या एका रात्री आम्ही दोघे शेकोटीपाशी रम पित बसलो होतो. सभोवताली घनदाट शांतता.
शेखरकडे त्याच्या मित्राची मोटरसायकल होती. लाल रंगाची. त्याच्यामागे बसून मी आलापल्ली ते भामरागड असा प्रवास केला. आसपासच्या गावातही गेलो होतो. १९९१ साली. त्यावेळी मी मराठवाडा या पेपरात काम करत होतो. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीसंबंधात मी एक लेखमाला लिहीली होती. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील आदिवासी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीचे बारकावे, इत्यादी अनेक बारक्या-सारक्या गोष्टी त्यावेळी मी अनेकांकडून जाणून घेतल्या. त्यापैकी एक शेखर. त्याच्यासोबत भरपूर वेळ काढला, खूप हिंडलो. शेखरनेच माझी दत्ता पांढरीपांडेची ओळख करून दिली.
दत्ता मूळचा चंद्रपूरचा. नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्याने काँग्रेसच्या नरेश पुगलियाला हरवलं होतं. पुढे नरेश पुगलिया खासदार झाला. दत्ता चळवळीतला कार्यकर्ताच राह्यला. चंद्रपूरातून आलापल्लीला आल्यावरही त्याच्या राजकारणात फरक पडला नाही. तडजोड न करता तो राजकीय कामात राह्यल्याचा त्याला अभिमानच होता. पांढरा पायजमा, पांढरा पण कळकट शर्ट, डोक्यावर गांधीटोपी, गळ्यात मफलर अशा वेशात दत्ता असायचा. तोही ठेकेदारच होता. पण आदिवासींचेच नव्हे तर कोणत्याही जातीपातीच्या गरीबांच्या प्रश्नावर काम करत असायचा. आदिवासींना मोर्चे वगैरे काढायचे शिकवले जोगा मडावीने. या आदिवासी नेत्याला शहरातून आलेल्या काही कार्यकर्त्यांची साथ मिळाली. ते कार्यकर्ते म्हणजे शेखर, दत्ता वगैरे. दत्ताचा जनसंपर्क दांडगा होता. खूप बोलघेवडा होता. झाडं, पानं, फुलं, फळं, आदिवासी, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, राजकारण अशा अनेक विषयांवर त्याच्याकडे वेगळी माहिती असायची. उदाहरणार्थ, म्यानमारमधल्या सागानंतर आलापल्लीच्या सागाच्या नंबर लागतो, आलापल्लीच्या जंगलातल्या बांबूचा लगदा आणि देशाच्या अन्य जंगलातल्या बांबूचा लगदा, किंवा जंगलातले राघू कसे पकडायचे वा आदिवासी वैदू पोटातले खडे ऑपरेशनशिवाय कसे काढतात, असं काहीही.
हेमलकसाला जाताना आलापल्लीच्या अलीकडे दोन किलोमीटरवर नागेपल्ली. तिथे शेखरला भेटायचं. आलापल्ली-भामरागड रस्त्यावर दत्ताचं घर होतं. भामरागड-हेमलकसाला जाताना नागेपल्ली, आलापल्ली इथे थांबूनच मी जायचो. त्यामुळे शेखर, दत्ता, विश्वास यांच्या भेटीगाठी व्हायच्या. तीन वर्षांपूर्वी दत्ताचं निधन झालं. हार्ट अ‍ॅटॅक आला. विश्वास दारू पिऊन पिऊन मेला. काल भेटलो तेव्हा शेखर म्हणाला. आता कधी हेमलकसाला गेलो तर नागेपल्लीला शेखर भेटेल. हेमलकसाला जाताना आणि येताना दत्ताच्या घराकडे नजर रेंगाळत राहीत.

Monday, 12 April 2010

उत्सुकतेने मी झोपलो........

