साखर कांडल्यावर उखळ पांढरं होतं. साखरेला उत्तम भाव मिळतो त्यामुळे शेतकर्याचं नशीब फळफळतं म्हणून हा वाक्प्रचार रुढ झाला. आमच्या लहानपणी मुंबईत काकवी मिळायची. पोळीबरोबर काहीतरी गोड हवं तर काकवी नाही तर गूळ ताटात वाढला जायचा. चहाही गुळाचाच. माझा जन्म १९६१ सालचा. त्यावेळी देशातलं दरडोई गूळाचं सेवन सालीना १५ किलो होतं तर साखरेचं पाच किलो. २०१०-११ सालात भारतीय माणूस वर्षाला २० किलो साखर खाऊ लागला तर गुळाचं सेवन पाच किलोपर्यंत खाली आलं. कारण साखर स्वस्त झाली आणि गूळ महागला. साखरेमध्ये शून्य पोषणमूल्यं आहेत तरिही जगभरात साखरेच्या सेवनाचं प्रमाण संपूर्ण जगात वाढत चाललं आहे. साखर, चहा, कॉफी, कोको अशा अनेकानेक पदार्थांचं जागतिकीकरण होण्याची प्रक्रिया गेल्या दोन-तीनशे वर्षांतली आहे. आठवडी बाजार अगदी आदिवासींच्या प्रदेशातही भरतात. पण ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो तिच्या विस्ताराला सुरुवात झाली युरोपातून. नव्या पदार्थांचं व्यसन लोकांना लावण्यावरच अन्न प्रक्रिया उद्योगांची मदार असते. मुद्दा अन्न प्रक्रिया उद्योगांवर टीका करण्याचा नाही तर माणसं वा समाजाच्या आहारात बदल केव्हा होतो, कसा होतो, नव्या चवी केव्हा आणि कशा स्वीकारल्या जातात हे समजून घेण्याचा आहे.
कापसाप्रमाणेच साखरेचाच शोध भारतातच लागला. कापसाप्रमाणे उसाचं मूळ स्थान भारत. रामायणातल्या मेजवानीच्या वर्णनात उसाचे करवे येतात म्हणजे भारतात उसाचं पीक प्राचीन काळापासून घेतलं जातं होतं, असं अनुमान काढता येईल. “ऊस चोखून खावा म्हणजे उसाची गोडी शोषता येते. उसाच्या दाट रसाला फणिता म्हणतात. या फणितापासूनच गूळ आणि शर्करा तयार होते” अशी माहिती अथर्ववेदात आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा काल इसवीसन पूर्व ३००. या ग्रंथात उसाच्या रसापासून गूळ, फणिता, खांड, खांडसरी, मत्स्यांदिका (माशाच्या आकाराचे साखरेचे स्फटिक) आणि शर्करा अशा अनेक प्रकारची साखर तयार करतात, अशी नोंद आहे. सुश्रुत आणि चरक संहितेत साखरेच्या औषधी गुणांची चर्चा आहे. चिनी लोकांचा दावा आहे की साखरेचा शोध त्यांनीच लावला. पण ऐतिहासिक पुरावे असं सांगतात की उसापासून साखर तयार करण्याचं तंत्र शिकून घेण्यासाठी चीनच्या सम्राटाने काही कारागीरांना गंगेच्या खोर्यात पाठवलं होतं. इसवीसन पूर्व ५५० ते ४८६ या काळात पर्शियामध्ये दरायसचं साम्राज्य होतं. त्याने सिंधु खोर्यावर आक्रमण केलं तेव्हा त्याला बांबूसारख्या दिसणार्या आणि मधमाशांच्या मदतीशिवाय मध देणार्या वनस्पतीचा अर्थात गवताचा शोध लागला. या पर्शियन लोकांनी उसासोबतच साखर बनवण्याचं तंत्रही मायदेशात नेलं आणि तिथे साखर उद्योग सुरु केला. साखरेचा व्यापारही त्यांनी सुरु केला. त्यामुळे अल्पावधीत उसाची लागवड सिंधु नदीपासून आफ्रिकेत आणि काळ्या समुद्रापर्यंत सुरु झाली. उसाच्या रसापासून बनवलेल्या दाट पाकाला मसाल्याचा पदार्थच म्हणत कारण पदार्थ टिकवण्याचा गुणधर्म होता त्याच्यात. संस्कृत शर्करा या शब्दांचं ग्रीक आणि लॅटिन भाषेत स्थानांतरण होऊन सॅकॅरम हा शब्द साखरेला मिळाला. ( या सॅकॅरमपासूनच रम हा शब्द निर्माण झाला. उसाच्या रसाच्या मळीपासून तयार होणारी दारू. असो.) मुद्दा