माझ्या
लहानपणी पुणे हे सायकलस्वारांचं शहर ओळखलं जायचं. मुंबईमध्ये तासाला ६० पैसे हा
सायकल भाड्याचा दर होता. पुण्यात हाच दर २० पैसे होता, असं सवंगडी सांगायचे.
पुण्यात प्रत्येक घरात सायकल असते त्यामुळे तिथे मूल चालायला शिकलं की सायकलही
चालवू शकतं, अशी लहानपणी माझी समजूत होती.
आर्थिक
विकासासोबत पुण्यातली सायकलींची संख्या कमी झाली. स्वयंचलित दुचाकी आणि चार चाकी
वाहनं लोक वापरू लागले. सायकल आता व्यायामासाठी वापरली जाते. पुण्यात म्हणे
सायकलचाही एक मॉल आहे. चाळीस-पन्नास हजार रुपयांच्या सायकली तिथे विक्रीला आहेत.
चीनमध्येही
सायकल हेच वाहतुकीचं सर्वाधिक लोकप्रिय वाहन होतं. मकबूल फिदा हुसेन ह्या
चित्रकाराने चीनच्या भेटीनंतर काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं.
रस्त्यावरील सायकलींच्या तांड्यांनी त्याचंही लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर
चीनमध्ये स्वयंचलित दुचाकी वाहनांची बाजारपेठ वाढली. पण अलीकडे चीनमध्येही चार
चाकीला अधिक पसंती आहे.
वस्तू
व सेवा ह्यांच्या उत्पादनात वाढ झाली, व्यापार वाढला की लोकांच्या हाती अधिक पैसे
खेळू लागतात, वेळेला अधिक महत्व येतं त्यामुळे सायकल असो की स्वयंचलित दुचाकी वा
चारचाकी वाहनांचा वापर वाढतो. त्यांच्या मागणीत वाढ होते.
युरोपमध्ये
एकेकाळी घोडे आणि घोडागाड्या ह्यांचा वापर होत असे. बायसिकल थिफ या गाजलेल्या चित्रपटातही
फारशा सायकली दिसत नाहीत. घोडे आणि घोडागाड्यांच्या जागी रेल्वे आली. आणि
रेल्वेच्या नंतर चारचाकी आल्या. चार्ली चॅप्लिनच्या सिनेमांमधील स्वयंचलित
चारचाकीचं डिझाईन वा आकार घोडागाडी वा बग्गीसारखाच आहे. जिप्सी लोकांच्या
घोडागाड्या बग्गीसारख्या नव्हत्या. त्यांचा सर्व संसार त्या गाड्यांमध्ये भरलेला
असे, त्याशिवाय घोडागाडी हे त्यांचं घरही होतं. जिप्सींच्या घोडागाड्यांना म्हणून
वॅगन म्हणत. त्यामुळे मोठ्या मालवाहू स्वयंचलित चारचाकीला स्टेशनवॅगन हे नाव पडलं
असावं. रेल्वेच्या मालवाहू डब्ब्यांना आजही वॅगनच म्हणतात. त्याचं मराठीकरण म्हणजे
वाघीण.
युरोपमध्ये
स्वयंचलित चारचाकी वाहनांचा खप अधिक आहे. जर्मनी या देशाची अर्थव्यवस्था चारचाकी
वाहनांच्या कारखान्यांवरच उभी आहे. युरोपियन देशांमध्ये स्वयंचलित दुचाकी वाहनांना
फारशी मागणी नाही. कामावर जाण्यासाठी फारच कमी लोक दुचाकी वापरत असतील. स्वयंचलित
दुचाकी हा स्पोर्टस् मानला जातो. आनंदासाठी मोटरसायकलवरून टूर करायची, अशी पद्धत
तिथे असावी. त्यामुळे आर्थिक विकास झाल्यावर तिथे स्वयंचलित चारचाकींची मागणी
वाढली. दुचाकींची मागणी फारशी वाढली नाही. अलीकडे आरोग्य आणि पर्यावरणविषयक
जाणीव-जागृतीमुळे युरोपात सायकलींचा वापर वाढला आहे. याच कारणामुळे पुण्यात वा
आपल्या देशातील शहरांमध्येही सायकलीचा वापर वाढावा ह्याचा प्रसार करण्याचं व्रतच
सुजीत पटवर्धनने घेतलं होतं. फेसबुकवर तो ह्या विषयाशी संबंधीत पोस्ट टाकायचा.
सायकल
असो की स्वयंचलित दुचाकी ह्यांचा वापर केवळ आर्थिक स्थितीशी संबंधीत नाही तर
हवामानाशीही आहे. युरोपियन देशांमध्ये थंडी खूप असते, पावसाळा नसतो कारण बारा
महिने अधून-मधून पाऊस पडत असतो. भारतात पावसाळा निश्चित असतो. दोन ते चार महिने पावसाळा
असतो. पावसाळा नसताना येणारा पाऊस बेभरवशी असला तरी क्वचित पडतो. भारतात हाडं
फोडणारी थंडी बहुधा लेह-लडाख याच भागात पडते. त्यामुळे सायकल वा स्वयंचलित दुचाकी
सोईची ठरते. स्वयंचलित दुचाकीचा, विशेषतः मोटरसायकलचा वापर मालवाहू वाहन म्हणूनही
केला जातो. दुधाच्या चरव्या मोटरसायकलवर बांधण्यासाठी खास व्यवस्था केलेली असते.