कथा नाही. कथानक नाही. पात्रं आहेत पण कचकडी. समाज आहे, समाजरचना आहे, पण वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर दिसणार्‍या बातम्यांसारखी. निबंध नाही पण विचार आहे. विचार प्रक्षोभक वाक्यं आहेत. “उत्सुकतेने मी झोपलो”, ही श्याम मनोहरांची कादंबरी अशी आहे.
“कळ” ही श्याम मनोहरांची कादंबरी, कादंबरीच नाही असं भालचंद्र नेमाडे म्हणाले होते. अनेक कथांची गोधडी आहे, असं आणखी कुणीतरी म्हटलं होतं. “कळ” त्यानंतर “खूप लोक आहेत”, त्यानंतर “उत्सुकतेने मी झोपलो”. आता “खेकसत म्हणायचं आय लव्ह यू” (ही कादंबरी मी वाचलेली नाही). कळमध्ये कथा आहेत पण कथानकाचा लोप होत जातो. पात्रं कचकड्याची होत जातात. समाजरचना वा समाज वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर दिसणार्‍या बातम्यांसारखा येतो. विचार प्रक्षोभक वाक्यं जवळपास प्रत्येक परिच्छेदात भेटतात.
ग्रेट म्हणजे काय, ग्रेट कलाकृती घडवण्याची भीती मराठी माणसाला का वाटते, ज्ञान म्हणजे काय, जीवनाचं रहस्य काय, ते कसं कळतं, विज्ञान कोणतं सत्य उकलतं, सत्य जाणून घेण्यासाठी काय करायचं असतं, असे अनेक प्रश्न लेखकाने “कळ” या कादंबरीपासून थेटपणे उपस्थित करायला सुरुवात केली. गोष्ट म्हणजे काय, मराठी समाजात गोष्ट का नाही, असे प्रश्न उपस्थित केले. “उत्सुकतेने मी झोपलो” मध्ये गोष्ट, कथा, कथानक सिनेमाच्या सेटसारखे येतात. लेखकाला जे म्हणायचं ते निबंधात सांगता येणार नाही म्हणून पात्रं येतात. खूप पात्रं असूनही गर्दी नाही कारण पात्रं पपेट शो मधल्या बाहुल्यांसारखी आहेत.
फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील थोर कादंबरीकार समजला जातो. त्याने एकही कादंबरी पूर्ण लिहिलेली नाही. आपली हस्तलिखितं जाळून टाकावीत अशी सूचना त्याने त्याच्या मित्राला केली होती. त्या मित्रानेच कादंबरीची प्रकरणं जुळवली. कारण प्रकरणांचा अनुक्रमही काफ्काने दिलेला नव्हता. काफ्काच्या या कादंबर्‍या नंतर थोर कलाकृती ठरल्या. तोवर अशी कादंबरी युरोपला ठाऊकच नव्हती. एकही कादंबरी पूर्ण न लिहिणारा लेखक थोर कादंबरीकार ठरला. सकस आणि यशस्वी कथा, कादंबर्‍या, नाटकं लिहिल्यानंतर श्याम मनोहर पूर्णपणे वेगळ्या कादंबरी लेखनाकडे वळलेले आहेत. त्यामुळेच सध्याच्या त्यांच्या कादंबर्‍या कथात्म लिखाण आहे की नाही याचा निवाडा करण्याची घाई कशाला.
लेखकानेच निर्माण केलेलं कथानक, पात्रं यांच्याशी लेखकाचा जो व्यवहार होतो त्यातून कथात्म लिखाण आकारतं असं साधारणपणे मानलं जातं. त्यातून निर्माण होणार्‍या कलाकृतीशी वाचकचा संबंध निर्माण होतो. वाचक त्या कलाकृतीशी स्वतःचं नातं जोडतो. लेखक, कथानक, पात्रं ही अर्थातच भाषेच्या माध्यमातून वाचकाशी बोलतात. या खेळात वाचकालाही सामील करून घेणं त्याला केवळ प्रेक्षक न ठेवणं, जेणेकरून कलाकृती इंटरअ‍ॅक्टिव करणं (पारंपारिक कथात्म लिखाणातली इंटरअ‍ॅक्टिविटी थेट नसते. ती वाचकाच्या आकलनावर सोपवलेली असते. ती वाचकसापेक्ष असते. “कळ” पासूनच्या श्याम मनोहरांच्या लिखाणातली इंटरअ‍ॅक्टिविटी लेखकसापेक्ष आहे. आकलनाच्या कोणत्याही पातळीवर निवेदक वाचकाशी संवाद साधू पहातोय.) हा प्रयत्न फार कमी लेखक जाणतेपणी करताना दिसतात. सतीश तांबे हे या कोटीत बसणारं कथा लेखन करतात.
कथात्म लिखाण करण्याची श्याम मनोहरांची प्रेरणा वाचकाचं मनोरंजन करणं ही नाही, मनोरंजनातून प्रबोधन करणं ही नाही, वास्तवाचं डॉक्युमेंटेशन करणं ही नाही, हितोपदेश करणं ही नाही, भाषेचे, शैलीचे, घाटाचे प्रयोग करणं ही नाही, समाजात क्रांती घडावी, समाजात बदल घडावेत ही नाही. जीवनाचा शोध घेणं, जीवन रहस्याचा उलगडा करणं, त्या प्रयत्नात वाचकाला सामील करून घेणं यासाठी श्याम मनोहर कथात्म लिखाण करतात.
शिल्पकला, चित्रकला, संगीत, काव्य, लेखन अशा कोणत्याही कलेपेक्षा जीवन जगण्याची कला सर्वश्रेष्ठ आहे, असं कृष्णमूर्ती म्हणायचे. कळ पासून सुरु झालेल्या श्याम मनोहरांच्या कादंबर्‍या या प्रश्नाच्याच जवळ जाणार्‍या आहेत. श्याम मनोहरांच्या साहित्याचा जे. कृष्णमूर्तींशी असलेला संबंध हरिश्चंद्र थोरात या समीक्षकाने एका निबंधात उलगडून दाखवला आहेच.
श्याम मनोहरांनी “धस स्पेक झरुत्रुष्ट” या फ्रेडरिख नित्शे यांच्या ग्रंथाचा अनुवाद केल्याचं सांगितलं जातं. (तो अनुवाद कुठे गेला कुणास ठाऊक.) “धस स्पेक झरुत्रुष्ट” हा काही झरुत्रुष्टाच्या उद्धरणांचा वा त्या उद्धराणांच्या अर्थनाचा ग्रंथ नाही. ते झरूत्रुष्टाचं चरित्रही नाही. नित्शेने त्याचं तत्वज्ञान झरुत्रुष्टाच्या गोष्टीतून मांडलंय.
जे. कृष्णमूर्ती, फ्रेडरिख नित्शे ही नावं चोखंदळ मराठी वाचकांना अपरिचित नाहीत. समीक्षकांना तर नाहीतच नाहीत. श्याम मनोहरांनी त्यांचं आशयद्रव्य या लेखकांकडून घेतललं नाही. परंतु या दोन लेखकांनी आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मांडणीची नवी वाट, नवा घाट, नवी भाषा आणली. मराठी साहित्यात विशेषतः कथात्म साहित्यात श्याम मनोहरांनी हाच प्रयोग केलेला आहे. असा प्रयोग करायला कमालीचा आत्मविश्वास, प्रखर बुद्धिमत्ता आणि धाडसं लागतं. कितीही कादंबर्‍या लिहून झाल्यावर पुरून उरेल एवढा या तीन गुणांचा खजिना श्याम मनोहर यांच्याकडे आहे.

