Thursday, 22 April 2010

दत्ता पांढरीपांडे

गडचिरोली जिल्ह्यातलं आलापल्ली हे गाव १९७९ सालापर्यंत फॉरेस्ट व्हिलेज होतं. म्हणजे गावाचा कारभार जंगल खात्याकडे होता. साग आणि बांबूचं हे जंगल. त्याशिवाय मोह, तेंदूपत्ता, आवळा, चारोळी अशा शेकडो वनस्पती आहेतच. साग आणि बांबू ही जंगलाची नगदी पिकं. त्यांची कटाई करण्याकरता माणसं लागतात, वाहतूकीसाठी ट्रका लागतात. त्यांची वस्ती जंगलखात्याने केली की ते फॉरेस्ट व्हिलेज होतं. माणसं राह्यला लागली की घरं, रस्ते, दुकानं, दवाखाने, शाळा, बाजार, न्हावी, टेलर असं काय काय हवं. जंगलखातंच ह्या गावाचा कारभार चालवणार म्हणजे पाणी, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्यसेवा वगैरे. त्यासाठी अनेक दुकानदारांना, हॉटेलांना, न्हावी, टेलर, कुंभार, सुतार यांना भाडेपट्ट्याने प्लॉट देणार. १९७९ नंतर आलापल्ली रेव्हेन्यू व्हिलेज झालं. म्हणजे गावाचा कारभार ग्रामपंचायतीकडे आला, वगैरे. आलापल्ली त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात होतं. पुढे चंद्रपूरातून गडचिरोली हा नवा जिल्हा कापून काढण्यात आला.
१९७९ साली शेखर आलापल्लीत आला. बंगलोरहून. प्रकाश आमटेच्या कामावरचा लेख त्याने फेमिनामध्ये वाचला. बंगलोरमधून तो मुंबईला आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसात जाऊन प्रकाश आमटेचा पत्ता घेतला. मुंबई, नागपूर आणि तिथून भामरागड असा प्रवास करून हेमलकसाला पोचला. काही वर्षं प्रकाशसोबत काम केलं. त्यावेळी जंगलखात्यातही आदिवासी मजूरांना किमान वेतन दिलं जायचं नाही. सरकार आणि सरकारी यंत्रणा अनेक प्रकारे आदिवासींना नाडत होती. या शोषणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये शेखर सामील झाला. जोगा मडावी या आदिवासी कार्यकर्त्यासोबत नागेपल्ली गावात काम करू लागला. तिथेच स्थायिक झाला. जातीने शेखर ब्राह्मण, त्याने लग्न केलं दलित मुलीशी. गडचिरोलीत कुठेत महार, हेमूने मध्येच विचारलं. अमेरिकेत आयरिश लोक आहेत तर गडचिरोलीत आंध्रातले लोक का नसतील, शेखर उत्तरला. जगदीश देशपांडे, नागेश हठकर या कार्यकर्त्यांसोबत शेखरने काम केलं. पण तो नागेपल्लीतच राह्यला. राजकीय कामामुळे घराकडे कधीच लक्ष देता आलं नाही. शोभा, त्याची पत्नी अंगणवाडी शिक्षिका आहे. तिनेच मुलांना शिकवलं. वाढवलं. पुढे शेखर लहानमोठी कामाची कंत्राटं घेऊन चरितार्थ चालवू लागला. राजकीय कार्यातही खंड पडला नाहीच. आलापल्लीपासून नागेपल्ली दोन किलोमीटरवर. आलापल्ली मोठं गाव. तिथे शेखर, दत्ता पांढरीपांडे, विश्वास असा तरूण पोरांचा चांगला ग्रुप जमला.
माझी आणि या ग्रुपची पहिली भेट बहुधा १९९१ साली झाली. त्यानंतर जवळपास दरवर्षी मी त्यांना आलापल्लीमध्ये भेटायचो. वर्षातून एकदा. नोव्हेंबर वा डिसेंबर महिन्यात. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाचं वृत्तसंकलन करायचो त्यावेळी. गेली दहा वर्षं मी त्यापासून दूर आहे. त्यामुळे भेट नाही. त्यावेळी शेखरकडे फोन नव्हता. दोघांकडे मोबाईल फोन आल्यावर माझं आलापल्लीला जाणं झालं नाही. एकमेकांचे फोन माहीत नसल्याने भेटही झाली नाही. मागच्या महिन्यात हेमू नागपूर, गडचिरोली इथे हिंडत होता. त्याला मी शेखरचा पत्ता दिला. आलापल्लीला तो शेखरला भेटला. खूष झाला. हेमूकडून शेखरने माझा नंबर घेतला. या आठवड्यात तो मुंबईला आला. तेव्हा आम्ही भेटलो.
शेखरचं घर लाकडाचं. कोणत्याही आदिवासीच्या घरासारखंच. त्याच्या दारातही सदा शेकोटी पेटलेली असायची. डिसेंबर महिन्यातल्या एका रात्री आम्ही दोघे शेकोटीपाशी रम पित बसलो होतो. सभोवताली घनदाट शांतता.
शेखरकडे त्याच्या मित्राची मोटरसायकल होती. लाल रंगाची. त्याच्यामागे बसून मी आलापल्ली ते भामरागड असा प्रवास केला. आसपासच्या गावातही गेलो होतो. १९९१ साली. त्यावेळी मी मराठवाडा या पेपरात काम करत होतो. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीसंबंधात मी एक लेखमाला लिहीली होती. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील आदिवासी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीचे बारकावे, इत्यादी अनेक बारक्या-सारक्या गोष्टी त्यावेळी मी अनेकांकडून जाणून घेतल्या. त्यापैकी एक शेखर. त्याच्यासोबत भरपूर वेळ काढला, खूप हिंडलो. शेखरनेच माझी दत्ता पांढरीपांडेची ओळख करून दिली.
दत्ता मूळचा चंद्रपूरचा. नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्याने काँग्रेसच्या नरेश पुगलियाला हरवलं होतं. पुढे नरेश पुगलिया खासदार झाला. दत्ता चळवळीतला कार्यकर्ताच राह्यला. चंद्रपूरातून आलापल्लीला आल्यावरही त्याच्या राजकारणात फरक पडला नाही. तडजोड न करता तो राजकीय कामात राह्यल्याचा त्याला अभिमानच होता. पांढरा पायजमा, पांढरा पण कळकट शर्ट, डोक्यावर गांधीटोपी, गळ्यात मफलर अशा वेशात दत्ता असायचा. तोही ठेकेदारच होता. पण आदिवासींचेच नव्हे तर कोणत्याही जातीपातीच्या गरीबांच्या प्रश्नावर काम करत असायचा. आदिवासींना मोर्चे वगैरे काढायचे शिकवले जोगा मडावीने. या आदिवासी नेत्याला शहरातून आलेल्या काही कार्यकर्त्यांची साथ मिळाली. ते कार्यकर्ते म्हणजे शेखर, दत्ता वगैरे. दत्ताचा जनसंपर्क दांडगा होता. खूप बोलघेवडा होता. झाडं, पानं, फुलं, फळं, आदिवासी, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, राजकारण अशा अनेक विषयांवर त्याच्याकडे वेगळी माहिती असायची. उदाहरणार्थ, म्यानमारमधल्या सागानंतर आलापल्लीच्या सागाच्या नंबर लागतो, आलापल्लीच्या जंगलातल्या बांबूचा लगदा आणि देशाच्या अन्य जंगलातल्या बांबूचा लगदा, किंवा जंगलातले राघू कसे पकडायचे वा आदिवासी वैदू पोटातले खडे ऑपरेशनशिवाय कसे काढतात, असं काहीही.
हेमलकसाला जाताना आलापल्लीच्या अलीकडे दोन किलोमीटरवर नागेपल्ली. तिथे शेखरला भेटायचं. आलापल्ली-भामरागड रस्त्यावर दत्ताचं घर होतं. भामरागड-हेमलकसाला जाताना नागेपल्ली, आलापल्ली इथे थांबूनच मी जायचो. त्यामुळे शेखर, दत्ता, विश्वास यांच्या भेटीगाठी व्हायच्या. तीन वर्षांपूर्वी दत्ताचं निधन झालं. हार्ट अ‍ॅटॅक आला. विश्वास दारू पिऊन पिऊन मेला. काल भेटलो तेव्हा शेखर म्हणाला. आता कधी हेमलकसाला गेलो तर नागेपल्लीला शेखर भेटेल. हेमलकसाला जाताना आणि येताना दत्ताच्या घराकडे नजर रेंगाळत राहीत.

No comments:

Post a Comment