१९४२ साली मुंबईत झालेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी
महात्मा गांधी रेल्वेने आले. त्यावेळचे मुंबईचे महापौर, युसूफ मेहेरल्ली त्यांच्या
स्वागताला व्हिक्टोरिया टर्मिनसवर हजर होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने पद्मा
प्रकाशन या संस्थेमार्फत युसूफ मेहेरल्ली यांनी ´क्विट इंडिया’ (चले जाव) या नावाची पुस्तिका काढली
होती. ह्या पुस्तिकेची तडाखेबंद विक्री त्यावेळी झाली
होती (सायमन गो बॅक ही घोषणाही युसूफ मेहेरल्ली यांची). अखिल भारतीय काँग्रेस
कमिटीच्या या अधिवेशनात ब्रिटीशांना निर्वाणीचा इशारा देण्याचं गांधीजींनी निश्चित
केलं होतं. त्यासाठी सुयोग्य घोषणा त्यांना गवसली नव्हती. पद्मा प्रकाशनाच्या
पुस्तिकेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ८ ऑगस्ट १९४२ रोजी, अधिवेशनामध्ये हीच घोषणा
गांधीजींनी केली आणि त्यासोबत “करेंगे या मरेंगे” हा मंत्र त्यांनी दिला. गोवालिया टँक
मैदानावरील त्या विराट सभेला जी. जी. पारीख ह्यांनीही हजेरी लावली होती. आंदोलनातील
सहभागाबद्दल त्यांना अटक झाली आणि ११ महिन्यांच्या कारावासाची सजा त्यांना झाली.
युसूफ मेहरल्ली, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता,
मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, नरेंद्र देव, एस. एम. जोशी, ना. ग.
गोरे इत्यादींनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना १९३४ साली नाशिक कारागृहात
केली होती. केवळ हेच नेते समाजवादी नव्हते तर अनेक समाजवादी गट त्या दिशेने विचार
करत होते. काँग्रेस पक्ष आणि संघटना भांडवलदार आणि साम्राज्यवाद्यांची हस्तक आहे
असा निर्वाळा तिसर्य़ा कम्युनिस्ट इंटरनॅशनलने दिला होता. अशा
परिस्थितीत स्वातंत्र्य लढा आणि समाजवाद ह्यांची सांगड कशी घालायची असा प्रश्न
मार्क्सवादी विचाराच्या अनेक तरुणांना आणि गटांना पडला होता. त्याचं निःसंदिग्ध
उत्तर काँग्रेस समाजवादी पक्षाने दिलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिनिधीत्व
काँग्रेस करते मात्र येऊ घातलेल्या स्वातंत्र्यात कामगार आणि शेतकर्यांची सत्ता
स्थापन करायला हवी असा विचार काँग्रेस समाजवाद्यांनी मांडला. स्वातंत्र्य लढा आणि
डावा विचार ह्यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता. म्हणूनच ऑगस्ट क्रांतीच्या
आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी समाजवादी पुढे सरसावले. गांधी, नेहरू, पटेल इत्यादी
काँग्रेस नेत्यांना ८ ऑगस्ट रोजीच अटक करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या छोट्या
गटांनी आंदोलन सुरू जारी ठेवण्याची आखणी युसूफ मेहरल्ली यांनी केली होती. जयप्रकाश
नारायण, राममनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, अरुणा असफअली हे या आंदोलनाचे नेते
होते. जी. जी. पारिख आजचे असे एकमेव समाजवादी असतील की ज्यांनी स्वातंत्र्य
आंदोलनातील सहभागापासून सहकारी चळवळ, ग्रामविकास, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा
मुक्ती संग्राम, संपूर्ण क्रांती आंदोलन या सर्व आंदोलनात महत्वाची भूमिका पार
पाडली.
जनता विकली हे इंग्रजी साप्ताहिक जयप्रकाश नारायण
आणि अच्युत पटवर्धन ह्यांनी १९४६ साली सुरू केलं. त्यावेळी काँग्रेस समाजवादी
पक्षाचं मुख्यालय मुंबईला होतं. माझ्या माहितीप्रमाणे, अपोलो बंदर येथील जनता
विकलीच्या कार्यालयाची जागा अच्युत पटवर्धन ह्यांनी मिळवली होती. युसूफ मेहेरल्ली,
अच्युत पटवर्धन, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण “ वे साईड इन” या रेस्त्रांमध्ये चहा पित गप्पा मारायचे. १९५२
च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाचं मुख्यालय दिल्लीला
स्थलांतरित झालं. मात्र जनता विकलीचं कार्यालय मुंबईत राह्यलं आणि त्याची जबाबदारी
जी. जी. पारीखांनी घेतली ती अजून त्यांच्याच खांद्यावर आहे. जनता विकली च्या
कार्यालयातच नरेंद्र देव खोज परिषदेचं कार्यालयही थाटण्यात आलं होतं. स्वांतत्र्य
लढा, सहकारी चळवळ, कामगार चळवळ, ग्राम विकास, स्वदेशी अशा विविध चळवळींशी जी. जी.