एका मोटरसायकलवर बसून तीन-चार व्यक्तींनी प्रवास करणं आपल्याकडे खूपच कॉमन आहे.
स्कूटी म्हणजे गिअर नसलेल्या स्कूटरवर पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं (हम दो,
हमारे दो) प्रवास करताना दिसतात. भारतातल्या कोणत्याही शहरात वा गावात.
महामार्गावरही हे दृश्य अपवादात्मक नाही.
२०१६
साली भारतामध्ये १७.७ दशलक्ष स्वयंचलित दुचाकी वाहनं विकली गेली. म्हणजे दिवसाला
सुमारे ४८ हजार दुचाकी विकल्या जात होत्या. दुचाकीच्या बाजारपेठेत भारताने चीनलाही
पिछाडीवर टाकलेलं आहे. मात्र भारतीय शहरांमधील रस्ते वाहतूक आणि वाहतुकीचे नियम
युरोप-अमेरिकेप्रमाणे आहेत. रस्ते चारचाकी वाहनांसाठीच बांधले जातात.
रस्त्यावरच्या सर्व मार्गिका स्वयंचलित चारचाकी वाहनांसाठीच
असतात. वस्तुतः शहरात आणि महामार्गांवर, सायकल आणि स्वयंचलित दुचाकींसाठी स्वतंत्र मार्गिकांची व्यवस्था हवी जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होईल. स्वयंचलित दुचाकींचे
वेग कमी होतील. स्वयंचलित दुचाकी—मोटरसायकल, हे वाहन नाही तर वृत्ती आहे. त्यामुळे
अपघातांचं प्रमाण वाढतं. हेल्मेट सक्तीची गरज त्यामुळेच निर्माण होते. हेल्मेटची
गरज आहेच मात्र त्याचा कायदा केल्यामुळे केवळ काळ्या पैशांत वाढ होते.
आपल्या
देशातल्या हवामानानुसार वाहतुक व्यवस्था हवी ही साधी बाब आपल्याकडचे सनदी अधिकारी,
नगररचनाकार, स्थापत्यकार, वाहतूकतज्ज्ञ इत्यादींना समजत नाही. त्यांचं व्यावसायिक
शिक्षण ज्या संस्थांमध्ये झालं आहे त्या संस्थांसाठी पाश्चात्य देशातील व्यवस्था
आदर्श आहेत.
राजकारण्यांना
तर विविध मॉडेलच्या चारचाकी वापरण्यातच रस असतो. परदेशी बनावटीच्या व्होल्वो किंवा
तत्सम अगडबंब बस जाऊ शकतील असे महामार्ग बांधण्यावरच आपण लक्ष केंद्रीत केलं आहे.
त्यामध्ये मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब ह्यांच्या सोईसुविधांचा विचार केलेला नसतो. १९९० नंतर विविध विमानतळांचं अत्याधुनिकीकरण करण्यात आलं. भारतातल्या
सर्व विमानसेवा तोट्यात आहेत, तरिही त्यामध्ये सरकारने प्रचंड भांडवल गुंतवणूक
केली. मात्र सर्वाधिक प्रवासी रेल्वे आणि बसने प्रवास करतात, या दोन वाहतूक
व्यवस्थांच्या पायाभूत व्यवस्थांमध्ये फारशी गुंतवणूक करण्यात आलेली नाही. प्रादेशिक
विकासाच्या मागण्या करणारे राजकीय पक्ष आणि संघटनांच्या मागण्याही विमानतळ,
विमानतळाचा विस्तार-आधुनिकीकरण ह्या असतात.
विमानतळावरील
स्वच्छतागृहं आणि रेल्वे वा बस स्टँण्डवरील स्वच्छतागृह ह्यंची तुलनाही करता येणार
नाही. मात्र तरिही सर्वाधिक चर्चा असते रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळं तोट्यात
आहेत ह्याची. त्यांचं खाजगीकरण करण्याची. जगातल्या बहुतेक सर्व विमानसेवा तोट्यात
आहेत. त्यांच्या सरकारीकरणाची मात्र चर्चा झाल्याचं माझ्या वाचनात नाही. जागतिक
भांडवलशाही, वित्तीय भांडवलशाही इत्यादींवर आपण त्यांचं खापर फोडूया. पण आपल्या
देशाच्या हवामानाला साजेशी वाहतूक व्यवस्था नसणं हे मात्र सत्ताधारी वर्गाच्या
(राजकारणी, सनदी अधिकारी, टेक्नोक्रॅट इत्यादी) अडाणीपणाचं लक्षण आहे.
agree!
ReplyDeleteआम जनतेच्या हितासाठी लोकशाही असलेल्या देशातील सरकारने कार्य करायला हवे . पण सरकार मूठ भर लोकांच्या हिताला प्राधान्य देते. कारण मतदार भावना प्रधान मानून मते देतात.
ReplyDelete