Tuesday, 6 April 2010

स्त्री एकी अन्न अन्न करीत गेली.......

पहिल्या पत्नीच्या मृत्युची नोंद तुकोबांनी या शब्दांत करून ठेवली आहे. शेकडो वर्षं उलटून गेल्यावरही अन्न..अन्न करत मरणार्‍यांची संख्या आपल्या देशात कित्येक लाख असावी. हे लोक उपासमारीने नाही तर कुपोषणाने मरत आहेत. १९९० सालानंतर आर्थिक क्षेत्रातील उदारीकरणाचे वारे वाहू लागले आणि भारत जागतिक महासत्ता कशी बनेल याची चर्चा सुरु झाली. सेन्सेक्सची चढ-उतार, डॉलर वा रुपयाचं मूल्य, जीडीपीतली (सकल राष्ट्रीय उत्पादन) वाढ वा घट, परदेशी भांडवलाचा ओघ अशा आकड्यांवर आपल्याकडची अर्थ-राजकीय व्यवस्था चर्चा करत होती. जवळपास दोन दशकं दारिद्र्य आणि उपासमार हे विषय राजकीय अजेंड्यावर नव्हते. राममंदिर, मंडल आयोग, सांस्कृतिक राष्ट्रवाद, राखीव जागा, दहशतवाद ह्या विषयांनी राजकीय अवकाश व्यापला होता. हे सर्व विषय आहेरे वर्गाचे होते आणि आहेत, ही बाब दारिद्र्य आणि उपासमार या विषयावर चर्चा सुरु झाल्यावर प्रकाशात आली.
अन्न सुरक्षा विधेयकाबाबत सोनिया गांधींनी नाराजी दर्शवली नसती तर शंभर टक्के भारतीय वंशाच्या केंद्रीय मंत्र्याच्या गटाला देशातील गरीबांची संख्या किती आहे, हे गरीब लोक कुठे राहतात, काय खातात, त्यांची नोंद कुठे झालीय का, त्यांच्यासाठी सुरु केलेल्या सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेची स्थिती काय आहे, गरीबांना पुरेसं अन्न माफक वा नाममात्र किंमतीत पुरवता येणं शक्य आहे का, कसं, इत्यादी प्रश्नांचा शोध घेण्याची गरज वाटली नसती. गेल्यावर्षी मान्सूनने दगा देऊनही गहू आणि तांदळाचं विक्रमी उत्पादन झालं. गुदामं ओसंडून वाहू लागली. पण गरीबांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं मात्र सरकारला, सरकारी यंत्रणेला शक्य झालं नाही. आपल्याला गरीबी हटवता आलेली नाही की गरीबांची उपासमार रोखता आलेली नाही. हे दोन्ही विषय राजकीय अजेंड्यावरही नाहीत.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर रमेश पाध्ये आणि उल्का महाजन हे दोन कार्यकर्ते-अभ्यासक या विषयावर सातत्याने लिखाण करत होते. त्यांच्याच लेखातील आकडेवारीचा आणि तपशीलाचा आधार घेऊन आता बडबडे राजकीय विश्लेषक प्रासंगिक लेखांचा रतीब टाकू लागले आहेत. ‘आंदोलन’ सारख्या चळवळीच्या नियतकालिकांतूनच या विषयावर सविस्तर माहिती दिली जात होती. वर्तमानपत्रं बंद झाली तरी चालतील पण ‘आंदोलन’ सारखी नियतकालिकं आणि अनियतकालिकं मात्र सुरु राह्यली पाहिजेत कारण बाजरपेठेला शरण न जाण्याचं तेज त्यांच्याकडेच असतं.