पारीख तेव्हापासून जुळलेले आहेत.
समाजवादी कार्यकर्त्यांचा अभ्यासक्रम तयार
करण्यात युसूफ मेहेरल्ली यांनी पुढाकार घेतला. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन,
अशोक मेहता ह्यांचाही सहभाग होता त्यामध्ये. जनता साप्ताहिकाच्या फाईलींमध्ये तो
अभ्यासक्रम वाचायला मिळतो. नानासाहेब गोरे, प्रेम भसीन, सुरेंद्र मोहन, मधु दंडवते
अशा नेत्यांनी जनता साप्ताहिकाचं संपादकपद सांभाळलं. त्यांच्या पश्चात जी.जींनी
संपादकपदाची सूत्रं हाती घेतली. १९९२ साली चलेजाव आंदोलनाचा सुवर्णमहोत्सव साजरा
करण्यात आला. त्यावेळी श्रीलंकेतील चलेजाव आंदोलनाच्या समाजवादी नेत्यांनी जनता
विकलीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. देशातील आणि विदेशातील अनेक नेत्यांनी,
कार्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी जनता विकलीमध्ये केलेल्या लिखाणाचं श्रेय जी.जी.
पारीखांना द्यायला हवं.
एशियन सोशॅलिस्ट कॉन्फरन्सबाबत सध्याचे सोशॅलिस्ट
अनभिज्ञ आहेत. आँग सांग सू ची चे वडील समाजवादी होते. एशियन सोशॅलिस्ट
कॉन्फरन्सच्या कामासाठी मधु लिमये रंगूनला होते, मा.श्री. गोखले आधी कोलंबोला आणि
नंतर रंगूनला होते. जवाहरलाल नेहरूंच्या अलिप्ततावादाला समाजवाद्यांनी दिलेलं ते
उत्तर होतं. भारतीय समाजवाद युरोपकेंद्रीत नको तर आशिया केंद्रीत हवा अशी दृष्टी
त्यामागे होती. १९९० साली म्हणजे शीत युद्धाच्या समाप्तीनंतर पंतप्रधान नरसिंहराव
ह्यांनी लुक ईस्ट या परराष्ट्र धोरणाची पायाभरणी केली आणि नरेंद्र मोदी तेच धोरण
पुढे घेऊन जाताना दिसतात. मात्र या धोरणाचे पूर्वसूरी समाजवादी होते ही बाब जनता
विकलीच्या वाचकालाच कळू शकते. प्रश्न पर्यावरणाचा असो की जातीय विषमतेचा वा
संप्रदायवादाचा किंवा आर्थिक शोषणाचा आणि विविध जनआंदोलनांचा त्याकडे समग्रपणे
पाहण्याचा राजकीय दृष्टिकोन जनता विकली या नियतकालीकामध्ये त्यावरील
अनुकूल-प्रतिकूल चर्चेसह वाचायला मिळतो. किशन पटनाईक सामायिक वार्ताचे संपादक होते
तोवर अशीच राजकीय दृष्टी त्यामध्ये अभिव्यक्त व्हायची. जनता आणि सामायिक वार्ता
ह्यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद तेव्हाही होते पण त्या ताणातूनच समाजवादी
दृष्टी वा भाष्य समृद्ध झालं. समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतर समाजवादी राजकीय
दृष्टी आणि विश्लेषण जनता आणि सामायिक वार्ता ह्या दोनच साप्ताहिकांनी पुढे ठेवलं
(नानासाहेब गोरे ह्यांच्यानंतर साधना साप्ताहिकाला राजकारणावर पकड असणारा संपादक
लाभला नाही).
काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते
समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतरही समाजवादी शक्तींची एकजूट हा विषय समाजवादी
आंदोलनात सातत्याने चर्चिला जातो. कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे समाजवादी पक्ष
केडरबेस्ड नाही ह्याचं वैषम्य अनेकांना वाटतं. त्यामुळे समाजवादी पक्षात आणि
आंदोलनात फाटाफूट झाली अशीही अनेकांची धारणा आहे. देशभर पसरलेल्या विविध समाजवादी
गटांना सामावून घेण्याची प्रक्रिया काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून सुरू
झाली. समाजवादी चळवळीचं सामर्थ्य वा शक्तीस्थळ जनलढ्याच्या अग्रभागी राहून
समाजवादी कार्यक्रम पुढे रेटण्यात आहे. त्यामुळे समाजवादी शक्तींची एकजूटीकरणाची
प्रक्रिया इन्क्लुजिव हवी, विविध गटांनाच नव्हे तर काँग्रेस, जनता दलाचे विविध गट,
आम आदमी पार्टी, विविध कामगार संघटना वा जनआंदोलनांमधील समाजवादी विचारधारेशी
जुळलेले विविध कार्यकर्ते ह्यांच्याशी सतत संवाद ठेवण्याला हवा असं जी.जी. पारीख आवर्जून
सांगतात. फरोख खान हे मुंबई समाजवादी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य १९९० च्या दशकात
भाजपमध्ये सामील झाले परंतु युसूफ मेहेरल्ली सेंटर आणि जी.जी. पारीख ह्यांच्याशी
ते जुळलेले होते. समाजवादी कार्यक्रमात वा उपक्रमात फरोख खान ह्यांना जी. जीं. नी
नेहमी सामावून घेतलं.
महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, युसूफ मेहेरल्ली
ह्यांचा व्यक्तीमत्वाचा प्रभाव जीजींच्या व्यक्तीमत्वावर आहे. त्यांची कौटुंबिक
पार्श्वभूमी सुबत्तेची मात्र राहणी कमालीची साधी. स्वातंत्र्य आंदोलनात
स्वीकारलेली खादी त्यांच्या अंगावर नाही तर व्यक्तीमत्वामध्ये प्रतिबिंबीत झाली
आहे. अतिशय शांत आणि लक्षपूर्वकपणे पुढच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, कितीही कडवी
टीका अतिशय सहृदयतेने समजून घेणं आणि त्यानंतर आपली भूमिका खुलासेवार सांगणं हे
जीजींच्या व्यक्तीमत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं पटलं नाही तरीही
मनात किल्मिष राहात नाही. त्यांच्या निर्णयाशी मतभेद असूनही वैयक्तीक स्वार्थाचा
लवलेश त्यामागे नाही ह्याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे टोकाचे मतभेद असूनही
संवाद कायम राहतो.
सहा फूट उंची, धारदार नाक, दाढी, डोळ्यातून
ओसंडणारा स्नेहभाव असं जीजी मितभाषी आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर होते. समाजवादी
चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचे ते फॅमिली डॉक्टर होते. अनेक कार्यकर्त्यांना
स्पेशालिस्टांकडे तपासणीसाठी पाठवताना ते संबंधीतांना चिठी देत. एका ग्रामीण
भागातल्या कार्यकर्त्याला त्यांनी चिठी देऊन एका स्पेशालिस्टाकडे पाठवला. मुंबईत
तो नवखा असल्याने मी सोबत गेलो होतो. तपासणी, सल्ला वगैरे सोपस्कार आटोपल्यावर मी
संबंधीत डॉक्टरांकडे फी ची चौकशी केली. त्यांनी मला जीजींची चिठी दाखवली--जीजींच्या
चिठीतली शेवटची ओळ होती—प्लीज डोन्ट चार्ज हिम. जीजींच्या विनंतीचा मान ठेवायला
हवा, असं सांगून डॉक्टरांनी कार्यकर्त्याला म्हटलं कोणत्याही मदतीसाठी निःसंकोचपणे
मला फोन करा. बसरूर नावाचे समाजवादी कार्यकर्ते चिखलवाडीतल्या चाळीत एका खोलीत
राह्यचे. त्यांची प्रकृती बिघडली. चाळीतल्या खोलीत त्यांची शुश्रूषा करणं अवघड
होतं. जीजींनी आपल्या घरामध्ये त्यांची व्यवस्था केली.
मंगला पारीख ह्या जीजींच्या पत्नी. रविंद्रनाथ
टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये त्या काही काळ शिकायला होत्या. त्यामुळे असेल कदाचित
पण जीजींच्या घरात अमृता प्रीतम, के.के. हेब्बर इत्यादी चित्रकारांच्या प्रिंटस्
अतिशय नेटकेपणे फ्रेम केलेल्या असायच्या. फर्निचर साधं पण मांडणी सौंदर्यपूर्ण.
मंगलाताईही समाजवादी आंदोलनात सक्रीय होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात
त्यांनी सत्याग्रह केला होता. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये
मंगलाताई आणि जीजी एकमेकांशी बोलायचे. कार्यकर्ते, नेते, मित्र-सहकारी, पुस्तकं,
नियतकालीकं, वर्तमानपत्रं ह्यांचा घरात सतत राबता असायचा. मंगलाताई जीजींना
अरे-तुरे करायच्या याची मला लहानपणी खूप गंमत वाटायची. कारण माझ्या घरात वा जीजी
आणि मंगलाताईंपेक्षा वयाने लहान असणार्या समाजवादी नेते-कार्यकर्त्यांमध्ये असा
संवाद अपवादाने कानी पडायचा. मागच्या वर्षी समाजवादी जनपरिषदेने पुण्यामध्ये दोन
दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. अध्यक्षस्थानी जीजी होते. त्यावेळच्या
भाषणात ते म्हणाले माझी प्रकृती आता ठीक नाही, वयही झालं आहे. माझी पत्नी असती तर
कार्यक्रमाला हजेरी लावायला विरोध केला नसता पण ती दुःखी झाली असती. या
प्रस्तावनेनंतर राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.
गेल्या वर्षी जीजींनी त्यांच्या वयाची नव्वदी पूर्ण
केली. १० एप्रिल रोजी त्यांचा सत्कार करण्याचं समाजवादी चळवळीतील साथींनी ठरवलं
आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजवादी शक्तींच्या एकजुटीचं एक पाऊल पुढे पडो
ह्या शुभेच्छांसह जीजींना विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment