बातमी कशी हवी? ताजी, नवी, पूर्ण आणि वस्तुनिष्ठ. असं पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. अर्थात नोकरी लागल्यावर रोकड्या व्यवहाराशी संबंध येतो. वृत्तपत्र हा एक व्यवसाय वा उद्योग असल्याने वाचकवर्ग मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात हे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नवख्या वा नवशिक्या पत्रकारांना कळू लागतं. केवळ शेटजी-भटजी यांच्या मालकीची वर्तमानपत्रं या प्रकारच्या तडजोडी करतात हा समज चुकीचा आहे. दडपण केवळ बाजारपेठेचं नसतं तर विचारसरणीचंही असतं. त्यामुळेच डाव्या वा परिवर्तनवादी संस्था वा व्यक्ती यांच्या मालकीची प्रसारमाध्यमं उदाहरणार्थ द हिंदू, वस्तुनिष्ठा कायम ठेवून पक्षपाती बातमीदारी करताहेत हे ध्यानी येतं. आपल्या वाचकवर्गानुसार कोणत्या विषयांना महत्व द्यायचं, कोणत्या बातम्या द्यायच्या हे प्रत्येक माध्यमाला ठरवावं लागतं. पक्षपात तिथेच होतो. तो अटळ असतो. हवामानाचे अंदाजच फक्त वस्तुनिष्ठ असतात आणि अनेकदा ते चुकीचे ठरतात. मात्र तरिही पत्रकारितेत बातमी पवित्र समजली जाते. त्यातल्या माहितीशी छेडखानी करायची नाही. बातमीवरचं वा बद्दलचं मत वार्ताहराने बातमीत घुसवायचं नसतं या तत्वाचं पालन करण्याचा प्रयत्न अनेक प्रसारमाध्यमं करतात.
वृत्तवाहिन्या आल्यावर बातमीच्या ताजेपणाला अतोनात महत्व आलं कारण घटना घडताना तिचं प्रक्षेपण वा वार्तांकन ज्याला रिअल टाइम रिपोर्टिंग म्हणतात ते तंत्रज्ञानामुळे शक्य झालं. वृत्तवाहिन्यांच्या बातमी ताजी आहे की नाही यापेक्षा जास्त चर्चा ती बातमी पूर्ण आणि वस्तुनिष्ठ आहे की नाही यावरच चर्चा होते. नीरा राडिया प्रकरणात बरखा दत्त, वीर सिंघवी या सारख्या मातब्बर पत्रकारांनी दलालीची भूमिका निभावली अशी टीका करण्यात आली. बरखा आणि वीर सिंघवी यांच्या बचावासाठी पुढे आलेला राजदीप सरदेसाई एडिटर्स गिल्डचा पदाधिकारी आहे. पत्रकारांसाठी आचारसंहिता तयार करण्याचं काम एडिटर्स गिल्ड करणार असल्याचं नीरा राडिया प्रकरणानंतर जाहीर झालं. वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, साप्ताहिकं, पाक्षिकं, बातम्या देणार्या वेबसाईटस् या सर्वांना ताजी, नवी, पूर्ण आणि वस्तुनिष्ठ बातमी देणं हा आदर्श कमी-अधिक प्रमाणात पाळावा लागतो, ही बाब त्यामुळे अधोरेखित झाली. काही माध्यमं वा पत्रकार याला बगल देतीलही, काही ढोंगीपणा करतील. मात्र ढोंगीपणा म्हणजे दुर्गुणाने सद्गगुणाला वाहिलेली आदरांजली असते.
वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, बातमीदारी करणार्या वेबसाईट इत्यादी ही लोंढा प्रसारमाध्यमं आहेत. ताजी, पूर्ण, वस्तुनिष्ठ बातमीदारी त्यांच्यासाठी आवश्यक आहे. या लोंढा प्रसारमाध्यमांचा विरुद्ध ध्रुव आहे सोशल मिडिया. ईमेल, एसएमएस, ट्विटर, ब्लॉग, सोशल नेटवर्किंग साइटस् हा सोशल मिडिया, मराठीत काय म्हणतात माहीत नाही. याहू ग्रुप्स, ऑर्कुट आणि आता फेसबुक यांच्या सभासदांची संख्या पाह्यली तर सोशल मिडियाची व्याप्ती ध्यानी येईल. प्रत्येक व्यक्तीला अर्थातच तिच्या दृष्टिकोनाला, मताला तिच्या वर्तुळात महत्व असतं. आपल्याला काय म्हणायचंय हे त्या वर्तुळात पोचलं तर त्या व्यक्तीला पुरेसं असतं. अर्थात हे वर्तुळ परिचितांसोबत अपरिचितांचंही असू शकतं. कारण अनेक समानधर्मा लोक त्या व्यक्तीशी जोडले जाऊ शकतात. लोंढा प्रसारमाध्यमांप्रमाणे सोशल मिडीयाला विशिष्ट प्रदेशाची बंधन नसतात. समाजातील कोणत्याही घटना, प्रसंगावर वा अन्य कोणत्याही बाबीवर आपलं मत मांडण्याची संधी समाजातील प्रत्येक व्यक्तीला (तंत्रवैज्ञानिकदृष्ट्या) सोशल मिडियाच देऊ शकतो. त्यामुळेच अभिव्यक्ती हेच माध्यम अशीही सोशल मिडीयाची व्याख्या केली जाते. सोशल मिडिया अर्थातच मतवाला आणि पक्षपाती असतो. वस्तुनिष्ठ असल्याची बतावणी करण्याची गरजही त्याला वाटत नाही. मतं, मतभिन्नता, मतांतरं आणि मतभेद अर्थात पक्षपात हीच सोशल मिडियाची ताकद असते.
अभिव्यक्ती हेच माध्यम ही सोशल मिडियाची संकल्पना सामावून घेण्यासाठी लोंढा प्रसारमाध्यमांनी सिटीझन जर्नालिस्ट, वाचणारे लिहितात इत्यादी क्लृप्त्या काढल्या. राजकारणी, नोकरशहा, टेक्नोक्रॅट, उद्योगपती, पोलीस अधिकारी ह्या प्रतिमांचं भंजन करणार्या सोशल मिडियाची नक्कल या लोंढा प्रसारमाध्यमांनी सुरु केली. माहिती-तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे सोशल मिडिया अस्तित्वात आला. एखादं वर्तमानपत्रं वा वृत्तवाहिनी सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा वा गुंतवणूकीची गरज असते. कंप्युटर आणि इंटरनेट जोडणी असलेला कोणीही आपली मतं, दृष्टीकोन ब्लॉगवर मांडू शकतो. मोबाईल फोन असेल तर आपण परिचितांना वा मित्रांना एसएमएस पाठवून आपलं मत कळवू शकतो. विनोदाला सोशल मिडियाने मोठ्या प्रमाणावर चालना दिली. सोशल मिडियाच्या आगमनामुळे पु.ल. देशपांडेप्रणीत कोमट विनोद हद्दपार होऊन आचार्य अत्रे वा बाळासाहेब ठाकरे यांचा बोचरा, रगेल, रंगेल विनोद लोकप्रिय केला. सोशल मिडियाने मिथ्य कथा, पुराणकथा, दंतकथा, स्मृती हाच इतिहास आहे हे रुजवायला सुरुवात केली. कमालीचा प्रतिगामीपणा आणि टोकाचा पुरोगामीपणा वा क्रांतीकारकत्व या दोन परस्पर विरोधी दिशांना सोशल मिडियाने सामावून घेतलं. सोशल मिडियाला एडिटर्सची अर्थात संपादकांची गरज नसते. त्याचा वापर करण्यासाठी कोणत्याही खास कौशल्याची गरज नसते.
सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पाळला जातो असं मला फेसबुकवर गेल्यावर समजलं. लोंढा प्रसारमाध्यमं कमी-अधिक प्रमाणात बाजारपेठेला शरण गेलेली आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही भूमिका म्हणजे त्यांचे दाखवायचे दात आहेत. नीरा राडिया प्रकरणात त्यांचे खायचे दात दिसून आले आहेतच. या प्रकरणात गुंतलेल्या पत्रकारांची बाजू लढवणारा राजदीप आता या लोंढा प्रसारमाध्यमांची आचारसंहिता बनवणार आहे. त्यामुळे जगभरातले सुजाण नागरिक आता सोशल मिडियाची कास धरू लागले आहेत. ही शक्ती पक्षपाती पत्रकारितेची आहे कारण तथाकथित वस्तुनिष्ठ पत्रकारितेने आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.