रात्री आकाशकडे पहात असताना ब्रम्हांड डोळ्यापुढून सावकाश सरकत जातं. हिंदूचं पहिलं प्रकरण वाचताना मला नेमकं तसं वाटलं. मोहेंजो-दडो या अतिप्राचीन नगरीच्या उत्खननाच्या जागतिक प्रकल्पावर, काम करणारा खंडेराव हा होतकरू पुरातत्वज्ञ अवघ्या जगाला आव्हान देणारं आपलं संशोधन जागतिक परिषदेत मांडतो आणि मोहेंजो-दडो ते तापी खोर्यातलं मोरगाव यांचा जैविक संबंध प्रस्थापित करू पहातो. पहिल्याच प्रकरणात येणारं मोरगावही विश्वरुप दर्शनासारखं भासतं.
निरीक्षण शक्ती, किस्से, गोष्टी, भाषासांस्कृतिक जाण वा भान, ह्या साहित्योपयोगी सामग्रीचा विचार करता नेमाडे हा गडगंज कुबेर आहे, अशी प्रतिक्रीया एका मित्राने एसएमएसद्वारे दिली. मला या शब्दकळेचा परिचय नाही पण त्यातली लयकारी पद्याच्या जवळ जाणारी म्हणून विलक्षण प्रभावी वाटली. कालानुक्रमाने गोष्ट सांगण्याची मळलेली वाट नेमाडे यांनी सोडून दिल्याने, काळाचं आकुंचन-प्रसरण करण्याचं वेगळं तंत्र त्यांना शोधावं लागलं. हे तंत्रं कितपत यशस्वी ठरलंय याचा निवाडा पहिल्या प्रकरणात करणं अवघड आहे. मात्र अनेकवचनी भूतकाळी हा परवलीचा शब्द उच्चारण्यापूर्वीच हिंदू वाचकावर गारुड करते, हे खरं.
खंडेराव जे पाहतोय, वागतोय, जगतोय तेच पाहतोही आहे. या साक्षी भावाच्या सूत्राने कादंबरीची सुरुवात होते. विश्राम बेडेकरांनी आपल्या आत्मचरित्रासाठी निवेदनाचं हेच सूत्र पकडलं आहे. साक्षी भावाचं हे सूत्र आत्मचरित्राला फारसं उपयोगी नाही हे एक झाड दोन पक्षी वाचल्यावर ध्यानी येतं. खंडेरावाच्या चरित्राला ते कितपत उठाव देतं हे कादंबरीची पानं जशी वाचत जाऊ तसं कळेलच.
श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न कृषिसंस्कृती हळूहळू परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्या नागरी ऐतखाऊ औद्योगिक, व्यापारी, कोळसा-पेट्रोलादी खनिजांवर धावणार्य़ा शोषण संस्कृतीचा विजय झाला. हेच महानगरी संस्कृतीच्या र्हासाचं प्रमुख कारण आहे. आजची मुंबई, न्यूयॉर्क, लंडन इत्यादी शहरही मोहेंजो-दडो प्रमाणेच निर्ममनुष्य होतील, अशी शक्यताही खंडेराव वर्तवतो.
धर्माची तत्व कोणती का असेनात कृषीसंस्कृती वा सरंजामशाही कालखंड कधीही मूलतत्ववादी नव्हता. त्यामुळेच तर डॉ. जलील बोलताना, इस्लाममधले हीनयान आणि शिया पंथ घ्या की हिंदूचे बौद्ध आणि सुन्नी पंथ घ्या, कॅथलिक आणि शैव—सॉरी वैष्णव आणि प्रोटेस्टंट—सॉरी.... अशी अर्थपूर्ण गफलत करतात. धर्म आणि त्याची तत्वं यापेक्षा लोकजीवन हेच महत्वाचं असतं. ते जीवन जर श्रमाला अर्थातच शेतीला केंद्रीभूत मानून असेल तर धर्मभेद, जातिभेद, भाषाभेद यांचा बडेजाव चालत नाही. किंबहुना विविध धर्म, पंथ, जाती, भाषा यांनी सामावून घेणारी एक समृद्ध संस्कृती तयार होते. जगातील कोणात्याही समूहाच्या वाट्याला येणार नाही असा समृद्ध भूतकाळाचा अवकाश हिंदूंना ज्यामध्ये आताच्या पाकिस्तानातील वा अफगाणिस्तानातील मुसलमानही येतात, यांना प्राप्त झाला आहे, असं खंडेराव म्हणतो.