हा की साखर या पदार्थाचं मार्केट पोटेन्शिअल भारतीय लोकांच्या ध्यानी आलं नाही. पर्शियन आणि त्यानंतर अरब लोकांनी साखरेचा व्यापार सुरु केला. शेजारी राष्ट्रांना ते साखर निर्यात करू लागले. त्यामुळे साखर बनवण्याच्या तंत्रातही प्रगती केली. तो काळ असा की युरोप सुरु व्हायचा आणि संपायचाही ग्रीसमध्ये. (उरलेल्या युरोपात बहुधा हिममानव वा निआंडरथल यांचाच वावर असावा.) ग्रीसचा संबंध पर्शिया आणि आशियाशी होता. सिकंदरने ग्रीसच्या साम्राज्याच्या सीमा सिंधु खोर्यापर्यंत विस्तारल्या होत्या. मॅगेस्थेनिसने तर नोंदच करून ठेवलीय की भारतीय लोक गवतापासून मध बनवतात. पण ग्रीकांनाही युद्धशास्त्र, तत्वज्ञान, चर्चा, वाद-विवाद ह्यातच रस असावा. त्यामुळे साखर उद्योगात त्यांनी रुची घेतली नाही की त्याचा विकासही केला नाही. (ह्याबाबतीत ग्रीक आणि भारतीयांमध्ये भलतंच साम्य दिसतं.) अरब व्यापारी होते. हुषार आणि धूर्त होते. युरोपियनांची साखरेची आवड हेरून साखरेचे कारखानेच त्यांनी काढले. उसाचं उत्पादन करता येईल असे प्रदेश त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणले. साखरेला उष्णता दिली की ती वितळते, खमंग होते, तिचा रंग तपकिरी बनतो. ती चिकट होते. अरबी भाषेत या साखरेला म्हणत—कुरत अल मिल. त्यापासूनच कॅरॅमल हा शब्द बनला. कॅरॅमल म्हणजे मधुर मिठाचा गोळा. इसवीसनाच्या दहाव्या दशकापर्यंत साखरेला पांढरं मीठ म्हणत. कारणं दोन. पहिलं हे की पदार्थ टिकवण्याचा गुण साखरेत होता आणि दुसरं, मीठ काळपट वा मातकट रंगाचं होतं. स्वच्छ पांढरं मीठ तयार करण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान त्या काळात नव्हतं. तर या कॅरॅमलचा उपयोग अरबी स्त्रिया अंगावरील लव काढण्यासाठी करत. सौंदर्यप्रसाधनांमध्ये साखरेचा वापर अरबांनी सर्वप्रथम सुरु केला. म्हणजे सर्वप्रथम काकवी, गूळ अशा क्रमाने पर्शियन साखरेकडे वळले. साखरेचा शोध लागण्याआधी गोड पदार्थ म्हणजे मधच पर्शियन आणि युरोपियनांना ठाऊक होता. मधाचं ठोक उत्पादन करता येतं नव्हतं त्यामुळे साखरेच्या गोडीची भुरळ अरब आणि युरोपियनांना पडली.
अरब मुसलमान धर्मभोळे, एका हातात कुराण आणि एका हातात तलवार घेऊन जग पादाक्रांत करायला निघाले, अशी चुकीची प्रतिमा आपल्याकडच्या इतिहासाच्या पुस्तकांनी तयार केलीय. अगदी नरहर कुरुंदकरही त्यातून सुटलेले नाहीत. वस्तुतः अरब व्यापारी होते. उद्यमशील होते. विचाराने प्रगत होते. वेगवेगळे प्रयोग करणारे होते. अॅरिस्टॉटल आणि अन्य ग्रीक तत्वज्ञांच्या ग्रंथांचे अभ्यासक होते. (अरबी प्रवाशांच्या नोंदी त्या काळातल्या युरोपियन प्रवाशांपेक्षा अधिक विवेकशील आहेत. उदाहरणार्थ “अल बेरूनीचा भारत” हा ग्रंथ.) त्यामुळेच त्यांचं युद्धतंत्र प्रगत होतं. म्हणूनच ते जग पादाक्रांत करू शकले. अरबांनी साखरेच्या व्यापारातून बख्खळ संपत्ती मिळवली. तेराव्या शतकातील फ्रान्समधील नोंदी पहा. सॅव्होईच्या काऊंटेसने लिहिलेल्या घरखर्चात एक पौंड साखरेला दोन सोन्याच्या साऊस आणि पाच चांदीचे दिनार एवढी किंमत मोजावी लागे, असा उल्लेख आहे. बर्गंडीच्या काऊंटेसने १२९९ साली साखरेच्या पंधरा गोणी खरेदी केल्या आणि त्यासाठी पंधरा गोणी चांदी एवढी किंमत तिला मोजावी लागली.
