Saturday, 24 April 2010

आयपीएलची सुलतानी

• • आयपीएलच्या संघांची नावं पहा-डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्ज इलेवन, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स, कोलकता नाइट रायडर्स. मुंबई इंडियन आणि दिल्ली डेअर डेविल्स ही दोन नावं वगळता प्रत्येक संघाला म्हणजे संघाच्या मालकांना राजे, सरदार, सेनापती यांचंच आकर्षण आहे.
• रोमन सम्राट भल्यामोठ्या स्टेडियममध्ये ग्लॅडिएटर्सच्या झुंजी लावायचे. क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, टेनिसपटू यांनी आता ग्लॅडीएटर्सची जागा घेतली आहे. रोमन सम्राटांच्या जागा शरद पवार, ललित मोदी, विजय मल्ल्या, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांनी पटकावल्या आहेत.
• स्त्रियांना चेटकीण ठरवून जाळण्याची परंपरा युरोपात होती. आशियातही होती. भारतात तर अजूनही आहे. ललित मोदींनी नेमकं हेच अस्त्र वापरून सुनंदा पुष्करला शिंदळ ठरवली. माध्यम होतं २१ व्या शतकातलं. ट्विटर.
• राजदीप सरदेसाई, अर्णब गोस्वामी, एम. जे. अकबर यासारख्या तथाकथित उदारमतवादी वा प्रागतिक विचाराच्या संपादकांच्या मनाच्या सांदीकोपर्‍यात सरंजामशाहीच दडून बसलेली आहे, हे आयपीएलच्या निमित्ताने स्पष्ट झालं. सुनंदा पुष्करचं व्यावसायिक यश यांच्यापैकी एकाही संपादकाने ध्यानात घेतलं नाही. संपादकांनी शब्द जपून, मोजून मापूनच वापरले. त्यांना शब्दांत पकडता येणार नाही पण वृत्तवाहिन्या वारंवार प्रसारीत करत असलेली दृष्यं संपादकांचा दृष्टीकोन मांडत असतात.
• शशी थरूरना राजीनामा द्यायला लागल्यावर सरकार नावाची संस्था जागी झाली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणून. ललित मोदी सरकार नावाच्या संस्थेला आव्हान देतो म्हणून वेगवेगळ्या खात्यांनी आयपीएल आणि संबंधीत कंपन्यांची चौकशी सुरु केली. तोवर सर्व आलबेलच होतं.
• आयपीएलची एक टीम पदरी बाळगता येईल एवढा पैसा प्रफुल पटेलांकडे आहे. विजय मल्ल्यांनी तर एक टीम पाळलेली आहेच. पण या दोघांच्या मुली (मल्ल्यांची सावत्र मुलगी) पॉकेट मनी मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये नोकरी करतात. आपला आयपीएलशी संबंध नाही हा पटेलांचा दावा फक्त पवार (आणि पवारवादी) यांनाच पटेल.
• सुप्रिया पवार यांच्या नवर्‍याचं, सदानंद सुळे यांचं नाव या वादात ओढलं गेलं. त्याबद्दल मिडियाला कोर्टात खेचण्याची धमकी त्यांनी दिली होती. पण वस्तुस्थिती पुढे आल्यावर त्यांनी माघार घेतली. नातेवाईकबाजी हे सुलतानशाहीचं, सरंजामशाहीचंच लक्षण आहे.
• मॅचच्या तिकिटांचे दर भीषण महाग. मॅच पाह्यला येणार्‍यांना पाण्याची बाटलीसुद्धा बरोबर ठेवण्याची मुभा नाही. १२ रुपयांची बाटली २००-३५० रुपयाला विकत घ्यायची. सामना संपल्यानंतरच्या पार्टीच्या तिकीटाचे पैसे. तिकीटांचा काळाबाजार. प्रसारणाचे हक्क, स्टेडियमवरच्या सोडाच पण प्रसारणातल्या जाहीरातींचे हक्क, मल्टिप्लेक्सेसमध्ये सामना पाहण्याचे हक्क, त्रिमिती प्रसारणाचे हक्क, शर्ट, टोप्या, इत्यादींचे हक्क. मॅच फिक्सिंगचाही आरोप आयपीएलवर होतो आहेच. आयपीएलने अब्जावधी रुपये निर्माण केले. अर्थात त्यातून संपत्ती किती निर्माण झाली ह्याचा हिशेब कोणीही मांडलेला नाही. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नव्हे तर त्याची गुंतवणूक करून अधिक काळा पैसा निर्माण करण्यासाठी आयपीएल हा कदाचित् या शतकातला सर्वात मोठा उद्योग ठरेल. युरोपातले फुटबॉल क्लब, अमेरिकेतले बास्केटबॉल वा बेसबॉलचे संघ या सर्वांच्या तोंडात मारेल असं यश आयपीएलने मिळवलं. प्रगत औद्योगिक राष्ट्रांना नामोहरम करण्याची ही युक्ती भारतासारख्या विकसनशील देशांने शोधली. हे शरद पवारांचं योगदान.
• महाराष्ट्र शासनाने मात्र षट्कार ठोकला आहे. आयपीएलची निर्मितीच करमणूक आणि करमणूकीतून अब्जावधी रुपये कमावण्यासाठी झाली. मात्र महाराष्ट्र शासनाने आयपीएलच्या सामन्यांना करमणूक कर लावण्याबाबत अजून निर्णयच घेतलेला नाही. शासन कोणत्या का पक्षाचं असेना ते नक्कीच आधुनिक वा औद्योगिक समाजाचं नाही. राजाच्या लहरीनुसार निर्णय घेणारं आहे.

3 comments:

  1. ज्या सामान्य माणसाची कड घेऊन स्वैराचाराला देशाबद्‌दल कळकळ वाटणार्‍यांकडून विरोध केला ज़ातो तो माणूसच बॉलीवूड, क्रिकेट या सवंग प्रकारांना भक्कम पाठिम्बा देतो, हा एक विरोधाभास आहे.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  2. रा. रा. सुनीलजी,
    हे असं झाल्यावरच ते रोम लयाला गेलं ना? गिबन्स की कोण तो सांगून गेलाय.
    - बापू आत्रंगे

    ReplyDelete
  3. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    मोदी लयाला जातील पण आयपीएल, बीसीसीआय, शरद पवार, सुप्रिया पवार लयाला जाणार नाहीत. त्यांची सत्ता आणि संपत्ती दिशीमाशी वाढतच जाते. निवडणूक आयोगाकडे सादर केलेली विवरणपत्रं आणि निवडणूकीचे निकाल पाहून हे सहज ध्यानी येईल. रोमन साम्राज्याच्या विलयापासून धडे घेतले आहेत, आधुनिक सरदारांनी. त्यासाठी गिबन्स वाचायची गरज नाही त्यांना......

    सुनील तांबे

    ReplyDelete