प्रो. सांखळीया म्हणजे पाश्चात्य दृष्टीपासून न ढळणारे पण प्रामाणिक, निष्ठावान पुरातत्वज्ञ आहेत. प्रो. मंडी इंग्लडची असली तरी मूळात स्कॉटलंडची आहे. तिला खंडेरावाच्या दृष्टीकोनाबद्दल आस्था आहे. युरोपियन श्रेष्ठत्वाच्या गंडाची छाप अनेक समाजशास्त्रीय सिद्धांतांवर आहे. त्यातून सुटका करून घेतल्याशिवाय विविध मानवसमूह, त्यांच्या जाणिवा, संस्कृती आणि म्हणून त्यांचं वर्तमान यांचा उलगडा करता येणार नाही या खंडेरावाच्या दृष्टीकोनाशी ती सहमत आहे. पाश्चात्य विरुद्ध देशी यासोबतच ब्राह्मणविरोधाचंही भक्कम सूत्रं या कादंबरीला आहे. नेमाडेंचा ब्राह्मणविरोध त्यांच्या श्रमसंस्कृतीच्या बांधिलकीतून आलेला आहे. जगण्यापेक्षा भाषेला केंद्रस्थानी आणण्याचा उपद्व्याप इंग्रजीच्या आधी संस्कृतने केलेला होता.
नेमाडेंच्या आधीच्या कादंबर्यांतील स्त्रियांचं चित्रण पुरेसं सखोल नव्हतं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे या नेमाडेंच्या सख्ख्या मित्राने अशी टीका केली होती. सलामीच्या प्रकरणातच तिरोनी आत्याचं तपशीलवार चित्रण करून पुढच्या प्रकरणांमध्ये अनेक बायकांच्या गोष्टी वाचायला मिळतील याची सूचना नेमाडे यांनी दिली आहे. पहिल्या प्रकरणातच वाचक मोरगावला पोचतो. हरखू (अफगाणिस्तानातील शरयू नदी), भावडू, खंडेरावाचे पूर्वज, आई-वडील, आत्या अशा अनेक पात्रांशी त्याचा परिचय होतो. त्यांच्या गोष्टी पुढच्या प्रकरणात वाचायला मिळणार हे सहजपणे ताडता येतं.
अनेकवचनी भूतकाळात रमायला होतंच. कारण तिथे आधुनिक तंत्रज्ञान पोचलेलं नसतं त्यामुळे समाजातील अंतर्विरोधाची तीव्रताही कमी असते. आधुनिक काळातच समाजातील अंतर्विरोध तीव्र आणि गुंतागुंतीचे होतात.
पहिलं प्रकरण वाचताना मी पंजाबात होतो. ते संपेपर्यंत चंडिगडहून विमान मुंबईच्या विमानतळावर झेपावलं. दोन दिवस अनेक कामांमध्ये अडकून पडलो. मग पुण्याला जाणं झालं. मागच्या गुरुवारी रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे भोपाळला जावं लागलं. दुसरं प्रकरण वाचायची सवड मध्य प्रदेशात मिळाली. विंध्याचलात. तिथे मी फणिश्वरनाथ रेणूंच्या दोन कादंबर्या विकत घेतल्या. मैला आँचल आणि परती परिकथा. मैला आँचल ही मेरीगंज या गावाची कहाणी आहे तर परती परिकथा, परानपुर या गावाची गाथा आहे. दोन्ही गावातली लोकसंस्कती, राजकारण, जातीचे आणि वर्गाचे अंतर्विरोध, भाषा, धर्म याचं मर्मग्राही चित्रण रेणूंनी केलं आहे. मैला आँचल ही कादंबरी १९५० च्या दशकात प्रसिद्ध झाली. ती कादंबरी हिंदी नाहीच असाच आक्षेप घेण्यात आला होता. कारण ती बिहार मधील पूर्णिया जिल्ह्याच्या भाषेतच लिहिण्यात आलीय. हिंदी, बिहारी, पूर्णिया जिल्ह्यातली लोकभाषा, नेपाळी, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा रेणूच्या साहित्यात डोकावतात. हिंदूची पुढची प्रकरणं मी रेणूच्या कादंबर्यांसोबत वाचायचं ठरवलं.
No comments:
Post a Comment