ऊस हे नगदी पिक होतं. त्याच्या लागवडीसाठी आणि साखर कारखान्यांसाठी गुलामांना कामाला जुंपलं जाई. गुलामीची मुसलमानांची वा अरबांची आणि युरोपियनांची संकल्पना यात मूलभूत फरक आहे. युरोपियनांसाठी जमीन हेच संपत्तीच्या निर्मितीचं केंद्र होतं तर अरबांसाठी व्यापार. युरोपात जमीन मालकीला महत्व होतं आणि मुसलमानांमध्ये गुलामांच्या संख्येवर मालकाची श्रीमंती मोजली जायची. गुलामाने मालकाच्या संपत्तीत भर घालणं अपेक्षित होतं. जमीन अर्थात शेती हे उत्पादनाचं साधन नसल्याने गुलामाने मालकाला व्यापारात मदत करणं अपेक्षित होतं. (सिंदबादच्या सफरीतले किंवा अरेबियन नाईटसमधले गुलामांचे संदर्भ काळजीपूर्वक वाचले तर हा मुद्दा स्पष्ट होईल.) त्यामुळे अरबी मुसलमान गुलामांना सैन्यातही भरती करायचे. ही भरती प्रामुख्याने आफ्रिकेतूनच व्हायची. पण या गुलामांवर ते वेगवेगळ्या जबाबदार्या सोपवायचे. अगदी लष्करी मोहिमांच्याही. त्यामुळेच मलिक अंबर असो की शिद्दी जौहर ह्या गुलामांना राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली. सिंधू नदीच्या खोर्यातही आफ्रिकन गुलामांनी आपल्या पराक्रमाने लष्करात आणि दरबारात मानाच्या जागा मिळवल्या होत्या.
संपत्तीची निर्मिती जमिनीतून अर्थात शेतीतून होते अशीच युरोपियनांची धारणा होती. त्यामुळे गुलामाला जमीनीवर राबवून त्याच्याकडून अधिकाधिक काम करून घेणं असा त्यांचा खाक्या होता. शेतीकामासाठी लागणारा एक पशू अशीच त्यांची गुलामांबद्दलची धारणा होती. आफ्रिकेतील काळ्या वर्णाच्या वा अमेरिकेतील तांबड्या वर्णाच्या लोकांना ते माणूसच मानत नव्हते. त्यांना जनावरांसारखीच वागणूक दिली जायची. पायात बेड्या घातलेल्या गुलामांना गळ्यातल्या साखळीने एकमेकांना जोडून त्यांच्या टोळ्या जहाजावर चढवल्या जायच्या. जेवढे जास्त गुलाम कोंबाल तेवढा नफा जास्त या हिशेबाने कमी जागेत जास्तीत जास्त गुलामांना डांबलं जायचं. मल-मूत्र विसर्जनाचीही सोय नसायची. उलट्या, हगवण, अन्य रोग यामुळे ३० टक्के गुलाम अमेरिकेच्या किनार्याला पोचेपर्यंत मरून जायचे. त्यांची प्रेतं समुद्रात फेकून दिली जात. इस्लाममध्ये विशेषतः अरबस्थानातील इस्लाममध्ये गुलामांना मनुष्यप्राण्याची वागणूक दिली जायची. युरोपियन लोक तेवढे सुसंस्कृत नव्हते.
युरोपियन समाज सुसंस्कृत व्हायला सुरुवात झाली दहाव्या शतकात. व्यापार वाढू लागला आणि पूर्वेकडून येणार्या मसाल्याच्या पदार्थांची मागणी वाढली. साखर, मसाले, रेशमी आणि सुती वस्त्रं, हस्तीदंत, चंदनाच्या कलाकुसरीच्या वस्तू अरबांकडून खरेदी करून युरोपातील देशांना चढ्या दराने विकणे हा व्हेनिसच्या व्यापार्यांचा धंदा बनला. व्हेनिसमध्येच साखरेची पहिली वखार सुरु झाली. (आणि यथावकाश साखर निर्मितीलाही सुरुवात झाली.) या व्यापारामुळे युरोपियन देशातील सरकारांना मोठं उत्पन्नाचं साधन गवसलं. या मालावर अव्वाच्या सव्वा जकात आकारली जायची. त्यातच जकात अधिकार्यांना लाचही द्यावी लागायची. त्यामुळे आधीच महाग असलेल्या या मालाच्या किंमती आणखी वाढत असत. पण हा माल बंदरात पोचल्यावर चुटकीसरशी विकला जात असे. त्यामुळेच सोळाव्या शतकात युरोपातील संपन्न शहर होतं व्हेनिस. मर्चंट ऑफ व्हेनिस हे शेक्सपियरचं नाटक याच काळातलं आहे. भूमध्य सागरी प्रदेशात व्हेनिस व्यापाराच्या केंद्रस्थानी आल्याने रेनेसाँ वा प्रबोधनाचा आविष्कार सर्वप्रथम इटलीमध्ये झाला. मे. पु. रेगे यांनी म्हटलं आहे, “ख्रिश्चन धर्मातील मानवी प्रकृतीची पापमयता रेनेसाँने नाकारली, पाप ही संकल्पनाच नाकारली, माणसाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींच्या उत्कर्षात, त्यांच्या मुक्त विलासात माणसाचे अंतिम कल्याण आहे असे मानले. माणसाच्या मनोधर्मांवरील आणि त्याला लोभनीय वाटणार्या बाह्य सृष्टीवरील पापाचे सावट दूर झाले. रुप-रस-गंध-स्पर्शांनी गजबजलेल्या निसर्गातील आनंद अनुभवायला माणूस मोकळा झाला.” लिओनार्दो दा विंची, मायकेल अँजेलो हे या कालखंडाचे प्रतिनिधी. रेनेसाँच्या या कालखंडात मूठभर व्यक्तीच मुक्त झाल्या. त्यांचं कर्तृत्व असामान्य होतं. पण तो कालखंड इतिहासाच्या ओघाला वळण देऊ शकला, गती देऊ शकला. कारण विज्ञानाची परंपरा उदा. गॅलिलिओ, केप्लर इत्यादी, उभी राह्यली आणि सामान्य माणसंही—खलाशी, शेतकरी-सैनिक, शेतकरी-कारागीर, व्यापारी, इत्यादी या चळवळीत ओढली गेली. त्यामुळे युरोपमध्ये रेनेसाँनंतर धर्मसुधारणेची म्हणजेच रिफर्मेशनची चळवळ समाजाच्या तळागाळात पोचली. त्यातूनच औद्योगिक क्रांतीची पायाभरणी झाली असं मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने “प्रोटेस्टंट एथिक्स अँण्ड स्पिरीट ऑफ वेस्टर्न कॅपिटॅलिझम” या ग्रंथात सविस्तर विशद केलं आहे. रिफर्मेशनच्या नंतर सुरु झालेल्या एनलाटन्मेंट या सांस्कृतिक आंदोलनाने क्रांतीच्या मशाली पेटवल्या.
“विज्ञानाच्या क्षेत्रात राबणार्या अनेक कष्टकर्य़ांच्या श्रमामुळे काळजीपूर्वक केलेल्या निरिक्षणाने पाखडून घेतलेल्या वस्तुस्थिती सामान्य नियमांनी एकत्र विणल्या जात होत्या. निसर्गाविषयीच्या ज्ञानाला वस्तुस्थितीचा भक्कम आधार लाभत होता आणि विज्ञानाचा आकार प्राप्त होत होता. सैनिक आणि खलाशी, इंजिनीयर आणि कारागीर ह्यांच्या अनुभवातून जी माहिती मिळत होती ती आता विज्ञान आत्मसात करू शकत होते. त्यांच्या समस्यांना आता कामचलाऊ, तात्पुरती उत्तरे मिळत नव्हती; ही उत्तरे विज्ञानाच्या हळूहळू रचल्या जाणार्या इमारतींचे भाग बनत होती.” अशा शब्दांत मे. पुं. रेगे यांनी रेनेसाँच्या कालखंडाची उपलब्धी मांडली आहे.
या प्रक्रियेची कारणं सामाजिक आणि राजकीय होती. मुसलमानांच्या अधिपत्याखालील जेरूसलेमसारखी पवित्र स्थळं परत मिळवण्यासाठी युरोपातील ख्रिश्चन देशांनी मोहिमा (क्रूसेडस्) सुरु केल्या ११-१२-१३ व्या शतकात. रेनेसाँची मूळं या काळात आहेत कारण या क्रूसेडसमुळे युरोपमध्ये सामाजिक स्थित्यंरं घडून आली. हजारो युरोपियन ख्रिश्चन या मोहिमांमध्ये सामील झाले. सैन्य भरतीसाठी युरोपातील भूदासांना म्हणजेच शेतकर्यांना जमीनीपासून मोकळं करणं सरंजामदारांना भाग पडलं. आपण शेतीपासून अर्थात गुलामीतून मोकळे होऊ शकतो ह्या अनुभवानेच शेतकर्यांमध्ये नवं चैतन्य संचारलं. हजारो युरोपियन या मोहिमांमधून सीरीया, पॅलेस्टीन, तुर्कस्थान, इजिप्त इत्यादी देशांमध्ये गेले. हजारो ठार झाले, पण कित्येक माघारी गेले. अरबस्थानात गेलेले युरोपियन अरबांच्या ऐश्वर्याने, प्रगतीने दिपून गेले. अरबांकडे गेलेला ग्रीक संस्कृतीचा वारसा, वैज्ञानिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नानाविध नव्या आणि चैनीच्या वस्तूंची ओळख त्यांना झाली. साखरेची चव सामान्य युरोपियनांनी म्हणजे सैनिकांनी सर्वप्रथम अरब राष्ट्रांमध्ये चाखली. या मोहिमांमधून परत आलेल्यांनी अनेक नवीन वस्तू आणि चैनीच्या चीजा आणल्या. त्यांची चटक सरंजामदारांना लागली. म्हणून पगाराच्या आणि काही हिश्शाच्या मोबदल्यात शहरातल्या आणि आजूबाजूच्या कारखान्यात काम करण्याची सवलत सरंजामदारांनी शेतकर्यांना दिली. त्यामुळे कारागीरांचा वर्ग निर्माण झाला. व्यापारी वर्गही तयार होऊ लागला. व्यापाराची आणि उद्योगधंद्याची केंद्रे म्हणून शहरं उदयाला आली. उद्योगांना, व्यापाराला नवीन रस्ते, दळणवळणाची साधनं यांची गरज भासू लागली. पतपेढ्यांचे, बँकांचे व्यवहार वाढू लागले. १४५३ मध्ये तुर्कांनी काँन्स्टॅटिनोपल ताब्यात घेतलं. त्याचं नामांतर इस्तंबूल करण्यात आलं. तिथे स्थायिक असलेले विद्वान आणि कलावंत पळाले आणि त्यांनी इटलीत आश्रय घेतला. हे पंडित आणि कलावंत यांना व्हेनिसच्या व्यापार्यांनी आश्रय दिला. त्यातून विचारमंथनाला सुरुवात झाली तेच रेनेसाँ.
कारखानदारी आणि व्यापारामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळालं. शहरीकरण वाढलं. शेती उत्पादनात घट झाल्याने आहारात बदल करणं भाग पडलं. वनस्पतीजन्य प्रथिनांपेक्षा प्राणीजन्य प्रथिनांकडे शहरी लोक वळू लागले. मासेमारी आणि पशुपालनाला प्रोत्साहन मिळालं. मांस आणि मासे टिकवण्यासाठी मीठ-मसाल्यांची गरज भासू लागली. भूमध्य समुद्रात युरोपिय उद्योजक आणि व्यापार्यांची दाटी झाली. त्यामुळे नव्या भूमीचा शोध गरजेचा बनला. त्यातच पूर्वेकडून येणार्या मसाल्याच्या पदार्थांच्या आणि अन्य वस्तूंच्या व्यापारावर अरबांचं नियंत्रण प्रस्थापित झाल्याने नवे सागरी मार्ग ही युरोपची गरज बनली. यामध्ये पोर्तुगीजांनी आघाडी घेतली. त्यांच्यापाठोपाठ स्पॅनिश स्पर्धेत उतरले. पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये साखरेचं उत्पादन तोपावेतो सुरुही झालं होतं. ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधासाठी निघाला आणि पोचला कॅरेबियन बेटांवर. स्पेनच्या राजाला पत्र पाठवलेल्या पत्रात तो म्हणतो—महाराज, आपल्याला लागेल तेवढं सोनं मी आपल्याकरता आणीन. मसाल्याचे पदार्थ, कापूस, गम, रेझिन्स असे अनेक पदार्थ मी मायदेशी घेऊन येईन. वास्को द गामाने पूर्वेकडे जायचा नवा सागरीमार्ग शोधून काढल्याने मसाल्याच्या पदार्थांची गरज भागू लागली होती. त्यामुळे नव्या जगात होणार्या अन्य अन्न पदार्थांवर युरोपची दृष्टी वळली.
शेती जोवर संस्कृतीच्या केंद्रस्थानी होती तोवर समाज खाऊन-पिऊन सुखी असतो किंवा ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’, या वृत्तीचा असतो. व्यापार केंद्रस्थानी येऊ लागल्यावर राहणीमानात, आचारविचारात, आहारात, भाषेत बदल होऊ लागतो. नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता तयार होते. दुसर्या प्रदेशावर राज्य करायचं तर आपल्या संपत्तीत वाढ करण्यासाठी हे सूत्रं भक्कम ठेवून युरोपिय देश नव्या प्रदेशांकडे पाहू लागले. नव्या भूमीवर साखर, कॉफी, कोको या नवीन पदार्थांची लागवड करण्यासाठी युरोपिय राष्ट्रांमध्ये होड लागली. ते पदार्थ लोकांच्या आहारात यायला हवेत म्हणून त्यांचा प्रचार करायचा. लोकांना नवीन सवयी लावायच्या, थोडक्यात आचरणात बदल घडवून आणणं हा केवळ विचार परिवर्तनाचा कार्यक्रम राह्यला नाही तर अर्थशास्त्राशी वा अधिक नेमकेपणे बोलायचं तर नफ्याशी जोडला गेला. चहा हे पेय केवळ भारतातच नाही तर युरोपातही ब्रिटीशांनी असंच लोकप्रिय केलं.
उसाच्या लागवडीसाठी अमेरिकेतील मूळ निवासींना गुलाम, वेठबिगार म्हणून कामाला जुंपण्यात आलं. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. हे सर्व पोपच्या धर्माज्ञेनुसार चाललं होतं. एदुआर्दो गॅलेनोने त्याच्या ग्रंथात पुढीलप्रमाणे नोंद केलीय.... जिवंत जाळण्याची शिक्षा दिलेल्या एकाला गुलामाला—अमेरिकेच्या मूळ रहिवाश्याला, युरोपियन धर्मगुरुने विचारलं की मेल्यानंतर तुला स्वर्गात जायचंय की नरकात. त्याला तर स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पनाच ठाऊक नव्हत्या. त्याने विचारलं गोरा माणूस कुठे जातो, पाद्री म्हणाला, स्वर्गात. मग मी नरकात जाईन, गुलाम उत्तरला आणि त्याच्या पायाखालची लाकडं कुरकुरत जळायला सुरुवात झाली.
उसाच्या मळ्यांमध्ये आणि साखर कारखान्यात कामाला जुंपलेले हजारो स्थानिक निवासी युरोपियनांच्या संपर्कात आल्याने अनेक रोगांना बळी पडले. शेकडो पळून गेले म्हणून एका कॅथॉलिक धर्मगुरुनेच स्पेनच्या राजाकडे मागणी केली की अमेरिकेतील स्थानिक निवासींऐवजी आफ्रिकेतल्या गुलामांना या कामाला जुंपावं. राजाच्या हुकूमानुसार १५०० गुलामांची पहिली तुकडी दक्षिण अमेरिकेतील उसाच्या मळ्यांवर आणि साखर कारखान्यात कामाला पाठवण्यात आली. त्यानंतर आफ्रिकेत पकडून आणलेल्या गुलामांचा ओघ अमेरिकेतल्या ऊसमळ्यांवर सुरु झाला. न्यू इंग्लड या वसाहतीत ब्रिटीश लोकांनी काकवी वा उसाच्या मळीपासून रम नावाचं मद्य बनवायला सुरुवात केली. काळ्या गुलामांच्या श्रमातूनच ही रम बनवली जात असे आणि क्रूर विनोद असा की या रमच्या मोबदल्यात आफ्रिकेतून गुलामांची खरेदी केली जाऊ लागली. त्यामुळे व्यथित झालेल्या शेर्मान एडवर्डस या गीतकाराने काकवी, रम आणि गुलामी यामुळे खणखणार्या पौंडाच्या तालावर आपण नृत्य करावं का ? असा सवाल केला. मोलॅसिस टू रम हे त्याचं गीत खूप लोकप्रिय झालं. इसवीसन १७०० पर्यंत साखर आणि गुलामी हे युरोपमध्ये समानअर्थी शब्द बनले. त्यामुळे गुलामगिरी नष्ट करू पाहणारे साखरेवर बहिष्कार घालण्याच्या गोष्टी करू लागले. एका निग्रोची कैफियत या कवितेत विल्यम कॉपर या कवीने नेमका हाच प्रश्न विचारला..
आम्ही ज्यासाठी राबतो ती वनस्पती निसर्गाने निर्माणच का केली ?
श्वासांनी त्याला वारा घालावा लागतोय, अश्रूंनी सिंचावं लागतंय
आमच्या घामांनी मातीला वस्त्र चढवावं लागतंय
हे दगडी हृदयाच्या मालका
आनंदाने लोळतो आहेस
विचार कर किती लोकांनी आपल्या पाठी मोडायच्या
तुझ्या उसातल्या साखरेसाठी
इंग्लडातील या असंतोषाची दखल घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या साखरेच्या जाहिरातीत बदल केला—ईस्ट इंडिया साखरः गुलामांनी बनवलेली नाही. कंपनीने गुलामांना कामाला जुंपलेलं नव्हतं हे खरं पण मळ्यावर आणि कारखान्यात काम करणार्या मजूरांना तुटपुंज्या मजूरीवर राबवून घेतलं जात होतं. अठराव्या शतकात आफ्रिका खंडातली लोकसंख्या घटल्याने गुलामांच्या किंमती वाढल्या, दक्षिण अमेरिकेतील ऊसमळ्यांमुळे साखरेच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याने किंमती कोसळल्या. फ्रेचांनी साखरेच्या उत्पादन खर्चात बचत केल्याने ब्रिटीश साखर कारखानदार बाजारपेठेबाहेर फेकले गेले.
१७७५ मध्ये प्लासीच्या विजयानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल भारतात स्थिरावला. खुल्क खुदाका, मुल्क बादशाहका अंमल कंपनी सरकारका, अशी स्थिती निर्माण झाली. उत्तर भारत, बिहार आणि बंगाल या प्रदेशातील शेती उत्पादनांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कंपनीने डॉ. फ्रान्सिस बुकानिन या संख्या शास्त्रज्ञावर सोपवली. १८०८ ते १८१५ या सात वर्षांच्या कालावधीत बुकानिनने अत्यंत काळजीपूर्वक माहिती गोळा करून आणि तपासून आपला सविस्तर अहवाल कंपनीला सादर केला. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात रोमेशचंद्र दत्ता यांनी या अहवालाच्या आधारे असं नोंदवलंय की उत्तर भारत, बिहार आणि बंगाल या प्रांतात उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती. गूळ, खांडसरी आणि साखरेचं उत्पादनही घेतलं जात होतं. पण उच्च दर्जाच्या साखरेचा उत्पादनखर्च अधिक होता. वेस्ट इंडिज बेटावरील उसाच्या जाती आणि इथल्या उसाच्या जातींत फरक नव्हता पण उत्पादन प्रक्रियेत व्यावसायिकता नव्हती. याचा अर्थ गंगा-यमुनेच्या खोर्यात साखरेचा शोध इसवीसनापूर्वी लागलेला असला तरिही व्यापार, कार्यसंस्कृती आणि मागणीप्रधान उत्पादनाचा अभाव असल्याने ऊस वा साखर उत्पादनाच्या तंत्रात अजिबात प्रगती झाली नव्हती. अरब आणि त्यानंतर युरोपियन लोकांनी साखर उत्पादनाच्या तंत्रात आणि उपपदार्थांच्या उत्पादनात कमालीची प्रगती केली होती. फक्त सामाजिक चालीरीतीबाबतच नाही तर उत्पादन आणि बाजारपेठ यामध्येही आपण परंपरानिष्ठ होतो आणि आहोतही. भोपाळमध्ये पारंपारिक भारतीय तंत्रज्ञानाचं कायमस्वरूपी प्रदर्शन मांडण्यात आलंय. आदिवासी जमातींनी शोधून काढलेले उसाचे चरक, तेलघाण्या इत्यादी यंत्रं तिथल्या कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवली आहेत. आजही पुण्याच्या किंवा सातार्याच्या रस्त्यावर त्याच तंत्रानुसार उसाचा रस काढला जातो. जातिव्यवस्था ही उत्पादन व्यवस्थाही होती. गंमतीची बाब म्हणजे ह्या उत्पादन व्यवस्थेचा बाजारपेठेशी फारसा संबंध नव्हता. केवळ जगण्यापुरतं उत्पादन करण्याशी होता. बलुतेदारांना मिळणारं बलुतं आणि त्यांच्या कष्ट आणि कौशल्याचं बाजारमूल्यं ह्यांचा परस्पर संबंधच नव्हता. त्यामुळे कुशल कारागीराला तंत्रात वा यंत्रात संशोधन करावं, त्याची उत्पादन क्षमता वाढवावी यासाठी इन्सेटिवला वावच ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे बाजारपेठेसाठी ठोक उत्पादन करावं अशी प्रेरणाच भारतीयांना झाली नाही. अर्थातच साखरेचा शोध लावूनही साखर तंत्रज्ञानात, साखर उद्योगात आपण मागासलेले ठरलो.
अठराव्या शतकापर्यंत साखरेवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग निर्माण व्हायला सुरुवात झाली पण साखरेचं सेवन प्रामुख्याने घरगुती होतं. साखर उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यावर, साखरेच्या ठोक पुरवठ्याची हमी मिळू लागल्यावर अन्न प्रक्रिया उद्योग विस्तारू लागले. महात्मा फुलेंनी आपल्या “शेतकर्याचा असूड” या ग्रंथात त्यांची नोंद घेतलेली आहे. विलायतेहून रुचीरुचीचे हलवे, मुरंबे, लोणची...इत्यादी सामान येऊ लागल्याने भारतातील कारागीर आणि कसबी जाती दारिद्र्यात लोटल्या गेल्या असं निरिक्षण म. फुलेंनी नोंदवलं आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अन्न प्रक्रिया उद्योगांची साखरेची गरज वाढली. त्यांनीच साखरेचं व्यसन समाजाला लावलं असं म्हणता येईल. कारण साखरेचा घरगुती वापर फारसा नसतो. दिवसाला आपण किती चहा पितो वा किती वेळा घरात पक्वान्न केली जातात. साखरेचं सेवन शीतपेयं, बिस्कीटं, केक, अन्य मिठाई यातून अधिक होतं. अन्न प्रक्रिया उद्योगांची जागतिक साम्राज्यं निर्माण व्हायला सुरुवात झाल्यानंतर साखर उद्योगावरील सरकारी नियंत्रणात वाढ होऊ लागली. सरकारचा हस्तक्षेप कळीचा ठरू लागला. जगातल्या फारच कमी देशांमध्ये साखर उद्योग नियंत्रणमुक्त आहे.
उसाच्या किंमत ठरवण्यात सरकारची भूमिका महत्वाची नाही तर कळीची असते. प्रत्येक कारखान्याला सरकारला लेव्ही साखर द्यावी लागते. म्हणजे एकूण उत्पादनाच्या दहा टक्के, सरकारी दराने. ही साखर सार्वजनिक शिधा वाटप यंत्रणेमार्फत वितरीत केली जाते. खुल्या बाजारपेठेत कारखान्याने किती साखर केव्हा विकायची हा निर्णयही सरकार घेतं. किती साखर निर्यात करायची हेही सरकार ठरवतं. साखरेच्या किंमती स्थिर राहाव्यात वाढू नयेत यासाठी सरकार ही खबरदारी घेतं. मुद्दा असा की साखरेच्या किंमती बाजारपेठेच्या शक्तींनी का नियंत्रित करायच्या नाहीत. साखर हा काही जीवनावश्यक पदार्थ नाही वा ते अन्नही नाही. गहू, तांदूळ, डाळी यांच्या व्यापारावरील वा किंमतीवरील सरकारचं नियंत्रण समजण्याजोगं आहे. साखर महाग झाली तर गरीब वा मध्यमवर्गीयांची उपासमार सुरु होणार नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पोषण संस्था यांची साक्ष काढली तर धट्ट्याकट्ट्या माणसाच्या रोजच्या आहारात साखरेचं प्रमाण फक्त १० ग्रॅम असावं. साखर म्हणजे शून्य पोषणमूल्यं असलेल्या कॅलरिज वा उष्मांक. मात्र तरिही साखरेचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात करण्यात आलाय. एकूण साखर उत्पादनाच्या केवळ ३० ते ३५ टक्के साखर घरगुती वापरासाठी खरेदी केली जाते. उरलेली सर्व साखर शीतपेयं, बिस्कीटं, चॉकोलेटं, गोळ्या, मिठाई इत्यादी प्रक्रिया उद्योगांमध्ये वापरली जाते. या मार्गाने जी साखर आपण खातो त्यासाठी आपण किती पैसे अधिक मोजतो? एक किलो मिठाईची किंमत ३०० रुपयांच्या आसपास असते. त्यातलं साखरेचं प्रमाण ४०० ग्रॅम असतं. २८ ते ३० रुपये किलोची साखर, मूल्यवर्धित उत्पादनात किती पटीने विकली जाते याचा अंदाज मिठाईच्या किंमतीवरून येऊ शकतो. तीच गत कोणत्याही शीतपेयाची वा चॉकलेट, गोळ्या इत्यादी उत्पादनांची आहे. साखरेच्या किंमती कमी असण्याचा फायदा या उद्योगांना होतो. शेतकर्यांना उसाचा दर देताना मात्र कारखान्याच्या उत्पादन खर्चाचा घोळ सरकारी यंत्रणा घालते. त्याच बरोबर साखर कारखान्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत देण्याच्या उपाययोजनाही सरकारयंत्रणेच्या सुपीक डोक्यातून निघतात. साखर उद्योग सरकारी नियंत्रणातून मुक्त होणं केवळ शेतकर्यांच्या हितासाठीच नाही तर समाजाच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे.