पूर्व दिशेला जाऊ लागलो की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बदलतात. मुंबईत संध्याकाळ सुरु होते ऑफिसातून बाहेर पडल्यावर म्हणजे सहा किंवा सात वाजता. रात्र सुरु होते दहा वाजता. गोहाटीत, शिलाँगला किंवा ईशान्य भारतात संध्याकाळ सुरु होते पाच वाजता. सिनेमा, नाटक, प्रदर्शनं यांची थोडीफार रेलचेल गोहाटीला. अतिरेकी संघटनांचा सुकाळ आणि स्थानिक, परदेशी, परप्रांतीय, आदिवासी, मैदानी असे अनेक तणाव. त्यामुळे संध्याकाळी रस्त्यावर पोलिस नव्हे तर केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक. वातावरणात एक अनिश्चितता रेंगाळू लागते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात धुकं. रस्त्यावरचे दिवेही मलूल भासू लागतात. स्वेटर, कोट, कानटोप्या, शाली यांनी झाकलेली माणसं रिक्षात, मोटारीत, रस्त्यावर दिसू लागतात. कोणाचाही भरवंसा वाटत नाही. लांबलचक संध्याकाळ दारूच्या प्याल्यात बुडवणं सोईचं असतं. बार ओस पडलेले असतात आणि वाइन शॉप बराच वेळ उघडी असतात. बहुतेक लोक घरी बसूनच पितात. दारूचा रोमान्स बिल्कुल नाही.
ईशान्येच्या जवळपास सर्वच राज्यात स्त्रिया तुलनेने निर्धास्त दिसतात. तिथे कोणी पडदा वा बुरखा वापरत नाही. अगदी मुसलमान स्त्रियाही. चहा-सिग्रेटच्या टप-या, रेस्त्रां, दारूसह अनेक छोटी-मोठी दुकानं स्त्रिया चालवतात. रेस्त्रांमध्ये वेटरचं काम करण्यापासून ते गल्ल्यावर बसण्यापर्यंत अनेक कामं त्या करतात. छेडछाडीच्या घटना अपवादाने घडतात. लैंगिक छळाच्या घटना वा गुन्हे यांचं ईशान्येतील राज्यांमधलं प्रमाण इतर देशाच्या तुलनेत खूपच कमी असावं.
ईशान्य भारतात बारक्या चणीचेच लोक दिसतात. धिप्पाड, मजबूत देहयष्टीचे लोक अपवादानेच आढळतात. आदिवासी असोत वा नेपाळी, भुटिया किंवा बंगाली वा आसामी सर्व बारक्या चणीचे. बाजारात, दुकानात, रेल्वे स्टेशनात, बस स्टँडवर किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी भांडण करणारे, हमरीतुमरीवर आलेले लोक अपवादानेच दिसतील. गुर्मी एकंदरीतच कमी आढळते. माणसाचं जीवन कम्युनिटीमध्ये बंदिस्त असतं कारण समूहातच सुरक्षा असते. अभिजीतच्या लग्नाला बहुसंख्य पाहुणे, नातेवाईक बंगालीच होते. त्यातही पूर्व बंगालातून स्थलांतरीत झालेले. लग्न चार-आठ दिवस चालतं याचं एक कारण बिरादरीची वीण घट्ट करणं हेही असावं. मुसलमान, हिंदू, अहोम, आसामी, बंगाली, तिवा, लालुंग, सुतिया, खाँसी, जैंतिया, गारो, नागा सर्वच लोक आपआपल्या बिरादरीत सुरक्षित असतात. समूहामुळेच ते नैसर्गिक संसाधनांवर वा आपल्या जिविकेवर नियंत्रण ठेऊ शकतात. किंबहुना हेच ईशान्य भारतातील बहुतेक सर्व वांशिक संघर्षांचं मूळ कारण आहे.
समूह जीवनात सुरक्षितता शोधायची आणि जगण्याच्या आकांक्षा व्यक्तीवादाच्या, हा ईशान्य भारतातला नवा तणाव आहे. व्यक्तीकेंद्री जगण्याच्या चौकटीला समूहाचा भक्कम आधार असतो परंतु हा समूह अस्मिता नसलेला बिनचेहे-याचा असतो. त्याचं नियंत्रण राज्य घटना, लिखित कायदे-कानून आणि त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यांच्यामार्फत होतं. भाषा, धर्म, जात, जमात, वंश हे या समूहाचे आधार नसतात. अर्थात या तणावातूनच ईशान्य भारतातली संस्कृती नवी वळणं घेऊ लागली आहे.
१९८३ साली मी पहिल्यांदा आसामला गेलो त्यावेळी आसामी लोक ‘चहा’ला ‘सा’ म्हणत असत. आसामी भाषेत ‘च’ नव्हता. त्यांचा चहा बहुधा बिन दुधाचा असायचा. नागालँण्डमध्ये फिकाचाय प्यायचे. म्हणजे बिन दुधाचा, बिन साखरेचा चहा. आता सर्वत्र चहा मिळतो, म्हणजे दुध आणि साखर घातलेला. ‘चहा’ हा शब्दही आसामी भाषेने आपलासा केला आहे. त्याच्यासोबत ‘च’ ही आसामी झालाय. १९८३ साली ईशान्येतल्या पहाडी वा आदिवासी राज्यांमध्ये बियांची केळी मिळायची. सिताफळ खातो तशी बिया थुंकत ती खायला लागायची. २००५ साली नागालँडच्या दुर्गम भागातही मला बिनबियांचीच केळी मिळाली. बियांची केळी पार जंगलातच असतात ती विकायला येत नाहीत असं एका नागा बाईने सांगितलं. पहाडी राज्यात केळी सोडली तर कोणतंही स्थानिक फळं गोड नव्हतं. खाण्यायोग्य सर्व फळं आंबट, तुरट वा कडवट होती. आता सर्व राज्यांमध्ये अननस, पपया, संत्री, पेरू यांची लागवड केली जाते. अरुणाचल प्रदेशात तर सफरचंदाचंही उत्पादन घेतात.
बँण्डस्ची संस्कृती आता ईशान्येत हळूहळू रुजू लागली आहे. विशेषतः पहाडी राज्यांमध्ये. तिथल्या तरूणांची नाळ हिंदी, बंगाली वा आसामी गाण्यांपेक्षा पाश्चात्य संगीताशी चटकन् जुळते. त्यांचे बँण्डस् आहेत, त्यांच्या स्पर्धाही होत असतात. शिलाँग, चेरापुंजी हिंडण्यासाठी आम्ही गाडी ठरवली होती. ड्रायव्हरने फ्लॅश ड्राईव्हवरची गाणी वाजवायला सुरुवात केली. त्यामध्ये पारंपारिक आसामी संगीत, बंगाली संगीत, हिंदी चित्रपटांमधली गाणी आणि सर्वाधिक पाश्चिमात्य अर्थात इंग्लिश गाणी होती. संध्याकाळी शिलाँगला परतलो. अभिजीतच्या घरी गेलो. लग्नघर सजलं होतं. रोषणाई वगैरे. नातेवाईक, मित्र आले. कोणीतरी हार्मोनियम काढलं. आणि मानोषने रविंद्र संगीत म्हणायला सुरुवात केली. सिल्चरहून आलेले नातेवाईक लहान-थोर सर्वच, रविंद्र संगीत ताला-सुरात म्हणू लागले. त्यावर पारंपारिक नृत्यही सुरु झालं. थोड्या वेळाने अंगणात दिवे वगैरे लावून वेस्टर्न पॉप म्युझिक वाजू लागलं. काही क्षणांपूर्वी रविंद्र संगीतात दंग झालेली तरुण पिढी पॉप म्युझिकच्या तालावर थिरकू लागली आणि बुजुर्ग टाळ्या वाजवत त्यांचे हौसले बुलंद करत होते.
"matriarchy" or "matrusattak paddhat" is practised in NE region,,, and ur observation about women's prominences in society is obvious
ReplyDeleteप्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteमातृसत्ताक समाजरचना खाँसी, जैंतिया आणि गारो या मेघालयातील तीन जमातींमध्ये आहे. ईशान्येतील अन्य राज्यांमध्ये पुरुषसत्ताक वा पुरुषप्रधान समाजरचना आहे.