Tuesday 25 May 2010

भाषा बदलली की जीवनाचं ज्ञानही बदलतं?

डोक्याला मुंडासं, डोळ्यांवर गोल काड्यांचा चष्मा, उभ्या रेघांचा शर्ट त्यावर कोट आणि गळ्याभोवती उपरणं. हे चित्र होतं, लोणची आणि लोणच्याचा मसाला बनवणार्‍या कंपनीच्या संस्थापकाचं. (तो मराठी भाषक होता.) त्याच्यासोबत जाहिरातीचा मजकूर—बाजारीच परंतु उंची मसाल्याचे पदार्थ आणून त्यांनी मसाले आणि लोणची बनवायला सुरुवात केली. मासिकातल्या जाहिरातीचं हे वर्णन आहे. मी शाळेत असताना अनेक मासिकांमध्ये ही जाहीरात पाह्यला मिळायची. लोणची, लोणच्याचा मसाला हे उत्पादन बाजारातच विकणार, त्यासाठी लागणारा कच्चा माल बाजारातूनच विकत घेणार पण बाजाराबद्दल मराठी माणसाला तितकासा विश्वास नव्हता त्यामुळे आमचं उत्पादन घरगुती आहे म्हणजे निगुतीने बनवलेलं आहे, असं एक कंपनी सांगत होती.

बाजार या शब्दाचं मराठी भाषेला प्रेम नाही. बाजारबसवी हा शब्द वानगीदाखल दाखवता येतो. मुंबईतले कोकणी लोक रविवारी मासळी आणायचे. त्याला बाजार केला असं म्हणायचे. माझे सासरे अजूनही घरात मासळीचं जेवण झालं की म्हणतात, बाजार चांगला होता. म्हणजे मासे वगळता सर्व पदार्थ वा जिनसा जणू घरातल्याच असतात. बाजार म्हणजे टाळता न येण्याजोगं पाप त्यामुळे त्याचं जीवनातलं स्थान जेवढं कमी तेवढं उत्तम, अशीच मराठी भाषेची धारणा असावी.

जमीनदारी-भांडवलदारी नष्ट कराया चला रं, असं गाणं सेवादलात असताना सुरेश पगारेने रचलं होतं. आम्ही ते म्हणायचोही उत्साहात. जमीनदार हा शेतकर्‍यांचं, म्हणजे जमीन कसणार्‍यांचं शोषण करणारा असं भाषेतून आमच्या मनावर बिंबवलं गेलं. महाराष्ट्रात जमीनदारी नव्हती. सावकारी होती (अजूनही आहे). गावगाडा या पुस्तकात जमीनदारी हा शब्दच नाही. बिहार, बंगालातली जमीनदारी मराठी भाषेत केव्हा आली हे तपासायला हवं. बळीराजा हा शब्द शेतकर्‍यासाठी योजला जातो. परंतु हा शब्दही बहुधा दुष्काळी प्रदेशातूनच आला असावा. गंगा, यमुना, सिंधू या नद्यांच्या सुपिक खोर्‍यांमधल्या शेतकर्‍यांना बळीराजा हा शब्द ठाऊकही नसेल.

पंजाबात गेलो तेव्हा कळलं की तिथले सावकार शेतकर्‍यांना जमीनदार म्हणतात. शेती दोन एकर असो की ५० एकर, सर्व जमीनदार असतात. हे जमीनदार अवाच्या सव्वा दराने सावकाराकडून कर्ज घेतात. अनेक कर्जबाजारी जमीनदार आत्महत्या करतात. हिंदी आणि पंजाबी भाषक समूहांचा शेती आणि शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे.

नागालँडमध्ये गेलो तेव्हा माणूस या शब्दाला नागा भाषांमध्ये काय प्रतिशब्द आहे याची चौकशी केली. नागालँडमध्ये १७ प्रमुख जमाती आहेत. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे. सेमा, अंगामी, चाकसांग, आओ या जमातींच्या प्रदेशात मी हिंडलो. तिथे कळलं की सेमा म्हणजे माणूस, अंगामी म्हणजेही माणूसच. म्हणजे जो आपल्या जमातीचा आहे तो माणूस. दुसर्‍या जमातीचा सदस्य माणूस नाही? प्राणी आहे? आपला शत्रू आहे? की माणूस म्हणजे कोणत्या तरी जमातीचा सदस्य? असे प्रश्न मला पडले.

प्रत्येक भाषेचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. प्रत्येक भाषेचं जीवनाचं ज्ञान वेगळं असतं. म्हणूनच काही भाषा शास्त्रज्ञ म्हणतात की एखादी भाषा नष्ट होते तेव्हा त्या भाषेतल्या ज्ञानाला अवघी मानवजात मुकते. असं अशोक शहाणेने एका ईमेलमध्ये लिहिलं. त्यामुळे या स्मृती जाग्या झाल्या.

5 comments:

  1. मस्त लिहिलंय.

    एक गंमत आठवली यावरून - आपल्या भाषिक परंपरेत कपडा म्हणजे मुख्यतः सुतीच. किंवा सूत म्हणजे कापसाचंच. पण हेच थंड प्रदेशातल्या जर्मन भाषेत कापूस या अर्थी जे शब्द वापरतात, तो आहे Baumwolle - म्हणजे झाडाची लोकर!

    भाषा नष्ट होण्याविषयीचं ते विधान अगदी खरं आहे.

    एक भाषा शिकणं म्हणजे जगाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन शिकणं असं आमचे सर म्हणायचे.

    ReplyDelete
  2. जर्मन भाषेत कापसाला झाडाची लोकर म्हणतात त्याचं कारण हॅरोडोटसच्या हिस्ट्री या ग्रंथात आहेत. ज्याला प्रागऐतिहासिक काळ म्हणतात तेव्हा तो भारताच्या सीमेपर्यंत येऊन गेला होता. भारतात कापसापासून तयार केलेले कपडे वापरतात याची नोंद त्याने आपल्या ग्रंथात केली. कारण आशिया आणि युरोपातले बहुसंख्य समूह त्या काळात लोकरीचेच कपडे वापरायचे. हेरोडोटसने म्हटलंय....
    “They posses a kind of plant which instead of fruit, produces wool of a finer and better quality than that of sheep; of this the Indians make their clothes,” (History, 445 BC) म्हणून जर्मन भाषेत कापूस म्हणजे झाडावरची लोकर ठरली असावी.
    असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    सुनील

    ReplyDelete
  3. Bhashach nahi tar bhashetale kahi Shbada hee mage padale, vapratun baad zale ki tyacha jagnyatala sandarbh sampla ase mhanave ka ?
    aaj Sakalich VANOLA ya shbdawarun ashich characha zali..Vanola ya shabdachi ukal sangata sangata asech kahise manat yeun gele hote..:) thanks..lekh mastch..!

    ReplyDelete
  4. Bajar shabdavaroon kelela vinod farch patanya sarkha aahe............

    ReplyDelete